‘ओरिजिनॅलिटी’ म्हणजे उत्तमाच्या ध्यासासह मूळ आणि अस्सल असण्याची प्रवृत्ती. ‘संशोधक का नाहीत?’ या नारायण मूर्तीच्या प्रश्नाशी सहमत होताना, या प्रवृत्तीच्या अभावाचा शोध समाजातूनही  घ्यायला हवा..
इन्फोसिसचे माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी अलीकडेच, आपल्याकडे कोणतेही नवे संशोधन होत नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि तीही संशोधक विद्यार्थ्यांसमोर. याहीनंतर अगदी परवाच, शिक्षकांसमोरही त्यांनी हाच प्रश्न मांडला. संशोधन होत राहण्यासाठी पैसा नाही, पुरेसे संस्थात्मक पाठबळ नाही किंवा संशोधन आणि उद्योजकीय वापर यांच्यातील पूल पुरेसे भक्कम नाहीत, ही कारणे यापूर्वीही वारंवार दिली गेली आहेत. त्यांत तथ्य आहेच, परंतु नारायण मूर्ती यांनी उपस्थित केलेला प्रश्न त्यापलीकडला आहे. आपल्याकडे एकूणच शोध का लागत नाही, नवनिर्मिती का होत नाही, विज्ञान-तंत्रज्ञानातील दूरवर परिणाम करणारे शोध आपल्याकडे का लागत नाहीत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. काही वर्षांपूर्वी शोधनिबंधांमध्ये नवीन का आढळत नाही असा लेख डॉ. अशोक रा. केळकर यांनी लिहिला होता. व्ही. एस. नायपॉल यांनीही एके ठिकाणी म्हटले आहे, ‘भारतीयांना तयार मॉडेल द्या, मग ते त्यावर निर्मिती करून दाखवतील.’
आपल्याकडे ओरिजिनॅलिटी का नाही? असा खरे तर प्रश्न विचारायला हवा आणि त्याचे उत्तर शोधायला हवे.
काही कारणे अशी संभवतात :
१) परंपरा : आपल्या परंपरेत मोठय़ांना मान देणे, त्याचे अनुकरण करणे, त्यांना आदर्श मानणे हे प्रकार रास्त मानले गेले आहेतच. पण गुरूला अवास्तव महत्त्व देणे, त्यांना उलटे प्रश्न न विचारणे आणि त्यांची तंतोतंत नक्कल करणे हे आदर्श मानले जाते. आपली महान परंपरा शास्त्रीय संगीताची. त्यात शिष्य केवळ अनुकरणच करत नाहीत तर ‘अगदी गुरूसारखे गातात.’ ही दाद मिळाल्यावर, अनेक शिष्य समाधानीही होतात.
२) शिक्षणपद्धती :  आपल्याकडे ऑब्जेटिव्ह शिक्षण पद्धत आहे. म्हणजेच एका वाक्यात उत्तरे द्या, किंवा होय किंवा नाही अशी उत्तरे द्या. अशा प्रकारचे शिक्षण मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल इत्यादींमध्ये दिले जाते. विचार करण्यास प्रोत्साहन देणारे प्रश्न आपल्याकडे विचारले जात नाहीत. तसे विचारले तर ते कठीण वाटतात. १९८० सालच्या दहावीच्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत गणिताच्या पेपरमध्ये  एका खोक्याची लांबी, रुंदी आणि उंची देऊन त्यामध्ये जास्तीत जास्त किती लांब आकाराची काठी राहू शकेल असा प्रश्न विचारला होता. प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अशा पेटीचा (घनाचा) कर्ण शोधणे आवश्यक होते. ‘अ’अधिक ‘ब’ बाजूचा कर्ण काढून मग ती लांबी आणि पेटीची उंची ‘क’ यांच्या साहाय्याने काठीची लांबी काढता येते. पण अनेक मुलांना हा प्रश्नच कळला नाही. संशोधनच नव्हे तर चांगलं काम, टीमवर्क यासाठी प्रोत्साहन देणारे निकोप स्पध्रेचे आणि गुणवत्तेला सर्व प्रकारची साधनसामग्री देणारे वातावरण शाळेपासून हवे. काही अंशी असे वातावरण आपल्याकडे आयआयटी (भारतीय प्रौद्योगिकी संस्था) आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स किंवा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन येथे आहे खरे. पण रामानुजम, चंद्रशेखर, एम.एन. श्रीनिवास, अमर्त्य सेन, होमी भाभा, व्ही. रामचंद्रन इतकेच काय, अगदी गांधी, नेहरूही काहीतरी स्वतंत्र विचार मांडणारी मंडळी परदेशात शिकली; यातील अनेकांचे करिअरच परदेशात घडले किंवा उमेदीचा काळ परदेशात गेला, हे लक्षात घ्यायला हवे. पाश्चात्त्य परंपरेचा त्यांना स्पर्श झाला, ज्यात लोकशाही समानता ही मूल्ये रुजली होती. ज्याला लिओनाडरे द विंची, मिकेलएंजेलो, शेक्सपिअर, कांट, हॉब्स, ह्यूम, लॉक, व्हॉल्टेअर, रूसो, गॅलिलिओ, न्यूटन, अ‍ॅडम स्मिथ, हेगेल, मार्क्‍स, आइन्स्टाइन अशी विचारवंतांची आणि कलावंतांची मोठी परंपरा आहे. त्याचबरोबर ‘प्रश्न विचारणे’- प्रसंगी कितीही श्रेष्ठ व्यक्तीचे विचार फोडून काढून नवा विचार मांडणे-  याला प्रोत्साहन दिले जाते. बटर्रन्ड रसेलचे शिष्य असलेला जीमूर हा विद्यार्थी नंतर त्याचा सहकारी बनला; इतकेच नव्हे तर काहीही लिहिताना किंवा मांडताना रसेल जीमूरशी चर्चा करत असे. विटगेन्स्टाइनच्या विद्यार्थिदशेतील प्रगती पाहूनच त्याने पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, ‘मला तत्त्वज्ञानात जे प्रश्न सुटले नाहीत तो हा सोडवेल.’
३) आर्थिक पाठबळ देणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती : कान्रेजीसारख्या उद्योगपतीने अमेरिकेत शेकडो वाचनालये सुरू केली. तर रॉकफेलर फोर्डपासून बिल गेट्सपर्यंत अनेकांनी आपली संपत्ती संशोधन करणाऱ्या, नव्या कल्पना मांडणाऱ्या व्यक्तींसाठी खुली केली. यातूनच प्रिस्टनपासून ते बिल गेट्स फाउंडेशनपर्यंत अनेक संस्था निर्माण झाल्या. ज्यांनी आइनस्टाइनपासून ते इस्थर डफ्लो, अभिजीत भट्टाचार्य यासांरख्या अर्थशास्त्रज्ञांपर्यंत अनेकांना आपले संशोधन मोकळेपणे करता आले. आपल्याकडे जी थोडी उदाहरणे आठवतात, त्यांत ऐतिहासिक ठरते ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड यांनी केलेली मदत! पण अशी किती उदाहरणे सांगता येतील?
४) ज्ञानसंस्कृतीचा अभाव : एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात गेलात तर उंची सोफासेटपासून चांदीच्या कटलरीपर्यंत अनेक गोष्टी आढळतील. पण पुस्तकाचे कपाट आढळणार नाही. मग स्टडी वगरे सोडाच. आपल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांची स्थिती ही अशी आहे. वाचन आणि अभ्यासाला प्रतिष्ठा नाही.
५) रेडीमेड गोष्टींचे आकर्षण :  एक पटकथाकार मित्र एक जुनी गोष्ट सांगतो. कहानी किस्मत की, सहेली आदी िहदी चित्रपटांच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला तो कथा ऐकवायला गेला. कथा ऐकून झाल्यावर दिग्दर्शक म्हणाला, ‘ही कथा कुठल्या इंग्रजी चित्रपटावरून घेतली आहे का?’ थोडासा बावरून पटकथाकार म्हणाला, ‘छे, छे ही माझी ओरिजनल कथा आहे.’ त्यावर दिग्दर्शक म्हणाले, ‘आम्ही अशा ओरिजिनल कथांवर सिनेमे बनवत नाही. आधीचा रेडीमेड सिनेमा असेल तर शूटिंग करताना काम सोपे होते. आता या कथेशी जवळपास जाणारा कुठला चित्रपट असेल तर सांग.’ आजही ही परिस्थिती फार बदललेली नाही.
६) समाजाची मन:स्थिती आणि परिस्थिती :  एखादा समाज अनेक प्रकारच्या निकषांवर तपासता येतो. समाजशास्त्रज्ञ आणि मानशास्त्रज्ञ हे काम अधिक चांगल्या रीतीने करू शकतात. पण आपण साध्या निकषांवर पाहू. आपल्या समाजात ज्यात लोकांचा वेळ चांगला जातो आणि ज्यावर लोक अधिक पसे खर्च करतात अशा गोष्टी कुठल्या, तर क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण. या तिन्हीमध्ये समाजाची धारणा पॅसिव्ह रोल घेऊन एन्जॉय करावा हीच असते. शिवाय या तिन्हीवरही कोणताही अधिकार किंवा अनुभव नसताना वाट्टेल तेवढे तास बोलता येते. याला जोडून चौथी गोष्ट म्हणजे खाणे आणि अर्थात खाताना खाण्याबद्दल चर्चा करणे, हेही लोकप्रिय होत चालले आहे.
७) मध्यम वर्गाचा बौद्धिक आळस :  बहुतेक अर्थनिर्मिती आणि इतर निर्मितीत मध्यमवर्गाचा मोठा वाटा असतो हे नाकारण्यात अर्थ नाही. एकेकाळी मराठीमध्ये शेकडो विषयांवर पुस्तके प्रसिद्ध होत. १९०१ ते ३० हा काळ पाहिला तर गणितापासून खगोलशास्त्रापर्यंत बहुतेक विषयावर आपल्याकडे पुस्तके प्रसिद्ध झालेली आढळतात. कारण मध्यमवर्ग शिकत होता आणि त्याला मोठी भूक होती. त्यातूनच पुढे किर्लोस्करपासून सत्यकथेपर्यंत अनेक मासिके निघाली. महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर विश्वकोशापासून साहित्य, संस्कृती मंडळांपर्यंत अनेक संस्था निर्माण झाल्या. पण हळूहळू मध्यमवर्गाला पसे कमावणे हेच प्राधान्याचे काम वाटू लागले. विविध, भाषा, कला, विज्ञाने इतकेच काय, स्वत:च्या भाषेमधलाही त्याचा रस कमी झाला. परिणामी, दिखाऊ गोष्टी, फॅशनेबल शास्त्रे आणि छोटय़ामोठय़ा गोष्टींमधले यश याला महत्त्व आले. त्यामुळेच उद्योगापासून विविध कलांपर्यंत अनेक गोष्टींत आपली पीछेहाट होत गेली. हल्लीच ज्या एका मराठी सिनेमाचे कौतुक झाले, तो इराणी सिनेमाची एक सराईत नक्कल आहे. चित्रपटाची दृश्यभाषा वगैरेबद्दल आता-आता मराठी प्रेक्षकवर्ग बोलू लागला. हा मध्यमवर्गीय ‘प्रेक्षक’ आधी बोलपटांचाच होतो.. मग चित्र-शिल्प आदी दृश्यकलांची गोष्टच राहूदे. आजही हा मध्यमवर्ग जहांगीर आर्ट गॅलरीपासून एनजीएमए किंवा केमोल्डसारख्या गॅलरीत पाऊलही ठेवत नाही आणि एकदम टूर कंपनीबरोबर जाऊन लूव्र किंवा प्रादा म्युझियममधली चित्रे बघतो.
वरील गोष्टींमध्ये इतरही कारणे आपापल्या मगदुराप्रमाणे जोडता येतील किंवा कमी करता येतील. सद्धान्तिक घटक आणि मांडणी याबरोबरच प्रात्यक्षिक शिक्षणही हवे, भाषेचे आणि ‘भाषा वापरता येण्या’चे महत्त्व शालेय वयापासून ओळखले जायला हवे.. याकडे तर आपल्या शिक्षणपद्धतीत दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे चार वाक्ये मराठी, इंग्रजी न लिहिता येणाऱ्या पदवीधरांची फौजच्या फौज ही शिक्षणपद्धती तयार करते.
अर्थात, अपवाद आहेत आणि असणारच. सत्यजित रेपासून व्ही. रामचंद्रनपर्यंत अनेक प्रतिभावंत मंडळींनी या देशाच्या उभारणीत व विविध क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाची कामगिरी करून दाखवली आहे. पण लोकसंख्या आणि संधी याच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे हे कुणीही मान्य करेल. शेवटी कलावंत, शास्त्रज्ञ काही बेटावर राहत नाहीत. आपल्या समाजातूनच ते निर्माण होतात. मोठी आणि चांगली निर्मिती समाजात होत नसेल तर त्याला तुम्हीआम्ही जबाबदार आहोत.
shashibooks@gmail.com