तंत्रस्नेहाच्या बेडीमध्ये जगातल्या सगळ्याच गोष्टी सुलभ-सोप्या आणि अल्पमार्गी होऊ लागल्या असतील, तर त्यापासून अभ्यासाच्या पारंपरिक पद्धती लांब कशा राहतील? नोट्सं ही म्हटलं तर अभ्यासात उपयोगी पडणारी गोष्ट . अजून आपल्याकडेसर्वत्र लॅपटॉपवर नोट्स घेण्याचं फॅड फारसं नाही, पण मोठय़ा महानगरांमध्ये ते आहे. लॅपटॉपवर नोट्स काढताना आपण वर सांगितलेली सगळी गंमत गमावून बसतो आहोत, कारण लॅपटॉपवरच्या नोट्स या आभासी जगात तुम्ही मेलवरूनही एक बटन दाबून त्याला किंवा तिला पाठवू शकता. मुळात लिहिणं ही कलाच आहे. ती संगणकाच्या कीबोर्डमुळे विसरली जाऊ शकते. किमान पक्षी अक्षर तरी खराब होऊ शकते. तंत्रस्नेही बनून इतर अनेक गोष्टींप्रमाणे  आनंदाची आणखी एक खूण कालबाह्य़ होण्याआधी नोट्सविज्ञानावर टाकलेला दृष्टिक्षेप..

वाईट अक्षर, चांगलं अक्षरं, टायिपग
 पूर्वी वाईट अक्षर असलेल्या बातमीदारांच्या बातम्या लवकर प्रसिद्ध होत नसतं कारण त्यांचं पुनल्रेखन करणं आलं. सुंदर हस्ताक्षर असलं की, मथळा देऊन बातमी लगेच तयार व्हायची. संपादन वगरे नाही, सरळ बातमी पुन्हा लिहायची. आता ज्यांना ‘मंगल’ फाँटमध्ये टायिपग येते त्यांचे लेख पटकन छापून येण्यास मदत होते. पूर्वी अक्षर बघितलं जायचं, आता संगणक टायिपग येतयं की नाही हे बघतात. पूर्वी दौत आणि टाक होते, कित्ता वही होती, त्यावर अक्षरे गिरवली जायची अन् त्यांना एक सुबक वळण यायचं. नंतर शाईचा पेन आला. त्यानं अक्षर चांगले येत असे. बॉलपेनने चार आण्याच्या रिफिलींपासून सुरुवात केली. सुंदर अक्षराची पहिली पिढी गारद केली. नंतर जेल पेनमुळे थोडसं अक्षर चांगलं येऊ लागलं पण आता पुढचे आक्रमण लॅपटॉपचे आहे. तिथे वेग वाढतो टायिपगचा, विचारांचा नाही. व्याख्यान शब्दन् शब्द टाइप केले जाते म्हणजे व्याख्यानाकडे लक्ष नसते, टायिपगकडे लक्ष असते. उलट, मुद्दे काढल्याने संकल्पना स्पष्ट होत जातात. लॅपटॉपने स्मरणात काही राहात नाही. हे सगळं सांगण्यांचे कारण नोट्स घेण्याच्या क्रियेचे मानसशास्त्र, त्याचा अभ्यासावर होणारा परिणाम समजून सांगण्याचा आहे. जात्यावर बसल्याशिवाय ओवी सुचत नाही, तसे आता संपादकांना संगणकावर बसल्याशिवाय अग्रलेख सुचत नाहीत. त्याला काही अपवाद असतीलही, पण इतकी याची सवय झालीय. आता तर खरं नोट्स काढायची गरजही नाही. रेकॉर्डरचे बटण दाबून मोबाईल शिक्षकांच्या टेबलावर ठेवायचा अन् खिडकीतून बाहेर बघत बसायचे. पण यात एक गोष्ट अशी की, आपल्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत, कारण अनेक गोष्टी आपण वर्गात त्या तासाला घडलेल्या विशिष्ट संदर्भाच्या तुलनेत लक्षात ठेवत असतो.

परदेशी विद्यापीठातील प्रयोग
नोट्स म्हटल्या की, वही आली, वहीतलं मोरपिस आलं, त्या वहीचा कोरा सुखावणारा वास आला, पण आता हळूहळू ती गंमत अस्तंगत होत चाललीय. परदेशात तर अशीच परिस्थिती आहे. परदेशातल्या सिमॉन फ्रेझर विद्यापीठातली गोष्ट आहे, एकदा एका शिक्षकांनी सांगितले की, उद्यापासून कुणीही वर्गात लॅपटॉप आणायचे नाहीत. पेन व वही घेऊन यायची व नोट्स घ्यायच्या. मुलांना वाटलं, ठीक आहे, ही काही फार अवघड गोष्ट  नाही. दुसऱ्या दिवशी पेन आणि वही घेऊन मुले आली; पण त्यातील निम्म्या मुलांना वहीत लिहिताच येईना, त्यामुळे त्यांना वर्गाबाहेर जाण्याशिवाय तरणोपाय नव्हता.

नोटसमधील फरक
संगणकावर नोट्स टाइप करणं आणि हाताने नोट्स घेणं यात फार फरक आहे. पेन इज मायटियर दॅन लॅपटॉप, हे विधान निदान अभ्यासासाठी नोट्स घेणाऱ्यांसाठी सत्य आहे. लॉस एंजल्समधील कॅलिफोíनया विद्यापीठात पॅम म्यूलर व डेव्हिड ओपनहायमर यांनी केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, ज्यांनी पेनने नोट्स लिहून घेतल्या होत्या त्यांना चांगले ज्ञान प्राप्त झाल्याचे त्यांच्या उत्तर पत्रिकातूनच दिसून येत होते व ज्यांनी लॅपटॉपवर नोट्स घेतल्या ते मागे पडले होते. अनेकदा लॅपटॉपवर नोट्स घेताना आपण कसे टाइप करतो आहे याकडे लक्ष राहते. म्हणजेच तंत्रावर लक्ष अधिक राहते, अभ्यासावर कमी राहते. जी मुले लॅपटॉपवर नोट्स घेत होती त्यांचे लिहिताना आपण काय लिहून घेतो आहोत याकडे अजिबात लक्ष नव्हते.

कागद आणि पेन
कागद आणि पेन यांची दोस्ती जुनी आहे. त्यांचा वापर करणारे विद्यार्थी काळजीपूर्वक लिहित असतात. संगणकावर टाइप केल्याने आपण लेखनाची कला विसरून जाऊ. सुलेखन तर बाजूलाच राहिले. लॅपटॉपवर नोट्स घेताना आपण केवळ शिक्षक सांगतात ते कॉपी करीत असतो. संशोधनात असे आढळून आले की, जी मुले कागद-पेनने नोट्स घेत होती, त्यांचे नेमका काय विषय आपण लिहितो आहोत याकडे बरोबर लक्ष होते. पण, जे लॅपटॉप वापरत होते त्यांच्या संकल्पना अजिबात स्पष्ट झाल्या नव्हत्या. जेव्हा त्यांना एखादी गोष्टी आठवायची वेळ यायची तेव्हा ती अजिबात आठवायची नाही.

व्याख्यान म्हणजे शब्दांची जुळणी नव्हे
शिक्षकांचे व्याख्यान म्हणजे केवळ शब्दांची जुळणी नसते तर ते संकल्पना स्पष्ट करून सांगत असतात, मुद्देसूद विषय मांडत असतात. त्यामुळे लॅपटॉपवर नोट्स घेताना संकल्पना स्पष्ट होत नाहीत. अजून आपल्याकडे हे फॅड फारसे नाही. परदेशात किंवा आपल्याकडील बडय़ा श्रीमंतांच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक शिकवत असताना मुले त्यांच्या लॅपटॉपवर यू टय़ूब बघत असतात किंवा वेगळाच मजकूर उघडून त्याची पारायणे करीत असतात. या मुलांचे प्रमाण जवळपास ८० टक्के आहे. जी मुले संगणकावर नोट्स घेतात त्यांना शैक्षणिक समाधानही फारसे मिळत नाही. आता मुलांना निबंध लिहायला सांगितले तर ती निबंधाची पुस्तके तर बघतातच, पण ऑनलाइन काही मिळते का ते बघतात; म्हणून त्यांची कल्पनाशक्ती संपून जाते. पेनने लिहिण्याने ती वाढते. अगदी ऑनलाइनसुद्धा लिहून घेणे आणि कॉपी पेस्ट करणे यात फरक आहे. हाताने एखादी गोष्ट लिहिल्याने थोडेफार तरी डोक्यात शिरते यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही.

हाताचे आपल्या मेंदूशी वेगळे नाते आहे. जेव्हा आपण विचार किंवा कल्पना तयार करीत असतो तेव्हा त्यांचा वेग आणि संगणकाचा वेग जमतं नाही. आपली कल्पनाशक्ती संगणकाला कशी कळणार? सर्व मुलांनी आता लॅपटॉप फेकून वही-पेन घेऊन बसावे असे माझे म्हणणे नाही. प्रत्येक सेमिस्टरला मुले मॅकबुक घेऊन येतात तेव्हा त्यांच्या हस्तलेखनाचा मृत्यू झाला आहे असे म्हणण्यावाचून गत्यंतर राहात नाही.   – व्हर्जििनया बेरिनगर यांच्या संशोधनातील निष्कर्ष

शिक्षणाच्या समाधानासाठी
कागद-पेन शिवाय शिक्षणाचे समाधानही मिळत नाही, कल्पनाशक्तीवर परिणाम होतो. सांगितलेले कृत्रिम पद्धतीने टाइप केले जाते, एकही संकल्पना नंतर कळत नाही नंतर त्याचा परिणाम परीक्षेत कळतो. याचा अर्थ सर्वानी आता लॅपटॉप, टॅबलेट फेकून द्यावेत व वही-पेन घेऊन बसावे असे म्युलर व ओपनहायमर यांचेही म्हणणे नाही, कुणाचेही असणार नाही; फक्त त्याचा वापर नोट्स घेण्यासाठी करू नये. काही मुले तर चक्क परीक्षा जवळ आली की, नोट्स झेरॉक्स करतात. पण त्यात लिहिण्याची क्रिया टाळली जाते त्यामुळे घोकंपट्टी करूनही काही लक्षात राहात नाही. आपण लिहितो तेव्हा ती गोष्ट जास्त स्मरणात राहते.

डिजिटल समन्वय
लॅपटॉप, स्मार्टफोन, फॅबलेट, टॅबलेट ही नोट्स घेण्यासाठीची डिजिटल साधने आहेत. तरीही त्यात कागद-पेनचे समाधान नाही, हे तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या धुरिणांच्या लक्षात आले आहे, कारण कागदावर लिहिण्याचा अनुभव डिजिटल साधनांवर हुबेहूब तयार करण्याची कल्पना अजून पूर्णपणे प्रचलित नाही. अगदी न्यूयॉर्क टाइम्सनेही याचा अभ्यास करून असे सांगितले आहे की, अनेक अभ्यासानुसार हाताने लिहिण्याला पर्याय नाही. त्यामुळे काही कंपन्यांनी की-बोर्डला डिजिटल पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. मायक्रोसॉफ्टने प्रथम ‘प्रो-३’ हा प्रगत स्टायलस तयार केला. यात डिजिटल स्वरूपाच्या पडद्यावर डिजिटल पेन वापरून लिहिता येते, चित्रे काढता येतात. इम्प्रूव्ह इलेक्ट्रॉनिक्सने बुगी बोर्ड सिक्रोनस ९.७ या डिजिटल स्लेट पाटय़ा तयार केल्या. अडोनीटने टॅबलेटमध्ये सुधारणा करून जॉट स्क्रीप्ट एव्हरनोट ही स्टायलसची एडिशन आणली. लाइव्हस्क्राइब थ्री स्मार्टपेन या प्रणालीत स्टायलसचा वापर करतात. त्यात वेगळा कागद व पेन असतो त्याने डिजिटल पद्धतीने नोट्स घेता येतात.

क्रिस्टल स्टायलस
हस्तलेखन व डिजिटल लेखन यांचा समन्वय साधण्यासाठी ‘बिक’ (बीआयसी) कंपनीने क्रिस्ट स्टायलस हा नवा पेन तयार केला आहे. हा एक पेनच असून त्यात पारंपरिक शाईचा पेनही आहे व दुसऱ्या बाजूला टचस्क्रीनवर लिहिण्यासाठी सोय आहे. कागदावर लिहिण्याचे समाधान व टचस्क्रीन तंत्रज्ञान यांचा संगम त्यात आहे. त्यांनी युनिव्हर्सल टाइपफेस एक्सपिरिमेंट हा अभिनव प्रयोग केला असून त्यांनी जगातले वेगवेगळे फाँट पाहून एक सामायिक फाँटच तयार केला आहे. आता तंत्रज्ञानामुळे तुमच्या अक्षरासारखा (म्हणजे बरे असेल तर) फाँटही तयार करता येतो. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फाँट तयार करू शकता, ते तुमचे वेगळेपण ठरते.

चीनचा अनुभव
चीनची प्रगती वेगाने होते आहे पण त्याचे परिणामही जाणवत आहेत. सुबत्ता आल्याने मुलांकडे लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट; सगळे आहे पण त्यांना कीबोर्ड वापरण्याची सवय असल्याने चिनी वर्णाक्षरे लिहिता येत नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की, तिथे हाताने लिहिण्याची राष्ट्रीय स्पर्धा घेतली जाते व हजारो मुले चिनी वर्णाक्षरे गिरवण्याचा अभ्यास करतात. आपली त्या दिशेने वाटचाल कालांतराने होईल, पण अजून संगणकावर फार सहजतेने मराठी वापरता येत नाही म्हणून, नाहीतर मुलांनी त्यावरच अभ्यास केला असता. चिनी मुलांना इलेक्ट्रॉनिक प्रॉम्पटिंग शिवाय १० हजार अक्षरे लिहिता येत नाहीत. तेथील एका सरकारी चॅनेलने त्यासाठी चायनीज डिक्शन कॉम्पिटिशन सुरू केली. कारण काही दिवसांनी चिनी लिपी लिहिणे जमणार नाही अशी भीती आहे. या स्पध्रेतील ७० टक्के प्रौढांनाही चिनी अक्षरे लिहिता येत नाहीत असे दिसून आले. चीनची भाषा ‘मँडरिन’ ही जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे कारण त्यांची लोकसंख्या जास्त आहे.    – माहिती संकलन : राजेंद्र येवलेकर

ग्राफोलॉजी
काही महाभाग तर अक्षरावरून भविष्य किंवा स्वभाव सांगतात. त्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जर कुणी मोठी मोठी अक्षरे काढली, ती भडक स्वरूपाची असली तर ती व्यक्ती महान व्यक्तिमत्त्वाची असते, जे लोक बारीक अक्षरात लिहितात ती लाजाळू व काही अंतर्मुख असतात, असे काही ठोकताळे त्यात मांडलेले आहेत. पण या ग्राफॉलॉजीला ‘स्युडो सायन्स’ म्हणजे ढोंगी विज्ञान म्हटले जाते.

मानसशास्त्र काय सांगते
लिहिण्याची कला आपण गमावून बसलो तर शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होईल, हाताने लिहिणाऱ्या मुलांचे गुण नेहमीच जास्त असतात. एखादी गोष्ट करून पाहात शिका हे तत्त्व हस्तलेखन टाळल्याने मारले जाते. हाताने लिहितो तेव्हा वर्गात सांगितलेले आपल्या जास्त लक्षात राहते. इतर वेळेस आपण केवळ स्टेनोग्राफर सारखे लिहून घेत असतो. हाताने लिहिण्याला वेग नसतो पण त्यामुळे आपल्या मेंदूत माहिती पक्की नोंदली जाते व वेळेला आठवतेही.

कॅलिग्राफी
वळणदार अक्षरांची ही कला आहे. लेखनच केले नाही तर ही कला टिकणार नाही. अगदी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्येही निमंत्रणे लिहिण्यासाठी कॅलिग्राफर्स ठेवलेले आहेत. नंतर थोडे काम संगणकावर केले जाते.

कागद-पेनने नोट्स घेणारी मुले व लॅपटॉप किंवा टॅबलेटने नोट्स घेणारी मुले यांना साध्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे उदा. बहुपर्यायी प्रश्न देता येतात, पण संकल्पनात्मक प्रश्नांची उत्तरे देण्यात ते मागे पडतात.
– डॅनियल ओपनहायमर

काही विद्यार्थ्यांनी कागद-पेनने नोट्स घेतल्या व काहींनी लॅपटॉपवर नोट्स घेतल्या व नंतर अध्ययनास सुरुवात केली, तर पुन्हा लॅपटॉप वापरणाऱ्यांना संकल्पना अवगत करणे अवघड जाते.
– पॅम म्युलर

कीबोर्डमुळे जगात शाळकरी मुलांवर जेवढा परिणाम झाला नाही तेवढा चिनी मुलांवर झाला आहे. त्याचा परिणाम चिनी भाषेच्या हस्तलेखनावर होत आहे. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा लोकांच्या लिहिण्याच्या सवयींवर झालेला परिणाम हा न पुसला जाणार आहे, त्यावर आपण काहीच करू शकत नाही. कॅलिग्राफीसारख्या कलेतून भाषा जिवंत ठेवणे हा यावरचा एक मार्ग आहे.
– टेलिव्हिजन शोचे निर्माते ग्वान झेनग्वान

चिनी अक्षरे माझ्या डोक्यात आहेत, पण ती कशी लिहायची ते माहीत नाही, केवळ संगणकाच्या मदतीने ती वापरता येतात.
– पत्रकार झँग शियोसाँग

चिनी वर्णाक्षरे शिकणे ही जीवनभराची प्रक्रिया आहे, तुम्ही जास्त काळ ती वापरली नाहीत तर तुम्ही ती विसरून जाणार हे ठरलेले आहे.  – चिनी भाषेला वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक हावो  मिंगजियान