स्त्रीनं चित्रकलेच्या किंवा दृश्यकलांच्या इतिहासात- म्हणजे हा इतिहास ज्या धारणांतून लिहिला गेला त्या धारणांनाही शह देत- जे स्थान मिळवलं, त्या संघर्षांतल्या वैचारिक टप्प्यांबद्दलही इथं लिहिलं जाईल. स्त्रिया आहेत म्हणून कौतुक, असं न करता; त्यामुळे फरक काय पडला, हे या ‘रंगधानी’त निरखलं जाईल. त्या अर्थानं, हे नवं पाक्षिक सदर फक्त चित्रकलेबद्दल नाहीच..

रंगधानी म्हणजे रंग सामावून घेणारी, रंग धारण करणारी. उन्हाचा रंग, पावसाचा रंग, काळाचा रंग, भाव-विभावांचा रंग, कथेचा रंग, नाटकातला रंग, चित्रातला रंग, धारणेचा रंग. या साऱ्या रंगांची जाणीवपूर्वक आणि सर्जनशीलतेने मोट बांधणारी. पण त्याही पुढे जाऊन व्यक्तिगत पातळीवर असेल किंवा सामूहिक पातळीवर- पण स्वत्वाचा शोध घेणारी, अस्मितांचे हुंकार जागवणारी, वर्चस्ववादी समाजरचनेनं बाईचं लादलेलं बाईपण झुगारणारी, त्यातून आलेल्या साचेबंद प्रतिमा नाकारणारी, आपली अनुभूती कलाविचारातून मांडणारी आणि स्वत:चा हा विचार हा जागतिक पातळीवरच्या कलेशी जोडणारी.

आधुनिक आणि समकालीन कलेत अनेक स्त्री कलाकारांनी आजवर ही भूमिका बजावलेली दिसते. बाईनं समाजात वावरणं, वर्षांनुर्वष घट्ट होत गेलेल्या सौंदर्याबद्दलच्या ठाशीव कल्पना, पुरुषत्वाची कल्पना आणि जाणीव-नेणिवेच्या पातळीवर ते उतरत राहाणं हे सगळंही यात येत गेलं. घरगुती कामाच्या संदर्भात, तसंच सार्वजनिक अवकाशातही बाईच्या परंपरागत चालत आलेल्या आणि तयार झालेल्या साचेबंद प्रतिमेला आणि भूमिकेला बदलण्याचा प्रयत्न या स्त्री चित्रकारांनी केला. फ्रीडा काह्लोने स्वत:ची व्यक्तिचित्रं बनवताना लिंगभावाचा प्रवाहीपणा दर्शवला किंवा त्या आधी मेरी कसाट या इम्प्रेशनिस्ट चित्रकर्तीनं खासगी अवकाश, त्यातला स्त्रीचा वावर, सार्वजनिक अवकाशातल्या तिच्या वावराच्या मर्यादा, आधुनिक शहरीसंदर्भात तिची बदलणारी रूपं यांचं चित्रण केलं.

नुसतं ‘कलाकार’ किंवा ‘चित्रकार’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वसाधारणपणे पुरुषाची आकृती उभी राहते. बोलतानाही ‘चित्रकार चित्र काढतो, सर्जनशील असतो’ असे सहजपणे पुल्लिंगी उल्लेख होतात. ते आपल्यात इतकं खोलवर रुजलेलं असतं की आपसूकच भाषेतही उतरतं किंवा भाषेतही तसंच असल्यानं अजून खोलवर रुजायला मदतच होते. पण मुद्दा असा आहे की ते केवळ भाषेपुरतं मर्यादित राहात नाही. त्या भाषेतून आपोआप कुणाला तरी नाकारण्याची प्रक्रिया घडते. आपल्यासंदर्भात अर्थात स्त्रियांना, स्त्री कलाकारांना. आणि मग स्त्री कलाकार म्हणताना ‘स्त्री’ हे विशेषण कलाकारापुढे जोडावं लागतं. कृष्णवर्णीय कलाकार, दलित कलाकार, समलिंगी कलाकार अशी विशेषणं आपण लावत जातो. पर्यायाने, यात निरनिराळ्या सामाजिक-सांस्कृतिक पाश्र्वभूमीतून आलेल्या स्त्री कलाकार आणि त्यांची कलानिर्मितीची प्रक्रिया यांचा संबंध काय आणि कसा असतो, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो.

या इतिहासातलं एक ठळक उदाहरण म्हणजे ग्रेसेल्डा पोलॉक आणि रोझेका पार्कर यांनी ‘ओल्ड मिस्ट्रेसेस’ हे १९७२ सालच्या एका स्त्री कलाकारांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचं शीर्षक त्यांच्या पुस्तकाचं शीर्षक म्हणून वापरलं. त्यात गंमत हीच आहे की ‘मास्टर’मध्ये जो आदर आणि दरारा आहे तो ‘मिस्ट्रेस’मध्ये नाही. त्या शब्दाच्या रंगछटा या बाईचं दुय्यमत्व, लैंगिकता दर्शविणाऱ्या आहेत. १९८२ साली आलेलं ग्रेसेल्डा पोलॉक आणि रोझिका पार्कर यांचं ‘ओल्ड मिस्ट्रेसेस’ हे गाजलेलं पुस्तक नेमकं यावरच बोट ठेवतं. पुनरुत्थान काळापासूनच अगदी अलीकडेपर्यंतच लिखाण हे कायम ‘मास्टर्स’ चित्रकारांवर केलं गेलं. मग तो मायकेल एंजेलो असेल, लिओनादरे दा विंची, रेम्ब्रां असेल किंवा विन्सेंट वॅन गॉग. कलेतिहास या विद्याशाखेची मांडणीच त्याभोवती केली गेली. त्यामुळे हे पुस्तक त्या लिंगभेदावर टीका करणारं तर होतंच; पण त्याचबरोबर कलेच्या इतिहासाच्या विविध टप्प्यांत वगळल्या गेलेल्या स्त्री कलाकारांबद्दलही ते बोलतं. याच पुस्तकात लिंडा नॉकलिन ‘महान महिला चित्रकार का नाहीत?’ हा प्रश्न विचारताना म्हणतात की, स्त्री कलाकार नाहीत हे मान्यच करावं लागेल, पण त्यामागची कारणं काय आहेत ते बघावं लागेल. सामाजिक दृष्टिकोन आणि कलासंस्था यांनी बाईला अशा प्रकारचं कला शिक्षणच नाकारलं. एवढंच नव्हे तर ‘प्रतिभावंत’ कलाकार ही संज्ञाच मुळात पुरुष चित्रकारांसाठी वापरली गेली. बाईची ओळखच पुसली गेली. त्यानंतर अनेक स्त्रीवादी कला इतिहासकारांनी मग त्याची पुनर्माडणी करायला सुरुवात केली. त्याचा पहिला टप्पा होता अशा स्त्री कलाकारांचा शोध घेणं, त्यांच्या कलाकृतींविषयी लिहिणं, त्यांना बाहेर का ठेवलं गेलं याची कारणं शोधणं, त्या काळातल्या सामाजिक-राजकीयसंदर्भात त्यांच्या चित्रांचे, त्यातल्या प्रतिमांचे अर्थ लावणं.

दुसरा कळीचा मुद्दा म्हणजे बाई, तिचं जगणं, त्यातच अंतर्भूत असलेली कलाकुसर. तिचं काम, ऊर्जा, वेळ, कष्ट यांना श्रमाचं महत्त्व दिलं जातं काय? कलेच्या इतिहासात, कला व्यवहारात, ‘जे ‘हाय आर्ट’ नाही किंवा जे ललित कलेच्या उच्च दर्जाचं मानलं जातं नाही ते ते स्त्रण्य’ किंवा ‘जे जे स्त्रण्य त्याला ललित कलांचा दर्जा मिळाला नाही,’ असंही दिसतं. त्यामुळे मग त्यांना ‘कलाकार’ असल्याचा दर्जा नाही. कला आणि हस्तकला हा फरक ही एक सामाजिक-आर्थिक प्रक्रिया तर होतीच, पण त्याला लिंगभावाचं परिमाणही लाभलं. एकीकडे विणकाम, भरतकाम, कलाकुसर, नक्षीकाम, रांगोळ्या हे सगळं यातून वगळलं जात गेलं. एकात सौंदर्य आहे, तर दुसऱ्यात मुख्यत: उपयोगिता मूल्य. आणि दुसरीकडे, व्यक्तिचित्रं, स्थिर चित्रण किंवा पानाफुलांची नाजूक चित्रं काढणं हा बाईचा प्रांत मानला जाऊ  लागला. यात फारशी कल्पनाशक्तीची आवश्यकता नाही, नवनिर्मितीची शक्यता नाही, मूलभूत विचारांची मांडणी नाही, ज्यात बुद्धीचा नव्हे तर केवळ अलगद भावनांचा आविष्कार आहे, त्याला ‘स्त्रीत्वा’ची किनार लाभली. आज भारतातल्या समकालीन कलाकारांमध्ये राखी पेसवानी किंवा ध्रुवी आचार्यबरोबरच अविनाश वीरराघवनसारखे कलाकारही भरतकाम हे माध्यम म्हणून वापरताना दिसतात. अर्थात, अविनाश वीरराघवनसारख्या कलाकारानं हे आत्मसात करून वापरण्यात नेमकं काय घडतं, त्याचे अर्थ कसे बदलतात, त्याची वेगळ्या प्रकारे मांडणी होताना दिसते का किंवा माध्यम म्हणून त्याला निराळं महत्त्व किंवा वरचा दर्जा प्राप्त होतो काय, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. त्यामुळे या लेखमालिकेचा उद्देश हा स्त्री कलाकारांना उच्च स्थानावर नेऊन केवळ कौतुक करणं नसून आजवर दुर्लक्षिलेल्या त्यांच्याकडे कलाव्यवहाराचा खोलवर विचार करणं, समजून घेणं आणि त्याभोवती चर्चाविश्व आकाराला आणणं हा आहे.

अर्थात, हे सगळं आपल्या म्हणजे भारताच्या संदर्भात बघताना काय दिसतं, आपल्या भवतालात नेमका कुठल्या पद्धतीनं त्याचा विचार केला गेला आहे, भारतातल्या आधुनिक व समकालीन कलेचा विचार मांडताना कोणते मुद्दे पुढे येताना दिसतात, ते पाहाणं आपल्या दृष्टीनं मोलाचं ठरणार आहे. कलेतिहासाचा विचार हा केवळ चित्रातले घाट, रंग, रेषा नव्हे तर त्याचे सामाजिक सांस्कृतिक संदर्भही होत. वर म्हणल्याप्रमाणे त्यात वर्गीय, जातीय, लिंगभावाच्या जाणिवाही आल्या. केवळ बाई आहोत म्हणून कलानिर्मिती स्त्री-वादी भूमिकेतूनच होतेय असं नाहीये. बऱ्याच स्त्री कलाकार स्त्रीवादी असणं, स्त्री-वादी भूमिकेतून कलानिर्मिती करणं किंवा कुठल्या कल्पनाप्रणालीशी बांधिलकी असणं उघडपणे मान्य करायचं टाळतात. त्यांच्यासाठी त्यांना जगताना आलेल्या अनुभूती त्यांच्या कामात उतरत असतात. त्यात त्यांचं स्त्री असणं हे नाममात्र असतं. पण मग त्यांचं बाई असणं त्यांच्या कलाकृतीत नेमकं कसं उतरतं, तसं ते उतरतं की नाही, त्या पलीकडे जाऊन काय विचार या कलाकृतीतून मांडले जातात, वैश्विक विचार मांडताना त्यात स्त्रीत्वाच्या जाणिवा अधोरेखित होतात का, माध्यम, घाट, आशयाच्या बाबतीतले कुठले प्रयोग त्यात या कलाकार करताना दिसतात, या साऱ्याचं आकलन ‘रंगधानी’ हे सदर येत्या वर्षभरात करेल.