गेली चार दशके महाराष्ट्रातील राजकारणाचे अविभाज्य अंग असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे वादग्रस्त विधाने करीत नाहीत, पण त्यांच्या एखाद्या टिप्पणीतही अनेक अर्थ दडलेले असतात. भल्या भल्या नेत्यांनाही त्याचा नेमका अर्थ उमगत नाही.राजकारणाबरोबरच समाजकारण, उद्योग, क्रीडा, चित्रपट, नाटय़, साहित्य, संगीत अशा विविध क्षेत्रांत त्यांचा संचार असतो व त्या त्या व्यासपीठावरून वेगवेगळ्या विषयांवर त्यांना केलेले  भाष्य चर्चेचा विषय बनतो. त्यांच्या वाक्चातुर्य आणि कार्यकौशल्याविषयी  त्यांना खास तिरकस शैलीत लिहिलेले हे अनावृत पत्र..
प्रिय शरदराव,
गेल्या आठ-दहा दिवसांतल्या तुमच्या बोलण्याने सर्व राज्य-देशभर हलकल्लोळ उडाला आहे. दुष्काळाने होरपळून निघालेला महाराष्ट्र पाऊस वेळेवर आणि दमदार आला म्हणून हुश्श करत होता. तेवढय़ात जागतिक पर्यावरण दिन पार पडताच राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे मागवून राजकीय पर्यावरण ढवळून काढलंत – इतकं की आपला तसा काही बेत नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांना स्पष्ट करावं लागलं. तुमच्या पक्षातले डागाळलेले मंत्री आता घरी जाणार अशी चर्चा सुरू झाली. बिरबलाच्या गोष्टीत एकाच खऱ्या चोराने आपली काठी चार बोटे छाटली होती. राष्ट्रवादीत सर्वच मंत्र्यांनी काठय़ा छाटून टाकल्या! मग तुम्ही पुण्याला पुण्यभूषण पुरस्कार देण्यासाठी आलात. तिथे आमचा दोस्त सुधीर गाडगीळ याला शाबासकी देता देताच त्याची शैली ‘भारदस्त’ आहे असं म्हणून त्याला टेन्शन आणलंत; तिथेच आशा भोसले यांना ‘तुम्ही मुलाखती घेऊन सुधीरच्या पोटावर पाय आणू नका’ असं सांगता सांगता, ‘पुण्यात एक फ्लॅट घ्या म्हणजे पुण्यभूषण सन्मान मिळेल,’ असाही सल्ला दिलात. त्या कार्यक्रमात एका स्वातंत्र्यसैनिकाने लोकप्रतिनिधी सभागृहाच्या हौद्यात धुडगूस घालतात याची खंत व्यक्त केली तेव्हा, ‘जनता सगळं पाहत असते, तीच हे सर्व दुरुस्त करील,’ असा शुद्ध लोकशाहीचा मंत्र जागवलात. ‘जनतेने भ्रष्टाचाऱ्यांना जगणं अशक्य करावं!’ या घोषणेची आठवण करून देणारा!
तेवढय़ात गोव्यामध्ये भाजपमधला ‘अडवाणी-मोदी संघर्ष चव्हाटय़ावर आला; त्यावर देशाला पर्याय देतो म्हणणाऱ्यांची घरची अवस्था पाहा,’ असं भाष्य करायला तुम्ही चुकला नाहीत. जणू इतर पक्षांत असे संघर्षच नाहीत. पाठोपाठ तुम्हाला सांगलीचं वारकरी महाविद्यालयाचं आमंत्रण होतंच. तिथे पत्रकार परिषदेत तिसऱ्या आघाडीची शक्यता नाकारतानाच ‘काँग्रेस असो वा भाजप – एकाची मदत घेतल्याशिवाय तिसऱ्या आघाडीला सत्ता मिळण्याची शक्यता नाही,’ हे सत्य सांगितलंत. म्हणजे पर्यायानं काँग्रेसला भाजप हाच पर्याय आहे असं सुचवलंत. पावसाची सुरुवात चांगली झालेली पाहून ‘दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्र सरकारने चांगली पावलं उचलली,’ असं प्रशस्तिपत्र आपल्या काळजीवाहू/काळजीग्रस्त मुख्यमंत्र्यांना दिलंत आणि आता, ‘मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; पण निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली होईल!’ अशी स्वपक्षीयासाठी सज्जड मार्गदर्शक भूमिकाही जाहीर करून टाकलीत.
निरनिराळ्या विधानांचा हा महोत्सव पाहून कुणाला तुम्ही आठही हातांत शस्त्रे धारण केलेल्या सर्वव्यापी देवतासारखे वाटलात, कुणासमोर सर्कशीतल्या अनेक बशा हवेत फेकत राहून एकही जमिनीवर पडू न देणाऱ्या कलाकाराची आठवण झाली. प्रसारमाध्यमांना तर तुमच्या प्रत्येक विधानामधून गुंतागुंतीचे अर्थ काढण्याची सवयच लागली आहे. भ्रष्ट मंत्री घरी बसणार, पक्षाची प्रतिमा उजळणार, केवळ मराठाबहुल पक्ष हे स्वरूप बदलणार, सर्व समावेशक राजकारणाची सुरुवात होणार, अनुभवी नेते लोकसभेला उभे राहणार (कारण पंतप्रधानपदाच्या बाबतीत अडवाणींप्रमाणेच तुमची अवस्थाही ‘अभी नही तो कभी नही’ अशीच आहे. यावर सर्वाचं एकमत आहे!) असे तर्क सुरू झाले!   
पण हवामान खात्याच्या अंदाजासारखे हे सर्व अंदाज फसले. जे मंत्री गेले ते बरेच दिवस जात होतेच. सत्ता आणि आरोप या विषयातले बुजुर्ग – जे बिचारे हिंदी-इंग्रजीचे क्लास लावण्याच्या विवंचनेत होते. भुजबळ सोडून आपापल्या ठिकाणीच राहिले. मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत पार पिचलेले एकदाचे मंत्री वर्ष-दीड वर्षांसाठी का होईना झाले आणि राज्यभर पिचकाऱ्या टाकणारे पुन्हा तेच काम करून स्वत:च्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झालं म्हणून निर्धास्त झाले. आता किरकोळ चर्चा ‘अजितदादांचं वजन वाढलं’ वगैरे सुरू झाली तेवढय़ात तुम्ही ‘मात्र नेता मीच’ हे ठासून सांगून टाकलंत!
असंही ऐकतो की, तिसऱ्या आघाडीचे धुरीण ‘काँग्रेसचा पाठिंबा’ या तुमच्या विधानाचा अर्थ ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा’ असा घेऊन तुमच्यापर्यंत पोचण्याच्या खटपटीत आहेत. तुमचे कल्चरल अ‍ॅम्बॅसेडर उल्हास पवार हे आशा भोसले आणि योग्य बिल्डर यांची गाठ घालून देण्याची तजवीज करताहेत. आमचे मित्र सुधीर गाडगीळ मात्र पेचात सापडलेत. आपली शैली ‘भारदस्त नाही’ म्हणावे तर तुमचा शब्द खोटा पडतो आणि आहे म्हणावे तर खुसखुशीत, मिस्कील पद्धतीने भल्याभल्यांची फिरकी घेणारा संवादक ‘ही परिश्रमपूर्वक कमावलेली प्रतिमा’ धोक्यात येऊन भावी आमंत्रणांची संख्या खाली येऊ शकते!
हे केवळ गेल्या काही दिवसांतलं! त्याच्या आधीचीही उदाहरणे वाटेल तेवढी आठवतात. ज्ञानेश्वरांनी ज्या शारदेला ‘अभिनववाग्विलासिनी, चातुर्यार्थकला कामिनी, विश्वमोहिनी’ ही विशेषणं योजून वंदन केलं, ती शारदा तुमच्यासमोर ‘केला इशारा जाता जाता’च्या नायिकेप्रमाणे लीन होऊन उभी असते. कधी कधी न बोलताही इशारे करत असते. राजू शेट्टी उसाच्या भावासाठी साखर कारखाने बंद पाडत होते, तेव्हा तुम्ही ‘शेट्टीच्या समाजाचे कारखाने मात्र चालू आहेत,’ याची आठवण करून दिलीत. मात्र हे सांगतानाचे, ‘उसाचा भाव हा साखर कारखानदार आणि शेतकरी यांच्यामधला विषय आहे.’ म्हणून हात झटकलेत. रंगराजन समितीच्या अहवालाच्या वेळी तुम्हाला उत्तर प्रदेशातल्या ऊस शेतकऱ्यांचा कळवळा आला! मुंब्य्राला इमारत पडून ७५ जणांचा बळी गेला. बिल्डर – राजकारणी – अधिकारी यांचं संगनमत उघडं पडलं, तेव्हाही तुम्ही ‘सर्वसामान्यांना घरापासून वंचित ठेवता कामा नये’ असं म्हणून बिल्डरांना ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ आणि ग्राहकांना ‘तूच आहेस तुझ्या मरणाचा शिल्पकार’ असे दिव्य संदेश दिलेत. दुर्दैवाने शारीरिक व्याधीमुळे तुमचे शब्दोच्चार आता अस्पष्ट झालेत; मात्र तुमच्या शब्दांचे अर्थ कायमच संदिग्ध होते व असतात. खरे तर येऊ घातलेल्या अन्न सुरक्षा विधेयकामध्ये तुमच्या कृषीखात्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यावर मात्र तुम्ही ‘सरकारने सर्वाशी चर्चा करावी’ अशी अगदीच अळणी पण अर्थगर्भ टिप्पणी केलीत. म्हणजे उद्या हे विधेयक मंजूर होऊन अन्नधान्याचे भाव पडले आणि शेतकरी अधिकच उद्ध्वस्त झाले तर ते पाप काँग्रेसच्या माथी मारायला तुम्ही मोकळे! एलबीटीच्या आंदोलनात पृथ्वीराज चव्हाणांची अवस्था ‘खालून आग, वर आग, आग बाजूंनी’ अशी झाली तेव्हा ‘चर्चेने प्रश्न सोडवा’ असे तुमचे मुग्ध भाष्य! म्हणजे व्यापाऱ्यांचा रोष झाला तर काँग्रेसवरच होईल!  ‘परदेशी जाऊन आले की उद्धव ठाक रेंना नवनव्या कल्पना सुचतात’ हेही असेच. म्हटले तर हलके-फुलके, म्हटले तर गंभीर शब्द! शरदराव, हे सर्व पाहून आम्ही स्तिमित झालो आहेत. इतके आरोपांनी ग्रस्त सहकारी वागवायचे पण स्वत:पर्यंत काही येऊ द्यायचे नाही – मला झोप येत नाही म्हटले की भास्कर जाधवांना निद्रानाश जडणार हे ओळखायचे – या तुमच्या कौशल्याचे वर्णन करण्यास आमच्याकडे शब्दच नाहीत. शिवाय ५० वर्षे सत्तेमध्ये राहूनही तुमच्या आर्थिक साधेपणाचेही आम्हाला कौतुक वाटते. मागच्या लोकसभा निवडणुकीत तुमची मालमत्ता केवळ ३२ लाखांची होती व तुमच्या नावावर एकही वाहन नव्हते! यामुळे आमच्या तुमच्याबद्दलच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत!
शरदराव, आमची खात्री आहे की तुम्ही हे वाक्चातुर्य आणि कार्यकौशल्य वापरून इतर काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य व कृती कराल! राजकीय स्पर्धकांत फूट पाडण्यात तुम्ही कुशल आहातच- नक्षलवादी भागाचा दौरा करून, तिथे मार्मिक टिप्पणी करून तुम्ही त्यांच्यामध्ये फूट पाडाल – पूर्वी सिद्धार्थ शंकर राय यांनी पाडली तशी! भारतीयांना क्रिकेट म्हणजे जीव की प्राण. सध्या क्रिकेटवर आलेले संकट तुम्ही निवाराल कारण क्रिकेटचे उत्सवीकरण व त्यातून आलेले व्यापारीकरण यात तुमचा वाटा ‘मोला’चा होता! अन्न सुरक्षा विधेयकाच्या संदर्भात शेतकऱ्यांचे हित जपणे आवश्यक आहे, असं ठासून सांगाल! आपत्ती निवारणाच्या (नैसर्गिक, राजकीय नव्हे!) राष्ट्रीय आयोगाचे तुम्ही प्रमुख आहात. या सुरुवातीच्या पावसामुळे दुष्काळ सौम्य झाला आहे, पूर्ण टळला नाही याची जाणीव ठेवून ठोस उपाय कराल!
तुमच्या पक्षाने पुण्याच्या विकास आराखडय़ाची पुरती वाट लावली आहे – इतकी की, गेल्या रविवारी पुणे बचाव कृती समितीच्या बैठकीला वंदना चव्हाण आल्या होत्या – तिथे लक्ष घालाल. तुम्ही बोलावल्यावर अध्र्या रात्रीत पुणे-मेट्रो संदर्भात दिल्लीत बैठक होते. त्या बाबतीतही पुणेकरांच्या इच्छांचा मान ठेवाल! आणि शेवटी सांगली जिल्हा तंबाखूमुक्त करण्याची अजितदादांची इच्छाही तुम्ही पूर्ण कराल!
कळावे! लोभ असावा.
आपला,
विनय हर्डीकर