नवी मुंबईतील नेरुळ येथे कालपासून दुसरे अ.भा. मराठी संतसाहित्य संमेलन सुरू झाले. या संमेलनाचे अध्यक्ष अभय टिळक यांच्या भाषणाचा हा संपादित भाग..
आजिचें हें मज तुह्मीं कृपादान। दिले संतजन मायबापीं।।
तुका ह्मणें तुह्मीं उदार कृपाळ। शृंगारिलें बाळ कवतुकें।।
वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या  दुसऱ्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मठाधीश, महंत आणि संतविचाराबद्दल अपार जिव्हाळा असणारे विवेकी वाचक, अभ्यासक आणि संशोधक मित्रहो, संत विचाराचे लाभलेले उदंड पाथेय, हा मराठी भाषक समूहाचा सर्वाधिक मौल्यवान ठेवा होय. गेली जवळपास हजारभर वर्षे ही शिदोरी आपले भरणपोषण करते आहे. पारायण-भजन-कीर्तन- प्रवचनादी उपक्रमांच्या माध्यमातून सांप्रदायिकांनी संतबोधाचे जागरण मोठय़ा निष्ठेने घडविलेले आहे. हे महत्कार्य आपल्याला या पुढील काळात चालू ठेवायचेच आहे. परंतु आजचे वातावरण असे आहे की, केवळ तेवढेच करून भागणारे नाही. इथून पुढच्या काळात आपल्याला आग्रह धरावा लागणार आहे तो संतांनी शिरोधार्य मानलेल्या मूल्यांच्या आचरणाचा. हे आचरणही पुन्हा आमच्या जीवनाच्या व्यक्तिगत तसेच सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर केले जाणे अगत्याचे ठरते. संतविचार हा स्वरूपत: मूल्यविचार होय. या मूल्यसंचयाचे जागरण कटाक्षाने करणे आज आणि इथून पुढे जितके अगत्याचे तितकेच अनिवार्यही ठरणार आहे. कारण, आपण सगळेच आज मूल्यसंक्रमणाच्या कालखंडातून प्रवास करतो आहोत. संतांच्या साहित्याचे वाचन-आकलन प्रगल्भपणे करणे त्यासाठी अत्यावश्यक आहे. कारण, या साहित्यातून प्रसवणारी मूल्ये म्हणजे आमच्या उभ्या मूल्यव्यवस्थेचा गाभा होत. संतसाहित्य हा मराठी साहित्य विश्वाचा गाभा तर, त्याच संतसाहित्यामधून प्रसवणारी जीवनमूल्ये हा आमच्या मूल्यव्यवस्थेचा गाभा, असे हे सूत्र आहे.
संतांचे शब्द समजावून घेताना आपल्याला विवेकाची आणि तारतम्याची कास पक्की धरून ठेवावी लागते. चक्रधरस्वामींना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र म्हणजे वस्तुत: विश्वाचे लघुरूप समजावे लागते. संतांच्या वचनांमध्ये त्यांच्या परिसरातील ग्राम-प्रदेशांची स्थळनामे प्रसंगोपात्त येत असली तरी त्यांच्या जाणिवेचा पैस मात्र विश्वाला गवसणी घालणारा होता, हे सूत्र आपण नजरेआड होऊ देता कामा नये. अन्यथा, फसगत होईल ती आपलीच! ‘जाईन गे माय तया पंढरपुरा’ अशा मोठय़ा लडिवाळ शब्दांत ज्ञानोबाराय आपल्या माहेराची महती सांगतात. मात्र, त्यांच्या मनीमानसी वसणारी आस ‘अवघाची संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक’ इतकी उदात्त आहे. ‘स्वदेश’ या संकल्पनेची तुकोबारायांची व्याख्या तर त्रिभुवन कवेत घेणारी आहे. ‘आमचा स्वदेश। भुवनत्रयामध्यें वास।।’ अशा शब्दांत तुकोबा त्यांच्या प्रसरणशील जाणिवेचे विश्वव्यापकत्व स्पष्ट करतात. किंबहुना, माझ्या अस्तित्वाचे हे असे सर्वात्मकपण हाच माझा स्थायिभाव असून तो अभिजात आहे, हे ठामपणे सांगताना, ‘सर्वात्मकपण। माझें हिरोनि नेतो कोण।।’, असा रोकठोक प्रश्न विचारून संतांच्या जाणिवेचे व्यापकपण ते जगापुढे मांडतात. या जगातला प्रत्येक जीव त्रलोक्यातील सर्व सुखांनी मंडित व्हावा, ही ज्ञानदेवांनी ‘पसायदाना’मध्ये विश्वात्मक देवाकडे व्यक्त केलेली मागणी म्हणजे संतांच्या मांदियाळीच्या पोटी निरंतर वसणाऱ्या प्रेमाचा आणि कळवळ्याचा हुंकार होय.
या जगातला मानवी व्यवहार विशुद्ध आणि पर्यायाने सुखकर बनावा, हा संतविचार आणि संतआचार यांचा गाभा. साहजिकच, हा व्यवहार निर्दोष बनण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या जीवनमूल्यांचा पुरस्कार संतांनी हिरिरीने केलेला दिसतो. माणसाची बुद्धी सरळमार्गी आणि विमल असेल तर तिच्यातून प्रसवणारा व्यवहार स्वाभाविकपणेच निरामय आणि सुखकारक, आनंददायक ठरतो. परंतु तीच बुद्धी जर स्वार्थाधतेने ‘व्यंकटी’ म्हणजे वाकडी बनली तर साराच व्यवहार नासून जातो. ‘दुर्बुद्धि ते मना। कदा नुपजो नारायणा’, अशी जी प्रार्थना तुकोबा करतात तिच्यामध्ये विलक्षण मार्मिक आशय दडलेला आहे. संतविचार हा स्वरूपत:च स्व-परहिताला केंद्रस्थानी ठेवणारा आहे. केवळ मी एकटय़ानेच शुद्ध बुद्धीने वागून जगाचा यच्चयावत व्यवहार सुधारणार नाही; त्यामुळे, वाकडय़ा मार्गाने जाण्याची खळांची स्वार्थप्रेरित ‘व्यंकटी सांडो’ असे मागणे ज्ञानदेव विश्वात्मकाकडे मागतात. शुद्ध बुद्धीने केला गेलेला व्यवहारच उभयपक्षी सुखकारक ठरतो. असा, व्यवहारातील दोन्ही बाजूंना समसमान सुखलाभ देणारा व्यवहारच आनंददायी असतो, हे आपले अनुभवसिद्ध व्यवहारसूत्र तुकोबा, ‘सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला। आनंद कोंदला मागें पुढे’ अशा मोठय़ा समर्पक शब्दांत जगापुढे ठेवतात. शुद्ध बुद्धी हे जे जीवनमूल्य संतांनी पुरस्कारलेले आहे त्याचा आशय आणि उपयोजन हे प्रथम ऐहिक-लौकिक आहे आणि मग पारलौकिक.
श्री विठ्ठल ज्या समतेचे अधिष्ठान आहे त्या समतेचा पाया म्हणजे प्रेम. प्रेमाशिवाय समतेची उत्पत्ती संभवत नाही. प्रेमाचे राज्य ही समतेच्या साम्राज्याची पूर्वअट. तुकोबारायांना हे पुरते ज्ञात आहे. त्यांच्या लेखी, त्यांचे जीवन असणारा श्रीविठ्ठल ‘जीवींचा जिव्हाळा’ आहे. त्यामुळे तो ‘कृपेचा कोंवळा’ आहे आणि कृपाजिव्हाळ्याने त्याला ‘प्रेमाचा पुतळा’ बनविलेले आहे. विठ्ठलाची समचरण, समदृष्टी अशी विटेवर उभी असणारी मूर्ती ‘प्रेम’ या त्याच्या स्थायिभावाचा आविष्कार घडवते. त्यामुळेच भक्त अथवा साधकाचे बहिरंग आणि अंतरंग यांत एकवाक्यता असली पाहिजे, असा संतांचा कटाक्ष आणि आग्रह आहे. ‘तुळशीमाळा शोभती कंठी। गोपीचंदनाच्या उटी’ हे बाह्य़लक्षण मिरवणाऱ्या वैष्णववीरांचे अंत:लक्षण अधोरेखित करताना, म्हणूनच, ज्ञानदेव-
सतत कृष्णमूर्ति सांवळी। खेळे हृदयकमळी।
शांति क्षमा तया जवळी। जीवेंभावें अनुसरल्या।।
या गुणसमुच्चयाचा उद्घोष करतात. प्रेम, समता, क्षमा, शांती यांसारख्या, इहलोकातील मानवी जीवन सुभग-संपन्न-सात्त्विक बनवणाऱ्या मूल्यांचा परिपोष करायचा तर सर्व प्रकारच्या विषमतेचे उच्चाटन व्यक्तिगत तसेच सामुदायिक जीवनामधून घडवण्यासाठी तीव्र लढा द्यायला हवा, याचीही संतभूमिकेला जाणीव होती. जन्मजात अधिकारभेद मानणाऱ्या वर्णाश्रमव्यवस्थेला आणि त्या व्यवस्थेचे व्यावहारिक परिमाण असणाऱ्या जातिभेदाला संतांनी त्यांच्या लढय़ाचे लक्ष्य बनविले त्याचे मूळ समतेच्या संतप्रणीत जीवनमूल्याच्या आग्रहात रुजलेले आहे. आज त्याच संतमूल्याचा आणि संतप्रेरणेचा तितकाच आवर्जून आणि तितक्याच हिरिरीने अंगीकार आपण सगळ्यांनीच आपल्या रोजच्या जीवनात करण्याची निकड निर्माण झालेली आहे. कारण, सामाजिक-आर्थिक विषमतेची वल्ली आज पुन्हा एकवार नव्याने धुमारताना दिसते आहे. संतकाळात या विषमतेची बीजे तत्कालीन धार्मिक-सामाजिक व्यवस्थेत अंकुरित झालेली होती. आज तिचे अंकुरण होते आहे ते विद्यमान आर्थिक परिस्थितीत. फरक असेल तर एवढाच.
आज महाराष्ट्रापुढे पाणीटंचाईचे भीषण संकट उभे आहे. प्रादेशिक विकासातील असमतोलाची समस्या उग्र बनलेली आहे. प्रश्न पाणीवाटपाचा असो वा विकासनिधीच्या वाटपाचा असो, संकुचित जीवनदृष्टीचा त्याग केल्याशिवाय या सगळ्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगे शोधून काढणे आपल्याला कधीच शक्य होणार नाही. ‘बंधुता’ हे जीवनमूल्य जागवण्यासाठी समतेचा स्वीकार अगत्याचा ठरतो आणि हृदयात प्रेम असल्याखेरीज समतेच्या मूल्याचा उद्भव संभवतच नाही. या तीनही जीवनमूल्यांचा उगम संतविचारात आहे. संतविचाराचे अनुसंधान, म्हणूनच, आपल्याला अखंड ठेवणे भाग आहे. समस्यांचे स्वरूप आर्थिक- सामाजिक- राजकीय- धार्मिक असे कोठलेही असले तरी त्यांच्या निराकरणासाठी उतारा शोधून काढत असते ती माणसाची बुद्धी. ही मानवी बुद्धी व्यापक आणि शुद्ध बनावी, माणसाचे मन सुसंस्कारित व निर्मळ बनावे, मन आणि बुद्धीचे संतुलन मानवी जीवनात नांदावे हीच संतांच्या उक्ती व कृतीमागील प्रेरणा आहे. या संतमूल्यांचे संस्कार समाजमनावर घडवण्यासाठी कार्यरत बनणे, ही तुम्हा-आम्हा सांप्रदायिकांची मुख्य जबाबदारी ठरते. त्यासाठी, या संतमूल्यांचे आचरण प्रथम आपल्या प्रत्येकाच्या जीवनात घडायला हवे. चित्तशुद्धी हा त्या आचरणाचा पाया आहे. सुभग मूल्यांची प्रतिष्ठापना करायची तर व्यवहारातील अनिष्ट शक्तींशी संघर्ष अटळ ठरतो. परंतु, त्या संघर्षांची बैसका चित्तशुद्धीची असायला हवी. चित्तशुद्धी हा जर संघर्षांचा पाया नसेल तर अशा संघर्षांमधून निष्पन्न होईल निव्वळ विद्वेष. ‘आपुलालें चित्त शुद्ध करा’’, या तुकोबारायांच्या आदेशाचे आचरण आपल्या सगळ्यांनाच अतिशय कसोशीने करावे लागणार आहे. संतविचाराचे जागरण कीर्तन- प्रवचनांद्वारे घडवणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्यांची जबाबदारी यात तुलनेने अधिक आहे. कारण, आपल्याच उक्ती आणि कृतीमध्ये तफावत दिसली तर, ‘बोलविसी तैसें आणि अनुभवा। नाही तरी देवा विटंबना’ या तुकोक्तीप्रमाणे आपली अवस्था होईल. त्यासाठी चित्तशुद्धीवर प्रथम भर द्यायला हवा आपल्यालाच.