पंकजा मुंडे, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, आदित्य ठाकरे ही राजकीय नेत्यांची पुढील पिढी नुकत्याच झालेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सक्रिय होती. पूर्वी विलासराव देशमुख म्हटल्यावर लातूर, सुशीलकुमार शिंदे सोलापूर, गोपीनाथ मुंडे बीड ही समीकरणे ठरलेली असायची. आपापले गड हे नेते शाबूत राखायचे. पण या नेत्यांच्या वारसदारांना मात्र हे गड कायम राखता आलेले नाहीत. राजकीय वारसदार आपापल्या प्रभाव क्षेत्रात अपयशी ठरल्याचे दिसते. त्याचा हा आढावा..

१४ ऑगस्ट २०१२ .. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन झाले. देशभरातील नेते लातूरकडे येत होते. सर्वसामान्य जनता हळवी झाली होती. तेव्हा लातूरमधील प्रत्येक चौकात एक पोस्टर आवर्जून वाचायला मिळत होते- ‘विठ्ठला, तू का आम्हाला पोरकं करून गेलास’. सर्वसामान्य लातूरकर आपल्या घरातील माणूस गेल्याच्या दु:खात होता. लोकप्रियता म्हणजे काय, याचा अनुभव त्यावेळी लातूरच्या प्रत्येक रस्त्यावर, चौकात दिसून येत होती. त्यांना जाऊन आता चार वष्रे झाली. वडिलांचा राजकीय वारसा सांभाळणारे अमित देशमुख यांना ग्रामीण भागातील मतदारांनी सांगितले. ‘आता बस झाले, तुमची सत्ता नको’! विलासरावांसारखा हावभाव करण्याचा प्रयत्न अमितभय्यांनी कितीही केला तरी कृत्रिमपणा वेगळा जाणवतोच ही लातूरमधील काँग्रेस नेत्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.

३ जून २०१४ .. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. ते केंद्रात मंत्री झाल्यानंतर सत्कारासाठी पहिल्यांदा परळीला येणार होते. सत्कारासाठी लागणाऱ्या फुलांची तयारी करण्यात आली होती. त्याचे निर्माल्य झाले, याचे कमालीचे दु:ख सर्वत्र होते. दु:खसागरात सारा मराठवाडा होता. मृत नेत्याचे किमान तोंड तरी बघू द्या, अशी विनंती करत समर्थक आक्रमक झाले. आयुष्यभर संघर्ष करत राजकीय आयुष्य जगणाऱ्या या नेत्याला सत्तेची ऊब काही फार काळ अनुभवता आली नाही. गोपीनाथरावांचा संघर्ष, लोकसंग्रह यामुळे राज्यभर त्यांचे समर्थक हळहळले. त्यांनी तो राजकीय वारसा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या हाती रीतसर सोपविला. डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदारांनी सर्वाधिक मतांनी लोकसभेत पाठविले. एक कन्या खासदार, दुसरी कन्या राज्यात मंत्री असा राजकीय वारसा मिळाल्यानंतरही नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला बीडच्या मतदारांनी नाकारले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये परळीमध्ये पंकजा मुंडे यांना एकाही गटात विजय मिळविता आला नाही. ‘जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री’ अशी भावना व्यक्त करणाऱ्या पंकजाताईं वादग्रस्तही तेवढय़ाच ठरल्या. चिक्की घोटाळ्यावरून त्यांच्यावर बरीच टीकाटिप्पणी झाली. यात काहीही चुकीचे केले नाही, असे पंकजाताईंनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याबद्दल वेगळी प्रतिमा निर्माण झाली. जलसंधारणासारखे महत्त्वाचे खाते काढून मुख्यमंत्र्यांनी मध्ये सूचक इशाराही दिला होता. मराठवाडय़ातील दोन लोकप्रिय नेत्यांच्या वारसदारांना मतदारांनी का नाकारले असावे? कारण सरळ आहे व ते म्हणजे दुसऱ्या पिढीतील नेत्यांचा जनमानसाशी संपर्क नसणे.

प्रणितीताईचेही तेच

सोलापूर म्हटल्यावर सुशीलकुमार शिंदे हे समीकरण. शिंदे यांनी राजकीय वारस म्हणून प्रणिती यांना पुढे आणले. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्या विधानसभेवर विजयी झाल्या. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा दारुण पराभव झाला आणि आता गेली चार दशके काँग्रेसच्या ताब्यात असणारी सोलापूर महानगरपालिकाही काँग्रेसला गमवावी लागली. प्रणिती यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

आदित्य ठाकरेंच्या मर्यादा

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच आदित्य ठाकरे यांना राजकारणात पुढे आणण्यात आले. युवा सेना स्थापन करून त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. रात्रजीवन, मोकळ्या जागेत जिम आदी युवकांना भावतील अशा विविध कल्पना त्यांनी मांडल्या. महानगरपालिका निवडणुकीत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यातून शिवसेना विरुद्ध युवा सेना असा वाद निर्माण झाला. निवडणुकीच्या तोंडावर युवा सेनेत बंड झाले. आदित्य काही उच्चंभ्रूच्या वर्तुळात वावरतात आणि त्यांच्या सल्ल्याने निर्णय घेतात, असे जाहीरपणे आरोप झाले. महापालिका निवडणुकीत युवा सेनेचे दोघे निवडून आले असले तरी युवा सैनिक प्रचारात सक्रिय दिसले नाहीत. त्यांना उमेदवारांचे काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. स्वत: आदित्य यांनी रोड शो किंवा जाहीर सभांच्या माध्यमातून प्रचार केला. पण आदित्य यांना बरीच राजकीय वाटचाल करावी लागणार आहे. पंकजा, अमित किंवा प्रणितीच्या तुलनेत आदित्य वयाने लहान असला तरी राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले आहे.

तेव्हा आणि आता..

लातूरमध्ये तेव्हा विलासरावांच्या जवळचे कार्यकर्ते बी. व्ही. काळे गाडी थांबवायचे. चला, गावात सोडतो असं म्हणायचे आणि गप्पा मारत गावात सोडायचे. सामान्य माणसाला मतदानादिवशी पैसे देण्यापेक्षा अशी आपुलकीने केलेली मदत मनात घर करत असते. हे करण्यामागे बी. व्ही काळेंचा राजकीय हेतू नसे. पण, त्यातून माणसं जोडली जात. अशा अनेक गावातील कार्यकर्त्यांचा संच विलासराव यांच्या मागे होता. त्याला जातीपातीच्या भिंती नव्हत्या. अर्थात तेव्हाही कार्यकर्त्यांची राजी- नाराजी असेच. पण प्रत्येकाला विचारात घेतले जायचे. विलासराव गेले आणि अमितराव भेटेनासे झाले. खूप दिवसांनी ते बाहेर पडले आणि हरंगुळ गावात त्यांनी बठक घेतली. ते अगदी सतरंजीवर बसले. तेव्हा ‘अमितरावांचे विमान जमिनीवर’ अशी बातमी वर्तमानपत्रात आली होती. सांगायचे तात्पर्य एवढेच की, अंगावरच्या कुर्त्यांची इस्त्री खराब होऊ न देता राजकारण करणे आणि सतरंजीवर बसून लोकांशी बोलणे यात अंतर पडले की पराभव नक्की समजावा. लातूरचा दुष्काळ सर्वाना परिचयाचा. पण अमितराव या काळात लोकांमध्ये मिसळले, त्यांनी सरकारदरबारी काही विरोधक म्हणून आरडाओरड केली, असे काही घडले नाही. कारण तेव्हा लातूरच्या पालकमंत्री होत्या पंकजा मुंडे. विलासराव-गोपीनाथरावांच्या मैत्रीपर्वाचा पुढचा अध्याय सुरू होता. सत्तेत नसतानाही फार अडचण येणार नाही, असा देशमुख यांचा कयास योग्यही होता. पंकजा मुंडे यांनीही लातुरात भाजप वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाला आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांपुरताच त्यांचा लातूरशी संबध होता. संभाजी निलंगेकर-पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद आले आणि त्यांनी एकहाती लातूरमध्ये भाजपला सत्ता मिळवून दिली.

आरोग्यासाठी ‘ब्लॅक टी’  पिणे वेगळे. पण ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या घरी जनावराच्या धारा काढण्यापूर्वी दूध संपलेले असताना काळा चहा पिणे वेगळे. गोपीनाथराव असा काळा चहा पिणारा माणूस. दुष्काळात एकदा जनावरांच्या छावणीतच ते मुक्कामी राहिले. गाडीत जेवणाचा डबा असला तरी ज्या तालुक्यात जातो आहोत, तेथील कार्यकर्त्यांला ‘आमच्या जेवणाचंही बघा’ असं म्हटल्यावर निर्माण होणारी आपुलकी बीडमधून गायब झाली आहे. एक तर ‘ताई’ फोन उचलत नाहीत. त्यांचे स्वीय साहाय्यक एवढे की, कोणता निरोप द्यायचा, याची त्यांचीच चाळणी अधिक बारीक आहे. परिणामी परळीसारख्या गावातही फटका बसतो. परळीतील एक स्थानिक सांगत होते, नाली तुंबली तरी आम्ही धनंजय मुंडे यांना सांगतो. तेही ऐकून घेतात. त्यासाठी कोणाला तरी सांगतात. मतदारांच्या समस्या आणि अपेक्षा फार मोठय़ा कधीच नसतात. पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तो सत्तेत असतानासुद्धा अपेक्षित असतो. कितीही वाजता दार ठोठवावं, ते उघडलं जावं. अडचणीमध्ये त्यांनी शब्द टाकावा, एवढीच अपेक्षा असते. पण राजकीय नेत्यांना तरतुदीचे मोठे आकडे सांगायची सवय असते. पंकजा मुंडे यांना या श्रेणीत ढकलणारे अनेकजण परळीमध्ये आहेत. परिणामी परळीसह बीडमध्ये त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पराभूत मानसिकतेतून त्यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले. पण पुन्हा मन जिंकण्यासाठी काम करण्याऐवजी राजीनामाअस्त्र म्हणजे पुन्हा स्टंटबाजी, असाच संदेश गेला. ज्यांना गोपीनाथरावांनी जवळ केले होते, त्यांची टीम बाद ठरवून नवीन टीम बांधण्याच्या नादात एकामागे एक पराभव पदरी घेत पंकजा मुंडेंचा प्रवास सुरू आहे. लोकप्रियतेच्या शिखरावरील दोन्ही नेत्यांच्या वारसदारांना त्यांचा जिल्हा सांभाळता येत नाही, असा संदेश या निवडणुकीमधून गेला आहे.

  • आदित्य ठकारे हे युवा सेनेचे अध्यक्ष असून त्यांचे दोन उमेदवार विजयी. युवा सैनिक प्रचारात सक्रिय नव्हते.
  • पंकजा या मंत्री असूनही नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला बीडच्या मतदारांनी नाकारले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये परळीमध्ये पंकजा मुंडे यांना एकाही गटात विजय मिळविता आला नाही.
  • लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाला आणि आता गेली चार दशके काँग्रेसच्या ताब्यात असणारी सोलापूर महानगरपालिकाही काँग्रेसला गमवावी लागली. प्रणिती यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
  • अंगावरच्या कुर्त्यांची इस्त्री खराब होऊ न देता राजकारण करणे आणि सतरंजीवर बसून लोकांशी बोलणे यात अंतर पडले की पराभव नक्की हे अमित देशमुखांना कळलेच नाही..

संपर्काचा अभाव

राजकारणात पुढे येण्यासाठी किंवा स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याकरिता बऱ्याच खस्ता खाव्या लागतात. जनमानसात मिसळावे लागते किंवा लोकांशी संपर्क ठेवावा लागतो. नेमकी यातच राजकारण्यांची पुढची पिढी कमी पडते. लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न जटिल झाला असताना आमदार अमित देशमुख आहेत कुठे, अशी ओरड झाली. पंकजाताईंबद्दल तर वेगळाच अनुभव येतो. त्यांच्यांशी संपर्क साधणे म्हणजे महाकठीण. या तुलनेत प्रणितीताईंचा अनुभव चांगला असल्याचे सांगण्यात येते. आदित्य ठाकरे हे पण आपल्या गोतावळ्यातच मग्न असतात, असा आक्षेप घेतला जातो. जनतेची नाळ तुटल्यावर काय होते याचा धडा अमित देशमुख आणि पंकजा मुंडे यांना या निकालातून नक्कीच मिळाला असणार.