राजकीय नेत्यांना आपल्या धकाकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.  सकाळी लवकर उठायचे, मात्र जेवणाच्या वेळा नक्की नाही, रात्री विश्रांती घेण्यास किती वाजतील याचा नेम नाही असा दिनक्रम बहुसंख्य  नेतेमंडळींचा असतो. अर्थात  नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते यास अपवादही आहेत. अशी जीवनशेलीमुळे  राजकारणी लोकांच्या शरीरात अनेक आजार घर करतात. त्यामुळे लठ्ठपणा हटवा’  अशी नवीन मोहीम शासनातर्फे  चालू होत आहे. नागपूर विधिमंडळात आमदार व मंत्र्यांची वैद्यकीय तपासणीने या मोहिमेची सुरुवात झाली व अनेक मंत्री/ आमदारांनी आपले खूप वाढलेले वजन पाहून ते कमी करण्याचा निश्चय जाहीर केला.  या पाश्र्वभूमीवर  सर्वच राजकारण्यांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी काय करावे, याची चर्चा करणारा लेख..

रात्रीचे जेवण खूप उशिरा, दिवस संपतो तो रात्री तब्बल एक-दीड वाजतो. सकाळी लवकरपासूनच लोकांची रीघ. दिवसभर फोन्स, धावपळ, मीटिंग्ज. लग्नसराईच्या मोसमात एकेका दिवशी अक्षरश: २०-२५ कार्यक्रमांना उपस्थिती लावायचीच. प्रत्येक ठिकाणी ‘थोडे तरी खा, निदान गोड तरी खा’ असा आग्रह. कार्यकर्त्यांचा, लोकांचा आग्रह मोडणे, त्यांना नाराज करणे कठीण. अपुरी झोप व वेळीअवेळी कुठेही जायला लागणे नित्याचेच. कुटुंबीयांसाठी सोडा, स्वत: व्यायाम करण्यासाठीसुद्धा वेळ काढणे मुश्कील. हे बोल, ही व्यथा ग्रामीण महाराष्ट्रातील एका आमदार पत्नीची, राजकीय नेतेमंडळींच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारी. थोडय़ाफार फरकाने राजकारणात सक्रिय असलेल्या सर्वाचाच दिनक्रम साधारण असाच. अनिश्चितता, अनियमितता हा रुटीनचा स्थायिभाव. कामाचे प्रेशर, ताणतणाव, अपुरे झोपेचे तास, सततची धावपळ, वेळी-अवेळी खायला लागणे हे बहुतांशी लोकांसाठी नेहमीचेच. यातून ‘वर्क-लाइफ’ समतोल सांभाळणे वा त्याचा विचारही करणे कठीण. नेमकी अशी पूर्ण सुट्टी नाहीच. यथावकाश या जीवनशैलीचे दुष्परिणाम कार्यक्षमतेवर होऊ लागतात. कुठे तरी प्रकृतीचे तंत्र बिनसू लागते. अ‍ॅसिडिटी, वेदनाशामके अशा गोळ्यांचा आधार घेत, वाढणारे वजन सावरत रुटीन खेचून नेण्याचा प्रयत्न होतो. हे कुठे तरी चुकतंय याची जाणीव होत असावी, पण राजकीय जीवनातील दबाव व वेग यामुळे जाणिवेतून कृतीपर्यंत काही प्रगती होत नाही. मग काही जणांच्या बाबतीत तरुण वयातच हृदयविकाराचा तीव्र झटका किंवा व्यसनामुळे कॅन्सरचा बळी अशा दुर्दैवी व दु:खद घटना घडतात. अनेकांना उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टोरॉल, गुडघेदुखी असे काही विकार होतात. अशा व्याधी पाठी लागल्यावर मात्र जीवनशैलीची दुरुस्ती करावीच लागते व मग पर्सनल योगा ट्रेनर, तोलून-मापून खाणे, वजन कमी करणे हे सर्व कसोशीने पाळताना काही जण जरूर दिसतात .  ‘बेटर लेट  दॅन नेव्हर’ या उक्तीप्रमाणे उशिरा का होईना, पण स्वत:च्या रुटीनमध्ये केलेला हा सकारात्मक बदल निश्चितच स्वागतार्ह व महत्त्वाचा, पण मुळात सुरुवातीपासून आरोग्याची काळजी घेतली गेली तर ते व्यक्तिगत स्वत:साठी व आपल्या राजकीय कारकीर्दीसाठीही अत्यंत फायद्याचे असेल या बाबीकडे दुर्लक्ष होते. लोकनेतृत्व करणाऱ्या, विविध पातळ्यांवर शासकीय यंत्रणेचा गाडा हाकणाऱ्या लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता ही समाजासाठीही महत्त्वाचीच. अर्थात यास अपवाद काही थोडे नेते जरूर दिसतात, जे करिअरच्या सुरुवातीपासूनच जाणीवपूर्वक स्वयंशिस्त पाळून व्यायाम, आहारनियंत्रण करतात व ‘अ‍ॅक्टिव्ह’ लाइफस्टाइलने स्वत:ला अगदी तंदुरुस्त ठेवतात. खरे तर प्रत्येक राज्यातील अशा नेत्यांची उदाहरणे तेथील सर्व राजकारणींपुढे ठेवली गेली पाहिजेत. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण आपल्या सर्वासाठीच व देशातील राजकीय क्षेत्रातील मंडळींसाठी तर विशेषत: प्रेरणादायी ठरावे.

सरासरी आयुर्मान जे स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अवघे ४२ होते, ते आता ६७ च्या पुढे गेले आहे; पण त्यासोबत चुकीच्या जीवनशैलीने येणाऱ्या अनेक आजारांचे ओझेही सातत्याने वाढत आहे. अनारोग्याचा हा हल्लारोखण्यासाठी जीवनशैलीतील योग्य बदल सारखे गुणकारी, परिणामकारक, स्वस्त व ‘साइड इफेक्ट’ फ्री औषध शोधूनही दुसरे सापडणार नाही. आपल्यातील प्रत्येकासाठीच याचे महत्त्व; पण ज्या राजकीय व्यक्तींची जीवनपद्धती इतकी धकाधकीची व अनारोग्याला सहज आमंत्रण देणारी आहे त्यांच्यासाठी तर याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे; पण सर्वसाधारण पाहता राजकीय जीवनशैलीत आरोग्यविषयक जागरूकता ही काही फारशी रुजलेली नाही. आरोग्य व औषधसाक्षरतेच्या कामाचा प्रसार करताना काही वेळा ज्येष्ठ राजकीय नेत्यांशी चर्चा झाली. ‘आम्ही इतक्या उच्च वर्तुळात असूनही, इतके वर्षे राजकारण-समाजकारण यात असून आरोग्य, औषधे या महत्त्वाच्या विषयांत आम्हाला अत्यल्प माहिती आहे.  आमच्यासारख्यांची ही स्थिती तर सर्वसामान्यांमध्ये आरोग्याबाबत अनास्था व अज्ञान असेल तर फारसे नवल नाही’ हे त्यांचे उद्गार बरंच काही सांगतात. राजकारणी मंडळींचे आरोग्य, त्यांचा ‘फिजिकल फिटनेस’ यावर फारशी चर्चा होताना कुठे दिसत नाही. अगदी निवडणुकीच्या वेळीही उमेदवारांचा ‘फिटनेस’ हा मुद्दा चर्चेत नसतो वा मतदारही हा मुद्दा लक्षात घेतात असे फारसे चित्र नाही. ‘शासकीय व इतरही नोकरीसाठी विविध वैद्यकीय चाचण्या असतात तसे निकष व व्यवस्था लोकप्रतिनिधींच्या निवडीबाबतही असावी, निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांनी त्यांची आरोग्य स्थिती, फिटनेस जाहीर करावा. राजकीय नेते हेसुद्धा समाजासाठी ‘सेलेब्रिटी’ असतात व त्यांच्या वागणुकीचा परिणाम जनमानसावर होत असतो. त्यामुळे त्यांनी सुआरोग्य राखल्यास चांगला मेसेज समाजात जातो, असे विचार इंडियन मेडिकल असोसिएशनने मागील वर्षी दिल्लीतील निवडणुकांआधी मांडले होते. या पाश्र्वभूमीवर अलीकडे पार पडलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे पाहणे  महत्त्वाचे ठरेल. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांबाबत भरपूर लिहिले, बोलले गेले. यात सत्तरीच्या जवळ पोचलेल्या या दोन्ही उमेदवारांच्या आरोग्याबाबतही चर्चा होती. ट्रम्प यांनी आपली प्रकृती ‘उत्कृष्ट’ असल्याचा निर्वाळा देणारे डॉक्टरांचे सर्टिफिकेट जाहीरपणे सादर केले, तर हिलरी क्लिंटन यांना मेंदूतील रक्तगाठी किंवा विस्मरणाचा त्रास नसल्याची ग्वाही त्यांचे डॉक्टर्स देत राहिले. या साऱ्यांचा त्यांच्या मतांवर किती परिणाम झाला याची कल्पना नाही; पण उमेदवार  तंदुरुस्त आहे की नाही, पद मिळाल्यावर ती जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याची क्षमता त्यांच्यात आहे की नाही याचा विचार तिथे केला जातो, हा मुद्दा निश्चितच लक्षवेधी आहे.

राजकीय कारकीर्द आणि आरोग्यभान यांची सांगड घालण्यासाठी काय काय करणे शक्य आहे?

  • राजकारणातील करिअर हे एक आव्हानात्मक करिअर आहे. त्यामुळे कार्यकर्ता स्तरापासूनच या करिअरची आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक ती आरोग्यविषयक जागरूकता व काळजी घेण्यासाठी पद्धतशीर कार्यक्रमच प्रत्येक पक्षात असावा. आजच्या तरुण कार्यकर्त्यांमधूनच पुढे आमदार, खासदार, मंत्री तयार होत असतात, हाही मुद्दा लक्षात घेण्यास हरकत नाही.
  • नवनिर्वाचित आमदारांसाठी व इतरही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठी आरोग्यविषयक कार्यक्रम घेता येईल. सर्व वैद्यकीय चाचण्या वर्षांतून एकदा तरी करण्याचा नियम उपयुक्त ठरेल.
  • अनेक पक्षांतर्फे नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेण्यात येतात व ती स्वागतार्ह गोष्टच आहे. अशीच आरोग्य शिबिरे सर्व कार्यकर्त्यांसाठी घेण्यात येऊन त्यांना आहार, व्यायाम, व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देता येईल. पक्षनेत्यांनी यासाठी विशेष लक्ष दिल्यास कार्यकर्त्यांनाही या विषयाचे गांभीर्य ध्यानात येईल.
  • आपल्या नेत्यांनी सर्व समारंभांना उपस्थित राहावे, ही अपेक्षा व आग्रह याबाबत संबंधित सर्वानीच विचार करण्यास हरकत नाही. दिवसभरात जर अनेक कार्यक्रमांत, मग कधी ते कोणाचे लग्नसमारंभ तर कधी उद्घाटन सोहळे, उपस्थिती लावायची तर त्यांना काम करायचा वेळही मर्यादित होऊन जातो व आरोग्यावरही परिणाम होतो, ही बाब लक्षात घेण्यास सर्वच आग्रही मतदारांनी व कार्यकर्त्यांनी हरकत नाही.

असे बरेच काही बदल जाणीवपूर्वक व सातत्याने केल्यास त्याचे दृष्यपरिणाम निश्चितच सर्वाना लाभदायी असतील. गेल्या तीन चार दिवसांत दोन बातम्या  वाचल्या. एक होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्नपूर्वक २५ किलो वजन गेल्या वर्षभरात कमी केले.

इतके व्यस्त असूनसुद्धा ते ही किमया करू शकले, हे इतरांसाठी नक्कीच स्फूर्तिदायी उदाहरण आहे. यासाठी  मुख्यमंत्र्यांचे  अभिनंदन. दुसरी बातमी होती ‘लठ्ठपणा हटवा’  अशी नवीन मोहीम शासनातर्फे सर्वासाठी चालू होत आहे. नागपूर विधिमंडळात आमदार व मंत्र्यांची वैद्यकीय तपासणीने या मोहिमेची सुरुवात झाली व अनेक मंत्री/ आमदारांनी आपले खूप वाढलेले वजन पाहून ते कमी करण्याचा निश्चय जाहीर केल्याचे बातमीत म्हटले होते. ही अत्यंत आवश्यक व सकारात्मक घटना आहे. यासाठी शासनाचे व मंत्री गिरीश महाजन यांचेही अभिनंदन. राजकारण वा राजकारणी हा विषय माझा नाही. मात्र आरोग्य हा विषय आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना प्रकर्षांने काही गोष्टी राजकीय जीवनशैलीबाबत जाणवल्या व त्यात सकारात्मक बदल व्हावे असे मनापासून वाटले म्हणूनच हा लेखप्रपंच. सर्वच संबंधित मागील भूमिका लक्षात घेतील व घ्यावी, अशीविनंती. वर्ष संपत आले आहे. नवीन वर्षांसाठी फिटनेसचा संकल्प असावा व या आरोग्यविषयक अजेंडय़ासाठी सर्वानाच शुभेच्छा. इच्छा असली की मार्ग सुचतो व केल्याने होत आहे रे हे निश्चित!

 

प्रा. मंजिरी घरत

लेखिका आरोग्य व औषधसाक्षरतेच्या प्रसारक व अभ्यासक आहेत.