‘‘२६ जुलैच्या महापुराची आठवण मुंबईकरांच्या मनात अगदी ताजी आहे. मात्र मुंबईपासून लांब चिपळूणसारख्या एका छोटय़ा शहरात राहणाऱ्या माझ्यासारख्यालाही त्या दिवसाच्या आठवणीने अंगावर काटा येतो. माझं घर ग्रंथालयासमोरच आहे. मी घरातून पाहत होतो की, ग्रंथालयात पाणी शिरतंय. पण मी काहीच करू शकत नव्हतो. कारण माझ्याही घरात पाच फूट पाणी होतं. दुसऱ्या दिवशी ग्रंथालयात गेलो, तर फक्त वरच्या रॅकमधली पुस्तकं शिल्लक होती. त्यांनाही ओल लागली होती. बाकी सगळी पुस्तकं वाहून गेली. अंदाज घेतल्यानंतर लक्षात आलं की, ५८ हजार पुस्तकांपैकी ४० हजार पुस्तकं अक्षरश पाण्यात गेली. त्यावेळी मीच नाही, तर आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी विचार केला, आपण घरात चटईवर झोपू शकतो. पण पुस्तकं कशी वाचवायची? आम्ही त्यानंतर कित्येक दिवस घरी फक्त जेवायला जात होतो. दिवसरात्र आम्ही वाचनालयातच काम उपसत होतो. तब्बल ४० हजार पुस्तकं वाहून गेली.. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथ, जुन्या पोथ्या यांचा समावेश होता. आम्हाला तर अगदी कणा मोडल्यासारखंच झालं. पण त्यावेळी कुसुमाग्रजांचे शब्द आठवले ‘पाठीवर हात ठेवून, फक्त लढ म्हणा..’! आम्ही पुन्हा एकदा जोमाने उभं राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पुनश्च हरि ओम म्हणून आम्ही काम सुरू केलं आणि चारही दिशांनी मदतीचा ओघ आला. अनेकांनी आम्हाला दुर्मिळ ग्रंथांची मदत केली. आता एका ठिकाणी दहा कपाटं भरून असलेली हस्तलिखितं आम्हाला मिळणार आहेत. खूप चांगला अनुभव असतो, हे काम करण्याचा! एखादा जुना ग्रंथ उघडला की, त्यावर लोकमान्यांची स्वाक्षरी आढळते. कधी त्यांनी समासात लिहिलेले संदर्भ आढळतात.’’
आता ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून मिळालेल्या मदतीतून कोकणच्या विषयात अभ्यासासाठी अपरान्त संशोधन केंद्र सुरू करायचं आहे. सध्या आमच्या कोकणात अशा प्रकारचं एकही संशोधन केंद्र नाही. हा व्याप मोठा आहे. पण या संशोधन केंद्रात अनेकांनी येऊन संशोधन करायला हवं. आम्ही त्यांना शिष्यवृत्तीही देऊ. ग्रंथालयाचा व्याप हळूहळू वाढत आहे. पण त्यासाठी जागा अपुरी आहे. आता आलेल्या निधीतून आम्ही ग्रंथालयाची इमारतही चांगली वाढवण्याचा विचार करत आहोत.
प्रकाश देशपांडे (लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण)

लोकसत्ताने बळ दिले.. ग्रंथालयांना ‘ज्ञानाची सदावर्त’ म्हटलं जातं. जेथे ज्ञानदान सतत चालू असतं, ती सदावर्त. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या अनेक ग्रंथालयांनाच सदावर्तात जाण्याची वेळ आली आहे. ग्रंथालयांना मिळणारं अनुदान वाढवण्याच्या फक्त गप्पाच दोन र्वष सुरू आहेत. प्रत्यक्षात सध्या मिळणारं अनुदान कर्मचाऱ्यांचा पगार भागवायलाही पुरेसं नाही. सरकार काहीच करत नाही. कदाचित लोकांनी वाचू नये यासाठीच सरकार प्रयत्नशील असावं. कारण वाचन वाढलं की, विचारशक्ती वाढते. मग कोणाला मत द्यायचं, याचा विचार करता येतो आणि ते धोकादायक ठरू शकतं. पण आम्ही थांबणार नाही. लोकसत्ता आमच्या पाठीशी उभा आहे. आमच्या वाचनालयाबाबत ‘लोकसत्ता’मध्ये माहिती आली आणि त्यानंतर खूप फोन आले. पण शेवटी समाजाचं काम म्हणजे देवपूजा असते.