नवी दिल्ली येथे इंडियन एक्स्प्रेस समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यानकार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी लोकशाही, माध्यमे आणि आजचे सामाजिक-राजकीय पर्यावरण या अनुषंगाने आपले विचार मांडले. त्या भाषणाचा संपादित अंश..

मी जेव्हा ‘इंडियन एक्स्प्रेस’चा विचार करतो, तेव्हा माझ्या मनात विचार येतो तो  रामनाथ गोएंका यांचा. पत्रकारितेच्या उत्तमोत्तम गुणांचे ते मूर्तिमंत प्रतीक होते. हे गुण होते प्रखर स्वातंत्र्येच्छा, बलाढय़ शक्तींविरोधात उभे राहण्याची आणि सत्तेच्या गैरवापराविरुद्ध लढण्यासाठीची निडरता आणि कटिबद्धता. आपणांस जे योग्य वाटते ते इंडियन एक्स्प्रेसमध्ये छापण्याच्या हक्कासाठी लढणे यापरती आनंदाची गोष्ट त्यांच्यासाठी अन्य कोणती नव्हती. ते एक लढवय्ये होते. प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न होत असताना त्यांनी त्यांच्या तत्त्वांसाठी आणि भारतीय पत्रकारितेत स्वातंत्र्याची अत्युच्च मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून एक मोठे उदाहरण घालून दिले. आज हेही लक्षात घेतले पाहिजे, की रामनाथजी एक सच्चे देशभक्त होते. त्यांनी १९३६ साली ‘द इंडियन एक्स्प्रेस’ची स्थापना केली. महात्मा गांधी यांनी व्यक्त केलेली राष्ट्रीय वर्तमानपत्राची गरज ही त्यामागील खरी प्रेरणा होती. त्यांनी साम्राज्यवादाच्या काळात प्रस्थापितांशी संघर्ष केला. स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि मुक्तपणे विचार व्यक्त करण्याच्या घटनादत्त अधिकाराचे रक्षण करण्यासाठी लढा दिला. मुक्त प्रसारमाध्यमांच्या अभावी लोकशाही म्हणजे एखाद्या कोऱ्या कागदासारखी आहे, ही बाब अन्य कोणाहीपेक्षा त्यांच्या जास्त ध्यानात आली होती. त्यांनी बाणवलेल्या कल्पना वेळोवेळी अधोरेखित करण्याची, वज्रलेपित करण्याची आणि लोकशाही व स्वातंत्र्यावर विश्वास असणाऱ्या सर्व पत्रकारांनी त्या अनुसरण्याची गरज आहे.

एका अर्थी ज्याच्याकडे दूरध्वनी यंत्र आहे असा प्रत्येक जण, मग तो एखादा शिक्षक असो, एखादी माता, विद्यार्थी वा राजकीय कार्यकर्ता असो, तो प्रकाशक आणि प्रसारक आहे. संवाद क्षेत्रात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती साधली आहे. त्यातून जनतेवर अफाट माहिती आणि मतांचा भडिमार होत आहे. त्यातून अनेक सकारात्मक बदलही झाले. सर्वप्रथम त्याने सत्ताहीन जनतेला आजवर घालण्यात आलेल्या शांततेच्या बेडय़ा तोडल्या. इंटरनेट आणि समाजमाध्यमांमुळे जी मुक्ततेची भावना आली आहे त्यातून हे नक्की झाले आहे की प्रत्येकाला आवाज आहे आणि अगदी दूरच्या गावातील लहान व्यक्तीचाही आवाज ऐकला जात आहे. बोलण्याच्या आणि माहिती मिळवण्याच्या क्षमतेतून सामान्य नागरिकांचे खरे सक्षमीकरण झाले आहे. या सर्व विकासातून माहिती मिळवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात विविधता आली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना धुंडाळण्यासाठी माहितीचे एक संपूर्ण जग आता उपलब्ध आहे. मात्र याची दुसरी बाजू अशी आहे, की माहितीचा इतका अफाट साठा असल्याने त्यातील बरीचशी माहिती तपासून बघता येत नाही. तिला कोणतीही चाळण नाही. अगदी अलीकडचेच उदाहरण घ्या. अमेरिका आणि फ्रान्समध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. त्या काळात तेथील राजकीय नेत्यांचे वैयक्तिक संभाषणसुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून अगदी कोणालाही सहज उपलब्ध झाले होते. अशा माहितीतून ठोस अर्थ काढण्यासाठी आणि तिचा गैरवापर टाळण्यासाठी ती पुन:पुन्हा तपासून पाहणे, त्याची संगती व अन्वयार्थ लावणे याची गरज असते. मुळात जेव्हा इतकी माणसे इतक्या माध्यमांतून बोलत असतात, तेव्हा त्या कोलाहलात अनेकांचे आवाज विरून जातात आणि योग्य गोष्टी ऐकणे आणि त्यांचा अर्थ लावणे हे अवघड होऊन बसते. याच ठिकाणी चांगली पत्रकारिता महत्त्वाची आणि अपरिवर्तनीय भूमिका बजावते – ती हस्तक्षेप करते. ती माहितीचे विश्लेषण करते. माहितीच्या जंजाळातून खोटय़ा किंवा फसव्या बातम्या वेगळ्या काढून सत्य वेगळे करते. योग्यतेची खात्री करून घेते. जनतेला चांगली माहिती मिळेल आणि ती मते बनवू शकेल यासाठी माहितीला संदर्भ प्रदान करते.

माहिती मिळवण्याचे पर्याय वाढले असले तरी ती अधिकाधिक वैयक्तिक होत चालली आहे. आपणांस जे आवडते, जे पटते, तेच वाचण्याचा पर्याय नागरिकांकडे आता आहे. परंतु बातम्यांचे स्रोत निवडण्याच्या या प्रक्रियेत एकमेकांकडे दुर्लक्ष केले जाण्याची किंवा दुसऱ्याचे मत ऐकूनच न घेतले जाण्याची शक्यता आहे. यातून सहमतीची शक्यता कमी होते आणि असहिष्णुतेची शक्यता वाढते. मी यापूर्वी अनेकदा म्हणालो आहे की, भारतासारख्या चैतन्यमय आणि सुदृढ लोकशाहीसाठी चर्चा होणे, मतभेद होणे आणि त्यातून निर्णय होणे आवश्यक आहे. येथे मतप्रदर्शन, चर्चा करणाऱ्या भारतीयांसाठी कायम जागा आहे. असहिष्णू भारतीयांना मात्र मुळीच स्थान नाही. ते भारतीय राज्यघटनेच्या प्राणतत्त्वाच्या विरोधात तर आहेच, पण भारतीयतेच्या कल्पनेविरुद्धही आहे.

देशातील विभिन्नता, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि वर्ण यांची विविधता ही देशाच्या संस्कृतीच्या मुळाशी आहे. आपल्या देशात १.३ अब्ज नागरिक आहेत, ते  २०० भाषा वापरतात, सात मोठे धर्म पाळतात, ते तीन मोठय़ा वांशिक गटांचे आहेत, एका व्यवस्थेखाली, एका झेंडय़ाखाली, एक भारतीय म्हणून ते राहतात.. हाच तर आपल्या विविधतेचा उत्सव आहे. त्यामुळेच आपल्याला वर्चस्ववादी विचारांप्रती – ज्यांचा आवाज मोठा आहे, जे भिन्न मतांचा आवाज दडपून टाकतात, त्यांच्याबाबत – अधिक संवेदनशील असण्याची गरज आहे. त्यामुळेच समाजमाध्यमे आणि अन्य माध्यमे संतप्त आहेत, सरकारकडून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे आणि राज्यव्यवस्थेबाहेरील घटक विरोधी मतांचा पिच्छा पुरवत आहेत. राजकारण, व्यवसाय किंवा नागरी जीवनातील प्रस्थापितांची चर्चेवर नियंत्रण ठेवण्याची आणि तिला हवी तशी दिशा देण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. तांत्रिक प्रगतीमुळे ते माहितीच्या छाननीची प्रक्रिया डावलून थेट त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचू शकतात. ही कायम एकतर्फी आणि सशक्तांकडून अशक्तांच्या दिशेने वाहणारी चर्चा आणि माहिती प्रक्रिया बनते. भारतीय संस्कृतीने नेहमीच विधितेची बूज राखली आहे आणि सहिष्णुतेला चालना दिली आहे. हीच बाब आपल्या अस्तित्वाच्या केंद्राशी आहे. तीच अनेक मतभेद असूनही अनेक शतके आपल्याला एकत्र सांधण्याचे कारण आहे. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे आपण नवविचारांचे वारे आत येण्यासाठी खिडक्या उघडय़ा ठेवल्या पाहिजेत, मात्र त्या वाऱ्याने आपण उडून जाता कामा नये.

अशा प्रकारे आपल्या देशाचे आणि खऱ्या लोकशाही समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे. प्रसारमाध्यमांनी हीच भूमिका कायम वठवली होती आणि ते काम सुरू ठेवले पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की प्रश्न विचारणे चांगले आहे, ते लोकशाहीच्या प्रकृतीसाठी चांगले आहे.

माहितीचे अन्य स्रोत उपलब्ध झाल्याने प्रसारमाध्यमांची प्राथमिक भूमिका आता बाजूला गेली आहे, पण आता त्यांना अधिक जबाबदारी सांभाळायची आहे. ती म्हणजे माध्यमांनी आता माहितीचे वॉचडॉग – पहारेकरी आणि गेटकीपर – रखवालदार – म्हणून काम केले पाहिजे. नेते आणि जनतेमध्ये दुवा म्हणून काम केले पाहिजे.

माध्यमांनी जनहिताच्या मुद्दय़ांवर आवाज उठवून जागृती केली पाहिजे. सरकारी आणि खासगी संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांच्या सर्व कृतींसाठी आणि निष्क्रियतेसाठी उत्तरदायी बनविले पाहिजे. ज्या लाखो नागरिकांवर अजूनही अन्याय होत आहे, ज्यांच्या गरजा भागलेल्या नाहीत, जेथे लिंगभेद, जातिभेद आणि सामाजिक पक्षपात आहे, त्यांना आवाज देण्यासाठी काम केले पाहिजे. सत्ताधारी त्यांचा आवाज ऐकतील यासाठी माध्यमांनी हे प्रश्न उभे केले पाहिजेत. माध्यमे हा एकतर्फी संवाद बहुआयामी करू शकतात. ते संकल्पनांच्या मुक्त वहनासाठी मार्ग बनवू शकतात. मात्र माध्यमांनी आपली भूमिका अत्यंत जबाबदारीने आणि तथ्यांप्रति आदर राखून पार पाडण्याची कधी नव्हे इतकी गरज आज आहे. तथ्ये पडताळून पाहण्याची मुख्य भूमिका माध्यमांना पार पाडायची आहे. आजच्या जगात जेथे पर्यायी तथ्ये सतत सादर होत आहेत, तेथे हे काम अधिक महत्त्वाचे आहे. जेथे विविध मते मांडली जातात तेथे वस्तुनिष्ठता हा महत्त्वाचा गुण आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी तथ्ये शोधून त्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

पेड न्यूजचा धोका मोठा आहे. माध्यमांची मालकी मूठभर लोकांच्या हाती एकवटणे आणि पत्रकारांची वैयक्तिक मते यातून हितसंबंधांचा संघर्ष होत आहे. अशा स्थितीत नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी वस्तुनिष्ठता जपली पाहिजे. रामनाथजींनी दाखवून दिले त्याप्रमाणे न्यूजरूममध्ये स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रकाशकाकडून नैतिक बळ मिळणे गरजेचे आहे. माध्यमांचाही मोठय़ा प्रमाणावर विस्तार झाला आहे. त्यात क्षीण आवाज दबून जाण्याचा धोका आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी माहितीचा भडिमार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात मतांचे ध्रुवीकरण आणि तथ्यांचे विकृतीकरण होण्याचा संभव अधिक आहे. माध्यमसमूहांनी हे सर्व दबाव झुगारून आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची व त्यांच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याची नवी प्रारूपे शोधली पाहिजेत.

देशाची तरुण पिढी त्यांच्या इच्छाआकांक्षा पूर्ण व्हाव्यात याकरिता चांगल्या वातावरणाची अपेक्षा करीत आहे. या नव्या धाडसी भारताला त्यांचे स्वतंत्र निष्कर्ष काढू द्यावेत. मात्र ते करताना मनाची कवाडे बंद करता कामा नयेत. आपल्या इतिहासात शंका घेण्याची, मतभिन्नतेची आणि विद्वत्तापूर्ण चर्चेची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या राष्ट्रीयत्वाचा तो गाभा आहे. एका चौकटीत मतभेदांना जागा असण्याचे आपली घटना हे उत्तम उदाहरण आहे. सहिष्णुता आणि विविधतेचा आदर हेच संस्कृतीच्या आणि पुढील पिढय़ांच्या तग धरून राहण्याचे खरे मंत्र आहेत.

प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. त्यांच्याकडे अन्य तीन स्तंभांना उत्तरदायी बनवण्याची आणि जनमत बनवण्याची मोठी ताकद आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी माध्यमांना स्वातंत्र्याची गरज असली तरी उत्तरदायित्व आणि वस्तुनिष्ठता जपण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. माझ्या मते माध्यमांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले नाहीत, तर ती कर्तव्यात कसूर करत आहेत. त्याचवेळी त्यांनी खऱ्या आणि खोटय़ा वार्ताकनांतील फरक ताडला पाहिजे. माध्यमांनी सोपा मार्ग अवलंबण्याचा मोह टाळला पाहिजे. माध्यमांनी हे अंतर्विरोध सहन करून तगण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. माध्यमांसह आपणां सर्वासमोरील प्रश्न हा आहे की आपण विधितेतून नटलेल्या संस्कृतीत जगणार की पक्षीय विचार आपल्या राष्ट्रीय धोरणांवर आरूढ होऊ देणार? जेव्हा आपण दुसऱ्यांचा आवाज ऐकणे बंद करू तेव्हा लोकशाहीचे अस्तित्व संपलेले असेल हे लक्षात ठेवले पाहिजे. शतकानुशतके भारताने संस्कृतींच्या, मतमतांतरांच्या या संघर्षांवर मात करूनच जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून स्थान मिळवले आहे.

आपण विकासाच्या मार्गावर जसे पुढे जात आहोत तसे साधनस्रोतांच्या आणि संधींच्या विषम वाटणीची भावना बळावत आहे. माध्यमांनी यातील सत्य वस्तुनिष्ठपणे मांडले पाहिजे. जर माध्यमे रामनाथजी गोएंकांप्रमाणे स्वातंत्र्य आणि विविधतेवर विश्वास ठेवत असतील तर त्यांनी तसे त्यांच्या कामातून दाखवून दिले पाहिजे. हे कायम लक्षात ठेवले पाहिजे, की माध्यमांचे काम प्रामाणिक आणि न्याय्य प्रश्न विचारण्याचे आहे. नागरिकांशी हेच त्यांचे पवित्र नाते व देणे आहे.

अनुवाद – सचिन दिवाण