कादियानी, अहमदी किंवा अहमदिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पंथांविरुद्ध पाकिस्तानात होणाऱ्या हिंसाचाराची मुळे ३० वर्षांपर्यंत मागे शोधता येतात. हा पंथ इस्लामविरोधी आहे, ‘ईश्वर-निंदा’ कायद्याचा भंग या पंथाकडून होतो आणि या पंथाकडूनच अनेकदा आमच्या- बहुसंख्याकांच्या- धर्माची ‘कुरापत’ काढली जाते, अशी कारणे माणसांना मारण्यासाठी पुरेशी ठरतात. अल्पसंख्य समुदायांचे उणेच पाहायचे, ते आपले नाहीत असेच समजायचे, या प्रकाराला पाकिस्तानात सामान्य लोकांचाही पाठिंबा मिळतो, हे कोणत्याही देशातील कोणत्याही धार्मिक समूहासाठी पुरेसा इशारा ठरणारे आहे..
‘कादियान पंथ हा संपूर्ण पाकिस्तानचा सामायिक शत्रू आहे. कारण हे लोक प्रेषिताबद्दल अनुदार उद्गार काढतात. तेव्हा सर्व मुस्लिमांनी या शत्रूला ओळखले पाहिजे.’ असे विखारी वक्तव्य महिन्याभरापूर्वी, २२ डिसेंबर २०१४ रोजी जिओ टीव्हीवरील एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानातील धार्मिक नेते सईद आरिफ शहा यांनी केले. कादियान पंथ किंवा अहमदी समुदाय हा पाकिस्तानातील अल्पसंख्य समुदाय आहे. अल्पसंख्याकांच्या विरोधातील या जाहीर वक्तव्याला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आमिर लियाकत हुसन यांच्यासह सहभागी झालेल्या गणमान्य लोकांनी टाळ्या वाजवून सहमती दिली, हे विशेष. त्यानंतर पाच दिवसांनी दिनांक २७ डिसेंबर रोजी पंजाब प्रांतातल्या गुजराँवाला जिल्ह्य़ात ‘भिरीशहा रेहमान’ या खेडय़ातले रहिवासी लुकमान अहद शेहजाद या अहमदी इसमाला एका बंदूकधारी इसमाने गोळ्या झाडून ठार केले. गेल्या वर्षभरात अहमदी समुदायातील मारला जाणारा अकरावा इसम होय. यापूर्वी ७ सप्टेंबर २००८ रोजी एका धार्मिक टीव्ही कार्यक्रमाचे संचालक (पाकिस्तानातील धर्मविषयक खात्याचे माजी मंत्री) म्हणाले होते की, ‘अहमदी समुदायातील लोक हे ‘वाजिब-उल-कत्ल’ आहेत’, म्हणजे ठार मारण्यालायक आहेत. त्यामुळे अहमदी लोकांची हत्या करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. परिणामत: त्यानंतरच्या ४८ तासांच्या आत अहमदी समुदायातील दोघांना ठार मारण्यात आले.
या दोन घटना व त्यांचे परिणाम यांचा सरळ संबंध नाहीच, असे गृहीत धरले तरी चित्रवाणी माध्यमातून खुलेआम एखाद्या समुदायाविरुद्ध चिथावणी दिली जाते, हे पाहून कुठलाही संवेदनशील माणूस अस्वस्थ होईल.
लाहोरनजीकच्या सर्कापूर खेडय़ात १६ मे २०१४ रोजी एका शाळकरी मुलाने खलील नावाच्या एका ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर गोळ्या झाडल्या. या अहमदी इसमाने एका दुकानात चिकटवलेला आक्षेपार्ह मजकुराचा कागद हटवण्याची विनंती केली होती. दुकानदाराने याउलट त्याच्याविरुद्ध ईश्वर-निंदेची केस नोंदवली. या वृद्ध इसमाला अटक झाल्यावर त्याला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका शाळकरी मुलाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. २८ जुल २०१४ रोजी गुजराँवालामध्ये तीन अहमदी महिलांना मारले गेले; त्यामध्ये ‘कायनात’ आणि ‘हिरा’ नावाच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश होता. नंतर त्यांच्या घरांना आगी लावून देण्यात आल्या. पोलिसांनी या घटनेमागचे तात्कालिक कारण असे नोंदवले की, अहमदी तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. या एका फेसबुक-नोंदीवरून स्थानिक मशिदीच्या इमामाच्या मुलाने रान उठवले. जमाव जमला, जाळपोळ केली, अहमदींची घरेदारे पेटवून दिली. (सोबतचे छायाचित्र याच हिंसाचाराचे आहे). चार वर्षांआधी लाहोरमध्ये दोन निरनिरळ्या घटनांमध्ये सुमारे ८६ अहमदी नागरिकांना ठार केले गेले. पाकिस्तानात या समुदायाविरुद्धच्या कारवाया कमालीच्या वाढल्यामुळे, सततच्या धोक्यातून सुटका मिळवण्यासाठी काहींनी चीनमध्ये आश्रय घेतला आहे. इस्लामाबादमधील ‘सेंटर फॉर रिसर्च अ‍ॅण्ड सिक्युरिटी स्टडीज’ या बिगरसरकारी संशोधन संस्थेच्या मते अहमदी समुदायाविरुद्ध ‘ईश्वर-निंदेचे’ आरोप वाढत आहेत.   
जनरल झिया यांच्या काळातील (१९७७-८८) पाकिस्तानात धर्मावर आधारित ‘राष्ट्रउभारणी’चे काम जोमात होते. झिया यांनी १९८० मध्ये एक कायदा केला. या कायद्याच्या रूपाने लेखणीच्या एका फटक्याद्वारे तमाम पाकिस्तानमधील ‘अहमदी’ समुदायाला ‘बिगरमुस्लीम’ ठरवले गेले. त्यांना ‘अल्पसंख्याक’ असा दर्जा बहाल केला गेला. हजारोंच्या संख्येने अहमदी पाकिस्तान सोडून गेले. या कायद्यान्वये जर अहमदी लोकांनी ‘मुस्लीम’ असल्याचा दावा केला अथवा ‘मुस्लिमां’च्या भावना दुखावल्या तर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागते. अलीकडे तर पवित्र धर्मग्रंथाचे पठण केले एवढय़ा कारणावरून अहमदींना अटक केल्याची उदाहरणे सापडतात. त्यांना मनमोकळेपणाने धार्मिक उत्सव साजरे करता येत नाहीत. त्यांना पवित्र यात्रा ‘हज’साठी मनाई करण्यात येते. लग्नपत्रिकांवर आणि बोटातल्या अंगठीवर पवित्र धर्मग्रंथाचे संदेश लिहिता येत नाहीत. पाकिस्तानात अहमदी संप्रदायातील मुस्लिमांना कुत्सितपणे ‘कादयानी’ असेही संबोधले जाते. त्यांच्या मशिदींवर हल्ले केले जातात. यामागे स्थानिक मौलवींचा हात असतो.
नोबेल परितोषिक विजेते प्रोफेसर अब्दुल सलाम हे अहमदी होते. त्यांनाही भयंकर त्रास दिला गेला. छळाला कंटाळून शेवटी ते देश सोडून गेले. एवढा उच्च-विद्याविभूषित माणूस, केवळ ‘अहमदी’ संप्रदायातील आहे म्हणून एवढा दु:स्वास! मग इतर अल्पसंख्याक समुदायाबद्दल न बोललेलेच बरे.  
मुस्लिमांचा ‘अहमदी’ हा संप्रदाय भारतात निर्माण झाला. मिर्झा गुलाम अहमद (१८३९-१९०८) यांनी १८८९ मध्ये या संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. ते पंजाबच्या कादियान गावात जन्मले होते. हा संप्रदाय उदारमतवादी असून यात इस्लामी तत्त्वांचा मेळ ख्रिस्ती, हिंदू आणि सुफी संप्रदायांशी घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याशिवाय हा संप्रदाय झरतुष्ट्र, अब्राहम, मोझेस, येशू, कृष्ण, बुद्ध, कन्फुशियस आणि गुरुनानक इत्यादी इतर धर्माच्या चिंतकांचे विचार अचूकपणे जाणतो. अहमदी लोक दहशतवादाचा जोरदार विरोध करतात. ‘तलवारीचा जिहाद’ त्यांनी शंभर वर्षांपूर्वी अमान्य केला होता.
आज पाकिस्तानची जी दुरवस्था झाली आहे, त्यामागे गेल्या तीस वर्षांत वाढलेली ‘धार्मिक असहिष्णुता हेदेखील एक प्रमुख कारण आहे. धर्मावर आधारित राष्ट्राची उभारणी ही मुळातच कमकुवत संकल्पना आहे. याची जाणीव झाल्याने पाकिस्तानातील विचारवंत आज पर्यायी विचार-प्रणालीचा कसून शोध घेत आहेत. परंतु धर्म आणि राजकारण यांच्या आज झालेल्या खिचडीत त्यांचा आवाज कुणी ऐकू इच्छित नाही. त्यामुळे खरे इस्लामी विचारवंत खिन्न झाले असून त्यांनी या प्रश्नावर मौन धारण केले आहे. त्यांची जागा दहशतवाद्यांच्या प्रवक्त्यांनी घेतली आहे. परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली असून पाकिस्तानी सन्य हेच देशाला तारू शकते असे तिथले सामान्य लोकदेखील समजू लागले आहेत.
भारताला या गोष्टीपासून शिकण्यासारखे खूप काही आहे. भारतातील मुस्लीम समुदाय हा जगातील एकमेव मुस्लीम समुदाय आहे की ज्याने ६७ वर्षे अविरतपणे लोकशाही आणि लोकशाही मूल्यांचा आस्वाद घेतला आहे. शांतता आणि सह-अस्तित्व या मूल्यावर त्यांची अढळ श्रद्धा आहे. परिणामी जागतिक दहशतवादी संघटनांना ते भीक घालत नाही. भारतीय मुस्लीम समुदायाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या दहशतवादी संघटना काहीशा हतबल झाल्यासारख्या दिसत आहेत. भारतीय मुस्लीम हे ‘भारतीय’च राहिले, याबद्दल ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द इकॉनॉमिस्ट’ या जागतिक दर्जाच्या नियतकालिकांनी  भरभरून लिहिले आहे.  
आज ‘अल-कायदा’ आणि ‘इसिस’ यांसारख्या दहशतवादी संघटनांनी जो उच्छाद मांडला आहे, त्याबद्दल भारतीय मुस्लीम समुदाय उद्विग्न झाला आहे. या समुदायात एक प्रकारे आत्मचिकित्साही सुरू आहे. अशा वेळी बहुसंख्य हिंदू समुदायाने त्यांचाशी प्रभावी संवाद साधला पाहिजे. त्यांचाशी खूप बोलले पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. पण हिंदू संघटना ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मातर’ (घर-वापसी), ‘२०२१ पर्यंत सर्वाना हिंदू बनवणे’, ‘पीके चित्रपटाला विरोध’, ‘२०११ च्या जनगणनेत हिंदूंची संख्या कमी झाली’ अशा मुद्दय़ांवर भारतीय समाजाचे ध्रुवीकरण करीत आहेत.
जनरल झिया यांच्या ‘इस्लामीकरणा’च्या मोहिमेने पाकिस्तानची पूर्णपणे वाताहत झाली. कळत-नकळत आज आपण जनरल झिया यांचा वारसा तर पुढे चालवत नाही ना, याचे भान सर्वानी ठेवून जबाबदारीने वागले पाहिजे.
लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापकआहेत. ईमेल : surenforpublication@gmail.com
सुरेंद्र हरिश्चंद्र जाधव