अध्यापनाची गोडी आणि शाळेत येणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातल्या मुलांबद्दल कणव असलेला शिक्षक किंवा शिक्षिका असेल आणि त्यांना गावकऱ्यांचंही सहकार्य लाभलं तर अवघ्या तीन वर्षांत शाळा प्रगतीच्या दिशेने कशी झेपावते, याचं रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेची भोके-मठवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा उत्तम उदाहरण आहे.
कोकण प्रदेश भौगोलिकदृष्टय़ा दुर्गम असल्यामुळे इथे आर्थिक-सामाजिक मागासलेपण अजूनही बऱ्यापैकी शिल्लक आहे. पण शिक्षणाची ओढ आणि त्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी हे इथल्या समाजानं पिढय़ान्पिढय़ा जपलेलं वैशिष्टय़ आहे. स्वातंत्र्यानंतरची पहिली काही दशकं इथे महाविद्यालयीन शिक्षण दुरापास्त होतंच, पण शालेय शिक्षणासाठीसुद्धा दररोज काही मैल पायपीट करावी लागायची. काळाच्या ओघात धोरणात्मक बदल होऊन वाडय़ा-वस्त्यांपर्यंत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचं जाळं निर्माण झालं. पण तिथे गुणवत्तेची किंवा दर्जेदार शिक्षणाची हमी नव्हती. अडाणी असण्यापेक्षा साक्षर असावं, जमलं तर पुढे तालुक्याच्या ठिकाणी जावं आणि नशिबाने आणखी साथ दिली तर मुंबई गाठावी, अशीच या शाळेत जाणाऱ्या मुलांची मानसिकता असायची. अलीकडच्या काळात मात्र हे चित्र बऱ्याच प्रमाणात बदललं आहे. ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही संगणकासारख्या आधुनिक साधनांच्या मदतीने अध्यापन होऊ लागलं आहे. रत्नागिरी तालुक्यातील भोके-मठवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा ही यापैकीच एक. अध्यापनाची गोडी आणि शाळेत येणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातल्या मुलांबद्दल कणव असलेल्या शिक्षक किंवा शिक्षिकांमुळे ही शाळा गेल्या तीन वर्षांत प्रगतीच्या दिशेने झेपावली आहे.
ग्रामस्थांकडून श्रमदान
सुमारे तीन वर्षांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापक मानसी गवंडे इथे रुजू झाल्या तेव्हा शाळेची अतिशय दुरवस्था होती. पण त्यामुळे खचून न जाता त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. शाळेची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासाठी स्वत: पदरमोड करण्याची तयारी दाखवली आणि ग्रामस्थांकडून केवळ श्रमदानाचं सहकार्य मागितलं. असा प्रस्ताव ग्रामस्थांसाठी नवीनच होता. त्यामुळे त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि नंतरच्या अवघ्या आठ दिवसांत शाळेने कात टाकली.
रूप पालटलं
शाळेमधल्या भिंतींवर रंगीत चित्रं झळकू लागली. जिल्हा परिषदेकडून छप्पर दुरुस्ती, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह इत्यादीसाठी निधी मिळाला. त्याचबरोबर गवंडे यांनी स्वखर्चाने शाळेभोवती बाग-बगीचा फुलवला. संरक्षक भिंतीवर लहान मुलांना भावतील अशी पशू-पक्ष्यांची आकर्षक चित्रं शाळेच्याच माजी विद्यार्थिनीकडून काढून घेतली. या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनीही उत्साहाने सहभागी होत मैदानासाठी सपाटीकरण, भाजीपाल्यासाठी वाफे इत्यादी गोष्टी श्रमदानाद्वारे करून दिल्या. त्यामुळे त्यांच्या मनात शाळेबद्दल आपलेपणा निर्माण झालाच, शिवाय वाडीतले विद्यार्थी उत्साहाने शाळेत येऊ लागले. या बाह्य़ बदलांबरोबरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्याध्यापक गवंडे आणि त्यांच्या सहकारी शिक्षक नेहा अवसरे यांनी नेटाने प्रयत्न सुरू केले. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, फुलबाग आणि भाजीपालानिर्मिती असे विविध उपक्रम शाळेमध्ये होऊ लागले. त्यामुळे जिल्ह्य़ातील आदर्श शाळांच्या यादीत ही शाळा चमकू लागली. अवघे चार गुंठे क्षेत्र असलेल्या या शाळेच्या परिसरात सुंदर बागेबरोबरच भाजीपाल्याच्या वाफ्यांमध्ये पिकवलेल्या माठ, मुळा, पालक, टोमॅटो, मिरची इत्यादी भरपूर पोषणमूल्य असलेल्या भाज्यांचा विद्यार्थ्यांना दररोज दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आवर्जून समावेश केला जातो. गांडूळ खताची निर्मिती आणि गप्पी माशांची पैदास हे इथले आणखी काही वेगळे लक्षणीय उपक्रम आहेत.
बोली भाषा ते प्रमाण भाषा
तीन वर्षांपूर्वी या शाळेचा ‘क’ दर्जा होता. पण पायाभूत भौतिक व शैक्षणिक सुविधा, लोकसहभाग, गुणवत्ता संवर्धन इत्यादी निकषांमध्ये उत्तम गुण मिळवत शाळेने ‘अ’ दर्जा प्राप्त केला. शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार वर्ग खोल्या, पाण्याची सुविधा, क्रीडांगण, बालवाचनालय, किचन शेड, मुलं व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह हे मानकही या शाळेने पूर्ण केले आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे भाषा विषय उत्तम होण्यासाठी ‘बोली भाषा ते प्रमाण भाषा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. त्याचबरोबर कोणे एके काळी ‘वाघिणीचं दूध’ मानलं जाणाऱ्या इंग्लिश भाषेबद्दलचा गंड नाहीसा व्हावा यासाठी इंग्लिशमध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि संभाषण कार्यक्रम नियमितपणे आवर्जून आयोजित केले जाऊ लागले. त्यामुळे आज या शाळेतील दुसरी-तिसरीतले विद्यार्थीसुद्धा इंग्लिशमध्ये उत्तम भाषण करू शकतात. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काही महिन्यांपूर्वी या शाळेला भेट दिली तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोरही या वक्तृत्व कलेचं प्रात्यक्षिक सादर करत शाबासकी मिळवली. अशा विविधांगी शैक्षणिक व तदनुषंगिक उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळेच या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. हा बहुमान मिळवणारी ही तालुक्यातली पहिलीच शाळा आहे.
गावकऱ्यांचा सहभाग
कोणत्याही चांगल्या शाळेतलं अध्यापन दर्जेदार आणि विद्यार्थी अभिमुख असणं आवश्यक असतंच, पण त्याचबरोबर शाळेचा परिसर आणि भवतालचं वातावरण उत्साहवर्धक, आल्हाददायक असणंही महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करताना स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. तसा तो नसेल तर शिक्षकाची कितीही तळमळ असली तरी केवळ तेवढय़ा बळावर शाळा फार प्रगती करू शकत नाही. त्यासाठी संबंधित शिक्षक आणि गावकरी या दोन्ही बाजूंनी सकारात्मक सहकार्याची भावना गरजेची असते. त्या दृष्टीने भोके-मठवाडीच्या सरपंच अंजली रेवाळे, उपसरपंच विजय माइंगडे, गावकर राजाराम माइंगडे इत्यादींचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. या परस्पर सहकार्यातूनच अवघ्या तीन वर्षांत ‘क’ दर्जा ते आयएसओ मानांकन, असा अवघड प्रवास पूर्ण होऊ शकला. शाळा करत असलेल्या या प्रगतीचा गावकऱ्यांनाही सार्थ अभिमान आहे.
ग्रामस्थांचा सहभाग असल्यामुळेच शाळा अशी प्रगती करू शकली. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक गवंडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून शाळेच्या यशस्वी वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे गाठताना आम्हाला सहभागी करून घेतलं म्हणूनच हे शक्य झालं, अशी भावना उपसरपंच माइंगडे यांनी या संदर्भात बोलताना व्यक्त केली.

– संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com

सतीश कामत