‘ज्या भूमीत आपण जन्मलो, वाढलो, तिथे आपल्याला किंमत नाही.. साध्या नोकऱ्याही मिळत नाहीत.. मिळाल्या तर नाना तऱ्हेचे ठपके ठेवले जातात.. अफवा उठवल्या जातात, त्या खऱ्या मानून लगेच ‘दोषींना देहदंड’ देण्याची पावले आपल्या देशाच्या सरकारला जशी माणसे हवीत, तशा प्रकारची माणसेच परस्पर उचलतात.. हे सारे थांबवण्यासाठी आपण लढले पाहिजे..’ अशा वैचारिक कोंडीकडे जर एखाद्या समूहाला बलाढय़ सरकारने राबवलेली एकसमानीकरणाची धोरणे नेत असतील, तर या धोरणाची तपासणी झाली पाहिजे. चीनमध्ये मात्र ते घडत नाही. उलट, विरोधाचा आवाज दाबला जातो. एकसमानीकरण कसे फसते, याची माहिती शिन्जियांग प्रांतातील विगुर समूहाच्या संदर्भात देणारा लेख..
रमजानचा महिना संपताच- म्हणजे ऑगस्ट आरंभापासून- चीनमधील अस्वस्थ शिन्जियांग प्रांतातील हिंसाचाराला पुन्हा सुरुवात झाली, त्यातून गेल्या पंधरवडय़ाभरात शंभराहून अधिक माणसे मारली गेली आहेत. अर्थात, हे सारे चीनमध्ये घडत असल्याने शंभराचा आकडा हा ‘अधिकृतपणे सांगण्यात आलेला’ आहे, म्हणजे बळींची अनधिकृत संख्या तर हजारभरही असू शकते, असे काही जण मानतात. आकडा कितीही असो, शिन्जियांगमध्ये नजीकच्या भूतकाळात किंवा ‘शिन्जियांग अस्वस्थते’च्या इतिहासातदेखील, ऑगस्ट २०१४ मधील हिंसाचार सर्वात मोठाच मानावा लागेल, असा आहे. आणखी थोडे मागे गेल्यास लक्षात येते की, २०१४ हे वर्ष पहिल्या साडेसात महिन्यांतच शिन्जियांगमध्ये २५० बळी घेणारे ठरले. अधिकृतपणे सांगण्यात येणारी ही संख्या शिन्जियांगच्या भूतकाळात सर्वाधिकच म्हणावी लागेल. सर्वसाधारणपणे, २००९ या वर्षभरात झालेल्या वांशिक दंगलींपासून शिन्जियांग प्रांत ‘अस्वस्थ’ झाला असे मानले जाते. त्या अख्ख्या वर्षांतील मृतांची एकंदर अधिकृत संख्या २५०च सांगितली जाते आणि त्याखालोखाल, २०१३ या वर्षभरात शिन्जियांगमधील एकूण बळी (अधिकृत आकडेवारीनुसार) ११० होते. परंतु २०१४ हे वर्ष आणखी वेगळे आहे, हे निश्चित.
शिन्जियांगचा हिंसाचार २०१४ मध्ये केवळ वाढला इतकेच याचे कारण नव्हे. एरव्ही वांशिक दंगलींच्या वळणावर जाणाऱ्या या हिंसाचाराचा रोख यंदाच्याच वर्षी बदललेला दिसतो. चीनमधील सर्वात मोठी मशीद म्हणून ओळखली जाणारी मशीद शिन्जियांगच्या काशगर गावात आहे, या मशिदीवर चिनी सरकारने नेमलेले इमाम जुमे तहरीर (वय ७४) यांना ३० जुलै रोजी, म्हणजे ईदच्या आदल्याच दिवशी भोसकून ठार करण्यात आले. या प्रांतातील उरुम्की येथे बाजारात स्फोट घडवून ४२ बळी घेण्याचा प्रकार (२२ मे), त्याआधी (१ मार्च) कुन्मिंग रेल्वेस्थानकात घडलेला दिसेल त्यावर बेछूट सुरामारीचा प्रकार, हे साधे नव्हते. केवळ माणसे अधिक संख्येने जिवास मुकली म्हणून नव्हे, तर हे हल्ले निरपराध सामान्यजनांवर होते, म्हणून हे प्रकार गंभीर ठरतात. हा एक प्रकारे दहशतवादच. त्याआधी २०१३च्या ऑक्टोबरात चीनच्या राजधानीत, भर तियानान्मेन चौकातील मोटारस्फोट हाच इतका गंभीर अतिरेकी हल्ला ठरला होता. त्यात तिघे ठार झाले, परंतु मोटारस्फोट आत्मघातकी अतिरेक्यांनी केला आणि सुरक्षाकठडे तोडून मोटार चौकात घुसवली, हे गंभीर होते.
सर्वसामान्य, निरपराध नागरिकांना सतत भीतीच्या छायेखाली ठेवू पाहणारे असे हल्ले, हे शिन्जियांगमधील गेल्या पाच वर्षांच्या अस्वस्थतेने अलीकडेच, म्हणजे फार तर गेल्या दोन वर्षांतच घेतलेले गंभीर वळण आहे. आता अतिरेक्यांचे लक्ष्य केवळ सरकारी अधिकारी वा पोलीस नव्हेत. रेल्वेस्थानकावरला प्रवासीही सुरामारीत बळी पडू शकतो, इतक्या थराला गेलेली दहशत तर यंदाच्याच वर्षांतली आहे.
हे हल्ले कोठून होतात, या दहशतीचे मूळ कोणते, याबद्दल चिनी नेतृत्वाला काहीच कल्पना नाही; कारण या हल्ल्यांची जबाबदारी कुणा एका संघटनेने स्वीकारलेली नाही. शिवाय अशी एखादीच संघटना यामागे असू शकते का हेदेखील अद्याप धूसर आहे. हल्ले भीषणच होते, परंतु त्यामागची कारणे स्थानिक होती. पोलीस आणि प्रशासन यांचा स्थानिक पातळीवरील कारभार दडपशाहीसारखा भासणे, स्थानिक रहिवाशांची (विशेषत: विगुर किंवा uighur वंशीयांची) रोजीरोटीच चिनी सरकार हिरावून घेते आहे असा रोष पसरणे, अशी कारणे यामागे आहेत. यावर ‘उपाय’ योजण्यासाठी चिनी सरकार इतके घायकुतीला आले आहे की, या प्रांतात कोणाकडेही बंदुका, तलवारी-सुरे वा तत्सम शस्त्रे असल्याची खबर देणाऱ्यांसाठी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत!
शिन्जियांग प्रांतातील अतिरेकीवादामागची खरी कारणे शोधून काढून त्यावर उपाय योजणे मात्र चिनी सरकारला शक्य झालेले नाही. शिन्जियांगमधील २००९ची विगुर-हान दंगलसुद्धा या दृष्टीने पुरेशी अभ्यासली गेलेली नाही. चिनी समाजातील वांशिक समूहांमध्ये परस्परांविषयी अद्यापही अविश्वासच दिसतो, हे या दंगलीचे मूळ कारण होते. काही विगुर तरुण नव्यानेच एका फॅक्टरीत कामाला लागले होते. त्यांच्या हत्येने या दंगलीची सुरुवात झाली.. पण हत्येमागचे कारण काय? तर, या विगुर कामगारांच्या राहण्याच्या ठिकाणी चुकून फिरकलेल्या हानवंशीय महिला कामगारांवर विगुरांनी बलात्कार केला, ही अफवा. सरकारने दिलेला प्रतिसाद तोकडा आहे, आरोप होताहेत तरीही तातडीने शोध घेऊन सोक्षमोक्ष लावला जात नाही, हे दिसू लागेपर्यंत उरुम्की आणि अन्य ठिकाणी हानवंशीय विरुद्ध विगुरवंशीय अशी दंगल उसळलेली होती. म्हणजे, लोक या बाबतीत कायद्यालाही न जुमानता, कायदा स्वत:च्या हाती घेऊन एकमेकांविरुद्ध उठले होते. अखेर समजले ते असे की, नोकरी गमावलेल्या एका हानवंशीय कामगाराने केवळ द्वेषापायी ही अफवा पसरविली होती. विगुर हे मुसलमान. दाढय़ा राखणारे. तेव्हा शिन्जियांगमधील अनेक शहरांनी ‘तातडीची उपाययोजना’ म्हणून, दाढीधारी पुरुष आणि बुरखेधारी स्त्रिया यांना कोणत्याही सार्वजनिक वाहनात प्रवेशबंदीच जाहीर करून टाकली.
वास्तविक, विगुरवंशीयांचे सामाजिक-सांस्कृतिक धागे चिनी मानल्या जाणाऱ्या हानवंशीयांशी जुळलेले नाहीत. त्यापेक्षा सीमेपल्याडच्या सोव्हिएतोत्तर मुस्लीमबहुल राष्ट्रांतील लोकांशी (म्हणजे कझाकस्तान, किरगिझस्तान आणि ताजिकिस्तान यांच्याशी) विगुर लोक सांस्कृतिकदृष्टय़ा अधिक जुळलेले आहेत. हे विगुर शिन्जियांगमधील ‘भूमिपुत्र’, पण विकासासाठी जे-जे प्रकल्प येथे आले, त्यांत नोकऱ्या मिळवणारे बहुतेक जण बाहेरून या प्रांतात आलेले आहेत. यात भर म्हणून, चिनी सरकारी यंत्रणा विगुरांच्या सांस्कृतिक वेगळेपणाबद्दल, त्यांच्या गरजांबद्दल अजिबात संवेदनशील नाही. गेल्या तीन वर्षांत रमजानच्या- म्हणजे ३० दिवस कडकडीत उपास पाळण्याच्या महिन्यात विगुरवंशीयांना ‘भरपूर खा-प्या, उपाशी न राहता रोजच्याप्रमाणेच काम/अभ्यास करण्यासाठी तंदुरुस्तच राहा’ असा सल्ला चिनी सरकार देते. नुसते सांगण्यावर न थांबता, काही विगुरांच्या घरांत चिनी अधिकाऱ्यांनी फळे वा खाद्यपदार्थ रमजानमधील दिवशी नेऊन घातल्याच्याही घटना यंदा घडल्या. याला संवेदनशीलता समजता येणार नाही, उलट हा नियंत्रणे घालू पाहणारा वरवंटाच, असेच विगुरांचे मत झाल्यास नवल काय?
या प्रादेशिक अस्वस्थतेवर उपाय योजण्यासाठी अधिक संवेदनशीलता दाखविणे चीन सरकारला भाग आहे, असा मुद्दा ‘सेंट्रल नॅशनॅलिटीज युनिव्हर्सिटी’तील अर्थशास्त्राचे प्राध्यापक इल्हम तोथी यांनी मांडला होता. प्रा. इल्हम हे स्वत: विगुरवंशीय आहेत. या सल्ल्यानंतर त्यांना चीनच्या सरकारने, गेले सहा महिने कोणत्याही पारदर्शक चौकशी वा खटल्याविना डांबले आहे.
चीनच्या मध्य आशिया आणि दक्षिण आशियाविषयक धोरणे राबविण्याच्या दृष्टीने शिन्जियांग हा प्रांत अत्यंत महत्त्वाचा आहे. हाच प्रांत आपल्या सियाचेनला टेकलेला आहे आणि अफगाणिस्तानचे एक निमुळते पश्चिम टोकही या प्रांताला भिडणारे आहे. अफगाणिस्तानात चीनला आर्थिक स्वारस्य आहेच, कारण तेथील खनिजांचे साठे चीनला खुणावताहेत. त्याचसाठी काराकोरम महामार्ग २०१६ पासून वापरला जाणार आहे. मात्र या खनिजांवर प्रक्रिया करणारे उद्योग सीमेजवळच्या शिन्जियांग प्रांतात नसणे हे चीनसाठी खर्चीक आणि महागात पडणारे ठरेल. मात्र, याच काराकोरम महामार्गावरून पाकिस्तान-प्रशिक्षित शिन्जियांग प्रांतात येऊ शकतात, असा संशयही चीनला दाट आहे. शिन्जियांगमध्ये २०११ सालात पकडले गेलेले अतिरेकी किती घातक आहेत हे सांगताना अधिकृत चिनी माध्यमांनी ‘पाकिस्तानी टोळ्यांच्या प्रदेशातून या दहशतवादय़ांना शस्त्रे आणि प्रशिक्षणही मिळाले होते’ असे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते. गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारचा हिंसाचार वाढल्याचे पाहून चोरवाटा रोखण्यासाठी सीमा कडेकोट करा, असा दबाव चीनकडून पाकिस्तानवर आणला जाऊ शकतो. चीन व पाकिस्तान हे एकमेकांचे मित्रदेश असल्यामुळे ते तातडीने शक्य होण्यास काही अडथळा खरे तर असू नये; परंतु ही तातडी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना समजेलच असे नाही, अशीही चीनची भावना आहे.
सारांश असा की, शिन्जियांगमधील हिंसाचाराचे बदलते स्वरूप, हे चीनसाठी चिंताजनकच ठरते आहे. चीनने जो एकसमानीकरण कार्यक्रम राबविला, त्याच्या संदर्भात हा वाढता हिंसाचार पाहिला तर हेच उमगेल की, एकसमानीकरणाचा कार्यक्रम येथे उपयोगाचा नाही. वांशिक  भेद वाढत जाणे आणि एखाद्या विशिष्ट वांशिक समूहाच्या लोकांमध्ये आपणास डावलले जात असल्याची, पारखेपणाची (डिप्रायव्हेशन) भावना घट्ट होत राहाणे, हेच अशा एकसमानीकरणाचे फलित असल्याचे दिसते आहे. धोपटपाठाने एखाद्या वांशिक समूहातील सर्व लोकांना एकसारखेच (स्टीरीओटाइप) समजणे बंद करावे, यासाठीही चीनला प्रयत्नरत राहावे लागेल. विकासाचे ‘वरून खाली’ येणारे जे प्रतिमान चिनी नेतृत्वाने अंगीकारलेले आहे, त्यास हे नेते जितके चिकटून राहतील, तितकाच शिन्जियांग प्रांतातील असंतोष/खदखद आणि परिणामी हिंसाचार/दहशतवाद यांचा धोकाही वाढतच राहील.
*  लेखक लेखक ‘इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसिस’ (आयडीएसए) या दिल्लीस्थित संस्थेत संशोधक व चीनविषयीचे विशेष अभ्यासक आहेत. या लेखातील मते त्यांची वैयक्तिक असून त्याच्याशी आयडीएसए व  भारत सरकारचा संबंध नाही.