युरोपीय अवकाश संस्थेच्या रोसेटा यानाने दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतूला गाठलेच.  त्याच्या फिली या लँडरने तेथे घट्ट पाय रोवून तेथील काही भाग खणलाही आहे. त्याची काही छायाचित्रे पृथ्वीवर मिळाली असून त्यामुळे सौरमालेची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची निर्मिती कशी झाली व धूमकेतूंमधून जीवसृष्टी पृथ्वीवर आली काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे..
पूर्वीच्या काळात धूमकेतूचे दर्शन हा राजासाठी अपशकुन मानला जायचा, पण आता विज्ञान खूप पुढे गेले आहे. पिसारा फुलवणारा धूमकेतू नयनरम्य तर असतोच, पण सौरमालेची अनेक रहस्ये त्याच्या रचनेत दडलेली आहेत. त्यामुळेच युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाशयान दहा वर्षांपूर्वीच एका धूमकेतूच्या दिशेने पाठवले. या मोहिमेचे असे वैशिष्टय़ काय होते? छोटय़ा बर्फाच्या गोळ्यासारख्या धूमकेतूमध्ये आपल्या विश्वातील मूळ अवशेष दडलेले आहेत. सौरमाला तयार झाल्यानंतर जे अवशेष राहिले, ते या धूमकेतूंनी साडेचार अब्ज वर्षांपूर्वी म्हणजेच सौरमालेच्या जन्माच्या वेळी त्यांच्यात साठवून ठेवले आहेत. त्यामुळेच धूमकेतूंची रासायनिक रचना समजणे हे वैज्ञानिकांना फार महत्त्वाचे वाटते. सौरमालेच्या निर्मितीविषयी अगदी साधे प्रश्नही अजून अनुत्तरित आहेत. त्यात पृथ्वीचा जन्म कसा झाला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. धूमकेतूंनी तारुण्यात असलेल्या पृथ्वीवर पाणी आणले असे म्हटले जाते. त्याचबरोबर सजीवांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कार्बनी रेणूंचीही पखरण पृथ्वीवर केली असावी असे म्हणतात. धूमकेतूमध्ये दगडही असतात. त्यात आतल्या भागात गोठलेले पाणी असते. शिवाय कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायॉक्साइड, मिथेन व अमोनिया हे घटक असतात.
धूमकेतू हे विरामचिन्हासारखे दिमाखदार, त्याच्या शेपटय़ा तर निरीक्षकांना भुलवतात व त्यामुळेच धूमकेतू हा अनेक शतकांपासून सामान्य लोकांनाही प्रिय आहे. माणसाने धूमकेतूंचे निरीक्षण फार प्राचीन काळापासून सुरू केले, पण काही शतकांपूर्वी वैज्ञानिकांनी त्या सतत आकर्षित करणाऱ्या अवकाशस्थ वस्तूत काय दडले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत धूमकेतू म्हणजे नेमके काय असते, हे समजायला लागले होते. विसाव्या शतकाच्या अखेरीस अवकाश तंत्रज्ञानात धूमकेतू वैज्ञानिकांना अनेक नव्या संधी दिसू लागल्या. केवळ नुसत्या डोळ्याने निरीक्षण करण्याऐवजी पृथ्वीवरील दुर्बिणींनी त्यांचे निरीक्षण केले जाऊ लागले. आता अवकाशयानाच्या मदतीने आपण धूमकेतूपर्यंत पोहोचू शकतो. सौरमालेच्या आंतरभागात ते चकरा मारत असतात, तेव्हा त्यांच्याजवळ जाऊ शकतो. काही वैज्ञानिकांना असे वाटते की, धूमकेतू आणि ग्रह हे एकाच प्रकारच्या धुळीपासून व बर्फापासून सूर्याच्या जन्मावेळी फेकल्या गेलेल्या द्रव्यातून निर्माण झाले आहेत. काहींच्या मते हे धूमकेतू फार जुने आहेत व ते आंतरतारकीय द्रव्याने भरलेले आहेत. हे आंतरतारकीय द्रव्य हे आपली सौरमाला तयार झाली त्यापेक्षा जुने आहे. युरोपीय अवकाश संस्थेने एक वेगळी मोहीम धूमकेतूच्या संशोधनासाठी आखली, त्याचे नाव ‘रोसेटा’ असे आहे. रोसेटा स्टोनवरून त्याला हे नाव देण्यात आले. लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात हा रोसेटा स्टोन बघायला मिळतो व त्या दगडातून प्राचीन इजिप्तची संस्कृती उलगडण्यास मदत होते, इतके त्याचे महत्त्व आहे. रोसेटा अवकाशयान धूमकेतूंविषयीचे जुने ज्ञान आपल्याला देतील अशी आशा आहे. ही माहिती त्यावरील औष्णिक अवशेष व इतर स्वरूपात असू शकते. त्यातून आपल्याला सौरमालेच्या उत्पत्तीविषयी नवीन माहिती मिळणार आहे; शिवाय जीवसृष्टी कशी आली असावी, याचेही धागेदोरे मिळणार आहेत. युरोपीय अवकाश संस्थेच्या या मोहिमेत अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेचाही सहभाग आहे. पूर्वीच्या मोहिमांपेक्षा ही वेगळी आहे. रोसेटा मोहिमेत धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेत ऑरबायटर व लँडर असे दोन भाग होते. त्यामुळे आता कक्षेतून धूमकेतूचे निरीक्षण होणार आहेच.
शिवाय धूमकेतूच्या पृष्ठभागावर उतरलेल्या फिली या लँडरने तेथे खणायला सुरुवातही केली आहे, त्यामुळे तेथूनही नमुने किंवा त्यांची छायाचित्रे मिळणार आहेत. सात तासांचा थरार अनुभवत ही मोहीम यशस्वी झाली. सुरुवातीला लँडरचा थ्रस्टर बंद पडला होता, पण नंतर लँडर धूमकेतूवर उतरले. त्यामुळे रोसेटा यान व फिली लँडर यांच्याकडून माहिती मिळणार आहे. धूमकेतूवर स्वारी अशा स्वरूपाची ही पहिलीच मोहीम होती व त्यात तंत्रज्ञानाची कसोटी लागली. सूर्याभोवती फिरताना धूमकेतू अगदी जवळ असताना त्याच्यावर यान पाठवणे व लँडर उतरवणे ही साधी गोष्ट नक्कीच नव्हती. सुमारे दहा वर्षे या मोहिमेत खर्ची घालण्यात आली आहेत. दहा वर्षांत ६.५ अब्ज कि.मी. अंतर कापून रोसेटा यान अत्यंत मोक्याच्या वेळी धूमकेतूपर्यंत पोहोचले व नंतर तेथे फिली लँडर हे ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतूवर १२ नोव्हेंबरला उतरले. युक्रेनचे खगोलशास्त्रज्ञ क्लिम च्युरयुमोव व स्वेतलाना गेरासिमेन्को यांच्यावरून या धूमकेतूला हे नाव मिळाले. त्यांनीच तो १९६९ मध्ये शोधून काढला आहे. २०१४ च्या अगोदर या धूमकेतूविषयी फारशी माहिती नव्हती. रोसेटा यान वेगाने या धूमकेतूकडे ऑगस्ट २०१४ मध्ये मार्गक्रमण करीत असताना व आता लँडर तिथे उतरल्यानंतर आपल्या माहितीत नक्कीच भर पडणार आहे. तेथे फिली लँडरचे स्क्रू पक्के करून खणायला सुरुवातही झाली आहे, पण नेमके जिथे खणायचे होते, तिथे ते जमलेले नाही असे ताज्या बातम्यांतून दिसत आहे. आता हा प्रयोग जवळपास यशस्वी झाला आहे. त्यामुळे या धूमकेतूविषयीच नव्हे तर धूमकेतू विज्ञानाविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यातून आपल्या सौरमालेच्या निर्मितीविषयी, पृथ्वीवरील पाण्याच्या उगमाविषयी तसेच पृथ्वीवरील सजीव सृष्टीवर नवा प्रकाश पडू शकेल.
(लेखक  नेहरू विज्ञान केंद्रात अभिरक्षक  आहेत.)
 अनुवाद – राजेंद्र येवलेकर