पालघरमधील पहिली आयएसओ प्रमाणपत्र मिळविणारी शाळा अशी आता ‘स. दा. वर्तक विद्यालया’ची ओळख आहे.
पण, बोईसरमध्ये १९८८ साली अवघ्या ६८ विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेल्या या शाळेला शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आस सुरुवातीपासूनच लागली होती आणि त्यासाठी अनेक क्रांतिकारी धोरणे राबवण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने २०००ला मराठी शाळांना पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य केले. परंतु, त्या आधीच म्हणजे १९८९ सालीच वर्तक विद्यालयाने पहिलीपासून इंग्रजीचा श्रीगणेशा केला होता. मुलांच्या इंग्रजी संभाषणावर सुरुवातीला भर होता. तो पुढे विद्यार्थ्यांना इंग्रजीतून अभिव्यक्त होण्यापर्यंत वाढत गेला. स्पेलिंग पाठ करून घेणे, एखाद्या विषयावर इंग्रजीतून व्यक्त होण्यास प्रोत्साहन देणे, इंग्रजी पुस्तके उपलब्ध करून देणे अशा अनेक मार्गानी विद्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती पळविण्याचा प्रयत्न असतो. पहिली ते चौथीला सेमी इंग्रजी लागू करण्याचा निर्णयही शाळेने याच दूरदृष्टीतून राबविला. म्हणून आजूबाजूला इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढत असताना आजही शाळेची तब्बल १६५० पटसंख्या टिकून आहे. कारण, शालेय व सहशालेय उपक्रमांमधून आपल्या एकाही विद्यार्थ्यांचा गुण सुप्तावस्थेत राहणार नाही, याची काळजी शाळेला आहे.
२४हून अधिक सहशालेय उपक्रम
पालघरचा परिसर औद्योगिक असल्याने येथे कामगारांचा भरणा अधिक. बहुतांश विद्यार्थी निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील. आजूबाजूच्या लालोंढे, नागझरी, महागाव, शिगाव या आदिवासी तसेच मुरबा, नवापूर या किनारपट्टीला लागून असलेल्या कोळी, भंडाऱ्यांच्या गावांतूनही विद्यार्थी येतात. घरात शिक्षणासाठीचे पूरक वातावरण अभावानेच. म्हणून अभ्यासाबरोबरच सहशालेय उपक्रम आणि क्रीडाविषयक गुणांना वाव देण्यावर शाळेचा भर असतो. ‘किंबहुना त्यामुळेच मुलांना शाळेची, अभ्यासाची गोडी लावण्यात व टिकवून ठेवण्यात यश आले आहे,’ असे शाळेचे मुख्याध्यापक डॅरल डिमेलो सांगतात.
सहशालेय उपक्रम तरी किती? तब्बल २४ प्रकारच्या स्पर्धा शिशुवर्गापासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता घेतल्या जातात. अभिनय, नृत्य, समूहगान, एकांकिका, एकपात्री अभिनय, कथाकथन, वक्तृत्व, वाद्यवादन, अभिनय गीत, वेशभूषा, श्लोक पठण नाही जमत तर रंगभरण, चित्रकला, भित्तिचित्र, सुलेखन, हस्तकला, आकाशकंदील, शुभेच्छा कार्ड बनव. ते नाही तर एकांकिका, गटचर्चा-वादविवाद आहेत. व्यासपीठावर व्यक्त होणे नाही जमत तर कथालेखन, इंग्रजी स्पेलिंग स्पर्धा, प्रश्नमंजूषा, निबंध, कथा-कविता लेखन कर. पण, कुठेतरी व्यक्त व्हा, असे जणू शाळेचे सांगणे असते. अगदी छोटा ‘इडियट बॉक्स’ बनलेल्या मोबाइललाही शाळेने सामाजिक वा निसर्ग छायाचित्रांच्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे साधन बनविले आहे.
इतक्या स्पर्धाचे नियोजन तरी कसे होते? त्यासाठी वार्षिक परीक्षा झाल्या की मुख्याध्यापक आणि शिक्षक पुढील वर्षांच्या स्पर्धा, उपक्रम, शैक्षणिक कार्यक्रमांच्या नियोजनात गर्क होऊन जातात. त्यांचे वर्षभराचे वेळापत्रक वर्षांच्या सुरुवातीला विद्यार्थी-पालकांना दिले जाते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनाही स्पर्धाच्या तयारीला वेळ मिळतो.
पंचक्रोशीतील शाळांचे नेतृत्व
वर्तक विद्यालयाने आपल्या उपक्रमांमध्ये पंचक्रोशीतील शाळांनाही सामावून घेतले आहे. बोईसरमधील शाळांसाठी क्रीडा महोत्सव, शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान संमेलन, प्रदर्शन, विज्ञान प्रश्नमंजूषा अशा कितीतरी कार्यक्रमांच्या आयोजनात शाळा अग्रेसर असते. त्यासाठी आपले शिक्षक-कर्मचारीवर्ग, परिसर, मैदान उपलब्ध करून देण्यास मागे राहत नाही.
खेल खेल में..
सहशालेय उपक्रमांबरोबरच खेळ या शाळेचा आत्मा आहे. शाळेचा परिसर विस्तीर्ण मैदानाने व्यापला आहे. मुले या मैदानाच्या कोपऱ्या-कोपऱ्याला न्याय देतात. नेहमीच या मैदानावर कुठल्या ना कुठल्या खेळाची स्पर्धा वा सराव चालू असतो. दिवाळी, नाताळच्या सुट्टय़ा त्यासाठी कारणी लावल्या जातात. कुठलाही नवीन क्रीडा प्रकार आला की त्याचे प्रशिक्षक शोधून काढून ते शिकविण्याची तजवीज शाळा करते. थाळी, गोळा, भालाफेक, धावणे, लंगडी आदी मैदानी खेळ, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, कब्बड्डीच नव्हे तर थांगता (मार्शल आर्टचा प्रकार), रॉक बॉल, धनुर्विद्या, व्हॉलीबॉल, जम्प रोप अशा कितीतरी क्रीडा प्रकारांची ओळख शाळेने मुलांना करून दिली. त्यात तरबेजही केले. त्यामुळे, विभागीयपासून ते राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी लक्षणीय राहिली आहे.
अभ्यासाचा भर कृतिशीलतेवर
कला-खेळ यांना वाव देण्याबरोबरच विज्ञान विषयाचे आकलन कृतिशीलतेतून होण्यासाठी शाळेने दोन वर्षांपूर्वी ‘सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी रूम’ विकसित केली. यात विज्ञानातील अनेक संकल्पना कृतिशीलतेतून स्पष्ट करणारी मॉडेल्स शाळेने तयार करवून घेतली आहेत. ‘स्मार्ट क्लास’च्या माध्यमातून विज्ञान, गणित, भूगोल या विषयांचे अध्ययन रंजक करण्याचा प्रयत्न असतो. ‘सर सी. व्ही. रामन विज्ञान मंडळा’च्या माध्यमातून प्रदर्शन, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, तज्ज्ञांची व्याख्याने भरवून विज्ञाननिष्ठ सुसंस्कृत विद्यार्थी घडविणे हा शाळेचा आणखी एक उपक्रम.
शिक्षकांनाही घडविणारी शाळा
ही शाळा केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही घडविते. ‘शिक्षक सृजनशील, संवेदनशील, प्रयोगशील असायलाच हवा. पण तो हाडाचा विद्यार्थी हवा,’ हे शाळेचे तत्त्वज्ञान. त्यामुळे, विद्यार्थ्यांची जशी दैनंदिनी असते तशी शिक्षकाला वर्षभरात कोणती जबाबदारी पार पाडायची आहे, याची माहिती देणारी ‘संकल्प’ ही पुस्तिका दिली जाते. त्यात त्यांची माहिती, पार पाडावयाची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, तासिकांचे वेळापत्रक, अध्यापनाचे नियोजन याबरोबरच वर्षभरात वाचलेली पुस्तके, किती विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले, किती पालकांची काय कारणास्तव वैयक्तिक भेट घेऊन संवाद साधला, दत्तक विद्यार्थ्यांच्या भेटीचा तपशील आदी माहिती भरून स्वयंमूल्यमापन करण्याची संधी दिली जाते. यामुळे शिक्षकांचेही प्रगतीपुस्तक तयार होते. शिवाय शिक्षकांनाही शाळेचे मूल्यमापन, सूचना करण्याची संधी दिली जाते.
शाळेचा प्रत्येक मजला, प्रयोगशाळा, आवार, सभागृह, कार्यालय आदी स्वच्छतेसाठी प्रत्येक शिक्षकाकडे देखरेखीचे काम सोपविले आहे. याशिवाय प्रार्थना सभेत शिक्षकांची पर्यावरण संवर्धन, संवेदनशीलता, सौजन्यशीलता, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा विषयांवरील भाषणे, दिनविशेष व्याख्याने ठेवली जातात. यामुळे वक्तृत्व कौशल्य, अतिरिक्तचे वाचन या गोष्टी आपोआपच होतात. शिष्यवृत्ती, प्रज्ञा शोध, राष्ट्रभाषा बाल प्रबोधिनी, एलिमेंटरी-इंटिमिडिएट अशा प्रत्येक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना तयार करण्याची जबाबदारीही शिक्षक पार पाडतात. दहावीच्या विद्यार्थ्यांनी नियमितपणे सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, यासाठी शिक्षकांना वेळपत्रक ठरवून दिले जाते हे विशेष.
याशिवाय मुलांचे दृक्श्राव्य माध्यमांचे ज्ञान समृद्ध करण्यासाठी ‘फिल्म क्लब’, मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन, नियमित वैद्यकीय तपासणी, विद्यार्थी साहाय्य निधी, ग्राहक मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देणे, फटाकेमुक्त दिवाळी, विद्यार्थिनी व महिला शिक्षकांसाठी तक्रार निवारण समिती.. ही यादी न संपणारी आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील सुमारे १५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च शाळा उचलते. कधी शाळेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य किंवा त्यांच्या मित्रमंडळीतून वा शाळेविषयीच्या आपुलकीने जोडलेल्या व्यक्तींच्या मदतीतून हा खर्च केला जातो, असे मंडळाचे सदस्य डॉ. नंदकुमार वर्तक सांगतात. थोडक्यात समाजातील प्रत्येक सामाजिक, आर्थिक घटकांमधील विद्यार्थ्यांला सामावून घेण्याची, त्याचा विकास घडवून आणण्याचा शाळेचा प्रयत्न राहिला आहे. ‘जनसामान्यांची सर्वमान्य शाळा’ हे शाळेचे ब्रीद त्यासाठीच सार्थ ठरते!

असा झाला शाळेचा जन्म
डॉक्टरकीची पदवी हातात पडल्यानंतर जिथे डॉक्टर नसेल तिथे प्रॅक्टिस करेन या ध्येयाने प्रेरित होऊन सदाशिव (दादा) दाजिबा वर्तक यांनी पालघरसारख्या दुर्गम भागात १९४० साली आरोग्याची गंगा नेली. पण, इथल्या गरीब-मध्यमवर्गीय पालकांना माध्यमिक शिक्षणासाठी मुलांना बाहेर पाठवावे लागते हे लक्षात आल्यानंतर दादांना शिक्षणाची गंगाही या भागात झुळझुळावी या ध्यासाने घेरले. १९७० साली त्यांनी येथील नागरिकांची एक सभा घेऊन शाळा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्या वेळी त्यांचे मार्गदर्शक होते प्रकाशभाई मोहाडीकर, नवनीत भाऊ शाह. पुढे सरकारी लाल फितीच्या कारभाराला कंटाळून त्यांनी शाळेचा नाद सोडून दिला. १९८८ साली हे थंडावलेले कार्य पुन्हा सुरू झाले. आणि ‘बोईसर एज्युकेशन सोसायटी’ने जन्म घेतला. आज याच संस्थेची दादांच्या नावे असलेली ‘डॉ. स. दा. वर्तक विद्यालय’ ही शाळा अख्ख्या पंचक्रोशीला ज्ञानाची प्रेरणा देणारी ठरते आहे.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
faculty and non-teaching staff have not been paid since two months in Department of Higher Education in West Vidarbha
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

 

रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com