मराठीमध्ये रॉक आणि पॉप गाणी लोकप्रिय करून या संगीताचा पाया घालणारे गायक व संगीतकार सदानंद ऊर्फ नंदू भेंडे यांचे शुक्रवारी निधन झाले. एका ज्येष्ठ सुहृदाने त्यांच्या आठवांना दिलेला हा उजाळा..
नंदू भेंडे हा माझ्या आयुष्यात आला तोच मुळी अलेक पदमसी दिग्दíशत ‘जिझस ख्राईस्ट सुपरस्टार’ या १९७६-७७ च्या दरम्यान मुंबईतल्या इंग्लिश रंगभूमीवर गाजत असलेल्या संगीतमय नाटकातली ‘जुडास’ ही व्यक्तिरेखा आपल्या जबरदस्त गायनाभिनयानं साकारल्यामुळे मिळालेल्या प्रचंड ग्लॅमरसह.. मराठी/ इंग्लिश रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शक-अभिनेते आत्माराम भेंडे आणि डॉ. आशा भेंडे या प्रतिभावंत दाम्पत्याचा सदानंद ऊर्फ नंदू हा मुलगा. बटरेल्ट ब्रेख्त या विश्वविख्यात नाटककाराच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’ या मूळ जर्मन नाटकाचं मराठी रूपांतर पु. ल. देशपांडे यांनी खास ‘घाशीराम कोतवाल’ सादर करणाऱ्या थिएटर अकादमीतल्या आम्हा रंगकर्मीकरिता लिहिलं. त्यातल्या अंकुश नागावकर या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेलांनी जेव्हा थेट मुंबईहून नंदू भेंडेला आयात करायचं ठरवलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ..आणि त्याला भेटून तर त्यांची खात्रीच पटली. कारण नंदूला मराठी जेमतेमच नव्हे तर जवळजवळ बोलता येत नव्हतंच म्हणेनात.. (म्हणजे केस िवचरायला तो फणी मागायचा. फणी आणि कंगवा यातला फरकच त्याला माहीत नव्हता.)
पहिले काही दिवस तो थिएटर अकादमीचे सचिव श्रीधर राजगुरू यांच्या घरी राहत होता. मग नंतर तो माझ्या घरी राहायला आला. हातात माईक घेऊन जेव्हा तो पहिलं गाणं ‘माझं नाव अंकुश नागावकर’ तालमीत पहिल्यांदा गायला तेव्हा कुठे त्याच्या गाण्याची खरी ताकद साऱ्यांच्या प्रत्ययाला आली आणि त्याच्याविषयी शंकित मनं आश्वस्थ झाली. ‘तीन पशा..’चं संगीत प्रथम ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर हेच करणार होते, पण दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘तीन पशा..’च्या संगीत संकल्पनेबद्दल चंदावरकरांचे तात्त्विक मतभेद झाल्यामुळे बहुधा त्यांनी आपलं अंग काढून घेतलं आणि आकस्मिकपणे ती जबाबदारी त्यांचा सहायक असलेल्या माझ्यावर पडली. चंदावरकरांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या मुखडय़ांचे अंतरे मी बांधले. याशिवाय नंदूची (एक वगळता) आणि इतर सर्व गाणी मी संगीतबद्ध केली. या सगळय़ात नंदू सुरुवातीला संकोचानं बहुधा थोडा अलिप्त राहिला. पण पुढे ‘झीनतची अन् माझी अमुची प्रीत पुराणी’ हे गाणं त्यानं स्वत: संगीतबद्ध केलं आणि अनेक गाण्यांच्या वाद्यवृंद संयोजनात विशेषत: लीड गिटार आणि बेस गिटार यांच्यासंदर्भात आणि हार्मनीबाबतही अत्यंत मोलाचं योगदान दिलं. अखेरीस ‘तीन पशा..’ला भास्कर चंदावरकर, आनंद मोडक व नंदू भेंडे असे तीन संगीतकार लाभले. रोज संध्याकाळी सात वाजता एस.पी. कॉलेजच्या स्टुडंट्स हॉलमध्ये सर्व वादक आणि कलाकारांची तालीम सुरू होई.
दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल मौजे दौंड येथील आपला दवाखाना संपवून साधारणपणे दहाच्या सुमारास तालमीच्या जागी पोहोचत. तिथून पुढे नाटकातले सीन्स-गाणी यांच्या विरचना आणि तालमी होत. रात्री दोन-अडीचला तालीम संपे. कुणीतरी जब्बार पटेलांना पुणे स्टेशनवर सोडायला जाई आणि आम्ही सारे सारस बागेलगतच्या बापूच्या फ्रुट ज्यूस बारवर ज्यूस प्यायला. पहाटे चार वाजता भिलवडी (सांगली)हून येणारी चितळय़ांची दुधाची गाडी सारस बागेसमोरून गेली की आम्ही घरोघरी परतत असू. नंदू माझ्या घरीच राहायला होता. सकाळी मी नोकरीवर जाई आणि तो दुपारी कधीतरी उठून आन्हिकं, जेवण वगरे आटोपून संध्याकाळी आम्ही नव्या गाण्यांवर काम करीत असू. दर शनिवारी दवाखाना बंद असल्यानं डॉ. पटेल शुक्रवार रात्रीपासून पुण्यातच मुक्कामाला असत. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास डॉक्टर पटेल, अस्मादिक, नंदू भेंडे, माधुरी पुरंदरे आणि कधी कधी चंद्रकांत काळेसुद्धा कमला नेहरू पार्कसमोरच्या पु. ल. देशपांडेंच्या घरी जमायचो. त्या आठवडय़ात नवी केलेली गाणी वसंतराव देशपांडय़ांच्या खास उपस्थितीत भाईंना आणि सुनीताबाईंना ऐकवायचो. नंदूला वसंतरावांची भरभरून दाद मिळे. भाईंच्या हार्मोनियमवर अस्मादिक आणि नंदू त्याच्या यामाहाच्या स्पॅनिश गिटारच्या साथीनं आम्ही नंदू, माधुरी, चंद्रकांत यांच्याकरिता केलेली गाणी पेश करीत असू. माझं नाव अंकुश नागावकर, माझी नवरी कशी नव्‍‌र्हस होऊन गेली ते, ग्यांगवाले स्साले नमकहराम, सगळे एकजात हरामखोर, झीनतची अन् माझी अमुची प्रीत पुराणी, माणूस जगतो कशावरी, पसा ही महत्त्वाची गोष्ट आणि माफ करा माफ करा अशी सात गाणी तो अशा काही जबरदस्त जोशात आणि मस्तीत गायचा की सारे प्रेक्षागृह संमोहित होऊन जाई. हातात मायक्रोफोन घेऊन व्यक्तिरेखेचं बेअिरग सांभाळत अत्यंत सहजतेनं रंगमंचावर वावरत तो गात असे. ‘पसा ही महत्त्वाची गोष्ट’ हे गाणं मी पाच मात्रांच्या छंदात बांधलं. खरं तर पाश्चात्त्य पॉप/ रॉक शैलीतली गाणी ही चार/ सहा अगर आठ मात्रांत बांधली जातात. पण मी आपल्या भारतीय संगीतातल्या झपतालाच्या अंदाजानं बांधलेल्या गाण्याला आमचा ड्रमर सतीश पंडित (आणि पुढे विजय अकोलकर) जेवढय़ा पक्क्या लयीत पाच मात्रांतल्या तालखंडाची जोड देई तेवढय़ाच सहजतेनं नंदूही ते गाणं गाई.
नंदूची काही गाणी तर चक्क पु. ल. देशपांडय़ांनी लिहिलेले गद्य संवादच होते आणि नाटकाच्या शेवटी त्याचं ‘माफ करा माफ करा’ हे संगीतमय स्वगत अतिशय प्रभावी होई. संथ गतीत वाजणारा ड्रम आणि सिंथेसायझर, पियानो अकॉर्डियन, गिटार यांवर वाजणाऱ्या संवादी सुरावटी आणि नंदूचा भावपूर्ण स्वर हे सगळं मराठी रंगभूमीवर अगदी नवीन. यापूर्वी कधी न घडलेलं. ड्रम्स, कोंगो, तुंबा, इलेक्ट्रिक गिटार, बेस गिटार, सिंथेसायझर, पियानो अकॉर्डियन अशा पाश्चात्त्य वाद्यवृंदासह रंगमंचावर देहभान विसरून गाणारा नंदू अनुभवणं हे सारं विलक्षण होतं. थरारून टाकणारं होतं. आधुनिक भारतातला पहिला रॉक सिंगर हा आमच्या मराठी मातीतला नंदू भेंडे. इंग्लिश रंगभूमी गाजवून नंदू आधुनिक मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘तीन पशाचा तमाशा’ या नाटकाद्वारे मराठी रसिकांच्या विशेषत: तरुणाईच्या गळय़ातला ताईत झाला. पुण्यात तर फग्र्युसन, वाडिया, बीएमसीसी या सर्व कॉलेजांत टीपीटी (तीन पशाचा तमाशाचं लघुरूप) हा अवघ्या तरुणाईचा कोडवर्ड झाला होता.
मला आठवतं, मुंबईतले ‘तीन पशाचा तमाशा’चे सर्व प्रयोग तिकीट विक्रीच्या पहिल्या दिवशी पहिल्या दोन तासांत हाऊसफुल झालेले असत. नंदूचं गाणं ऐकायला मुंबईतल्या अनेकानेक प्रयोगांना महान संगीतकार सी. रामचंद्र हजर असत. तर जसराजजींपासून पंडित अभिषेकीबुवांपर्यंत आणि विश्वविख्यात गायिका आशाबाई भोसल्यांपासून तरुणांचे आवडते आर. डी. बर्मन ऊर्फ पंचमदांपर्यंत साऱ्यांनी नंदूच्या गाण्याचं प्रचंड कौतुक केलं. पुढे िहदी चित्रपट संगीतातल्या आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि बप्पी लाहिरी या लोकप्रिय संगीतकारांनी त्याला पाश्र्वगायनाकरिता बोलावलं ते ‘तमाशा’तील त्याच्या जोशिल्या आविष्कारामुळेच. ‘तीन पशा..’च्या यशामुळे मुंबई दूरदर्शन केंद्रावर कार्यरत अभिनेता दिग्दर्शक विनय आपटेनं ‘युवदर्शन’ या कार्यक्रमांतर्गत नवी मराठी पॉप गाणी करण्याची कामगिरी माझ्यावर सोपवली. माझा मित्र सुधीर मोघेंच्या मुक्त छंदातल्या कविता मी पॉप/ रॉक शैलीत संगीतबद्ध केल्या नंदू भेंडे, रवींद्र साठे, माधुरी पुरंदरे आणि लालन पळसुले या गायक/गायिकांकरिता. तेव्हा नंदूचा ‘वेल्व्हेट फॉग’ हा रॉक ग्रुप होता.
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
किंवा
तुझ्या माझ्या सहवासाचा योग
आपल्या कुंडलीत कुठून लाभला
ही नािरगी संध्याकाळ,
ही सुखाची सफर, हा झकास बेत कसा जमला
अशा सुधीर मोघेंनी लिहिलेल्या सुंदर कविता नंदूनं फार उत्कटतेनं गायल्या. ही गाणी दूरदर्शनवर प्रसारित झाली. दर्शकांना फार आवडली. तेव्हाच्या पॉलीडॉर म्युझिक कंपनीनं या गाण्यांची ‘आपल्या आयुष्यात प्रेम येतं’ या शीर्षकाची मराठी पॉप गाण्यांची पहिली ध्वनिमुद्रिका बाजारात आणली. त्यापाठोपाठ ‘तुम्हाला देईल जे जे हवे’ या शीर्षकाची ध्वनिफीत माझ्या संगीत दिग्दर्शनामध्ये नंदू गायला. गाणी पुन्हा सुधीर मोघे यांच्या जादूई लेखणीतून साकारलेली. देवा मला भेटायचं तुला, थबकुनी साजणी अशी वळू नको, असा कसा घोळ होतो अशी एकाहून एक धमाल गाणी नंदू भन्नाट गायला. मुंबई दूरदर्शन केंद्रावरील ‘आरोही’ या सुगम संगीताच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाकरिता ‘खिलते हैं फूल, फूल खिलते हैं’ (गीतकार- मंगेश कुलकर्णी ) आणि ‘ये बात बता सकता है एक तूही’ (गीतकार- सुधीर मोघे) अशी दोन गाणी मी नंदूकरिता संगीतबद्ध केली होती. ‘तुम्हाला देईल जे जे हवे’ या ध्वनिफितीतल्या गाण्यांचे आणि ‘आरोही’तल्या गाण्यांचे संगीत संयोजन लेस्ली लेविस (कलोनिअल कझिन)नं केलं होतं.
‘जिझस ख्राईस्ट सुपरस्टार’ या नाटकातल्या ‘जुडास’ आणि ‘जिझस’ या दोन्ही भूमिकांबरोबर ‘द फन्टास्टिक’ या नाटकात ‘एल गलिओ’ ही भूमिका तर ‘टोमी’ या संगीतमय नाटकातला त्याचा सांगीतिक आविष्कार हे त्याचं इंग्लिश रंगभूमीवरील योगदान. त्याखेरीज लोकप्रिय िहदी गाण्यांच्या रिमिक्सच्या तडाखेबंद खपाच्या अनेक ध्वनिमुद्रिकांची निर्मिती त्यानं पॉलीडॉर म्युझिक कंपनीकरिता केली. गेल्या काही वर्षांत त्यानं स्टुडिओ इन सिंकद्वारे ध्वनिमुद्रणाच्या क्षेत्रात आपला जम बसवला होता. तिथं तो आवाज साधनाशास्त्राचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देई. ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकरांच्या ‘समांतर’ आणि ‘धूसर’ या मराठी चित्रपटांची गाणी मी स्टुडिओ इन सिंकमध्येच ध्वनिमुद्रित केली. तेव्हा झालेल्या भेटीगाठीमध्ये जुन्या आठवांना उजाळा मिळत राहिला. पुन्हा एकदा नवी गाणी करण्याचे मनसुबे रचले गेले आणि आता ते तसेच अधुरे राहिले. आता उरली फक्त त्याच्या सहवासाची असंख्य स्मरणं आणि त्यानं गायलेल्या गाण्यांचीही.

सुधीर मोघेंनी लिहिलेल्या एका गमतीदार गाण्याच्या ‘देवा मला भेटायचंय तुला’ या गाण्याच्या शेवटी
हं, तू असं कर
मला रीतसर आमंत्रण पाठव
जाण्या-येण्याचा भाडेखर्च
किंवा चक्क तुझं वाहन पाठव (म्हणजे गरुड )
आणि स्वर्ग, स्वर्ग म्हणतात त्याची निदान झलक तरी दाखव
पण एक विसरू नकोस
तिथून परत मात्र नक्की यायचंय मला
असं देवाला मिस्कीलपणे बजावणारा नंदू कुणालाही कसलीही कल्पना न देता अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला.
नंदूच्या अकस्मात जाण्यानं मी आणखीन एक सुहृद गमावलाय. सन २०१३ च्या अखेरी विनय आपटे, सन २०१४ च्या आरंभी माझा मितवा सुधीर मोघे आणि त्यापाठोपाठ आता नंदू भेंडे. सारंच क्लेशकारक. नंदू भेंडे या माझ्या गायक-अभिनेता मित्राला भावपूर्ण आदरांजली!

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे