कुठलीही भाषा ही तिच्या वापरावर टिकून राहते. बेळगावसारख्या सीमाभागातही तिथल्या जनतेने मराठीशी आपली नाळ या नात्यातूनच आजवर टिकवून ठेवली आहे. तर या नात्याला अधिक शाश्वत करण्याचे काम बेळगावातील सरस्वती वाचनालयाकडून सुरू आहे. १४२ वर्षांचा हा ज्ञानयज्ञ आणि त्याने रुजवलेल्या वाचनसंस्कृतीची ही गाथा!

बे ळगाव’ हा शब्द उच्चारला तरी तिथल्या मराठी भाषकांचा लढा डोळय़ांपुढे उभा राहतो. केवळ एका भाषेसाठी, तिच्या अस्तित्वासाठी ही भूमी आणि या भूमीतील माणसे गेल्या सहा दशकांहून अधिक काळ संघर्ष करत आहेत. मातृभाषेच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढय़ात जनांसोबत काही मराठी संस्थांनीही हा यज्ञ सतत धगधगत ठेवला आहे. ‘सरस्वती वाचनालय’ यातीलच एक आदराचे नाव! सीमाभागात राहून वाचनसंस्कृती आणि अन्य उपक्रमांतून इथे बागडणाऱ्या मराठीला प्रवाही ठेवण्याचे काम या संस्थेने केले आहे. यामुळेच सीमाभागात मराठी संस्कृतीचा शोध घेऊ लागलो, की प्रत्येक जण अगदी सुरुवातीला या शारदेच्या दारात आणून उभा करतो.

बेळगावच्या शहापूर भागात हे विद्येचे मंदिर! दारात उभे राहताच हे घडीव चिऱ्यातील सुंदर आलय आणि तिच्या भाळीवरचा तो ‘सरस्वती वाचनालय’ हा फलक लक्ष वेधून घेतो. दुमजली वास्तू. पुढय़ात मोठे पटांगण. त्यात मधोमध कमळाच्या आकाराचा कारंज्याचा हौद आणि त्यातून उमलून आलेली शारदेची प्रतिमा..प्रथम दर्शनातच प्रेमात पाडणारे हे दृश्य!

ब्रिटिश स्थापत्याची छाप असलेली ही वास्तू. एकूण सात दालने. उंच छत. प्रकाश-वाऱ्यासाठी जागोजागी खिडक्या-झरोक्यांची रचना. भिंतीत ओळीने कपाटांची मांडणी.. पुस्तकांनी काठोकाठ भरलेली. वाचक-अभ्यासकांना बसण्यासाठी जुन्या काळच्या टेबल-खुच्र्या ..सारस्वतांनी व्यापलेल्या. नवख्यालाही पहिल्या कटाक्षातच गुंतवणारे हे दृश्य. वाङ्मयाच्या दुनियेत घेऊन जाणारा अनुभव. मग ही अनुभूतीच ‘सरस्वती’च्या या देव्हाऱ्याचा शोध घेण्याची प्रेरणा देते.

या वाचनालयाचा जन्म १८७४ सालचा. म्हणजे आजपासून बरोबर १४२ वर्षे जुना! हा भाग त्या वेळी तत्कालीन सांगली संस्थानकडे होता. या शहापुरातील सरंजामे गुरुजी नावाच्या गृहस्थांनी विद्यादानाबरोबरच पाच पुस्तके आणि एका वृत्तपत्राच्या शिदोरीवर ही वाचन चळवळ सुरू केली. पुढे पुस्तके आणि संस्थेचा जसजसा विस्तार होत गेला तसे मग हे वाचनालय बेळगावात विविध जागी फिरू लागले आणि अखेर १९३४ साली स्वत:च्या वास्तूत स्थिरावले.

या वास्तूचीही गमतीशीर गोष्ट. १९३२च्या सुमारास या भागात मोठा दुष्काळ पडला होता. म्हणून संस्थानतर्फे काही मदतनिधी पाठवला होता. त्याचा उपयोग करूनही काही रक्कम शिल्लक राहिली. मग यामध्ये स्थानिक दानशूरांनी भर घालत ‘सरस्वती’चे हे मंदिर उभे केले. इमारतीची भव्यता पाहत असतानाच आपले लक्ष तिच्यात सामावलेल्या ग्रंथ श्रीमंतीकडे वळते. तब्बल ३८ हजार ग्रंथांचा हा संग्रह. यातील बहुसंख्य मराठी. जोडीने कानडी, संस्कृत, उर्दू आणि इंग्रजी भाषेतीलही अनेक दुर्मीळ ग्रंथ. या साऱ्या संग्रहातील तब्बल ३ हजारांहून अधिक ग्रंथ वा हस्तलिखिते ही शंभरहून अधिक वर्षे जुनी. वाचनालयाची हीच खरी बौद्धिक संपत्ती. यातील हस्तलिखितांची जीर्ण पाने चाळू लागताच याचा प्रत्यय येऊ लागतो. ऋग्वेद, यजुर्वेदाची प्रत, कालिदासाने लिहिलेले श्री रघुवंश आणि किरातार्जुनीय, पाणिनीने लिहिलेले शब्द रूपावली आणि सिद्धान्त कौमुदी ही दुर्मीळ हस्तलिखिते त्यांचे महत्त्व सांगत पुढय़ात येतात. ज्ञानेश्वरीच्या दीडशे वर्षांपूर्वीच्या हस्तलिखित प्रती कुतूहल निर्माण करतात. गुरुचरित्राच्या अशाच एका जुन्या हस्तलिखितामध्ये श्री दत्त गुरूंचे दीडशे वर्षांपूर्वी काढलेले एक दुर्मीळ चित्र दिसते.

पुस्तकांची मांडणीही अशीच सुखद धक्के देणारी. सन १८६२ मध्ये छपाई केलेला ‘अमरकोश’ हा संस्कृत शब्दकोश हजारो संस्कृत शब्दांचे भांडार घेऊन येतो. साधे ‘पार्वती’ शब्द घेतला तरी मग ‘उमाकात्यायनी गौरीकाली हैमवतीश्वरी।। शिवाभवानीरुद्राणीशर्वाणी सर्व मंगला।। अपर्णापार्वती दुर्गामृडानी चंडिकांबिका।। आर्या दाक्षायणीचैव गिरिजा मेनकात्मजा।। अशी तिची नाना रूपे इथे उलगडतात.

जैमिनी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या ‘जैमिनी अश्वमेध’ ग्रंथाचा मराठी अनुवादाची दुर्मिळ प्रत इथे आहे. कवी मुक्तेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास आणि मोरोपंत या आमच्या आद्यकवींच्या पद्य वाङ्मयावरही असाच एक अनोखा ग्रंथ या संग्रहात दडलेला आहे. गौतम बुद्धांपासून ते लोकमान्यांपर्यंत आणि औरंगजेब बादशाहपासून ते नाना फडणविसांपर्यंत अनेक दुर्मीळ चरित्रग्रंथ इथे आहेत. हे सारेच ग्रंथ शंभरहून अधिक वर्षे जुने. यामुळे गौतम बुद्ध (१८७४), श्रीमद् शंकराचार्य (१८८९), नेपोलियन बोनापार्ट (१८७८), औरंगजेब बादशाह (१८९६) ही अशी नावे आणि त्यांचे प्रसिद्धी काळ जरी वाचले तरी थक्क व्हायला होते.

शेती, पशुपालन, आयुर्वेद, वनौषधी, भाषा, व्याकरण, साहित्य, संस्कृती, इतिहास अशा शेकडो विषयांवरील हे विपुल साहित्य. यातले कुठलेही पुस्तक घ्यावे आणि त्यात दडलेल्या ज्ञान-माहितीच्या सागरात बुडून जावे. कागदी वय झालेल्या या पुस्तकांना आता संदर्भमूल्यही खूप मोठे आले आहे. १९३५ साली प्रसिद्ध केलेल्या वनौषधींवरील सात खंड संस्थेच्या संग्रहात आहेत. यामध्ये अनेक दुर्मीळ वनस्पतींचे संदर्भ सापडतात. पुण्याच्या आयुर्वेद रसशाळेने १९३९ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘औषध दीपिका’ नावाच्या ग्रंथात नाना व्याधी आणि त्यावरील चारशे औषधांची माहिती मिळते. १८७० साली प्रसिद्ध झालेला ‘शब्दरत्नाकर’ हा संस्कृत-मराठी आणि १८९० साली प्रकाशित झालेला संस्कृत-इंग्रजी हे शब्दकोश तर या वाचनालयाचा ठेवाच आहेत. हे सारे वाङ्मय पाहता पाहता थक्क व्हायला होते. कितीही उपसली, शोधली, वाचली तरी विद्येची ही पाणपोई सतत भरलेली भासते. ‘सरस्वती’च्या या मंदिरातून गेली १४२ वर्षे विद्येचे हे दान निरंतर सुरू आहे, ज्याचा लाभ बेळगावातील सामान्य मराठी जनांपासून ते देशभरातील विद्वानांपर्यंत अनेक जण घेत आहेत. आज बेळगावच्या मातीत आणि इथल्या माणसांच्या रक्तात अद्यापही मराठी भाषेचे जे सत्त्व टिकून आहे त्यामध्ये या शारदेच्या उपासनेचा मोठा वाटा आहे.

परंतु संस्थेच्या या यशाला भविष्य पोखरणाऱ्या चिंतेचीही मोठी किनार आहे. हा ज्ञानयज्ञ आजतागायत केवळ लोकाश्रयावर तेवतो आहे. संस्थेला कुठलेही ठोस उत्पन्न नाही. ८२ वर्षांची इमारत जुनी झाली आहे. खचणाऱ्या भिंती आणि मोडणाऱ्या कपाटांमुळे रोज असंख्य पुस्तके निराधार होत उघडय़ावर मांडावी लागतात. वृद्ध पदाधिकारी आणि अत्यल्प पगारावरील चार महिला कर्मचारी संस्थेचा हा सारा गाडा हाकतात. पण अनेकदा या कर्मचाऱ्यांचे तीन-तीन महिन्यांचे वेतन करण्यासही पैसे नसतात. मग प्रत्येक वेळी या विश्वस्तांनाच स्वत:चे खिसे रिकामे करावे लागतात. हे सारे का तर.. वाचनालय आणि त्यातून जोपासलेली मराठी वाचनसंस्कृतीची चळवळ टिकवण्यासाठी. संस्थेचे स्वरूप मराठी भाषा संवर्धनाचे यामुळे कर्नाटक शासनाची मदत तर दूर उलट सततची वक्रदृष्टी. यामुळे महाराष्ट्र शासनाला अनेकदा आर्त हाक दिली गेली. पण एक-दोनदा पाठवलेल्या मदतीचा अपवाद वगळता इथेही केवळ आश्वासनांचे ढीगच आहेत. मातृभाषेला श्वासाएवढे महत्त्व देत सुरू असलेले हे मराठी वाचनालय आज मृत्युपंथावर आहे. इथले हजारो ग्रंथ आणि त्यातील पाने बेळगावातील अस्तंगत होणाऱ्या मराठी भाषेबरोबरच गळू लागली आहेत. गेली १४२ वर्षे अत्यंत निगुतीने जपलेला ‘सरस्वती’चा हा देव्हारा आता रिता होऊ लागला आहे. या शारदेचे आणि जगू पाहणाऱ्या मराठीचे भवितव्य आता केवळ समाजाच्या हाती!!

 

संस्थेपर्यंत कसे जाल?

बेळगाव शहर रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीने जोडलेले आहे. बेळगाव बस आणि रेल्वेस्थानकापासून हे वाचनालय दोन किलोमीटर अंतरावर आहे. या प्रवासासाठी रिक्षा उपलब्ध आहेत.

 

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०५३६
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, माहापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, इंडियन एक्स्प्रेस, बी१/बी सेक्टर, नॉएडा – २०१३०, उत्तर प्रदेश. ०११- २३७०२१००

धनादेश या नावाने पाठवा..

श्री सरस्वती वाचनालय, शहापूर, बेळगाव (Shree Saraswati Vachnalay, Shahapur, Belgaum) ( कलम ८०जी (५) नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत )

 

संगीत शाकुंतलचा पहिला प्रवेश!

वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवताच सांगली संस्थानकडून इमारतीसाठी जागा देण्यात आली. या जागेवर ४ सप्टेंबर १८७५ रोजी अण्णासाहेब किलरेस्कर यांच्या ‘संगीत शाकुंतल’ नाटकाचा पहिला प्रयोगही पार पडला. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण सरस्वती वाचनालयाच्या मातीशी जोडला गेला आहे. यामुळे आजही अनेक कलाकार या भूमीला वंदन करण्यासाठी इथे येतात.

– सरस्वती वाचनालयाचे संस्थापक सरंजामे गुरुजी

 

सरस्वती वाचनालय

शहापूर, बेळगाव : या वाचनालयातील काही पुस्तकांची मध्यंतरी चोरी झाली. चोरलेली ही पुस्तके शहरातीलच रद्दी विक्रेत्यांकडे विकली गेली. मात्र हे वाचनालय आणि तिथल्या या पुस्तकांचे मोल या रद्दी विक्रेत्यांनीही जाणले आणि ही सर्व पुस्तके त्यांनी कुठलाही मोबदला न घेता संस्थेकडे पुन्हा जमा केली.

सीमाभागात राहून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी सरस्वती वाचनालयाचे सुरू असलेले कार्य हे सुवर्णाक्षरात लिहून ठेवावे असे आहे. या भागातील मराठीच्या अस्तित्वासाठी हे काम निरंतर सुरू राहणे आवश्यक आहे. 

कुसुमाग्रज

 

– अभिजित बेल्हेकर