प्रायोगिक नाटक क्षेत्रात गेल्या साडेचार दशकांपासून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारी संस्था म्हणजे ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’. या संस्थेने केवळ नवीन प्रायोगिक नाटकेच सादर केली नाहीत, तर अनेक रंगकर्मी घडविले. गेल्या दशकापासून या संस्थेने प्रत्यक्ष नाटकांचे सादरीकरण थांबविले असले तरी नाटय़विषयक चळवळीच्या रूपाने काही महत्त्वाच्या गोष्टी राबविल्या. आता ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ संस्थेने ‘महाराष्ट्रीय मंडळ’ या संस्थेच्या सहकार्याने ‘सकळ ललित कला संकुल’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सर्व ललित कलांच्या एकत्रित आविष्काराचे केंद्र म्हणून लवकरच हे संकुल पूर्णत्वास येईल. पण या संकुलाच्या पूर्ततेमध्ये कलाप्रेमी रसिकांचाही खारीचा वाटा हवा आहे.

पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर म्हणजेच ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’, एकाच विषयासाठी ध्येयाने पछाडलेल्या व्यासंगी विद्वानांचे शहर. एके काळी सायकलींचे शहर ही ओळख असलेले पुणे आता आशिया खंडातील सर्वाधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे शहर झाले आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), लष्कराचे दक्षिण मुख्यालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), उच्च दाब पदार्थ संशोधन संस्था (एचईएमआरएल) अशा संरक्षणदृष्टय़ा महत्त्वाच्या संस्थांमुळे पुण्याची कीर्ती देशभर पसरली आहे. सेवानिवृत्तीनंतर वास्तव्य करण्याचे ठिकाण असलेले पुणे औद्योगिक शहर, ऑटोमोबाइल उद्योगाचे शहर झाले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाल्यानंतर त्यामध्ये देशातील एक अग्रगण्य शहर म्हणून पुण्याने आपला ठसा उमटविला आहे. एके काळच्या जुन्या पुण्यामधील नागरिकांसाठी दुपारचे सुग्रास भोजन, सायंकाळी लोकमान्यांचे भाषण आणि रात्री बालगंधर्व यांचे नाटक ही चैन असायची. मात्र पुण्याची ओळख ही एवढय़ापुरतीच मर्यादित नाही. काळाबरोबर पुणे बदलले आणि पुणेकरांनीही कात टाकली. नव्या प्रागतिक विचारांचे स्वागत करण्यामध्ये पुणेकर अग्रभागी राहिले. हे केवळ एकाच क्षेत्रात झाले असे नाही. तर हा बदल जीवनाच्या सर्वच क्षेत्रांनी स्वीकारलाच नव्हे, तर आपलासा केला. मग रंगभूमी आणि त्यातही प्रायोगिक रंगभूमी मागे राहून कशी चालेल?

गुणिजनांना आर्थिक सुरक्षाकवच..

भारतातील प्रायोगिक रंगभूमीला समृद्ध करण्याचे काम पुण्याने केले. मराठी रंगभूमीची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या संस्थांमध्ये ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ हे एक महत्त्वाचं नाव. केवळ मराठीच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या वादातून ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ ही संस्था सुरू झाली. गेल्या साडेचार दशकांपासून हे ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ या संस्थेचे नाणं खणखणीत वाजतच आहे. विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक १९७२ मध्ये राज्य नाटय़ स्पर्धेच्या माध्यमातून रंगभूमीवर आले. डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शन केले होते. पं. भास्कर चंदावरकर यांनी नाटकाला संगीत दिले होते, तर कृष्णदेव मुळगुंद यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत काळे, नंदू पोळ, श्रीराम रानडे, रवींद्र साठे, मोहन गोखले, सतीश आळेकर, रमेश मेढेकर, सुरेश बसाळे, प्रकाश रानडे असे अनेक कलाकार ‘घाशीराम कोतवाल’मध्ये होते. राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम अशा दोन्ही फेऱ्यांमध्ये या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळालं. मात्र त्यानंतर काही काळाने हे नाटक म्हणजे नाना फडणवीस यांचे चारित्र्यहनन आहे आणि या नाटकातून समस्त ब्राह्मणवर्गाची बदनामी केलेली आहे, असा सूर पुण्यात उमटू लागला. त्यातून ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’ (पीडीए) या मूळ संस्थेवर दबाव निर्माण करण्यात आला. नाटकाचे प्रयोग थांबवावे लागले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. भालबा केळकर यांनी नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संस्थेत जुनी पिढी आणि नवी पिढी असा वाद उभा राहिला. परिणामी पीडीए संस्थेचे थेट विभाजन झाले.

‘घाशीराम कोतवाल’ नाटकाविरोधात निदर्शने होऊ लागल्यामुळे नाटकामध्ये नेमके काय आहे याची उत्सुकता वाढली. त्या काळात हे नाटक वादग्रस्त झाले तसेच ते लोकप्रिय झाले. नाटकाचे प्रयोग करण्याची ऊर्मी या युवा कलाकारांना काही स्वस्थ बसू देईना. मग, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीधर राजगुरू यांच्या ‘शिशुरंजन’ या संस्थेमार्फत ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचे प्रयोग सुरू झाले. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून २७ मार्च १९७३ रोजी ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ या नव्या नाटय़संस्थेचा जन्म नाटककार सतीश आळेकर यांच्या शनिवार पेठेतील घराच्या गच्चीवर झाला. मात्र संस्था २२ ऑक्टोबर १९७३ रोजी नोंदणीकृत झाली. कोणत्याही दबावाला बळी न पडता नाटय़वेडानं पछाडलेल्या युवा रंगकर्मीनी नाटकाचे प्रयोग पुढे सुरूच ठेवले. १९८० मध्ये या नाटकाचे युरोपातही प्रयोग झाले. या दौऱ्याला जाण्यावरूनही नाटकाला तीव्र विरोध झाला होता. त्या विरोधालाही न जुमानता राजकीय स्तरावरून झालेल्या सहकार्यातून नाटकाचा दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या नाटकाला परदेशातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. कालांतराने हे नाटक केवळ मराठी रंगभूमीवरच नाही, तर भारतीय रंगभूमीच्या संदर्भात मैलाचा दगड ठरले. ‘घाशीराम कोतवाल’मुळे ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’चे नाव जगभरात पोहोचले. थिएटर अ‍ॅकॅडमीमुळे महाराष्ट्रातील युवा रंगकर्मीना बळ मिळाले आणि अनेक नाटय़संस्था उभ्या राहिल्या. या नाटय़संस्थांच्या माध्यमातून अनेक नाटके रंगभूमीवर सादर झाली.

‘घाशीराम कोतवाल’ या पहिल्याच नाटकाने थिएटर अ‍ॅकॅडमीची देशभरातील नाटय़सृष्टीत चर्चा सुरू झाली. या नाटकाबरोबरच ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ने नंतरच्या काळात ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’, ‘पडघम’, ‘अतिरेकी’, ‘मिकी आणि मेमसाहेब’, ‘प्रलय’, ‘शनिवार-रविवार’, ‘डॉल हाऊस’ अशी नाटके सादर केली. बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितांवर आधारित ‘बदकांचं गुपित’, पु. शि. रेगे यांच्या साहित्यकृतींवर आधारित ‘आनंद भाविनी’ दर्जेदार सांगीतिक रंगमंचीय कार्यक्रमही केले. सतीश आळेकर यांची ‘बेगम बर्वे’, ‘महानिर्वाण’, ‘महापूर’ ही तिन्ही नाटके प्रचंड गाजली. या नाटकांमुळे महत्त्वाचे आधुनिक नाटककार अशी आळेकरांची ओळख निर्माण झाली. पुन्हा एकदा थिएटर अ‍ॅकॅडमी आणि पर्यायाने मराठी नाटकाचा भारतीय रंगभूमीवर गौरव झाला. ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकाद्वारे नव्या धाटणीची संगीतिका मराठी रंगभूमीला मिळाली. पारंपरिक संगीत नाटकापेक्षा वेगळा आणि आधुनिक संगीत-नाटय़ानुभव प्रेक्षकांना मिळाला. पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकात संगीत नाटकाची नवी व्याख्या मांडली गेली. ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’नं केवळ नाटके केली नाहीत तर नाटकाची पारंपरिक चौकट मोडणारे, रंगभूमीला नवे आयाम देणारे प्रयोग केले. या प्रयोगातूनच नाटक आणि नाटय़ चळवळ बळकट झाली. या संस्थेतून डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, मोहन गोखले, नंदू पोळ, प्रसाद पुरंदरे, श्रीरंग गोडबोले, माधुरी पुरंदरे, आनंद मोडक, समर नखाते, अतुल पेठे असे रंगकर्मी मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीला लाभले. थिएटर अ‍ॅकॅडमीचं वैशिष्टय़ म्हणजे संस्थेतील कलावंतांचा संच हरहुन्नरी होता. एकाच वेळी संस्थेत अभिनेते, गायक, संगीतकार, लेखक, दिग्दर्शक, पडद्यामागील कलाकार होते. प्रत्येकाकडे संयोजन कौशल्य होतं. या सगळ्यामुळे संस्थेला कोणतेही आव्हान पेलताना कोणताही विचार करावा लागला नाही.

काळाची पावले ओळखून संस्था आता नाटक आणि सकळ ललित कलांचा साकल्याने विचार करत आहे. व्होडाफोनच्या सहकार्याने ‘रंगसंगीत’ या संगीत एकांकिका स्पर्धेपासून त्याची सुरुवात झाली.

संस्थेचा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘सकळ ललित कला संकुल’. भारतात एवढी वष्रे नाटय़संस्था आणि नाटकांचा इतिहास सांगितला जातो. मात्र एकाही संस्थेचे स्वत:चे नाटय़गृह नाही. ही उणीव भरून काढण्याचं काम ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ करत आहे.

महाराष्ट्रीय मंडळ संस्थेच्या सहकार्याने मुकुंदनगर येथे संस्थेचे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ललित कला संकुल साकारत आहे. या प्रकल्पाला ज्येष्ठ उद्योगपती शंतनुराव किलरेस्कर यांचे नातू पार्थ अमीन आणि गोपाळ अमीन यांनी प्राथमिक टप्प्याच्या कामासाठी अर्थसाहय़ केले आहे. एकूण सात कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता ९५ टक्के पूर्ण झाले आहे. यात नाटकांच्या सादरीकरणासाठी नाटय़गृह, रंगीत तालमीसाठी सभागृह, विविध कलांच्या आविष्कारासाठी खुला मंच, चित्र-छायाचित्र आणि शिल्पकलेच्या प्रदर्शनांसाठी कलादालन साकारण्यात येणार आहे.

सकळ ललित कला संकुल

केवळ महत्त्वाची नाटके रंगभूमीवर आणण्यापुरतेच ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ संस्थेचे काम मर्यादित नाही. काळाची पावले ओळखून संस्था आता नाटक आणि सकल ललित कलांचा साकल्याने विचार करत आहे. व्होडाफोनच्या सहकार्याने ‘रंगसंगीत’ या संगीत एकांकिका स्पर्धेपासून त्याची सुरुवात झाली. खरे तर संगीत नाटक हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मराठी संगीत रंगभूमीला मरगळ आली. ‘तीन पैशांचा तमाशा’नंतर नव्या धाटणीचे संगीत नाटक रंगभूमीला मिळालेच नाही. ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि नव्या काळाची, आजच्या तरुणाईची भाषा बोलणारी संगीत नाटके घडण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. अवघ्या महाराष्ट्रातून या स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद मिळू लागला.

संस्थेपर्यंत कसे जाल?

सकळ ललित कला संकुल महाराष्ट्रीय मंडळाचे शेठ दगडूराम कटारिया हायस्कूल, टिळक महाराष्ट्र विद्यापीठासमोर, मुकुंदनगर, पुणे.

धनादेश महाराष्ट्रीय मंडळ

(MAHARASHTRIYA MANDAL) या नावाने काढावेत. धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

देणगी ‘८०-जी’ अंतर्गत करसवलतीस पात्र.

यासाठी मदतीची गरज

शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांवर साहित्य, नाटय़, संगीत, नृत्य, चित्र आणि शिल्प अशा सकल कलांचे संस्कार केले तरच भावी पिढीचे सर्जनशील कलाकार घडविता येतील या उद्देशातून ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’तर्फे सकळ ललित कला संकुल साकारले जात आहे. या संकुलाच्या उर्वरित कामासाठी अर्थसाहय़ हवे आहे.

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ – २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००

विद्याधर कुलकर्णी