समाजातील वंचितांसाठी, गरजूंसाठी काम करणाऱ्या.. संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या.. रुग्णसेवेसाठी झोकून देणाऱ्या.. वाचन संस्कृती वाढावी यासाठी पदरमोड करून दुर्मीळ साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या.. आबालवृद्धांच्या स्वास्थ्यासाठी झटणाऱ्या.. मुक्या बिचाऱ्या प्राण्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी राबणाऱ्या.. अशा कितीतरी नानाविध संस्थांची ओळख सर्वकार्येषु सर्वदाया उपक्रमातून राज्यभरातील वाचकांना करून देण्यात आली. अनेक संस्थांवर समाजातील दानशूरांवर अक्षरश मदतीचा वर्षांव झाला. त्यापैकी काही निवडक संस्थांनी मिळालेल्या आर्थिक मदतीचा विनियोग नेमका कसा केला, त्याचा हा आढावा..

 maxresdefault

 

लवकरच वृद्धाश्रमाची उभारणी

आधाराश्रम, नाशिक

नाशिक व उत्तर महाराष्ट्रापर्यंत सीमित असणाऱ्या ‘आधाराश्रम’च्या कामाची महाराष्ट्रासह देशातील अनेक भागाला ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमामुळे ओळख झाली. या उपक्रमातून संस्थेला ३५ लाख, ७० हजार रुपये देणगी रूपात मिळाले. विशेष म्हणजे या उपक्रमाच्या दिवसात संस्थेला मदत मिळालीच, शिवाय नंतरच्या काळातही कित्येक दिवस देणग्या प्राप्त झाल्या. इतकेच नव्हे, तर गतवर्षी सिंहस्थानिमित्त आलेल्या अनेकांनी आधाराश्रमाला आवर्जून भेट देऊन निराधार बालकांसाठी चाललेल्या कामाची माहिती घेतली. या उपक्रमात माहिती वाचून आजही वाचक व देणगीदार संस्थेत येत असतात. त्यातील काही मूळचे नाशिकमधील होते. मात्र कामानिमित्त मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्यास गेलेले. या उपक्रमामुळे शहराशी तुटलेली नाळ पुन्हा जोडली गेल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आश्रमाचे संस्थापक कै. अण्णाशास्त्री दातार यांनी अनाथ बालकांबरोबर भविष्यकाळात वृद्धांचा सांभाळ करणे ही काळाची गरज असेल असे म्हटले होते.  गतवर्षी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संस्थेस भेट दिली. तेव्हा वृद्धाश्रमाचा मानस त्यांच्यासमोर मांडण्यात आला. त्यासाठी नाशिक परिसरातच जागेचा शोध घेणे सुरू आहे. मुंडे यांनीही त्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच अशी जागा उपलब्ध झाल्यास आधाराश्रम संचालित वृद्धाश्रमदेखील सुरू होईल. ‘सर्वकार्येषु..’ उपक्रमामुळे आधाराश्रम सर्वत्र पोहोचले आणि योग्य ठिकाणी आम्ही मदत केली, अशी समाधान व्यक्त करणारी अनेक पत्रेदेखील संस्थेला आली. देणगीदार व प्रामाणिक काम करणाऱ्या संस्था यांचा सेतू बांधण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले असल्याचे संस्थेच्या कार्यवाह सुनीता परांजपे यांनी नमूद केले.

 

जुन्या वाहनांची दुरुस्ती

प्रबोधिनी ट्रस्ट, नाशिक

मानसिक अपंगांच्या विकासासाठी काम करणाऱ्या नाशिक येथील ‘प्रबोधिनी ट्रस्ट’ संस्थेला ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून मिळालेल्या देणगीमुळे अनेक प्रश्नांची सोडवणूक करता आली. संस्थेला २१ लाख रुपये देणगीरूपात मिळाले. मानसिक अपंग विद्यार्थ्यांची शाळा आणि कार्यशाळा चालविणाऱ्या संस्थेत १०० शिक्षक व कर्मचारी काम करतात. त्यातील निम्म्या म्हणजे ५० जणांचे वेतन शासनाकडून मिळते. उर्वरित ५० जणांचे मानधन संस्थेला द्यावे लागते. अतिशय कमी मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे देणगीमुळे शक्य झाले. एकूण रकमेतील १५ लाखाची रक्कम संस्थेने ठेव स्वरूपात ठेवली. तसेच उर्वरित रक्कम संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी उपयोगी आणली. मानसिक अपंग विद्यार्थ्यांना दररोज ने-आण करणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेने बस आणि अन्य चार अशी एकूण पाच वाहनांची व्यवस्था केली आहे. हा खर्च अपरिहार्य आहे. त्यासाठी दरमहा दोन लाखाची तरतूद करावी लागते. या उपक्रमातंर्गत मिळालेल्या देणगीतून विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या जुन्या वाहनांची दुरुस्ती करण्यात आली.  मुंबईतील एका महिला देणगीदाराने आपल्या नावावरील सदनिका आपल्या मृत्यूपश्चात संस्थेला दिली आहे. या महिलेचा मुलगा मानसिक अपंग होता. त्याचेही निधन झाले आहे. अनेकांनी संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन काम पाहिले. त्यात वाशीतील एका नवरात्रोत्सव मंडळाचाही समावेश होता. त्यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला. हे सर्व दृष्टिपथास आले, ते केवळ ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळे, अशी भावना ट्रस्टचे सचिव डॉ. दिलीप भगत, उपसचिव शलाका पंडित यांनी व्यक्त केली.

 

१०० मुलींसाठी वसतिगृह

‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या दानयज्ञाच्या चौथ्या पर्वात मिळालेल्या २३ लाखांच्या देणगीतून वंचितांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या वरोरा येथील विद्यार्थी सहाय्यक समितीने हिंगणघाट येथे दोन एकर जमिनीची खरेदी केली असून तेथे शंभर मुलींचे वसतिगृह उभारले जात आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळेच हे सहज शक्य झाले आणि या संस्थेची नाळ असंख्य दानशूर व राज्यभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत संस्थांशी जुळल्या आहेत. वरोरा येथील विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकरराव उपलेंचवार यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना २३ लाखांच्या देणगीतून संस्थेच्या विकासकार्याला कशा प्रकारे गती मिळाली, याची माहिती दिली. वंचितांसाठी कार्य करणाऱ्या या संस्थेचे वरोरा येथे ज्ञानदा वसतिगृह, तर हिंगणघाट येथेही मुलांचे वसतिगृह आहे. मात्र, या संस्थेचे आजवर मुलींचे वसतिगृह नव्हते. मुलींच्या वसतिगृहाची उभारणी करू शकलो नाही, ही खंत होती; परंतु ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळेच शंभर मुलींच्या वसतिगृहाचे स्वप्न पूर्णत्वाला येत आहे, कारण वसतिगृह बांधकामासाठी सर्वात पहिले जमीन आणि पुरेसा निधी हवा; परंतु संस्थेकडे या दोन्ही गोष्टी नव्हत्या. त्याच दरम्यान ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून संस्थेविषयीची माहिती ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध होताच या संस्थेला २३ लाखांची देणगी या दानयज्ञाच्या माध्यमातून मिळाली. यातून मुलींसाठीचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला; परंतु त्यासाठी सोयीची जमीन नव्हती. जागेचा शोध सुरू असतानाच हिंगणघाट येथील गोएंका या दानशूर कुटुंबाने निम्म्या किमतीत हिंगणघाट-नागरी रस्त्यावर मोक्याची २ एकर जागा उपलब्ध करून दिली. जागा मिळाल्यावर मुलींच्या वसतिगृह निर्मितीच्या कामाला लागलेलो असतानाच ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या उपक्रमातून संस्थेची राज्यात आणि देशपातळीवर ओळख झाल्याने मुंबईच्या ‘केअरिंग फ्रेन्ड्स’ या संस्थेने १ कोटीची देणगी देण्याचे जाहीर केले.त्यामुळे मुलींच्या वसतिगृहाचा मार्ग सुकर झाला. हे वसतिगृह प्रस्तावित असलेल्या जागी रस्ते, वीज आणि इतर सर्व सोयीसुविधांची कामे पूर्ण झाली असून लवकरच बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहितीही उपलेंचवार यांनी दिली.

 

ग्राम ज्ञानपीठाचे बांधकाम

संपूर्ण बांबू केंद्र, मेळघाट

शहरे हायटेक होत असताना मेळघाटसारखा दुर्गम भाग गुरुकुल संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. ग्रामज्ञानपीठ हे त्या गुरुकुलाचेच अत्याधुनिक रूप आणि या रूपातून प्राचीन कला जपण्याचा प्रयत्न केला जात आहे तो अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाटच्या धारणी तालुक्यातील ‘कोठा’ या गावात!  ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात नि:स्वार्थपणे, स्वबळावर, कुणापुढेही हात न पसरता काम करणाऱ्या संस्थांसाठी आवाहन केले. पहिल्याच वर्षी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद वाचकांकडून मिळाला. मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवादा येथील ‘संपूर्ण बांबू केंद्रा’ला तब्बल सात लाखांचा निधी प्राप्त झाला. बांबूपासून सुरू झालेल्या या केंद्राचे कार्य भारतीय जीवनशैलीचे अध्ययन आणि अध्यापनापर्यंत जाऊन पोहोचले. संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील देशपांडे यांनी ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या उपक्रमातून मिळालेल्या सात लाखांच्या निधीतून ग्रामज्ञानपीठाचे स्वप्न पाहिले. वास्तविक या सात लाख रुपयांत ग्रामज्ञानपीठाचा पायाही रचला गेला नसता, पण स्वप्नांना पूर्ण करण्याची वाट या निधीने दाखवली. गुरुकुलावर आधारित परंपरागत कारागीर शिक्षण व्यवस्था, भारतीय पद्धतीचे संग्रहण करणारे संग्रहालय, भारतीय व्यवस्थेला गतिशील राखणाऱ्या आचार्याची निर्मिती, समाजाधारित विपणन व्यवस्था, लोककला व संस्कृतिदर्शन असे बरेच काही या ग्रामज्ञानपीठात आहे. यातून कारागीर आणि त्यांची कला यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. अलीकडेच जानेवारी २०१६ मध्ये वसंतपंचमीला या ग्रामज्ञानपीठाचे लोकार्पण करण्यात आले. आठ एकरांच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या ग्रामज्ञानपीठात लोखंड, पितळ, काष्ठ, बांबू, माती, चर्म, विणकर, कृषी व लोककला असे नऊ गुरुकुल आहेत. सर्व काही जुने, पण शैली मात्र नवीन! असा या गुरुकुलात शिकवल्या जाणाऱ्या कलांचा प्रकार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या निधीतून ग्रामज्ञानपीठाचा पाया तयार झाला आणि नंतर बाकी सारे काही आपोआप जुळत केले. ग्रामज्ञानपीठाची संपूर्ण संकल्पना आंध्र प्रदेशातील आदिलाबादच्या कलाश्रमाचे रवींद्र शर्मा यांची आहे. नैसर्गिक स्रोतांच्या आधारावर कारागिरांनी जे ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान हजारो वर्षांपासून जपले आहे, त्याचे संरक्षण व संवर्धन यातून केले जात आहे.

 

संस्थेच्या विस्ताराची मुहूर्तमेढ!

माऊली सेवा संस्था, अहमदनगर

बेवारस मनोरुग्ण महिलांसाठी कार्यरत असलेल्या नगर येथील माउली सेवा संस्थेच्या इंद्रधनू प्रकल्पाचा व्याप आता खूपच वाढला आहे. डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुजाता धामणे या दांपत्याने ही संस्था केवळ स्थापन केली असे नाही तर,  त्यासाठी सर्वस्व झोकून दिले आहे. संस्थेचा विस्तार होताना या प्रवासात ‘लोकसत्ता’चा मोठा हातभार लाभला, असे डॉ. राजेंद्र धामणे यांनी सांगितले. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळेच संस्थेचा विस्तार शक्य झाला, असे ते म्हणाले. रस्यावर फिरणाऱ्या बेवारस मनोरुग्णांची अवस्था सगळीकडेच अत्यंत दयनीय आहे. भटक्या प्राण्यांपेक्षा वाईट दिवस ते कंठतात. त्यातही अशा महिलांच्या समस्येला पारावार नाही. ते लक्षात घेऊनच धामणे दांपत्याने बेवारस मनोरुग्ण महिलांची सुरुवातीला सुश्रूषा आणि जेवणाची व्यवस्था सुरू केली. त्यातूनच माउली सेवा संस्था आणि इंद्रधनू प्रकल्प आकाराला आला. अशा महिलांचे हे आता हक्काचे घर बनले आहे. संस्थेच्या या निवासी प्रकल्पात सध्या तब्बल दीडशे महिला आश्रयाला आहेत. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पातून अनेक महिला पूर्ण तंदुरुस्त होऊन आपापल्या घरीही गेल्या आहेत. अपत्ये संभाळत नाही, अशा या रुग्णांना धामणे दांपत्याने आपलेसे केले आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या सन २०१४ च्या चौथ्या पर्वात माउली सेवा संस्थेचा सहभाग होता. डॉ. धामणे यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रासह देशभर संस्थेची माहिती व कार्य पोहोचले, त्यातून अनेक माणसं संस्थेशी जोडली गेली आणि महत्वाचे म्हणजे यातून संस्थेला प्रथमच भरभक्कम आर्थिक सहयोग प्राप्त झाला.

 

वाचन, अभ्यासासाठी स्वतंत्र व्यवस्था

खरे वाचन मंदिर, मिरज

मिरज विद्यार्थी संघामार्फत मिरज शहरात चालविण्यात येत असलेल्या खरे वाचन मंदिराची शतकाकडे वाटचाल सुरू असताना ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’च्या माध्यमातून वाचकांना परिचय करून दिला. यामुळे वाचकांनी या ज्ञानयज्ञाला भरभरून मदत केली. या मदतीतून वाचन मंदिराच्या काही मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास हातभार लागला. संस्थेकडील दुर्मीळ वाङ्मयाच्या जतनाचे काम करण्यात आले. या निधीतून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तके आणि स्वतंत्र कक्षही निर्माण करण्यात आला आहे. याशिवाय विविध विषयांमध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांना संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासिकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभ्यासिकेचे पूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे.

 

रंगमंदिर उभारणी

गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर

‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ या उपक्रमाच्या पहिल्याच वर्षी गायन समाज देवल क्लबचा समावेश झाला. डॉ. के. एस. देसाई यांनी ५ लाखांचा निधी दिला. याशिवाय आणखीन ३६ हजार रुपये उपलब्ध झाले. तेव्हा आम्ही शिक्षण व सांस्कृतिक उपक्रमासाठी संकुल उभारण्याचा विचार करीत होतो. त्यासाठी ‘लोकसत्ता’कडून मिळालेली ही मदत मोलाची ठरली. या निधीतून मिळालेल्या मदतीने आम्ही काम सुरू केले. पुढे ते पूर्ण करण्यासाठी आणखी सव्वाकोटींचा निधी संकलित झाला. त्यातून गोिवदराव टेंबे रंगमंदिराचे बांधकाम पूर्ण करू शकलो. रंगमंदिर उभारणीसाठी टेंबे यांच्या नातीने ५० लाख, शासकीय निधी व लोकसहभाग अशी निधीची गंगा वाहू लागली. येथे आता संगीत, नृत्य, नाटय़ यांचे शिक्षण ते सादरीकरणापर्यंतचे कार्य होऊ लागले आहे. अजूनही काही कामे अपूर्ण असून ती लवकरच पूर्ण होतील. पण कलानगरी करवीरमधील गायन समाज देवल क्लबच्या रंगमंदिर उभारणीला ‘सर्वकाय्रेषु’ उपक्रमातून मिळालेली मदत ही पायाचा दगड बनली आहे.

 

२५ खाटांचे रुग्णालय सुरु

स्नेहालय, अहमदनगर

‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या पहिल्याच वर्षी २०११ मध्ये स्नेहालय संस्थेची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. १९८९ पासून वेश्या, त्यांची मुले, एचआयव्ही एड्सबाधीत, झोपडपट्टीतील आणि इतर विशेष गरजयुक्त बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत स्नेहालयचे कार्य नगरमधून सुरू झाले. आता पुणे, सिंधुदुर्ग, सांगली व कर्नाटकातील बेळगाव या जिल्ह्य़ांमध्ये विविध १७ सेवा प्रकल्प विस्तारले आहे.

स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, १९९२ मध्ये एड्स बाधितांसाठी भारतातील पहिला निवासी उपचार व पुनर्वसनाचा प्रकल्प लोकसहभागातून स्नेहालयने सुरू केला. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे संस्थेची माहिती सर्वदूर पोहोचली. या उपक्रमाद्वारे लोकांनी संस्थेच्या कार्यासाठी मोठा आर्थिक सहयोग दिला. संस्था सुरू झाली त्यावेळी एचआयव्ही एड्स बाधितांच्या वैद्यकीय उपचारांचा प्रश्न गंभीर झाला होता. महाराष्ट्र व इतर ठिकाणचे रुग्णही मोठय़ा संख्येने संस्थेत उपचारांसाठी येऊ लागले होते. डॉ. सुहास घुले, डॉ. नीलेश परजणे व डॉ. संजीव गडगे यांच्या सहयोगामुळे वैद्यकीय उपचार दिले जात होते. परंतु रुग्णांसाठी पॅथॉलॉजी लॅब, दर्जेदार खाटा, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, इतर रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध नव्हते. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील निधीतून प्राधान्याने ही यंत्रणा उभी करता आली.  या निधीतून संस्थेने २५ खाटांचे रुग्णालयच सुरू केले. याच समाजगटासाठी सध्या ७० खाटांचे सुसज्ज ‘केअरिंग फ्रेंड्स’ रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्यात आहे. निधीतील निम्मी रक्कम नगर तालुक्यातील इसळक येथील हिंमतग्राम या एड्सबाधितांच्या निवासी संकुलाच्या बांधकामासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या प्रकल्पाचे लोकार्पण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाले. येथे ३०० चौरस फुटांच्या तीन घरांची उभारणी करता आली, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

 

विज्ञानप्रयोगांना चालना

विज्ञानग्राम, सोलापूर

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून सोलापूर जिल्ह्य़ातील मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील ज्येष्ठ वैज्ञानिक अरुण देशपांडे यांच्या विज्ञानग्रामाच्या सेवाकार्यावर प्रकाश टाकला जाताच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या माध्यमातून सहा लाख १५ हजारांची मदत संस्थेस मिळाली. यातून विज्ञानग्रामला विविध पाच प्रकल्प हाती मार्गी लावता आले. दुष्काळाच्या संकटात मुक्या जनावरांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक्स आधारकार्डे’ तयार केली गेली. लगतच्या मंगळवेढय़ातील विज्ञानवीर शेतकरी वैभव मोडक यांच्या ‘कॉम्प्यॅक्ट ऑर्गनिक फर्टिलायझर’ प्रकल्पाची पूर्तता झाली. बहुउद्देशीय ‘बुल्क गियर चरखा’ तयार करून त्यावर दहा प्रकारची यंत्रे बसविण्यात आली आहेत. जनसाक्षरता आणि ऊर्जा साक्षरता प्रदर्शनाची आखणी होऊन त्यातून काही प्रयोग सिद्ध झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने अंकोलीच्या विज्ञानग्रामला ज्ञान पर्यटन केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

 

प्राचीन कागदपत्रांच्या जतनास चालना

समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे

जुनी कागदपत्रे, ग्रंथ, हस्तलिखिते, पोथ्या यांचा संग्रह आणि संशोधनाचे कार्य करणारी संस्था म्हणून धुळय़ाच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिराची सर्वत्र ओळख आहे. लाखो जुनी हस्तलिखिते, हजारो पुस्तके, पोथ्या सध्या संस्थेच्या संग्रहात आहेत. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून संस्थेस ११ लाखांहून अधिक मदतनिधी उपलब्ध झाला. या निधीतून या सर्व प्राचीन वाङ्मयाच्या जतनाचे काम सुरू झाले आहे. या कागदपत्रांचे अंकीकरण (डिजिटायजेशन), वर्गीकरण, देवनागरीकरण, त्यासाठी चांगली व्यवस्था उभी करण्याचे काम सुरू झाले आहे. या संस्थेच्या ‘वाल्मिकी रामायण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या संशोधन आणि प्रकाशनास या निधीमुळे मोठी चालना मिळाली आहे. या निधीतून संस्थेसाठी एक उपयुक्त संदर्भ ग्रंथालय उभे करण्यात आले आहे. श्री समर्थ आणि शिवराय संदर्भ कोशाचे कामही सुरू करण्यात आले आहे.

 

निराधारांना कायमचा निवारा

जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग

मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कणकवलीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर पणदूर येथे कार्यरत असलेल्या जीवन आनंद या संस्थेच्या संविता आश्रमामध्ये वृद्ध, मतिमंद, मनोरुग्ण, अपंग इत्यादी विविध प्रकारच्या निराधार स्त्री-पुरुष आणि लहान मुलांची मोफत भोजन-निवासासह सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. यापैकी कुणाचेही जवळचे नातेवाईक नसल्यामुळे वैद्यकीय उपचारांसह अन्य प्रासंगिक खर्चाचा भारही संस्थेतर्फे उचलला जातो. संस्थेचे सचिव संदीप परब आणि त्यांचे कार्यकर्ते कोणत्याही सरकारी मदत किंवा अनुदानाशिवाय ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. या सर्व निराधारांची गेल्या वर्षांपर्यंत केवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली होती. पण ती अजिबात पुरेशी नव्हती. या व्यक्तींच्या वेगवेगळ्या गरजांनुसार आवश्यक सुविधा असलेली स्वतंत्र वास्तू उभारण्याची गरज होती. त्या दृष्टीने नियोजन करून बांधकामाला सुरुवातही झाली होती. या प्रस्तावित वास्तूसाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज होती. संस्थेचे प्रवर्तक संदीप परब यांच्यासह सर्व कार्यकर्ते त्या दृष्टीने प्रयत्नशील होते. त्यासाठी वस्तूरूप किंवा रोख रकमेच्या स्वरूपातही संस्थेतर्फे देणग्या स्वीकारल्या जातात. पण मिळालेल्या देणग्यांमधून संस्थेचा दरमहा सुमारे तीन लाख रुपये खर्च भागवल्यानंतर या वास्तूच्या बांधकामासाठी फारसा निधी शिल्लक राहत नव्हता. त्यामुळे स्लॅब आणि खांब वगळता सर्व बांधकाम रखडले होते. शिवाय, सध्या संस्थेत असलेल्या निराधारांच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादीतील गरजूंची संख्या आहे.या पाश्र्वभूमीवर ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या मालिकेत गेल्या वर्षी संस्थेच्या कार्याला प्रसिद्धी दिल्यानंतर अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. पालघर, मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्य़ांमधून गरजू निराधारांना आश्रयासाठी काहीजणांनी संपर्क साधला.या देणग्यांची एकूण रक्कम सुमारे ३८ लाख रुपयांवर गेली. त्यामुळे परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधकाम वेगाने पूर्ण करण्याच्या कामाला हात घातला. गेल्या वर्षभरात तळमजला सर्व सुविधांसह बांधून पूर्ण झाला असून संस्थेतील ६८ जणांपैकी ४४ जणांची तेथे सर्व सुविधांसह व्यवस्था झाली आहे.

 

विविध योजना कार्यान्वित

स्नेहज्योती अंध विद्यालय, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्य़ातील मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय ही कोकणातील अंध मुला-मुलींसाठी निवासी व्यवस्था असलेली एकमेव शाळा. आशा कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या भगिनींनी  वयाची साठी जवळ आली असताना यशस्नेहा ट्रस्टच्या माध्यमातून चौदा वर्षांपूर्वी मोठय़ा जिद्दीने या शाळेची स्थापना केली. कोकणच्या निरनिराळ्या भागातील ५ ते १८ वयोगटातील ३० मुले-मुली येथे राहून शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिकवणारे शिक्षक बाहेरगावाहून येथे आलेले आहेत. त्यांच्या निवासाची स्वतंत्र सोय नसल्यामुळे सध्या ते विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातच राहत आहेत. त्यांच्या स्वतंत्र निवासाची सोय करण्याचीही गरज आहे. पण शाळा पूर्णपणे विनाअनुदान तत्त्वावर चालवली जात असल्यामुळे दरमहा सुमारे दीड लाख रुपयांच्या खर्चाची तोंडमिळवणी करतानाच या भगिनींची खूप धावपळ होते. प्रसंगी पदरमोड करून खर्च भागवावे लागतात. २०१४ मध्ये ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याची माहिती लोकांसमोर मांडली गेली. त्यानंतर मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला. राज्याच्या विविध भागांमधून संस्थेला सुमारे ३८ लाख रुपये देणगीस्वरूपात मिळाले. त्यामुळे शाळेची पैशाविना अडून राहिलेली सध्याच्या तात्पुरत्या वसतिगृहाची तातडीची दुरुस्ती, रंगरंगोटी, कार्यालयाचं नूतनीकरण अशी अनेक छोटी-मोठी कामं पूर्ण करणं शक्य झालं. याशिवाय तीन कायमस्वरूपी उपयुक्त कामांची आखणी करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे शाळेच्या व वसतिगृहाच्या विविध गरजांसाठी पाण्याचा पुरवठा. शाळेजवळच्या मोकळ्या जागेतून बारमाही पाण्याचा ओढा वाहतो. या ठिकाणी बंधारा घालून पाणी अडवलं तर वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग होईल आणि शाळेचाही पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल, हे लक्षात घेऊन या ओढय़ावर काळ्या दगडाचा भक्कम बंधारा बांधण्यात आला आहे. शाळेच्या मुलांना कुठेही कार्यक्रम किंवा उपक्रमांसाठी सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी संस्थेचं स्वत:चं वाहन गरजेचं होतं. देणग्यांमधूून या मुलांच्या प्रवासासाठी संस्थेतर्फे बोलेरो गाडी खरेदी करण्यात आली आहे.  तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे, शिक्षकांसाठी निवासव्यवस्था. त्यादृष्टीने दोन डबल रूम आणि एक हॉल बांधण्याचं नियोजन करण्यात आलं असून येत्या वर्षभरात तेही पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

 

अमूल्य कलाकृतींना आश्रय

केकी मूस कलादालन, चाळीसगाव

कलेच्या विश्वात केकी मूस हे नाव खूप आदराने घेतले जाते. आयुष्यभर चित्र, शिल्प, काष्ठ, छायाचित्रण, ओरिगामी अशा विविध कलांसाठी जगलेल्या या कलामहर्षीच्या कलाकृतींचे जतन त्यांच्याच चाळीसगाव येथील बंगल्यात करत त्याचे कलादालनात रूपांतर केले आहे. परंतु शंभर वर्षे जुनी असलेली ही इमारत पूर्णपणे थकली होती. यामुळे या वास्तूत जतन केलेल्या या कलाकृतीही धोक्यात आल्या होत्या. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून संस्थेस साडेपाच लाखांहून अधिक मदतनिधी उपलब्ध झाला. या निधीतून मोडकळीस आलेल्या इमारतीची प्रामुख्याने दुरुस्ती करण्यात आली. सर्व कलाकृतींना फ्रेम करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेची कथा आणि व्यथा दोन्हीही समाजापुढे आल्याने त्या ओढीने आजही देशभरातून अनेक जण चाळीसगावला येऊन संस्थेला भेट देत आहेत.

 

रक्कम अनामत ठेवून विनियोग

इन्फंट इंडिया, बीड

बीड शहरापासून जवळ असणाऱ्या इन्फंट इंडियामध्ये आता ५४ एचआयव्हीग्रस्त एकत्रित राहतात. दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी सुरू केलेली ही संस्था या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. ‘सर्व कार्येषु सर्वदा’मधून या संस्थेचा परिचय दिल्यानंतर हजारो जणांनी मदतीचा हात पुढे केला. भरघोस मदत झाल्यानंतर मिळालेली रक्कम अनामत म्हणून बँकेत ठेवण्यात आली. त्याच्या व्याजावर दर महिन्याचा किराणा आणि औषधांचा खर्च केला जातो. या मदतीमुळे मोठी समस्या दूर झाली आहे. एचआयव्हीग्रस्तांसाठी औषधांवरही अधिक पैसे खर्च करावे लागतात. औषध आणि किराणा यावर होणारा खर्च ‘लोकसत्ता’मुळे अधिक सुकर झाल्याचे दत्ता बारगजे आवर्जून सांगतात.

 

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च

मानव्य, भूगाव

एचआयव्हीबाधित मुलांच्या सर्वागीण पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या मानव्य संस्थेने ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमांतर्गत मिळालेल्या निधीपैकी काही रक्कम राखून ठेवली आहे. संस्थेतील दहावी उत्तीर्ण झालेली २० मुले कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट आणि विज्ञानाश्रम येथे पुढील शिक्षण घेत असून त्यांचा प्रत्येकी वार्षिक खर्च २० हजार रुपये आहे. त्यासाठी निधी उपयोगात आणला जात आहे. संस्थेने जीप या वाहनाच्या खरेदीसाठी काही रक्कम वापरली आहे. हॉस्पिटलच्या बांधकामासाठी काही निधी वापरला आहे. संस्थेला देणगी मिळालेल्या सौरदिव्यांच्या बॅटरी बदलण्याबरोबरच देखभाल आणि दुरुस्तीसाठी निधीचा उपयोग होत आहे, अशी माहिती मानव्य संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी दिली.

 

संगीत अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची निर्मिती

पुणे भारत गायन समाज

अभिजात संगीताचे जतन आणि संवर्धन यासाठी गेल्या शतकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या पुणे भारत गायन समाज या संस्थेने शास्त्रीय संगीताचे जतन करण्यासाठीच ‘सर्व कार्येषु सर्वदा’अंतर्गत मिळालेल्या निधीचा विनियोग केला आहे. विद्यार्थ्यांना संगीत शिकविण्यासाठी मा. कृष्णराव पद्धतीने संगीताचे स्वरलेखन (नोटेशन) असलेली पुस्तके यापूर्वी वापरली जात होती. हे संगीताचे ज्ञान संपादन करणे विद्यार्थ्यांना अवघड जात असल्याने संस्थेने भातखंडे पद्धतीने स्वरलेखन असलेली संगीत अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची निर्मिती करण्यासाठी ७५ हजार रुपयांचा निधी उपयोगात आणला. त्याचप्रमाणे या अभ्यासक्रमाच्या डीव्हीडी निर्मितीसाठी १ लाख ९० हजार रुपये खर्च आला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध गायिका शैला दातार यांनी दिली.