एके दिवशी

हजारो लोक उतरूनही

रस्त्यांवरली भयाण शांतता ऐकून

मनात कुठलीशी चिडीचुप्प चाहूल

फिरून गेली

 

त्यांच्या हातात मेणबत्त्या नव्हत्या

नव्हती शस्त्रही कुठलीच

शिस्तबद्ध होते सारे निहत्ते

ओठ शिवून मुक्यासारखे

 

एखादी लांबलचक मालगाडी

रेल्वेट्रॅकवरून जाताना संपूच नये

डोळ्यांसमोरून

तसा हा मोर्चा

 

मालगाडय़ांच्या डब्यांमध्ये निदान

तेल, पेट्रोल, लोखंड अशा वस्तू

असतात अनेक

या मोर्चात

नक्की काय भरलं होतं

कळत नव्हतं

आपण काय वाहातो आहोत आपल्यातून

हेही कळलं नसावं

त्यातल्या काहींना

 

आता होईल

नंतर होईल काहीतरी म्हणत

वाट पाहात होती गर्दी

रस्त्याच्या दुतर्फा जमलेली

 

पण काहीच घडलं नाही

नाकासमोर पाहात शांतपणे

नुस्तीच

निघून गेली लाखो पावलं

 

तेव्हा

रस्तेही बावचळले

तिथल्या तिथे थांबून

सैरभैर पाहात राहिले

 

एक बुजुर्ग रस्ता म्हणाला,

‘इतक्याच शांतपणे

खूप वर्षांपूर्वी माझ्यावरून

निघून गेले होते गांधी

 

ते निघून गेल्यावर पण

माझ्यावर उगवली होती भरघोस

फुलं देशाभिमानाची

स्वतंत्र

 

आज मात्र

कुणास ठाऊक का

खूप जड जड वाटतं आहे..’

 

सौमित्र