गुरुत्वीय लहरींच्या शोधाला यंदाच्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला, आइनस्टाइनने शतकापूर्वी या लहरी विश्वात असण्याचे भाकीत केले होते ते २०१५ मध्ये लायगोच्या प्रयोगात खरे ठरले. गुरुत्वीय लहरींच्या आंतरराष्ट्रीय संशोधनात लायगो इंडिया अंतर्गत मोठे काम झाले, त्याआधीपासून या क्षेत्रात पायाभूत कामगिरी करणारे आयुकातील वैज्ञानिक व प्राध्यापक डॉ. संजीव धुरंधर  यांनी कथन केलेला गुरुत्वीय लहरी संशोधनाचा प्रवास.

आपण जमिनीवर आहोत तेच गुरुत्वामुळे त्यामुळे गुरुत्वापासून सुटका नाही. गुरुत्वीय लहरींचा शोध हा निश्चितच नोबेल पारितोषिक मिळण्याइतका महत्त्वाचा होता यात शंकाच नाही. शतकातील पहिल्या दहा शोधांच्या यादीत किंबहुना पहिल्या दोन शोधांमध्ये त्याचा समावेश आहे. गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात केवळ गुरुत्वीय लहरींच्या शोधाचाच समावेश नाही तर यात कृष्णविवरे, द्वैती कृष्णविवरे यांचाही थेट शोध घेण्यात यश आले आहे म्हणजेही थ्री इन वन अशी परिस्थिती आहे. या शोधाने खगोल भौतिकीचे जग बदलून जाणार आहे. विश्वाचा वेध घेण्यासाठीची एक नवी खिडकी यातून खुली झाली आहे. अलीकडेच तीन गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांनी गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व पुन्हा एकदा अधिक अचूकतेने टिपले असतानाच या संशोधनाला नोबेल जाहीर झाले आहे. आइनस्टाइनने विश्वात गुरुत्वीय लहरी आहेत असे पहिल्यांदा सांगितले होते ते गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे खरे ठरले. २०१५मध्ये लायगो म्हणजे गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांच्या मदतीने या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व पहिल्यांदा टिपले होते.

आताच्या गुरुत्वीय लहरी संशोधनाच्या प्रकल्पात खरे तर अनेक देशांच्या संशोधकांचा समावेश होता. हे खरे असले तरी ज्या तिघांना नोबेल मिळाले आहे त्यांनी १९७० पासून या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले आहे. ४० ते ५० वर्षे त्यांनी यात काम केले आहे. १९९१ मध्ये मी व सत्यप्रकाश मिळून गुरुत्वीय लहरींसंदर्भात एक शोधनिबंध लिहिला होता त्यात आम्ही गुरुत्वीय लहरी सापडतील याबाबत अधिक स्पष्टपणे मत व्यक्त केले होते. त्याआधीच्या काळात म्हणजे १९८९ मध्ये मी गुरुत्वीय लहरी शोधक यंत्र भारतात बसवण्याचा प्रस्ताव विज्ञान व तंत्रज्ञाान खात्याकडे मांडला होता, पण काही कारणाने त्यासाठी तरतूद होऊ शकली नाही. त्या वेळी जर तसे शोधक यंत्र बसवले गेले असते तर जास्त सखोल संशोधन भारतात शक्य झाले असते. नंतरच्या काळात डॉ. नारळीकर यांनी मला आयुकात बोलावून घेतले त्यामुळे या संशोधनात मी आणखी पुढे काम सुरू केले. साधारण इ. स. २०००च्या सुमारास अनेक देशांच्या लायगो प्रकल्पात आयुकाच्या माध्यमातून भारत सहभागी झाला. इतरही काही संस्था त्यात काम करीत होत्या त्यामुळे नोबेल संशोधनात वाटेकरी असल्याचा आम्हाला अभिमानच वाटतो. यात आम्ही गुरुत्वीय लहरींचे संदेशाचे विश्लेषण करण्याचे काम या प्रयोगात केले. कारण या लहरी गोंगाटात म्हणजे नॉइजमध्ये लपलेल्या असतात त्यातून त्या वेगळ्या काढण्यासाठी बरेच परिश्रम लागतात यात भूमिती, संख्याशास्त्र, अलगॉरिथम यांचा वापर केलेला असतो. कृष्णविवराचे वस्तुमान बदलते त्याप्रमाणे तरंग बदलतात, गुरुत्वीय लहरी असलेला संदेश केव्हा येईल याची वेळ निश्चित सांगता येत नाही त्यामुळे हे संशोधन अतिशय कालहरण करणारे व गुंतागुंतीचे आहे यात शंका नाही. शेकडो वर्षे अशा संशोधनाला द्यावी लागतात. विजेरीचा शोध लावला तेव्हा मायकेल फॅरेडेला एका महिलेने विचारले होते की, या शोधाचा उपयोग काय तेव्हा फॅरेडे म्हणाला होता, तुमच्या कडेवर जे बाळ आहे त्याचा उपयोग काय तुम्ही कृपया सांगू शकाल का, तसेच हे आहे. गुरुत्वीय लहरींचे अनेक उपयोग आहेत ते काळानुसार पुढे येतील. चारशे वर्षांपूर्वी गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला तेव्हा प्रकाशीय खगोलशास्त्र ही शाखा आली. त्यात जे शक्य झाले नाही ते विद्युत चुंबकीय लहरींवर आधारित खगोलशास्त्राने शोधून काढले. त्यानंतर रेडिओ लहरी हे माध्यम नव्याने उदयास आले. त्यातून विश्वाच्या शोधाची आणखी एक खिडकी खुली झाली व आता गुरुत्वीय लहरींच्या माध्यमातून आपण विश्वातील घडामोडींचा वेध घेण्यास सज्ज आहोत. १८९० मध्ये हर्ट्झने विद्युतचुंबकीय लहरींचा शोध लावला तेव्हाही त्याचा उपयोग काय, असा प्रश्न अनेकांनी केला होता. पण नंतर त्याच लहरींच्या माध्यमातून अनेक शोध लागले. रेडिओ लहरींच्या माध्यमातून पल्सार व इतर ताऱ्यांची माहिती मिळाली. सध्या गुरुत्वीय लहरी खगोलशास्त्र शाखेची ही प्रारंभीची अवस्था आहे असे समजा. आणखी ५०-१०० वर्षांत या लहरींच्या मदतीने विश्वातील अनेक गूढ रहस्ये शोधता येतील. आइनस्टाइनने मांडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला या गुरुत्वीय लहरींच्या शोधाने पाठबळ मिळाले. त्याचा हा सिद्धांत गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे प्रायोगिक पातळीवर खरा ठरला ही यातील महत्त्वाची बाब आहे. आताच्या गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे कृष्णविवरापलीकडे नेमके काय असते, कृष्णद्रव्याचे अस्तित्व यावर अधिक माहिती मिळू शकते. गुरुत्वीय लहरी संशोधनात एकूण एक हजार वैज्ञानिकांचा सहभाग होता त्यात ३७ भारतातील होते. आयुकातील आठ जणांचा त्यात समावेश होता. त्यातील अनेक जण माझे पीएच. डी.चे विद्यार्थी आहेत. या सगळ्या संशोधन प्रकल्पातून विज्ञानात काही देशांनी एकत्र येऊन काम केले तर मोठे यश मिळू शकते हे स्पष्ट झाले आहे. तसेही गुरुत्वीय लहरी संशोधन हा खूप व्यापक विषय होता तो हाताळण्यासाठी अशा सहकार्याची गरज होतीच. एकूणच गुरुत्वीय लहरींच्या शोधाला नोबेल मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे, यात शंका नाही.

नोबेल विजेत्यांसमवेत कामात आनंदच

गुरुत्वीय लहरींच्या शोधात नोबेल मिळालेल्या रेनर वेस, बॅरी बॅरिश व किप थॉर्न यांच्याशी माझा जवळून परिचय आहे. त्यात किप थॉर्न यांच्यासमवेत जास्त काळ काम करायला मिळाले, त्या वेळी तीन महिने मी अमेरिकेत होतो. थॉर्न यांनी त्या वेळी खास पार्टीही दिल्याचे आठवते. त्यात जिलेबीसह अगदी भारतीय जेवणाची व्यवस्थाही त्यांनी केली होती. नंतर ते आयुकातही एका चर्चासत्रासाठी आले होते, त्या वेळी योगायोगाने माझा साठावा वाढदिवस होता त्यात त्यांनी आपुलकीने भाषणही केले. त्या वेळी त्यांनी तुला खगोलशास्त्रातील सगळे काही प्रा. चंद्रशेखर यांच्याप्रमाणे गणिताच्या रूपात दिसते असे कौतुकही केल्याचे आठवते. या अमेरिकी वैज्ञानिकांबरोबर काम करताना मजाच आली. त्यांनी भारतीय वैज्ञानिकांचे यात मोठे योगदान असल्याचे वेळोवेळी कौतुकाने सांगितले होते. थॉर्न यांच्या आग्रहास्तव भारत लायगो प्रकल्पात आला. यात आणखी एक वैज्ञानिक सहभागी होते ते म्हणजे रोनाल्ड पी. ड्रेव्हर पण ते आता हयात नाहीत, कॅलटेकमध्ये ते मानद प्राध्यापक होते. गुरुत्वीय लहरीत माझ्या मते साठ टक्क्यांहून अधिक काम त्यांनी केले. त्यांचे ७ मार्च २०१७ रोजी निधन झाले अन्यथा ते नोबेलच्या मानकऱ्यांत दिसले असते.

शब्दांकन- राजेंद्र येवलेकर