नामवंत साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांचा ‘बसवण्णांच्या क्रांतीची आज गरज’ हा लेख गेल्या ‘रविवार विशेष’मध्ये (१३ ऑगस्ट) प्रसिद्ध झाला होता. कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असल्याने वीरशैव- लिंगायत समाजात उफाळलेला वाद आणि त्याचा कॉँग्रेस पक्ष कसा लाभ उठवू पाहात आहे याचे विवेचन त्या लेखात होते. त्यातील काही मुद्दय़ांना उत्तर देतानाच अंतर्विरोधांनी बजबजलेल्या वीरशैव समाजाऐवजी आजच्या वैज्ञानिक युगाशी सुसंगत लिंगायत समाजच का हवा, याची मीमांसा करणारा लेख..

लिंगायत-वीरशैव द्वंद्वाची समस्या आजकालची नव्हे. ती गत सहा शतकांपासून शेवट न दिसणारी समस्या आहे. विविध प्रकारच्या हिंदू शैव पंथांतून आलेल्या आणि बसवण्णांच्या ‘लिंगायत’ प्रवाहात शिरलेल्या लोकांनी निर्माण केलेली ही समस्या आहे. त्यांच्यामध्ये काळामुखी, पाशुपत, कापालिक, लकुलीश, काही नाथपंथी आणि आंध्रातील आराध्य शैव ब्राह्मण ही प्रमुख होत. तथापि, पंधराव्या शतकाच्या अखेरीच्या सुमारास वर उल्लेखित आधीचे पाच पंथीय बहुधा बसवण्णांना संपूर्णपणे मान्य करून, आपले मूळ स्वरूप गमावून, लिंगायतांचे आजचे ‘विरक्त मठ’ होऊन परिवíतत झाले. त्यामुळे विरक्त मठ बहुतांश बसवतत्त्वांचे पालन करतात आणि ‘वीरशैवांचा’ पंचाचार शक्य तितके बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

तथापि, आंध्रच्या आराध्य ब्राह्मणांनी आपले मूळचे ब्राह्मण्य सोडून न देता, बसवण्णा आणि शरणांनी स्थापिलेल्या ‘लिंगायत’चे संपूर्णपणे पालन न करता, दोन्हींची सरमिसळ करून बसवधर्म नासवून टाकला आहे. आपले प्रभुत्व गाजविण्यासाठी कोणताही ऐतिहासिक आधार नसलेल्या, बनावट, काल्पनिक दंतकथांवर आधारित पंचपीठांची त्यांनी निर्मिती केली. ‘वीरशैव’नामक नवा वाद जन्माला घालून क्लिष्ट समस्या उभी केली आहे. विरक्त मठांच्या यतींना मार्गभ्रष्ट करण्याचे कार्य विसाव्या शतकाच्या आरंभापासून पंचपीठांच्या प्रवर्तकांनी आरंभिले आहे. हे कार्य कशा प्रकारे चालले याचे विश्लेषण पुढे करण्यात आले आहे.

१ ‘वेदांना बासनात गुंडाळून टाकेन, शास्त्रांना साखळदंड लावेन, आगमांचे नाक कापेन’ असे बसवण्णा म्हणाले होते. ‘वेद म्हणजे पढतगप्पा, पुराण म्हणजे पुंडांच्या गोष्टी’ असे शरणांनी सांगितले होते. ‘स्मृती समुद्रात बुडू द्यात, श्रुती वैकुंठात शिरू द्यात, आगम वायूत विरू द्यात, आमच्या उक्ती महालिंगाच्या ग्रंथी होऊ द्यात’ असे म्हटलेल्या सिद्धरामेश्वरांच्या धर्मामध्ये वेद, आगम, शास्त्र, पुराण, उपनिषदे यांची घुसखोरी घडविली ती पंचपीठांनीच! त्यामुळेच वेद आणि शैवागमांवर आधारित सिद्धान्त शिखामणी आपला मूलग्रंथ असल्याचे प्रतिपादन ते करतात. सदर ‘सिद्धान्त शिखामणी’ ग्रंथ चौदाव्या शतकात लिहिला गेला असल्याचे आधार या ग्रंथाच्या लेखकानेच आपल्या सदर ग्रंथात उल्लेखिले आहेत नि ते पुरेसे आहेत.

२वर्णाश्रम सिद्धान्तावर आधारित जाती पद्धती, जातीवर आधारित कर्मसिद्धान्त, कर्मसिद्धान्तावर आधारित पाप आणि पुण्य संकल्पना, पापपुण्य यावर आधारित स्वर्ग आणि नरक, स्वर्ग-नरकावर आधारित जन्म-पुनर्जन्म हे सारेच ‘लिंगायत’ संपूर्णपणे नाकारतो. अशा प्रकारे, शरणांनी हिंदू धर्माची मूळ तत्त्वेच नाकारलेली आहेत. म्हणून तेच लिंगायत संस्थापक!

तथापि वर्णाश्रमधर्मातून उत्पन्न कर्मसिद्धान्त, त्यातून उत्पन्न झालेली जातिपद्धती, कर्मसिद्धान्तातून उत्पन्न पाप-पुण्य, पाप-पुण्यातून उत्पन्न स्वर्ग- नरक, स्वर्ग-नरकातून उत्पन्न जन्म-पुनर्जन्म आदींवर विश्वास असणारा हिंदू धर्म आणि या सर्व गोष्टींना आधार असलेले वेद, आगम हे वीरशैवांना सर्वमान्य झालेले आहेत, आणि पंचपीठाधीश या सर्व गोष्टींचे अतिशय भावुकपणे प्रतिपादन करीत असतात. असे असताना लिंगायत आणि वीरशैव हे दोन्ही एकच म्हणता येणे कसे शक्य आहे? या पाश्र्वभूमीवर बसवण्णांचा शुद्ध लिंगायत धर्म अशुद्ध करणारे कोण आहेत? याद्वारे आजच्या आंतरिक गोंधळास, अंतर्वरिोधास कोण कारणीभूत आहेत हे स्पष्ट होत नाही काय?

३चौदाव्या शतकापासून उपरोल्लेखित गोंधळ निर्माण केला तो पंचाचार्यानीच! लिंगायतांच्यात लिंगधारणा ‘सूत्र’ स्तरावर नेऊन त्यासाठी पुरोहितशाही निर्माण केलेले (‘लिंगधारण चंद्रिके’सारख्या ग्रंथांद्वारे) ते आराध्य ब्राह्मणच! बसवण्णांनी कोणाला जबरदस्ती करून लिंग बांधले नाही. बाहुबळावर लिंगायत धर्माची उत्पत्ती झालेली नाही. तथापि बळाच्या जोरावर तो नामशेष करण्याचे प्रयत्न मात्र चालले. बसवण्णांनी कोणता मठ स्थापन केला नाही. ते कोण्या मठाचे प्रमुखही नव्हते. अल्लमप्रभूंना अनुभव मंटपाचे अध्यक्ष बनविलेल्या बसवण्णांची मनोभूमिका लक्षात घेतली पाहिजे. पंधराव्या शतकातील ‘शून्य संपादने’मध्ये उल्लेख आलेले सारे मठ बसवपूर्वकालीन मठ नव्हेत. सध्याचे सारे लिंगायत मठ बसवोत्तर काळात लिंगायत धारेत समाविष्ट झालेल्यांचे मठ होत.

बसवण्णांच्या ‘जंगमा’स जातीय स्वरूपात परिवíतत करून, त्या जातीच्या लोकांना पुरोहितशाहीचे अधिकार बहाल केलेले पंचाचार्यच! बसवण्णांनी पुरोहितशाहीचे कंबरडे मोडले, तर पंचपीठांनी स्वतचीच खास अशी पुरोहितशाही निर्माण करून, त्यांना ‘पट्टद देवरु’, ‘शाखा मठ’ इ. नावे दिली.

४विजयनगरच्या राजांच्या काळापासून (१४ वे शतक) १९४० पर्यंत (पाच शतकांत) पंचाचार्यानी लिंगायत धर्मीयांना इतक्या घोर अंध:कारात लोटले की, हे लिंगायत धर्मीय स्वतला आपण हिंदू धर्माचेच अनुयायी असल्याचे समजू लागले आणि त्या धर्माचे सर्व अनाचार आचरणात आणू लागले. मुहूर्त, हिंदू सणवार, सुतक-पातक पाळू लागले. इ. स. १८८० च्या सुमारास म्हैसूरचे लिंगायत आपण ब्राह्मण असल्याचे सांगू लागले. पण या गोष्टीला ब्राह्मणांनी मान्यता दिली नाही. नाभिक, मातंग, चर्मकार हे लिंगायत असताना तुम्ही कसले ब्राह्मण असा प्रश्न करून तत्कालीन शुभोदय पत्रिकेत लिंगायतांची अवहेलना, तिरस्कार, निंदा करण्यात येत होती. त्यामुळे त्यावेळचे लिंगायत पुढारी एन. आर. करिबसवशात्री, वीरसंगप्पनवरु आदींनी कनिष्ठवर्गीय लिंगायत हे लिंगायतच नव्हेत असे प्रतिपादन करायला सुरुवात केल्याचे ‘स्टार ऑफ मसूर’ पत्रिकेत नमूद झालेले आहे.

कनिष्ठ जातींचे लिंगायत हे वीरशैव नव्हेत या म्हैसूरच्या आराध्यांच्या प्रतिपादनाचा परिणाम उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विस्तृत प्रमाणात झाला. हा पंचाचार्याचा महिमा! त्याचीच परिणती पुढे अशी झाली की, त्यामुळे नाभिक, नायक, परीट, तेली इ. असे निम्नजातीय लिंगायत लोक जनगणनेमध्ये हिंदू म्हणून नमूद करण्यास पुढे झाले. हिंदू धर्मातील जातिपद्धती लिंगायतांच्यात पुढे चालू ठेवून श्रेष्ठ-कनिष्ठ भेदभाव अनुसरणारे पंचपीठांचे गुरूच त्यास कारणीभूत आहेत. लिंगायत हे वीरशैव धर्मात फोडाफोडीची नीती अनुसरत असल्याचा आरोप म्हणजे विपर्यासच!

वर उल्लेखित ऐतिहासिक कारणांखेरीज देशातील आजच्या विचित्र परिस्थितीत आपला हिंदू म्हणून उल्लेख नमूद करून, शासनाकडून आरक्षण सुविधा प्राप्त करून घेणे कनिष्ठवर्गीय लिंगायत आणि उच्चवर्गीय जंगमांचा उद्देश होता. परंतु जंगमांना ‘बेड जंगम’ या जातिनामाने आरक्षण राखण्याची इच्छा, आकांक्षा होती, तर मग ते लिंगायत धर्माला का बरे चिकटून राहिले आहेत? काशी जगद्गुरूंच्या दृष्टीने लिंगायत हे हिंदू म्हणून राहिले तरच त्यांचे अस्तित्व अबाधित राहील. लिंगायत हे लिंगायत म्हणून राहिले तर, ‘वीरशैव’ला कवडीमोलसुद्धा लाभणार नाही. म्हणूनच सरकारच्या ‘फोडा व झोडा’ नीतीला पंचपीठांचे गुरू हातभार लावत असतात.

५ लिंगायत हे ब्राह्मण म्हणविण्याच्या एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या भागापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या (इ. स. १९४०) पाश्र्वभूमीवर पुढे आलेल्या व्यक्ती म्हणजे दक्षिण आणि मध्य कर्नाटकात पू. श्री हानगल कुमारस्वामी आणि उत्तर कर्नाटकात काशिनाथशास्त्री हे होत. त्या दोघांचा उद्देश म्हणजे, अ) वीरशैव समाज संघटित करणे आणि ब) पंचाचार्याच्या तत्त्वांचा सुसंघटितपणे प्रचार करणे. त्यासाठी नागनूरच्या काशिनाथशास्त्रींनी आपल्या उद्देशांसाठी पूरक वातावरण असलेल्या म्हैसूरमध्ये ‘पंचाचार्य इलेक्ट्रिक प्रेस’ची स्थापना केली. तेथून ‘पंचाचार्य प्रभा’ हे नियतकालिक, तसेच ‘काशिनाथ ग्रंथमाला’नामक पुस्तक प्रकाशनमाला सुरू केली. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे, विरक्त मठांच्या विरुद्ध आणि बसव धर्माच्या व शरणांच्या विरुद्ध अवमानजनक, असभ्य, खोटेनाटे लेखन, ग्रंथ प्रकाशित करून अपप्रचार करणे, पंचाचार्याना प्रसिद्धीच्या झोतात आणणे हा होता. यांनीच सिद्धान्त शिखामणीमध्ये आपल्या उद्देशाला अनुरूप बदल घडवून लिहून त्याचा प्रचार केला.

काशिनाथशास्त्रींच्या उत्तेजनानेच शांतप्पा कुबसद यांनी ‘बसवादी निजतत्त्व दर्पणवु’ नामक ग्रंथ लिहून त्यात बसवण्णा आणि इतर शरणांच्या विरुद्ध दोनशे उद्धट प्रश्न उपस्थित केले होते. या अवमानकारक पुस्तकावर बंदी घालण्यात यावी म्हणून धारवाडच्या सिद्धरामण्णा पावटे यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात दावा ठोकून तो जिंकलाही होता. तेव्हा त्या ग्रंथलेखकाला क्षमायाचना करणे भाग पडले. सदर पंचाचार्य प्रेसचे तत्कालीन मॅनेजर एन. गुंडाशास्त्री यांनी आपल्या पुस्तकात त्या दुष्ट कुबसदचे खरेखुरे जीवनचरित्र उघडे पाडले आहे. ही सारी पंचाचार्याच्या आशीर्वादाने त्या वेळी चाललेली दुष्कृत्ये!

६आता पू. श्री हानगल कुमारस्वामींच्या विषयी थोडी माहिती अगत्याची आहे. हैद्राबाद निजामाच्या अंमलाखालील परळी वैजनाथ येथील देवस्थानामध्ये पूजा करणाऱ्या ब्राह्मणांच्या ठिकाणी लिंगायतांची नेमणूक व्हावी म्हणून चाललेला वाद निजामाच्या हायकोर्टात दाखल झाला. त्या खटल्यातील मुख्य वाद म्हणजे लिंगायत हे ‘लिंगी ब्राह्मण’ असल्याने वैजनाथाची (शिवाची) पूजा करण्याचा अधिकार लिंगायतांना दिला पाहिजे हा होता. हा म्हैसूरच्या लिंगायतांकडून प्रेरणा घेतल्याने उद्भवलेला कलह होता. या कलहाच्या मागे जे काही सूत्रधार नायक होते, त्यांपकी हानगल कुमारस्वामी हे एक! इंदोरीत संस्कृत शालेचे प्राचार्य असलेले, धारवाड जिल्ह्य़ातील विरूपाक्ष ओडेयर यांनी कुमारस्वामींच्या इच्छेनुसार वकिली पार पाडली. लिंगायत हे ‘लिंगी ब्राह्मण’ असल्याचे न्यायालयाला (लवादाला) पटवून दिले. वैजनाथाच्या पूजेचे हक्क लिंगायतांना मिळाले. पाहा, कसा आहे पंचाचार्याचा प्रभाव ! कुठे बसवण्णा आणि कुठे लिंगी ब्राह्मण!

७अत्यंत विद्वान अशा श्री हानगल कुमारस्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार सन १९०४ मध्ये ‘अखिल भारत वीरशैव महासभा’ स्थापन करण्यात आली. अलीकडे दहा वर्षांपूर्वी तिचे नाव ‘वीरशैव लिंगायत महासभा’ असे बदलण्यात आले. १९०४ मध्ये पू. श्री हानगल कुमारस्वामींच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या महासभेच्या पहिल्या अधिवेशनातच ‘वीरशैव वेद, उपनिषदे, आगम मान्य करतात.’ ‘वीरशैव हिंदू आहेत.’ ‘लिंगायत मठांना जातीने जंगम असलेल्यांचीच स्वामी म्हणून नेमणूक झाली पाहिजे.’ असे सगळे निर्णय घेण्यात आले. छत्तीस वर्षांनंतर या महासभेच्या अधिवेशनात पहिल्या अधिवेशनातील हे सारे निर्णय रद्दबातल ठरविण्यात आले.

८विरक्त मठांचे स्वामी बसवण्णा आणि शरणांना, तसेच शरण साहित्यास फार महत्त्व देतात, त्यांचा आग्रह धरतात. सिद्धांत शिखामणीला फारसे महत्त्व देत नाहीत. हिंदू शैव धर्म ते मान्य करीत नाहीत. ही प्रवृत्ती कमी करून, सिद्धान्त शिखामणी, वेद, उपनिषद, आगम इ. त्यांनी मान्य करून त्यानुसार चालण्याची गरज पू. कुमारस्वामीजींच्या ध्यानी आली. आपले पुढील धोरण अमलात आणण्यासाठी त्या वेळी त्यांच्या चाणाक्ष बुद्धीला सुचलेला उपाय म्हणजे, सर्व वीरशैव-लिंगायत बटूंना एकाच पद्धतीचे प्रशिक्षण दिले तर हा सर्व विपरीत अंतर्वरिोध आपोआप निघून जाईल हा त्यामागचा विचार! त्यासाठी त्यांनी बदामीजवळ ‘शिवयोग मंदिर’मध्ये १९१०साली बटूंसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. शिवयोग मंदिरात सर्व वीरशैव-लिंगायत बटूंना प्रामुख्याने वीरशैवांचा सिद्धान्त शिखामणी, शक्तिविशिष्टाद्वैत, वेद, उपनिषद, आगम, लिंगधारण पद्धती, दीक्षा, अय्याचार इ. शिकविण्यात येते. बसवण्णांची विश्वमानवता, समता वगरे कोणत्याही अंशाला त्या प्रशिक्षणात महत्त्व नव्हते. लिंगायतांना मार्गभ्रष्ट करण्याचे प्रयत्न कसे चालत आले आहेत पाहा!

पंचाचार्याविषयीची काही माहिती इथे अगत्याची वाटते. सिद्धान्त शिखामणीमधील आंतरिक विरोधाभास लक्षात घेतल्यास या पाच पंचाचार्यापकी दोघांच्या अस्तित्वास (काशी आणि केदार पीठांच्या) कोणताही ऐतिहासिक, पौराणिक आधार नाही. या पाच जणांना ‘आचार्य’ केलेले कोण? कधी? या प्रश्नांना योग्य समाधानकारक आधार नाहीत. कृतायुग, त्रेतायुग, द्वापरयुगामध्ये धर्मप्रचार केला, रामायणातील बिभिषणाला सल्ला दिला, अगस्त्याला शिवमहिमा उपदेशिला, शंकराचार्याना चंद्रमौळीश्वर लिंग दिले वगरे सिद्धान्त शिखामणीचा लेखक सांगतो.

अशी सर्व चमत्कारिक काय्रे केलेल्या या पंचपीठांविषयी वेद, आगम, उपनिषदे, ब्राह्मण्यके, अरण्यके अथवा शंकराचार्याशी संबंधित ग्रंथांमध्ये, रामायणामध्ये, अथवा भारताच्या प्रदीर्घ इतिहासाशी संबंधित कोणत्याही प्राचीन ग्रंथामध्येसुद्धा पंचाचार्याविषयी एक चकार शब्दसुद्धा नाही. असे असेल तर त्यांचा सगळा इतिहास म्हणजे स्वयंनिर्मित, स्वयंकल्पित भाकडकथा आहेत ना? त्या साऱ्या निर्माण केलेले कोण? का? कसे? केव्हा? या सर्व गोष्टींचा साधार उपयोग करून लिंगायत स्वतंत्र धर्म आहे, पंचपीठे हा त्यानंतरचा संप्रदाय आहे हे सिद्ध करण्यासाठी अपार अशी ऐतिहासिक सामग्री आता उपलब्ध आहे. सध्या लिंगायत समुदाय अत्यंत कठीण आंतरिक विरोधातून, संघर्षांतून पंथीय समस्यांतून वाटचाल करताना थरकापलेला आहे, व्याकूळलेला आहे. आज आम्हाला पाहिजे आहे, तो आजच्या वैज्ञानिक युगीन मनोभावनेशी संपूर्णपणे सुसंगत असा बाराव्या शतकातील बसवण्णांचा लिंगायत धर्मच; पंचाचार्यानी अशुद्ध केलेला, शे-सव्वाशे अंतर्वरिोधांनी बजबजलेला वीरशैव मुळीच नकोय!

डॉ. एस. एम. जामदार

(‘लिंगायतवु स्वतंत्र धर्मवल्लवेंब डॉ. चिदानंद मूर्तीयवर वादक्के उत्तरया डॉ. जामदार (आयएएस, निवृत्त, बेंगळुरु) यांच्या प्रकाशित कन्नड लेखातून संकलित. अनुवाद- शिवानंद, कोल्हापूर)