एका बाजूला ‘स्मार्ट सिटीज’सारख्या घोषणा होत असताना त्याच समाजात बायकांनी ‘राइट टू पी’ची मागणी करावी याची आपल्याला व सरकार चालवणाऱ्या धुरिणांना लाज वाटू नये याचा अर्थ काय? ‘राइट टू पी किंवा पू’ ही वरवर पाहता स्त्रियांची चळवळ दिसत असली तरी ती तशी नाही. म्हणूनच ‘स्वच्छता अभियान’सारख्या भोंगळ कार्यक्रमात आणि टॉयलेट्स बांधण्याच्या प्रकल्पात समाविष्ट करून तिचे प्रश्न संपणार नाहीत.

 

सुमारे चार वर्षांपूर्वी सुजाताने मला तिच्या ‘कोरो’ या संस्थेने हाती घेतलेल्या नव्या उपक्रमाची माहिती दिली. ‘राइट टू पी’ तिने सांगितले. मुख्यत: महिलांसाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी मुताऱ्या नसल्यामुळे कशी कुचंबणा होते व त्या बांधाव्यात म्हणून आंदोलन उभे करण्याची कशी गरज आहे वगैरे.
‘राइट टू पी’ या शब्दाने- विशेषत: ‘पी’, लघवी (करणे) व तिच्या विसर्जनाचा हक्क असण्याची मागणी करण्याचे आंदोलन करावे लागणे या कल्पनेनेच मला प्रथम स्वत:ची व भवतीच्या समाजाची लाज वाटली. मुतारी नाही म्हणून रस्त्याच्या कडेला उभा राहून मुतणारा पुरुष आणि उभी न राहू शकणारी स्त्री अशा दोन्ही प्रतिमा समोर आल्याच, पण पाठोपाठ गेल्या दोनशे वर्षांतील काही अन्य प्रतिमाही डोळ्यासमोरून तरळल्या.
रेम्ब्रापासून, पिकासो, किकी स्मिथ, सॅली मान, मरिआ डय़ुमस अशा अनेक पाश्चात्त्य कलावंतांच्या लघवी करणाऱ्या स्त्रियांच्या किंवा अ‍ॅन्डी वॉरटोलच्या लघवी करण्याचा कार्यक्रम आखून तिचा वापर माध्यम म्हणून केलेल्या कलाकृतींची आठवण झाली. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी ग्रीक कलावंतांनी (बर्लिन) बनवलेला टेराकोटा पॉटरीतील गणिकेची मोठय़ा टेचात मद्याच्या चषकामध्ये मूत्र विसर्जन करण्याची नागडी प्रतिमाही आठवली.
मुलीची अडचण नको म्हणून लग्नानंतर नव्या घरात पाठवताना आठवणीने दिलेले, कलाकुसर केलेले चेंबर पॉट आठवले व अठराव्या शतकात युरोपमध्ये अशा सुंदर चेंबरपॉट्सची अख्खी बाजारपेठ चीन व जपानच्या पोर्सेलिन कारागिरांनी कशी घडवली याची आठवण झाली. त्याचबरोबर समकालीन सार्वजनिक मुताऱ्यांतील नवकला म्हणून तयार केलेली आणि मुख्यत: पुरुषांच्या मुताऱ्यांत पुरुषांच्या लैंगिक कल्पनाविलासांना व विकृत वास्तवांना सुखावणाऱ्या या नव्या ‘डिझाइन्स’चीही आठवण झाली.
लघवी करण्याच्या, ती जिथे करायची त्या जागेच्या, त्या वास्तूच्या, त्या अवकाशाच्या, त्या साधनांच्या, त्या क्रियेच्या, तिच्या शारीरिक आवश्यकतेच्या प्रत्येक कोनाला, पैलूला आणि तिच्या मान्य-अमान्य अभिव्यक्तीला ‘जेंडर’ किंवा ‘लिंग राजकारणा’च्या असमतोल राजकारणाचे आणि पुरुषी लैंगिक सौंदर्यशास्त्राचे परिमाण भिंग कसे परिणाम आणि व्यंग निर्माण करते याचा इतिहासच एका क्षणात त्या वेळी माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेला. स्त्री-पुरुषांच्या लघवी चित्रांचा अभ्यास करून कुणीतरी या अंगाने संशोधन करायला हवे याची जाणीव सुजाताच्या बोलण्याने मला झाली.
आज एका बाजूला ‘सेल्फी विथ डॉटर’ या घोषणेने प्रसिद्ध झालेला भंपक कार्यक्रम आणि ‘राइट टू पी’ हा स्त्री चळवळीने घेतलेला व्यापक कार्यक्रम यांच्या एकत्र अस्तित्वामध्येच सर्वाना मान्य असलेली स्त्री मुताऱ्यांची निकड प्रत्यक्ष अमलात का येत नाही याचे उत्तर दडले आहे असे मला वाटते. ‘सेल्फी’ या शब्दातच तिच्या अस्तित्वाची क्षणभंगुरता आणि उथळ प्रसिद्धीची उठवळ अभिप्रेत आहे. (श्रुती सेठ या अभिनेत्रीने केलेल्या ट्वीट – वरून उठलेल्या वादळावरून या कार्यक्रमाचा फोलपणा लक्षात यावा.)
लघवी करण्याचे तत्त्वज्ञान कोणते, असे तत्त्वज्ञान मांडता येईल काय; लघवी करण्याचे, करू इच्छिण्याचे राजकारण असते काय व ते कोणते असा मूलभूत प्रश्न ‘राइट टू पी’ या आंदोलनामुळे माझ्या मनात किणकिणला. या चळवळीत लैंगिकतेपासून तालिकतेपर्यंत शारीरिक व / वा अभौतिक अस्तित्ववादी प्रश्नांपासून, मानसशास्त्रीय व राजकीय जडणघडणीच्या प्रवासापर्यंत अशा सर्वच मुद्दय़ांची एक छोटेखानी प्रयोगशाळा दडली आहे असा मला भास झाला. हार्वर्ड विद्यापीठातील सुप्रसिद्ध मार्क्‍सवादी अनुवंशशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ रिचर्ड लेवोन्टीन यांचा माझा परिचय असता तर त्यांच्या ‘बायॉलॉजी अ‍ॅज आयडिऑलॉजी’ या गाजलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती काढण्यापूर्वी मी त्यांना ‘राइट टू पी’ आंदोलनाची निरीक्षणे करण्याची विनंती केली असती.
अशी विनंती करण्याचे पहिले कारण म्हणजे ‘आपल्याला मुक्त इच्छाबळ आहे याची जाणीव लघवी करण्याच्या इच्छेबरोबर कमकुवत होते’ असा निष्कर्ष. म्हणजे जेवढी लघवी करण्याची इच्छा जास्त, जेवढी मोठी कळ, तेवढी मुक्ततेच्या जाणिवेची कोंडी. अलीकडेच ‘कॉन्ट्रासनेस अ‍ॅण्ड कॉग्निशन’ या मानसशास्त्रीय व तत्त्वज्ञानविषयक नियतकालीकात मायकेल इन (एल्ल३) आणि रॉय बौमेस्टर या जोडगोळीने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आला. लघवी करण्याच्या सामान्य क्रियेचा आणि ‘मानवी मुक्त इच्छे’सारख्या उच्च तात्त्विक संकल्पनेचा संबंध जोडल्याने साहजिकच या विषयावर ठिकठिकाणी चर्चा सुरू झाली.
मायकेल आणि रॉय यांनी केलेल्या प्रयोगातून, पाहण्यांतून स्पष्ट झाले की जसजशी लघवी करण्याची इच्छा तीव्र होत जाते तसतसे माणसाला ‘त्या इच्छेविरुद्ध’ झगडता येत नसल्याने दुबळे वाटू लागते. आपल्याला ‘मुक्त इच्छेचे’ पाठबळ नाही हे जाणवू लागते. (मल वा मूत्र साठविण्याच्या व विसर्जनाच्या कृती आनंदावर फ्रॉइड यांनी स्वतंत्र व वेगळे भाष्य केले आहे त्याबद्दल आपण परत केव्हा तरी बोलूच) असे दुबळे होणे, अधीन होणे किंवा निर्बल होणे ही क्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे.
नव्या मानसशास्त्राचा व मज्जाशास्त्राचा एक विभाग अलीकडे जाणीव व संज्ञाप्रवाह यांचा अभ्यास करतो. याच शाखेचा एक भाग म्हणजे ‘प्रतीकात्मक तरीही मूर्त आकलनाचे संज्ञाप्रवाह’. या शाखेच्या अभ्यासातून क्षणाक्षणाच्या शारीर अनुभवातून आपल्याला जाणवणारे जग कसे बदलत जाते, बदलणारे हे जग कसे दिसते अशा सूक्ष्म बाबी उलगडत जातात.
लघवी करण्याच्या भावनेच्या शारीर अनुभवामुळे आपल्या (लघवी न होऊ देण्याच्या) इच्छेवर ताबा नाही हे लक्षात आल्यामुळे त्या त्या व्यक्तीला दुबळे वाटणे- तात्त्विक व विचारधारेच्या, जाणिवेच्या पातळीवर दुबळे वाटणे हा अत्यंत गंभीर निष्कर्ष आहे. जे लघवीचे त्यापेक्षा अधिक कळ देणारे म्हणजे मल विसर्जनाचे, तडफड वाढवणारे म्हणजे लैंगिक इच्छांचे,- म्हणजेच घर, जागा, काम, एकांत, अवकाश, शिक्षण,- अशा विविध आणि प्राथमिक इच्छांचे समुदाय प्रथम शारीर व नंतर सामाजिक किंवा राजकीय इच्छांची भरलेली मूत्राशयेच नव्हेत काय? दुबळे वाटण्याच्या मानवी अनुभवाची परिणती उदासीनतेत होते. उदासीनतेची सहचरी निराशा असते.
दैनंदिन जीवनात क्षणाक्षणाचा शारीर अनुभव मूत्राशये तुडुंब भरलेल्या स्त्री-पुरुषांना अतिकठीण तेव्हा वाटतो जेव्हा मलमूत्र विसर्जनासाठी मुताऱ्या व शौचालये उपलब्ध नसतात. जी असतात ती अस्वच्छ, अपुरी, असुरक्षित आणि किंवा पैसे मोजायला लावणारी. ताबा नसलेल्या इच्छेला विसर्जनाचा मार्ग नसेल, तर शरीर व मन या दोन्ही ठिकाणी असलेल्या मूत्राशयात खडा होऊन, वेदना व वंचना यातून येणारे औदासीन्य रोजच्या जीवनात शारीर व मानसिक रोगांना बळी पडणार नाही काय? शौचालय नसलेल्या स्त्रीला तुंबलेले गटार बरोबर घेऊन व पुरुषाला निर्लज्जपणाच्या अपमानित अवस्थेत भर रस्त्यात नागडे करून दुबळे बनविणाऱ्या सामाजिक व्यवस्थेच्या अतिप्राथमिक ओंगळ रूपाला ‘राइट टू पी’सारखे आंदोलन प्रश्न विचारते. ती केवळ शौचालये बांधण्यासाठी छेडलेली चळवळ नव्हे.
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात शहरातील माणसांच्या बद्धकोष्ठ विकारात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध वैद्यक विचारतज्ज्ञ डॉ. रवी बापट यांनी माझ्याशी बोलताना ‘आयबीएस-इरिटेबल बाहुल सिंड्रोम’ हा शारीर-मानसिक आजार एखाद्या साथीसारखा कसा पसरतो आहे हे चिंतायुक्त स्वरात सांगितले होते. एका बाजूला बद्धकोष्ठ व दुसऱ्या बाजूला आयबीएस अशा अवस्थेत सारा समाजच चिडखोर, धास्तावलेला, दुबळा आणि त्रासलेला म्हणून उदासीन-डिप्रेस्ड बनू लागला असेल तर त्याची कारणमीमांसा होणे आवश्यक आहे.
गरीब व झोपडपट्टीत बद्धकोष्ठतेचे रोगी जास्त आहेत, तर आयबीएस समाजाच्या सर्वच वर्गात वेगाने पसरतो आहे. ही लक्षणे केवळ शौचालये नसणे या बाह्य़ गरजेवर अवलंबून नसून आपल्या आर्थिक व राजकीय व्यवस्थेचे ते परिणाम आहेत.
राइट टू पी, राइट टू पू, इथपासून अन्नसुरक्षा, मैथुन आणि एकांताच्या अधिकारासाठी जागेच्या हक्काचा लढा म्हणजेच राइट टू सिटी असा एक मोठा हा मुक्ततेचा पसारा आहे.
मुक्त इच्छा-फ्री विल आहे किंवा नाही, यापेक्षा ती आहे असा विश्वास वाटणे हेच मुक्तीच्या ध्यासाचे सूत्र असते. फ्री विल म्हणजे फ्री मार्केट किंवा मुक्त बाजारपेठ नसून, अशा बाजारपेठेच्या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मुक्तीचा लढा होय.
एका बाजूला ‘स्मार्ट सिटीज’सारख्या गुळगुळीत घोषणा होत असताना त्याच समाजात बायकांनी ‘राइट टू पी’ची मागणी करावी याची आपल्याला व आपले सरकार चालवणाऱ्या धुरिणांना लाज वाटू नये याचा अर्थ काय? ‘राइट टू पी किंवा पू’ ही वरवर पाहता स्त्रियांची चळवळ दिसत असली तरी ती तशी नाही. म्हणूनच ‘स्वच्छता अभियान’सारख्या भोंगळ कार्यक्रमात आणि टॉयलेट्स बांधण्याच्या प्रकल्पात समाविष्ट करून तिचे प्रश्न संपणार नाहीत.
समाजातल्या कोणत्या वर्गाला हा प्रश्न अधिक भेडसावतो हा खरा प्रश्न आहे व का भेडसावतो हा दुसरा मूलभूत विकारावर बोट ठेवणारा प्रश्न आहे. मायकेल व रॉय यांच्या प्रयोगातून क्षणाक्षणाच्या शारीर अनुभवातून आलेल्या विकलतेतून भवताल कसा रोगट व अर्थहीन दिसतो याचे दर्शन होते तर रिचर्ड लेवोन्टीनसारख्या डाव्या विचारांच्या शास्त्रज्ञाच्या लिखाणातून जीवशास्त्रातील मूलभूत सिद्धान्तावर केवळ शारीरिक वा नैसर्गिकच नव्हे तर त्या त्या समाजाच्या सामाजिक व राजकीय इतिहासाचे तेवढेच महत्त्वाचे परिणाम कसे होतात हे स्पष्ट झाले आहे.
सार्वजनिक मुताऱ्या असाव्यात, स्त्रियांसाठी शौचालये असावीत, सर्वाना सारखे शिक्षण मिळावे, सर्वाना घरे असावीत, मोकळ्या जागा वा जंगले असावीत, नद्या स्वच्छ असाव्यात आदी गोष्टींवर समाजात एकमतच असते व असे एकमत असूनही लोकशाही व्यवस्थेत जेव्हा वरीलपैकी एकही गोष्ट प्रत्यक्षात उतरत नाही तेव्हा व्यवस्था लोकशाही असण्याच्याच शक्यतेबद्दल शंका येते.
प्रबळांच्या इच्छेवर चालणारी व्यवस्था अशा वेळी ‘मार्केट इज मोस्ट डेमोक्रॅटिक’ अशी भंपक विधाने करून लघवी करण्यापासून शिक्षणापर्यंत आणि आरोग्य सेवेपासून राहण्याच्या जागेपर्यंत अशा सर्वच मूलभूत गरजांना विक्रीयोग्य वस्तू ठरवून विकू लागते. पैसे असतील तरच मुता किंवा शिक्षण घ्या असे सांगणारी निबर व्यवस्था व त्यांचे गब्बर प्रवक्ते उलथणे, व्यवस्था बदलणे वा तिच्या बदलासाठी काम करणे हे ‘राइट टू पी व पू’ अशा चळवळींचे काम आहे.
गावोगाव शौचालये बांधण्याच्या करोडो रुपयांच्या प्रकल्पांमुळे त्यात उडय़ा घेणाऱ्या देशी व विदेशी कंपन्या, संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते भांडवली व्यवस्थेच्या रेटय़ामुळे चळवळींच्या बदल करण्याच्या राजकारणाचे मर्म बेमालूमपणे बदलून त्याचे गोड सामंजस्यात रूपांतर करण्यात आपोआपच गुंतत जातात. देखावे व जाहिराती, आलिशान समारंभ व भाषणबाजी यातून क्षणिक ‘मुक्त इच्छा बळा’चा आभास निर्माण होतो. परंतु मूत्राशयात वाढणारा खडा व वंचनेचा मस्तकशूळ त्यामुळे कमी न होता वाढतच जातो.
व्याधिग्रस्त, दुर्बल व हताश समाज हे रुजत चाललेल्या हुकूमशाहीचे व मेलेल्या लोकशाहीचे लक्षण आहे. डिटरमिनिझम किंवा सूत्रबद्धतेचे विज्ञान हा त्याचा नैसर्गिक पाया आहे. मुक्तीसाठी म्हणूनच, थोपवणे नव्हे तर यथेच्छ मुतणे हाच उपाय आहे, याची जाण करूण देणे हे अशा चळवळींचे काम आहे- तसेच ‘राइट टू सिटी’ नसेल तर ‘राइट टू पी किंवा पू’ला अभिप्रेत असलेले शौचालय उभे राहणे अशक्य आहे हे या चळवळीने दिलेले भान आहे.

संजीव खांडेकर – sanjeev.khandekar@gmail.com
* लेखक चित्रकार, कलाचिंतक आणि नवतत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.

Sick Painting
‘ निस्तेज चित्र’,
२००६. संजीव खांडेकर, कागदावर स्वत:ची उलटी, त्यावर वाढलेली बुरशी