तो चतुर्थीचा दिवस होता. दिवंगत प्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले सोलापुरात आले होते. गणपती अथर्वशीर्षांचे अस्खलित पठणाचे बालस्वर त्यांच्या कानावर पडले आणि अनाहूतपणे त्यांचे पाय तिकडे वळले. जवळच असलेल्या ज्ञानमंदिरात ते दाखल झाले. शांतपणे स्पष्टोच्चारात विद्यार्थिनींचे अथर्वशीर्ष पठण सुरू होते. ते भारावले. त्यांचा त्या वेळचा तो ‘अभिप्राय’ आजही ‘सोनामाता कन्या विद्यालया’च्या भिंतीवर दिमाखात चमकतोय..
सोलापुरातील सात रस्त्याजवळील मोदीखाना परिसरातील एका गजबजलेल्या भागात पंखा विहिरीशेजारी हिरव्यागार झाडीत लपलेली एक कौलारू इमारत व दुरूनच दिसणारे सोनामातांचे मंदिर. आत प्रवेश करताच दर्शन होते एका संस्कारक्षम ज्ञानमंदिराचे. हीच ती सोनामाता कन्या विद्यालय.
१९६८ साली दिवंगत वाजपेयी नानासाहेब अत्रे यांनी त्यांचे गुरू अक्कलकोटजवळील शिवपुरीचे अग्निपूजक श्री गजानन महाराजांच्या मातोश्री सोनामातांच्या नावाने कन्या विद्यालय सुरू केले. माध्यमिक विभागात सुरू झालेले विद्यालय आज पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक असे तीन विभागांत विस्तारले आहे.
या शिक्षकांची भूमिका दुहेरी
या विद्यालयात प्राथमिक विभागात ३५०, तर माध्यमिक विभागात जवळपास ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे २००९ सालापासून सहशिक्षणाचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामुळे आता मुलींबरोबर मुलेसुद्धा या शाळेत अध्ययन करीत आहेत. शाळा जरी शहरातील मध्यवर्ती परिसरात असली तरी शाळेत येणारा विद्यार्थिवर्ग कष्टकरी समाजातील आहे. जवळच रेल्वे पोर्टर चाळ, रामवाडी, चिंतलवार वस्ती, माजी गुन्हेगार वसाहत अशा आर्थिक दुर्बल व अशैक्षणिक स्तरातील लोकवस्ती. मोलमजुरी करून उपजीविका चालविणारा पालकवर्ग जवळपास ७० टक्के आहे. उकिरडय़ातील केरकचरा व काचा गोळा करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या गलिच्छ व उपेक्षित भागातून मुले-मुली याच शाळेत शिक्षणाचे धडे घेतात. घरात शिक्षण व संस्काराचे महत्त्व कमी, हे जाणून सोनामाता कन्या विद्यालयातील शिक्षक दुहेरी भूमिका बजावतात. पाठय़पुस्तके शासनाने पुरवली असली तरी गणवेश, वह्य़ा व इतर खर्च शिक्षक सहभागातून केला जातो.
मूल शाळेपर्यंत येण्यासाठी जे जे काय प्रयत्न करावे लागतील, ते करण्यास शिक्षक तत्पर असतात. घरातील आर्थिक अडचणींमुळे कधी कधी मुले शाळेत न येता कामावर जातात. त्याचीही दखल घेऊन शालेय कामकाजात त्याला सवलत दिली जाते. दहावीच्या वर्गातील एक विद्यार्थी पूर्वपरीक्षेला गैरहजर राहिला. चौकशीअंती असे समजले की, वैयक्तिक शौचालय अनुदान शासनाकडून मिळाले आहे. ठरलेल्या वेळेत घरात शौचालय बांधले पाहिजे. त्यामुळे तो घरीच राहून शौचालयाचे बांधकाम करीत होता. आजकाल पाण्याचा प्रश्न रौद्ररूप धारण करीत असताना विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजांसाठी झगडावे लागते. त्याचाही विचार विद्यालयात केला जातो.
यशाचे गमक – सांस्कृतिक विभाग
सुसंस्काराचे महत्त्व जाणून शासनाने मूल्यशिक्षण हा नवीन विषय पाठय़क्रमात अनिवार्य केला, पण सुरुवातीपासूनच या संस्थेत मूल्यशिक्षणाचे पाठ दिले जात होते. सर्व धर्माचे संस्कारक्षम कार्यक्रम आजतागायत या शाळेत राबविले जातात. शाळा रक्षाबंधन, भाऊबीज यांसारखे सण साजरे करते, परंतु या सणांच्या अत्यंत वेगळ्या प्रकारच्या साजरीकरणातून शाळेने त्यांना नवे आयाम दिले आहेत. भाऊबीजेच्या दिवशी कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत जाऊन कुष्ठरोग्यांना विद्यार्थिनी ओवाळतात. विद्यार्थिदशेतच सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्या मनात रुजावी हा हेतू.
शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी याबरोबरच सोनामातांच्या साक्षीने गेली ४५ वर्षे शारदीय नवरात्रोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी शारदोत्सव व्याख्यानमालांतून सरस्वतीचा जागर सुरू आहे. यात विद्यार्थ्यांना आकलन होईल, असे विषय घेतले जातात. पाणी, स्वच्छता, वाहतूक नियम, स्त्री शक्तीची रूपे, कथाकथन, विद्यार्थ्यांचे कवितावाचन, अभिवाचन इत्यादी कार्यक्रम आयोजिले जातात.
या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे ४० मिनिटे चालणारी दैनंदिन प्रार्थना. नित्यनेमाने अनुक्रमे भगवद्गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय, प्रज्ञावर्धन स्तोत्र, अथर्वशीर्ष, संस्कृत स्तोत्रे तसेच गीतमंच व देशभक्तीची समूहगीते आदींची आवृत्ती केली जाते. शिवाय शालेय विषयांचे विशेष कार्यक्रम.
तंत्रज्ञानाचा वापर
नवीन शैक्षणिक धोरणानुसार तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात केला जातो. शाळेत सुसज्ज संगणक कक्ष आहे. प्रोजेक्टर आहे. तसेच गणित, विज्ञानासारखे विषय शिकविण्यासाठी ई-लर्निग प्रोसेसही आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला या नवीन तंत्रज्ञानानुसार संगणक हाताळण्यास दिले जातात. यातून उकिरडय़ावर काच, कचरा गोळा करण्यासाठी धडपडणारे हात मोठय़ा आत्मविश्वासाने संगणकाची हाताळणी करतात.
शाळाबाह्य़ परीक्षा
शालेय अभ्यासाबरोबर व शाळाबाह्य़ परीक्षांमध्येही शाळेतील विद्यार्थी सहभागी होतात. शाळा अशा स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांनी बसावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते. त्यांच्याकडून तयारीही करवून घेते. त्यामुळे वेगवेगळ्या नामांकित शिक्षण संस्था तथा अभिमत विद्यापीठांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इंग्रजी, गणित, हिंदी, संस्कृत व चित्रकला यांसारख्या परीक्षांमध्ये या शाळेचे विद्यार्थी उज्ज्वल यश प्राप्त करतात.

गुणवत्तावाढीचा कार्यक्रम
कोणत्याही शाळेचे यश हे त्याच्या बोर्डाच्या निकालावर अवलंबून असते. पूर्वी शाळेचा निकाल ५० टक्क्य़ांपर्यंत असायचा. विद्यार्थ्यांमध्ये खासगी शिकवणी वर्गात जाण्याची कुवत नाही म्हणून शाळेतच उन्हाळी वर्ग, हिवाळी वर्ग याशिवाय जादा मार्गदर्शन केले जाते; परंतु डिसेंबर महिन्यात नियोजनपूर्वक प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तावाढीसाठी कार्यक्रम राबविला जातो. परिणामी दहावी वर्गाचा परीक्षा निकाल आता ७५ ते ८० टक्क्य़ांपर्यंत वाढण्यास मदत झाली आहे.
सांस्कृतिक, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रांत शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. वक्तृत्व, निबंधलेखन, पाठांतर, हस्ताक्षर, विज्ञानप्रयोग, रांगोळी, चित्रकला इत्यादी स्पर्धा शालेय स्तरावर होतच असतात; परंतु शाळाबाह्य़ स्पर्धेतही विद्यार्थी चमकतात. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन गेली चार वर्षे विद्यालयात पाचवीपासून सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू केले आहेत. गेली चार वर्षे सेमी इंग्लिश माध्यमाचा निकाल शंभर टक्के असतो.
आजकाल शिक्षणाचे बाजारी स्वरूप झाले असले तरी सोनमाता कन्या विद्यालयात कोणत्याही देणगीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शिक्षणासाठी आवश्यक ते साह्य़ही केले जाते. शाळेत तळागाळातले विद्यार्थी शिक्षण घेतात, याची जाणीव ठेवूनच कोणतेही शिक्षक खासगी शिकवणी न घेता विद्यार्थ्यांना जादा मार्गदर्शनासाठी तत्पर असतात. पूर्वी दहावी बोर्डाच्या परीक्षेत केवळ उत्तीर्ण होणारे विद्यार्थी अधिक असायचे; परंतु आज विशेष योग्यता, प्रथम श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. अशी गुणात्मक प्रगतीही येथे साधली आहे. अशी ही शाळा समाजावर सुसंस्काराचा ठसा उमटविण्याचे काम अविरतपणे करीत आहे.

संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com

एजाजहुसेन मुजावर