‘राष्ट्र सेवादला’च्या माध्यमातून लोकप्रबोधन करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांकरिता पुनर्वसनाचे आदर्शवत काम उभारणाऱ्या समाजवादी विचारसरणीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां सुधाताई  वर्दे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्फूर्तिदायी व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध..
मधु दंडवते यांच्या अंत्यदर्शनासाठी धडपडत मंत्रालय परिसरातल्या जनता पक्षाच्या कार्यालयात पोचले. सभोवार ओळखी-अनोळखी, गंभीर-दु:खी चेहऱ्यांची गर्दी. एकेक जण अंत्यदर्शन घेऊन बाजूला किंवा कार्यालयाबाहेर येऊन थांबत होता. दंडवत्यांचा देह जिथे ठेवलेला होता त्याच्या साधारण जवळच सुधाताई अत्यंत गंभीरपणे उभी होती. दंडवत्यांसारखा मित्र, नेता गेल्यानंतर मन व्याकूळ तर होणारच. आता अगदी थोडय़ाच वेळात, देहदान करण्याचं ठरवलेल्या दंडवत्यांचं शव जे.जे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार होतं आणि आलीच ती वेळ. सुधाताई त्या वेळेस राष्ट्र सेवादलाची अध्यक्ष असावी. ती पुढे आली. तिनं सेवादलाच्या शिस्तीत आपल्या या नेत्याला सर्वाकडून मानवंदना देवविली, राष्ट्रगीत झाले, सगळे जण विखरून जड अंत:करणानं आपापल्या मार्गाला लागले.
दंडवत्यांबद्दलच्या असंख्य आठवणींचा पट मनात सुरू होता, पण त्यातच सुधाताईंची ती गंभीर आणि दु:खी भावमुद्रा डोळ्यांसमोरून हलेना. मनात आलं, सुधाताईंच्या एरवीच्या खळाळत्या स्वभावामागचं वृत्तिगांभीर्य आपण कधी लक्षातच घेतलं नाही का? या बाईनंसुद्धा काय काय आणि किती किती अनुभवलं, पचवलं आणि इतरांसाठी उधळत राहिली – एकदा सांगितलंच पाहिजे तिनं तिच्या आयुष्यातलं भलंबुरं, तिच्या मनात दडलेले माणिकमोती, तिच्या खूपखूप आठवणी.
लिहिण्यासाठी तिला आधी विनंती केली, तर तिनं ‘मी? मला लिहायला सांगतेस?’ म्हणून तिच्या हसण्याच्या खळखळाटात उडवूनच लावलं, अपेक्षेप्रमाणेच. मग अजिजीनं पटवायला लागले, शेवटी हट्टालाच पेटले – तरी तिचं चाललंच होतं, ‘अगं, मी कुठे लिहितेबिहिते? मी आपली नाचणारी आणि काम करणारी बाई.’ म्हटलं, ‘अगं, तेच ते, तुला सेवादलामुळे मुक्तपणे खेळण्याची, गाण्याची, नाचण्याची, स्वतंत्रपणे विचार करण्याची ही संधी कशीकशी मिळत गेली ते आजच्या पिढीला कळायला नको का?’ मग मात्र बाईसाहेबांनी मनावर घेतलं. आणि कळायला लागल्यापासूनच्या तिच्या आठवणी, तिचे अनुभव, तिचे वेगवेगळ्या विषयांसंबंधातले विचार, तिनं केलेली असंख्य म्हणावीत अशी कामं- असं जे जे काही सांगितलं – त्याचीच झाली मग एक, ‘झऱ्याची गोष्ट’, म्हणजेच सुधाताईंचं आत्मकथन. कमालीचं बोलकं, प्रांजळ, हसवणारं आणि दु:खी करणारं. गंभीर आणि मिस्कीलही. मराठी आत्मकथनांमधलं एका पारदर्शक आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवणारं आगळंवेगळं आत्मकथन, मुळातूनच वाचायला हवं असं!
या लेखनाच्या निमित्तानं मला सुधाताई अधिक उलगडत गेली. एरवी मी तिला जरा दुरूनच पाहात होते. प्रमिला दंडवतेंनी छबिलदास हायस्कूलच्या एका वर्गात एक मीटिंग घेतली होती आणि त्यावेळी बाकावर बसलेल्या नलूताई बापट आणि सुधाताई वर्दे यांच्याशी माझी आमनेसामने जरा बऱ्यापैकी अशी ओळख झाली. पुढे आम्ही प्रमिला दंडवतेंनी सुरू केलेल्या उपक्रमांच्या निमित्ताने वा इतर काही कारणांनी भेटत असू. त्यावेळची उत्साही सुधाताई मला आठवते आणि तोच उत्साह तिच्यामध्ये शेवटपर्यंत तसाच टिकून राहिला होता, शरीर थकत होते तरी.
सुधाताईची महाराष्ट्राला झालेली पहिली ओळख म्हणजे राष्ट्र सेवादलाच्या कलापथकात काम करणारी प्रमुख कलावंत,  खास करून ‘झेलमचे अश्रू’ या नृत्यनाटिकेतली ‘झेलम’ सरिता. त्यातलं तिचं नृत्यकौशल्य खिळवून ठेवणारं होतं. सेवादलाच्या कलापथकाचं नेतृत्व वसंत बापट, लीलाधर हेगडे यांच्याबरोबरच सुधाताईंकडेही होतं. कलापथकात ती तिच्या वयाच्या १६व्या वर्षांपासून ते ४४व्या वर्षांपर्यंत म्हणजे तब्बल ३५ वर्षे अखंड काम करीत होती. वेगवेगळी वगनाटय़े, नृत्यनाटिका, ‘शिवदर्शन’, ‘महाराष्ट्र दर्शन’सारखे इतिहासावर आधारलेले कार्यक्रम, ‘चिनी आक्रमणाचा फार्स’ यासारख्या अनेक कार्यक्रमांत ती स्वत: नृत्य आणि अभिनय करायचीच, पण पुढच्या काळात कलापथकाच्या मुलींच्या संघटनांचीही जबाबदारी तिच्यावर आली. पन्नास-पन्नास तरुण मुला-मुलींचा गट घेऊन महिनामहिना एकत्र फिरायचं, रात्ररात्र प्रवास करायचा हे काम सोपं नव्हतं. दौऱ्याआधी शिबिरंही असायचीच. सुधाताई संघटक. कलापथकाची विशेषत: मुलींची जबाबदारी सुधाच फार काळजीपूर्वक आणि ममतेनं  पार पाडत असे.  
सुधाताईला उपजतच नृत्यकला वश होती, शास्त्रीय नृत्याचं रीतसर शिक्षण तिला घेता आलं नव्हतं. ‘झेलमचे अश्रू’मध्ये तिनं भरतनाटय़मचाही सराव केला आणि ‘भारत दर्शन’ या कार्यक्रमात भारतातल्या सर्व राज्यांच्या नृत्यशैलींचं दर्शन व्हावं म्हणून तिनं ‘छाऊ’ या लोकनृत्याचा प्रकारही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिकून घेतला. पुढे रमेश पुरव, राघवन नायर, केलूचरण महापात्रा अशांसारख्या गुरूंकडून आवश्यक ते सर्व शिकू शकली. कारण नृत्यकलेबद्दलचं तिचं प्रेम, तिचा ध्यास. पुढे तिच्या कन्येनं -झेलमनं महापात्रांकडे ओडिसी नृत्याचं शिक्षण घेऊन आपल्या गुणी, अकाली गेलेल्या कलावंत मैत्रिणीच्या, स्मिता पाटीलच्या नावानं ‘स्मितालय’ ही नृत्यसंस्था सुरू केली. अर्थातच त्यामुळे सुधाताईला केवढं तरी समाधान मिळालं. ‘महाराष्ट्र दर्शन’प्रमाणेच ‘भारत दर्शन’ हा रंगमंचावरचा भव्य कार्यक्रमही कलापथकाचा गौरव वाढवणारा ठरला, ज्याचं श्रेय वसंत बापट, लीलाधर हेगडे, वसंत देसाई यांच्या- बरोबरीनं सुधाताईलाही आहे.
लोकरंजन आणि लोकप्रबोधन हे राष्ट्र सेवादलाच्या कलापथकाचं प्रयोजन होतं. पुढे जेव्हा तिने राष्ट्र सेवादलाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा कुणीसं म्हणालं, ‘चला, आता समाजकार्यासाठी सुधासारखी कार्यकर्ती मिळाली.’ पण सुधानं त्यावर तत्काळ प्रतिक्रिया दिली की कलापथकाचं काम हे एक प्रकारची समाजसेवाच आहे. कारण नानासाहेब गोरेंनी सांगितलंच होतं की, समाजाला जे जे आवश्यक आहे ते ते करायचं आणि त्यासाठी आपल्या आवडीच्या माध्यमातून तुम्ही काम करा. म्हणजे आयुष्यात ध्येय आणि तृप्ती अशी विसंगती राहणार नाही.
राष्ट्र सेवादलाच्या वाटेवरून प्रमिलाताईनं सुधाताईला मैत्रीच्या अधिकारानं आणि सक्तीनंच म्हणायचं खरं तर, पण महिला दक्षता समितीच्या कामात ओढलं आणि सुधाताई तिच्या स्वभावानुसार त्यात आकंठ बुडून गेली. हे काम तिनं सलग बारा र्वष  केलं. या कामामुळे तिला एकूण समाजव्यवस्थेचं एक विराट दर्शन झालं आणि तिच्या विचारांचा परीघ विस्तारला. सेवादलाचं काम करीत असताना विशिष्ट विचारांच्या लोकांमध्येच तिचा जास्त वावर असे. पण आता या कामात गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित, बहुशिक्षित माणसंही बाईला कसं गृहीत धरतात, दबावात ठेवतात, तिच्यावर तऱ्हातऱ्हांनी अन्याय करतात हे तिला उमजलं. नोकरी करून पैसे मिळवत असली तरी बाईला स्वातंत्र्य नाहीच. स्त्रियांवर होणाऱ्या अगणित अन्यायांचं स्वरूप तिच्यासमोर स्पष्ट होऊ लागलं आणि सुधा अस्वस्थ होऊन गेली. विशेषत: बायकांच्या जळिताच्या केससाठी रात्रीअपरात्री सायन रुग्णालयात जाऊन आली की मग रात्ररात्र झोप नाही.   स्त्रियांच्या प्रश्नांबाबत स्वत:ला अलिप्त ठेवून ते सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा हे तिला कळत होतं पण वळत नव्हतं. तरी पण तिनं तिच्या सहकाऱ्यांसमवेत अनेक स्त्रियांना मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी तिनं पूर्वापार चालत आलेल्या नीतिनियमांची धार्मिक आणि आधुनिक काळातल्या कायद्यांची, स्त्रियांच्या हक्कांची माहिती करून घेतली. आता ‘स्त्री मुक्ती’ या संकल्पनेचा आशय नेमकेपणानं तिच्या लक्षात येऊ लागला आणि याबाबत ती स्वत:च्याही जीवनाबद्दल विचार करू लागली.
याच काळात तिची सेन्सॉर बोर्डवर नेमणूक झाली होती. एका चित्रपटात, एका सुनेचा वांझ म्हणून, पांढऱ्या पायाची म्हणून अतोनात छळ दाखवला होता आणि दोन महिन्यांनी तिनं वंशाला दिवा दिला आणि बाळंतपणात मरून गेली. तिच्या दहनानंतर म्हणे ती ‘देवी’ झाली. अशा प्रकारचं अंधश्रद्धा पसरवणारं कथानक असलेल्या ‘माहेरच्या साडी’सारख्या चित्रपटाला तिनं कडाडून विरोध केला होता. स्त्रियांना धाय मोकलून रडायला लावणाऱ्या चित्रपटाला वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून सेन्सॉरच्या कात्रीतून कसे सोडवायचे हे इतर सदस्यांना अवगतच! ‘माहेरची साडी’ पास झाला. निर्माते सुधाला भेटायला घरी आले, सुधानं हात जोडून त्यांना दरवाजा दाखवला.
१९९३ मध्ये सुधाला शामराव पटवर्धनांनी मृत्युशय्येवरून पत्र लिहून सेवादलासाठी बोलावून घेतलं आणि सुधा पुन्हा संघटनेत मग्न झाली. त्याच वर्षी ३० सप्टेंबरला विध्वंसकारी भूकंप झाला आणि पीडितांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मदतपथक घेऊन सुधा दीडदीड महिना लातूर आणि उस्मानाबाद परिसरात गेली. त्यावेळी तिच्याबरोबर महिला दक्षता समितीतल्या दोन सहकारी होत्या. या संकटातून अनाथ झालेल्या मुलांचा उद्भवलेला फार मोठा प्रश्न होता. ही मुलं निसर्गकोपानं हादरलेली, झोपच हरवून बसलेली, खरजेनं ठासलेली. त्यांची सुधानं व सेवादलाच्या इतर कार्यकर्त्यांनी अतिशय काळजी घेतली. त्यावेळेस शाळांमधून, तंबूंमधून त्यांची तात्पुरती सोय केली होती. सेवादल कार्यकर्त्यांनी अक्षरश: खस्ता खाल्ल्या आणि मग त्याच भागात या मंडळींनी शासनाने दिलेल्या जागेवर शाळा बांधली. दिवसा शाळा आणि रात्री घर, अशी ही शाळा. संस्थेचं नाव ‘आपलं घर’. या कामात सुधाताईंसमवेत अनू वर्दे (म्हणजे प्रा. वर्दे) आणि पन्नालाल सुराणा यांनीही जीव ओतला! संस्था भरभराटीस आली.
त्याआधी सुधा उत्तर भारतात सेवादल शिबिरासाठी गेली होती. उत्तर बिहारमध्ये एका आंतरराष्ट्रीय संघटनेनं चहा मळ्यातल्या, ज्यूट मळ्यातल्या आणि भातशेतीतल्या मजूर संघटनांचं एक शिबीर घेतलं होतं. त्याला ती आवर्जून हजर राहिली. बघते तर एकही मजूर बाई शिबिरामध्ये नाही. या भागात एस. एम. जोशींबद्दल त्यांच्या कामामुळे भक्तिभाव असलेले काही लोक होते. त्यांच्या मदतीनं सुधानं मजूर स्त्रियांची शिबिरं घ्यायला सुरुवात केली आणि स्वत:ला अत्यंत हीन-दीन मानणाऱ्या त्या स्त्रिया आपल्या हक्कासाठी इतक्या सजग झाल्या, पेटून उठल्या, अन्यायाविरुद्ध लढण्याची इतकी हिंमत आली, की मैलोन्मैल अनवाणी चालत येणाऱ्या त्या पाच पाच, दहा दहा हजारांच्या संख्येनं मोर्चे काढायच्या! आजही पूर्णिया जिल्ह्य़ात स्त्रियांसाठी सेवादलाकडून शिबिरं घेतली जातात. सुधा त्या भागात शेवटपर्यंत जात राहिली, कारण त्या बायकांचे प्रेम आणि विश्वास. त्यांचा आग्रह असा असायचा, ‘ताई आयी, आग लगा के चली गयी, ये नहीं चलेगा!’ सुधाताईंनी केवढा विश्वास निर्माण केला या स्त्रियांमध्ये!
कच्छमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हाही सुधा मदत पथकाबरोबर धावलीच होती. तेथेही ती लोकांमध्ये मिसळली, झोपडय़ा झोपडय़ांत सभा घेतल्या, बायकांना समजावलं आणि देवेन्द्र या कार्यकर्त्यांला आर्थिक साहाय्य मिळवून देऊन त्याच्या प्रयत्नांनी शाळा, वसतिगृह सुरू झालं. सुधाला आणि प्रा. वर्दे यांनाही या परिसराचा लळा लागला.
‘आणीबाणी’च्या काळात सुधावर दोन कामे सोपवलेली होती. आणीबाणीविरोधी सत्याग्रहींच्या तुकडय़ा तयार करायच्या आणि अटक झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करायची व तिचे योग्य रीतीने वाटपही करायचे. सत्याग्रहाबाबतचे काही अनुभव रोमहर्षक म्हणावेत असेच होते. मग यथावकाश सुधाताईंनाही पकडलंच सरकारनं, कारागृहातल्या बडय़ा सत्याग्रही बायकांबरोबरचा पंक्तिप्रपंच अनुभवायला!

१९७७च्या निवडणुकीनंतर अनू वर्दे शिक्षणमंत्री झाले. मंत्र्याचा प्रचंड बंगला, सतत पाहुणे, मीटिंगा, सभा, पण मंत्रीणबाई झाली म्हणून सुधाने आपली कामे सोडली नव्हती. उलट वर्दे यांच्या मतदारसंघाकडे ती नेहमीच लक्ष पुरवीत राहिली. भाऊसाहेब रानडे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, नानासाहेब गोरे आदींबद्दल सुधाच्या मनात खूप आदर होता. गांधीजी, साने गुरुजी आणि दाजी म्हणजे तिचे सासरे यांना तिच्या मनात देवासारखं स्थान होतं. वसंत बापट आणि लीलाधर हेगडे हे तर तिचे मित्र, सहकारी आणि कुटुंबीयही. तिच्या मनात विस्तारित कुटुंबाची कल्पना असायची, ज्यात आवाबेन देशपांडे आणि नलूताई बापट आणि त्यांच्या कुटुंबीयांचा तिनं समावेश केला होता आणि तसे तर तिच्या ‘कपिलवस्तू’ या जुन्या घरामध्ये किती तरी मंडळी येऊन राहून घरचीच होऊन गेलेली होती. सुधाताईला तिचं आणि अनू वर्दे यांचं सहजीवन हे सर्वार्थानं आदर्श सहजीवन वाटत होतं आणि वर्दे यांच्यासारख्या जोडीदाराची साथ मिळाली म्हणूनच ती तिच्या आयुष्यात तिच्या मतानं मनासारखं (आणि समाजाच्या दृष्टीनं म्हटलं तर एवढं मोठं आणि महत्त्वाचं) काम करू शकली. तिनं तिच्या आत्मकथनात प्रारंभीच म्हटलं आहे, ‘दोन व्यक्ती वर्षांनुर्वष एकत्र जगतात ते सहजीवन आणि दोन्ही व्यक्तींना आपल्या आयुष्यात जे करायचं आहे ते आयुष्यभर आनंदानं करायला मिळणं, परस्पर विश्वासानं, सहकार्यानं आपलं आयुष्य संपन्न करणं हे आदर्श सहजीवन.’ असं सुंदर सहजीवन ज्यांना लाभलं ते दोघं आता आपल्यामध्ये नाहीत, अपरिहार्यच आहे हे. एवढय़ातल्या एवढय़ात किती मोठी माणसं काळाच्या पडद्याआड गेली. एक मात्र खरं, या मंडळींनी जग चांगल्या अर्थानं बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा डाव संपला. पण खेद कशाला? आठवणी तर आहेतच, आपण आहोत तोवर..