आजी-माजी लोकप्रतिनिधींचा मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणुकीत किंवा सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पत्नीला-मुलाला वा कुटंबातील अन्य सदस्यास उमेदवारी देऊन सहानुभूतीच्या भावनेचा वापर करून निवडणुकीतील विजयाची निश्चिती करण्याची पद्धत सुरू झाली आहे. आता तर घरात उमेदवार देऊन इतर पक्षांनी शक्यतो उमेदवारच देऊ नये व निवडणूक बिनविरोध व्हावी असे एक प्रकारचे ‘निवडणूक फिक्सिंग’ वाढत चालले आहे. राज्यातील अशा काही उदाहरणांचा हा आढावा.

रंजना कुल (दौंड)
*दौंडमधील राष्ट्रवादीचे आमदार सुभाष कुल यांचा जुलै २००१ मध्ये मृत्यू.
*त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी रंजना कुल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी.
*रंजना कुल या गृहिणी होत्या. राजकारणात काम केले नव्हते.
*भाजपचे वासुदेव काळे यांच्याविरोधात त्यांचा विजय.

हर्षदा वांजळे (खडकवासला)
*खडकवासल्यातील मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचा जून २०११ मध्ये मृत्यू.
*त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना मनसेऐवजी त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी.
*त्या राजकारणात सक्रीय नव्हत्या.
*भाजपच्या भीमराव तापकीर यांच्याकडून पराभव.

महानंदा तानवडे (अक्कलकोट)
*अक्कलकोटचे भाजप आमदार बाबासाहेब तानवडे यांचा जानेवारी १९९६ मध्ये मृत्यू.
*भाजपकडून त्यांच्या पत्नी महानंदा तानवडे यांना उमेदवारी.
*त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या.
*काँग्रेस उमेदवार सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडून पराभूत.

सुमन पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ)
*राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारी रोजी निधन.
*पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी.
*त्या राजकारणापासून पूर्णत अलिप्त. उमेदवारीअर्ज दाखल केल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या.
*११ एप्रिल रोजी तेथे मतदान.

श्यामल बागल (करमाळा)
*करमाळ्यातील नेते दिगंबर बागल यांचे फेब्रुवारी २००५ मध्ये निधन.
*२००९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे त्यांच्या पत्नी श्यामल बागल यांना उमेदवारी.
*त्या गृहिणी होत्या.
*जनसुराज्य शक्तीचे नारायण पाटील यांच्याविरोधात विजयी.
*२०१४ मध्ये त्यांच्या कन्या रश्मी बागल-कोलते यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी.
*शिवसेनेचे नारायण पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव.

अमित झनक (रिसोड)
*रिसोडचे आमदार सुभाष झनक यांचा ऑक्टोबर २०१३ मध्ये मृत्यू.
*एप्रिल २०१४ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून त्यांचे पुत्र अमित झनक यांना उमेदवारी.
*आधी राजकारणात फारसे काम नाही.
*मोदी लाटेवर मात करीत विजयी.

प्रीतम खाडे (बीड)
*भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे जून २०१४ मध्ये निधन.
*मुंडे यांच्या घरातच उमेदवारी दिल्यास निवडणूक लढणार नसल्याचे राष्ट्रवादीकडून जाहीर.
*मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रीतम खाडे यांना भाजपची उमेदवारी.
*प्रीतम यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता.
*ऑक्टोबर २०१४ मधील पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम खाडे निवडून आल्या.

डॉ. तुषार राठोड (मुखेड)
*विधानसभेवर २०१४ मध्ये निवडून आलेल्या गोविंद राठोड यांचा शपथ घेण्यापूर्वीच मृत्यू.
*नंतर उमेदवारीवरून त्यांच्या दोन्ही मुलांत वाद.
*अखेर डॉक्टर असलेल्या तुषार यांना उमेदवारी.
*जाने. २०१५ मधील पोटनिवडणुकीत विजय.

संध्यादेवी कुपेकर (चंदगड)
*माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांचा नोव्हेंबर २०१२ मध्ये मृत्यू.
*त्यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी.
*राजकारणात येण्यापूर्वी त्या गृहिणी होत्या.
*फेब्रुवारी २०१३ च्या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय.

प्रिया दत्त (वायव्य मुंबई)
*काँग्रेसचे नेते सुनील दत्त यांचे मे २००५ मध्ये निधन.
*लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांची मुलगी प्रिया दत्त यांना उमेदवारी.
*आधी त्या वडिलांना निवडणुकीत मतदारसंघाच्या कामात मदत करीत.
*सहानुभूतीच्या लाटेत त्यांचा विजय.

आनंद परांजपे (ठाणे)
*शिवसेनेचे खासदार प्रकाश परांजपे यांचे फेब्रुवारी २००८ मध्ये निधन.
*मे २००८ मधील पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांना सेनेची उमेदवारी.
*तोवर आनंद परांजपे यांचे राजकीय कर्तृत्व काहीही नव्हते.
*सहानुभूतीच्या लाटेत त्यांचा विजय.

तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व)
*शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांचे जानेवारी २०१५ मध्ये निधन.
*पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना सेनेची उमेदवारी.
*११ एप्रिलला मतदान होणार.

नीलेश पारवेकर (यवतमाळ)
*नीलेश पारवेकर २००९ च्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसचे आमदार झाले.
*त्यांचे वडील आबासाहेब पारवेकर राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री होते.
*२०१३ मध्ये नीलेश पारवेकर यांचा मृत्यू.
*पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांना काँग्रेसची उमेदवारी.
*यापूर्वी त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या.
*निवडणुकीत त्यांचा विजय.
लोकशाहीमध्ये लोकांनी आपला प्रतिनिधी निवडून द्यावा तो त्याच्या चांगल्या कामांच्या जोरावर की सहानुभूतीच्या? राजकीय पक्षांनी कायदेमंडळात पाठविण्यासाठी उमेदवारांची निवड करावी ती त्याचे कार्यकर्तृत्व पाहून की त्याची वंशावळी? प्रश्न भाबडे आहेत. सध्याचा दुखावण्यासाठी सदा आसुसलेल्याच vv11असलेल्या भावनांना विवश झालेला काळ पाहता ते धाडसीही आहेत. परंतु ते विचारणे आवश्यक आहे आणि राजकीय पक्षांनीच नव्हे, तर मतदार यादीत नाव असलेला प्रत्येकच त्याला उत्तरदायी आहे. कारण यात मुख्य मुद्दा आपण लोकशाही मानतो की लोकशाहीच्या बुरख्याआडची सरंजामशाही हा आहे. गादीचा वारस त्या रक्ताचा, वंशाचा, कुळाचा नेमणे ही सरंजामशाहीतील रीत. अशा वारसाला कारभार चालविण्याचे ज्ञान, अनुभव असो वा नसो. घराण्याचा टिळा लागला की तो एकदम लायक होऊन बसतो. लोकशाहीत या घराणेशाहीला स्थान नाही. अर्थात याबाबत कोणाचेच दुमत नसते. सर्वाचाच घराणेशाहीला तत्त्वत: विरोध असतो. वस्तुत: एखाद्या राजकीय घराण्यातील पिढय़ांमागून पिढय़ा कर्तबगार निपजत असतील आणि आपल्या बापजाद्यांच्या vv10खांद्याचा सहारा न घेता स्वकर्तृत्वावर निवडून येत असतील तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र प्रत्यक्षात क्वचितच असे घडताना दिसते. या घराणेशाहीचाच पुढचा आणि अत्यंत घातक असा भाग म्हणजे अनुकंपेच्या राजकारणाचा. एखाद्या महनीय नेत्याच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा ही खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे त्या जागी त्या नेत्याच्या पत्नीला, मुला-मुलीला, कोणीच न मिळाल्यास भावाला वा पुतण्याला उभे करायचे आणि निवडून आणायचे ही लोकशाहीची थट्टा आहे. शासकीय नोकऱ्यांत अनुकंपा तत्त्वावर जागा भरण्यात येतात. त्यातलाच हा प्रकार. तेथे निदान त्या उमेदवाराचे शिक्षण, अनुभव हे तपासूनच त्याला त्यानुसार काम दिले जाते. येथे तेही नसते. राजकीय पक्षांसाठी ती जागा आपल्या दावणीला राहणे महत्त्वाचे असते आणि त्या नेत्यांच्या वारसांना गादीची परंपरा पुढे चालू ठेवण्यात रस असतो. त्या दिवंगत नेत्याप्रति लोकांच्या मनात वसत असलेल्या आदराच्या, प्रेमाच्या भावनांचा केवळ राजकीय स्वार्थी हेतूने वापर करून आपण त्याच्या स्मृतींचाच अपमान करीत असतो, हेही अशा वेळी कुणाच्या लक्षात येत नाही. हल्ली तर अशा अनुकंपा उमेदवाराला बिनविरोध निवडून द्यावे अशी एक मागणी पुढे येताना दिसते. सहानुभूतीचे राजकारणातून लोकशाहीच्या मूलतत्त्वांवरच कुऱ्हाड चालविण्याचा हा प्रकार आहे. यातून अन्य राजकीय कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो ही बाबसुद्धा लक्षात घेतली पाहिजे. सुदृढ आणि अभ्रष्ट लोकशाहीसाठी या अशा प्रथा बंद होणे आवश्यक आहे.