अण्वस्त्र युद्धाचा भडका उडू न देता पाकिस्तानला योग्य तो धडा कसा शिकवायचा, हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी आर्थिक नाकाबंदी, दहशतवादी तळांवर मर्यादित हल्ले असे पर्याय सुचवले जात असले तरी त्यातून कधी र्सवकष युद्धाचा भडका उडेल हे सांगता येत नाही. पाकिस्तानचे उट्टे काढायला आपले बाहू कितीही फुरफुरत असले तरी युद्धाच्या खर्चाचा आणि अन्य परिणामांचा विचार करता त्याला आवर घालणेच इष्ट ठरते. युद्धाची किंमत आणि परिणाम यांची जाणीव नसल्याने युद्धखोरीची भाषा येते. सतरा वर्षांपूर्वी कारगिल लढाईत विजयोत्सवासाठी मोजावी लागलेली किंमत या संदर्भात विचारात घेता येईल. छुप्या युद्धासाठी पाकिस्तानला येणारा खर्च आणि सैन्य मैदानात उतरविताना भारतास मोजावी लागणारी किंमत यांचा ताळमेळ जुळविणे केवळ अशक्य. भारताचा युद्धखर्च लक्षात घेतल्यास वास्तवाचे भान येईल..

अवघड ताळेबंद

लढाईत ५१९ भारतीय अधिकारी-जवान शहीद झाले आणि जवळपास ७०० जण जखमी झाले. देशासाठी बलिदान देणाऱ्या अधिकारी-जवानांचे मोल कशातही होऊ शकणार नाही. त्यांचे कुटुंबीय पोरके झाले. सरकारने कितीही मदत दिली तरी कुटुंबीय व देशाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले.

एक अधिकारी प्रशिक्षित करण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. जवानांचे खडतर प्रशिक्षणही त्याच स्वरूपात असते. या काळात इतर सीमावर्ती भागात सैन्य तैनाती तसेच नौदलाच्या हालचालींचा खर्चही विचारात घ्यावा लागेल.

लढाईत हवाई दलाने तीन विमाने गमावली. लढाऊ विमानांची किंमत कोटय़वधींच्या घरात आहे. लढाऊ विमाने आणि वैमानिक गमाविण्याचे नुकसान कधीही भरून न निघणारे.

हवाई उड्डाणावर मोठा खर्च होतो. लढाऊ विमानास प्रतितास उड्डाणाचा खर्च अंदाजे २६ हजार तर आयएल ७६, एएन ३२ या मालवाहू विमानांसाठी हाच खर्च ४० हजार रुपयांहून अधिक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

कारगिल युद्धात लढाईचा सर्वसाधारणपणे खर्च १० ते १५ कोटी रुपये प्रतिदिन होता. जवळपास ५० दिवस चाललेल्या या युद्धासाठी एकूण आठ ते दहा हजार कोटींच्या आसपास खर्च आल्याचा अनुमान आहे. त्यासाठी संबंधित युद्धाचे वर्ष आणि त्यापुढील वर्षांत संरक्षण क्षेत्रात झालेल्या खर्चाचा दाखला दिला जातो.

युद्धाचे प्रकार

  • मर्यादित युद्ध – सैन्यशक्ती, दारूगोळा आदींचा एका विशिष्ट भागातच वापर. युद्धक्षेत्र मर्यादित असल्याने कार्यवाही लवकर संपुष्टात येते.
  • र्सवकष युद्ध – शत्रू राष्ट्राचा विनाश हेच ध्येय. त्यात अण्वस्त्रांसह सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. युद्धक्षेत्र, रणभूमी अमर्यादित असल्याने मोठय़ा प्रमाणात वित्तहानी व प्राणहानीचा संभव.
  • आण्विक, गनिमी, रासायनिक, मानसशास्त्रीय, आर्थिक, इलेक्ट्रॉनिक्स असेही काही युद्धप्रकार आहेत.

कारगिलचे उदाहरण

  • कारगिलचे युद्ध मर्यादित युद्ध होते. विशिष्ट भागातच ते लढले गेले. खबरदारीचा उपाय आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन पाकिस्तानलगतच्या सीमेलगत भारतीय लष्कर मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आले. नौदलाने आपल्या युद्धनौका, पाणबुडय़ा पश्चिम तटावर आणून सज्जता राखली.
  • कारगिल युद्धात तोफखान्याने प्रारंभीच शत्रूवर तोफगोळ्यांचा अविरत केलेला वर्षांव आणि हवाई दलाच्या बॉम्बफेकीने निर्णायक वळण दिले.
  • दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदा एखाद्या युद्धात तोफगोळ्यांचा इतक्या प्रचंड प्रमाणात वापर झाला. बहुचर्चित बोफोर्स, मॉर्टर, रॉकेट लाँचर यातून तब्बल अडीच लाख तोफगोळे, रॉकेट्सचा तुफान मारा केला गेला होता.
  • हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी शत्रूवर हल्ला चढविण्यासाठी ३५०हून अधिक उड्डाणे केली. पुरवठा व्यवस्था व जखमी सैनिकांना युद्धभूमीवर आणण्यासाठी हेलिकॉप्टरची उड्डाणे वेगळीच होती.
  • घुसखोरांच्या ताब्यातील ठाणी काबीज करण्यासाठी पायदळाने अखेरची चढाई केली. मोठे सैन्य या कारवाईत उतरविले.

 

युद्धाचे सर्वसाधारण परिणाम

  • महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ. मोठय़ा प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी
  • विकास दरात घसरण. चलन फुगवटय़ामुळे करवाढ अटळ
  • शांतताकालीन व युद्धकालीन अर्थव्यवस्थेची सांगड घालण्याचे आव्हान. स्थावर मालमत्ता व सीमेलगतच्या शेतीचे नुकसान
  • देशावर कर्जाचा डोंगर वाढण्याचा धोका. युद्ध खर्चामुळे देशातील शैक्षणिक व इतर विकास खुंटतो
  • नवीन सीमाप्रश्नास जन्म. स्त्री-पुरुषांच्या प्रमाणात बदल

 

अफाट किंमत

  • ब्राह्मोस क्षेपणास्त्र : १५ कोटी रु.
  • मिग विमान : १०० ते १२५ कोटी रु.
  • एमआय-१७ हेलिकॉप्टर : ६०.३ कोटी रु.
  • आयएनएस विक्रमादित्य विमानवाहू नौका : १५७. ४ अब्ज रुपये
  • पेव्हवे-२ लेसर गायडेड बॉम्ब : १४.६७ लाख रुपये.
  • बोफोर्स तोफगोळा : ४३ हजार रु. (कारगिल युद्धात असे शेकडो तोफगोळे आपण दररोज डागत होतो.)

 

संकलन – अनिकेत साठे, सचिन दिवाण