शिवसेनेच्या इतिहासात बाळासाहेबांप्रमाणेच मनोहर जोशी यांचे स्वतंत्र स्थान आहे. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे. राजकारणाप्रमाणेच व्यवसायातही यश मिळवून त्यांनी कोहिनूरची उंची गाठली खरी, परंतु बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात झालेल्या अपमानाची जखम आजही अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी खोलवर त्यांच्या हृदयात दिसून येते. ही जखम उराशी बाळगूनच शिवसेनेची साथ आजन्म न सोडण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे.. अजूनही राजकारणात मोठे पद मिळेल ही  आशा  त्यांनी ‘लोकसत्ता’ आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली..
उद्धवही सल्ला घेतात..
बाळासाहेबांच्या निकट राहण्याची संधी मला सतत मिळाली. त्यांच्यामुळे अनेक पदेही मिळाली. सेनेच्या वाटचालीत अनेकदा बाळासाहेब माझ्याशी सल्लामसलत करत असत. उद्धवही माझा सल्ला घेतो. बाळासाहेब व उद्धव यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. काळ बदलला तशी कार्यपद्धतीही बदलली. यात चुकीचे काहीही नाही. वडील आणि मुलगा एकच कसे असू शकणार? त्यांच्यामध्ये फरक असला तर आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तो काळ आणि त्यावेळची आव्हाने वेगळी होती, आजची वेगळी आहेत. दोन लोक हे केव्हाही वेगळेच असतात. परंतु उद्धव ठाकरे हे फारच थोडय़ा काळात राजकारणात तयार झाले. पक्षाचा ताबा कसा आपल्या हाती ठेवायचा हे त्यांना कळले. त्यामुळे शिवसेनेचा भविष्यकाळ उत्तम आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जागे केले. राज्य हे मराठी लोकांच्याच हाती असायला हवे, त्यामुळेच महाराष्ट्राचे हित साधले जाणार आहे. ज्याप्रमाणे दक्षिणेकडील राज्यांमध्ये राज्याच्या विषयात एकी दिसते तशी आपल्याकडे दिसत नाही. मराठी माणूस वादावादीतच जास्त रमतो. त्यामुळेच राज्यात एकदाच शिवसेना-भाजपची सत्ता आली. अन्य राज्यात तेथील नेत्यांनी आदेश दिला की चर्चा होत नाही तर आदेशाचे पालन केले जाते. दुर्दैवाने मराठी माणसाची ती प्रकृती नाही. त्यामुळेच मराठी माणसाचे नुकसान होत आहे.
बाळासाहेबांचे स्मारक, उद्धव आणि शरद पवार..
शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मारक झाले पाहिजे ही मागणी मीच प्रथम केली होती. या विषयावरून काही प्रश्न निर्माण झाल्यानंतर उद्धव यांनी त्यामध्ये लक्ष घातले. बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी पवार यांनीच स्मारकाचा विषय काढला होता. त्यांनी स्मारकासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली. बाळासाहेबांसारखा आमचा नेता दुसऱ्या नेत्यांनाही वंदनीय वाटत असेल व त्यांनी स्मारक उभारण्यात पुढाकार घेण्याची तयारी दाखवली तर त्यात चुकले काय? स्मारकासाठी सीआरझेडसह कायद्यातील काही गोष्टींचा अडथळा येत होता. त्यामुळे परवानग्या मिळण्यात अडचणी येत होत्या. मी स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन स्मारकाच्या परवानगीसाठी पाठपुरावा केला होता. त्यात आम्ही कमी पडलो. काही परवानग्या या केंद्रातून आणायच्या असल्यामुळे पवारांची मदत होईल, ते परवानगी मिळवतील असे वाटले होते. त्यांनी झपाटल्यासारखे काम केले असते तर स्मारक उभे राहिले असते. त्यांनी स्वत:हूनच सर्वपक्षीय स्मारक समितीचे प्रमुख बनण्याची तयारी दाखवली होती. स्मारकाबाबत त्यांनी झपाटल्यासारखे काम केले असते तर केव्हाच स्मारक घडले असते. ते घडले नाही. स्वत:हून पद मागून घ्यायचे आणि काम करायचे नाही हा त्यांनी स्मारकाबाबत केलेला अन्याय आहे. पवार कसे शब्द देतात आणि फिरवतात हे सर्वानाच माहिती आहे. त्यामुळे अशा गोष्टींचा तुम्ही खराखुरा अभ्यास केला तर तुम्हाला वेगळेच चित्र दिसेल.
कोहिनूरचा वेग..
लोकांमध्ये अशी चर्चा आहे की एसटी तेथे कोहिनूर. शिवसेनेपेक्षा कोहिनूरचा वेग दिसतो असे म्हटले जाते. याला कारण कोहिनूरमध्ये मला पूर्ण अधिकार होते. पूर्ण अधिकार दिले तर माझा वेग कोठेही दाखवू शकतो.
सेनेचे युवा नेतृत्व..
युवा नेतृत्वाबाबत सगळेच सांगणे कठीण आहे. परंतु सर्वसाधारणपणे जीवनात यशस्वी होण्यासाठी गरज असते ती अनुभवाची. युवा नेत्यांना तो मिळायला वेळ लागतो. त्यासाठी काही काळ जावा लागतो. पण काही युवा नेते आपोआप युवा नेते बनतात. असे युवा नेते वाडवडिलांच्या असलेल्या गुणांमुळे जन्मत: सद्गुणी..गुणी असतात. नेते असतात.. त्यामुळे त्यांचा मला राग येत नाही..
माझी टीका प्रवृत्तींवर..
निवडणुकीत नेमके कोण निवडून येणार हे सांगणे तसे कठीण असते. निवडणुकीचे भविष्य सांगणे कोणालाही शक्य झालेले नाही. एक खरे की सत्तेचा मार्ग खडतर असतो. त्यासाठी ताकदीने लढावे लागते. लोकांच्या मनात शिरण्याची कला अवगत असली पाहिजे. भाजप नेते लालकृष्ण आडवाणी म्हणायचे, हिंदू जाती जातींमध्ये विभागला गेला आहे. तेच मराठी लोकांबद्दलही म्हणता येईल. मन बदलण्याचे काम झाले की मतही बदलू शकेल. केंद्रात मोदींचे सरकार यायला हवे. सर्वाना समान संधी देणारे सरकार हवे. परंतु खरी गरज जर कोणती असेल तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडविणारे, लोकांच्या गरजा भागवणारे सरकार लोकांना हवे आहे. लोकांच्या गरजा पुऱ्या होतात का तर त्याचे उत्तर नाही. महाराष्ट्रात युतीचे सरकार १९९५ साली आले. त्या वेळी साखर, गहू, तांदूळ अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचे वचन दिले होते. १९९९ साली मी मंत्रालयासमोर एक बोर्ड लावला होता. त्यात मी मुख्यमंत्री बनलो तेव्हाचे भाव व ९९ साली असलेले भाव एकच असल्याचे दाखवून दिले. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या भावात तेव्हा वाढ झालेली नव्हती. इच्छाशक्ती असेल तर मार्ग निश्चित निघतो. मी राजकीय टीका करत असलो तरी माझी खरी टीका ही प्रवृत्तींवर आहे. आज साठ वर्षांनंतरही आपण का लोकांना साधे पिण्याचे पाणी देऊ शकत नाही? शरम वाटते. कशाला उगाच मोठय़ा मोठय़ा गप्पा मारायच्या. सरकारकडे पैसा आहे परंतु आम्ही लोकांना साधी भाकरी देऊ शकत नाही? जे मंत्री आपल्या गाडीतून उतरून लोकांच्या प्रश्नांकडे पाहत नाहीत, त्यांनाच आपण पुन्हा पुन्हा निवडून देतो..
‘जस्टीस राइट नाऊ..’
बाळासाहेबांची एक कार्यपद्धती होती. त्यांनी शिवसेनेला निर्धाराने पुढे नेले. येणाऱ्या संकटांशी सामना करत निर्धाराने पुढे गेले तर यश निश्चित आहे. निश्चयाला कृतीची जोड दिली तर कोणतीही गोष्ट होऊ शकते, असे बाळासाहेब म्हणत असत. एक दिवस महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, मी आणून दाखवेन, असे ते विश्वासाने सांगत.. आणि १९९५ साली युतीची सत्ता राज्यात आली. बाळासाहेबांनी आपले शब्द खरे केले. बाळासाहेब म्हणजे ‘जस्टीस राइट नाऊ’.. त्यामुळेच लोकांचा शिवसेनेवर विश्वास बसला. एखादी घटना त्यांच्या कानावर गेली तर तात्काळ फैसला होत असे. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती बदलली आहे. नरेंद्र मोदी यांच्या चरित्रातून एक दिसते ते म्हणजे त्यांच्या शब्द व कृतीत मेळ आहे. हे ज्यांना जमत नाही त्यांनी राजकारणात येऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. अन्याय झाला की बाळासाहेब ‘आदेश’ द्यायचे आणि शिवसैनिक तो तात्काळ अमलात आणायचे. त्यामुळे अनेकांना न्याय मिळाला. आता शक्ती मिल बलात्कार प्रकरणात न्यायालयानेच फाशीची शिक्षा सुनावली, पण हेच जर बलात्कार करणाऱ्यांना शिवसेनेने चोपले असते व त्यात त्यांचा मृत्यू झाला असता तर प्रचंड टीका आमच्यावर झाली असती. बाळासाहेबांनी जागच्या जागी न्याय करताना कोणत्याही टीकेची पर्वा केली नाही.
शिवसेना-राष्ट्रवादी युतीचा प्रस्ताव..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत शरद पवार यांनी उद्धव यांच्याकडे विचारणा केल्याचे उद्धव यांचेच म्हणणे आहे. स्मारक हा विषय तेच पाहत आहेत. स्मारकाची जबाबदारी स्वीकारूनही पवार यांनी जसा अन्याय केला. त्याचप्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्याबाबतीतही केला. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-राष्ट्रवादी युती करून लढण्याची कल्पना पवार यांनी मांडली. मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे. मी व उद्धव यांनी चर्चा केली आणि एकत्र लढण्याचे ठरवलेही. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पेडररोड येथील त्यांच्या एका मराठी उद्योजक मित्राच्या घरी गेलो असताना, ‘या वेळी एकत्र लढणे कठीण दिसते’ असे सांगून त्यांनीच पाठ फिरवली. आयत्या वेळी त्यांनी आपला शब्द फिरवला. अशा पवारांवर किती विश्वास ठेवायचा हे मी कशाला सांगायला हवे. संधीचा फायदा अचूकपणे कसा घ्यायचा हे पवारांना चांगलेच कळते.
राज-उद्धव एकत्र येतील?
माझे आडनाव हे जोशी आहे पण राज व उद्धव एकत्र येतील का, हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. त्यामुळे ते कधी एकत्र येतील हे सांगता येणार नाही. परंतु त्यांनी एकत्र यावे असे मला निश्चितपणे वाटते. त्यांच्यामधील भांडणे मिटली पाहिजेत असेही माझे म्हणणे आहे. राज व उद्धव यांच्यातील भांडण एवढे कडक आहे की त्यातून मार्ग काढण्याची आज तरी यापैकी कोणाची इच्छा नाही. राज शिवसेनेचे नव्हे तर उद्धव यांचे कसे नुकसान होईल हेच पाहत आहे. त्यामुळेच शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे काम तो करत आहे. वडिलांना आपण काही दिले तर ते काढून दाखवतो का? माझ्याकडेही बाळासाहेब राहिले होते.. आता तो वाद मिटला आहे.. नव्वद टक्के भांडणे ही चर्चेतून सुटू शकतात असा माझा अनुभव आहे. आकाश आणि जमीनही कुठे तरी एकत्र येतात, त्यामुळे राज व उद्धव हेही एकत्र येऊ शकतील असा मला विश्वास वाटतो. उद्धवशी या विषयावर अनेकदा बोललो आहे. राजने शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिला त्या वेळी मी व संजय राऊत यांनी त्याची घरी जाऊन भेट घेतली होती. तेव्हा त्याच्या संतप्त समर्थकांनी संजय राऊत यांची गाडी फोडली होती. आज जरी भावना तीव्र असल्या तरी कालांतराने त्यांची तीव्रता कमी होत जाईल. खरे म्हणजे यांच्यातील भांडणाचे कारण काय, हा प्रश्न मला भेडसावतोय. खरे कारण अजूनही कळलेले नाही. त्या दोघांशी माझे जवळचे संबंध आहेत. तेही मला जवळचे मानत असावेत. दोघेही माझ्यासमोर बसले तर त्यांच्यामधील वाद मिटविण्यासाठी मी चर्चा करायला केव्हाही तयार आहे. त्यांच्यातील भांडणे मिटलीच पाहिजे, असे माझे मत आहे.

आणखी वाचा – माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस

Basavaraj Patil
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?
Eknath Shinde viral video of karyakram karen
“मुख्यमंत्री साहेब, कार्यक्रम म्हणजे काय समजायचं?”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ VIDEO शेअर करत काँग्रेसचा सवाल
Shiv Sainik Manohar Joshi passed away Mumbai
बाळासाहेबांचा विश्वास लाभलेला शिवसैनिक; नगरसेवक, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष..
Manohar Joshi
मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांना ‘या’ योजनेचा आनंद अन् दुःखही, गडकरींनी सांगितला होता किस्सा

बाळासाहेब असते तर दसरा मेळाव्यात अपमान झालाच नसता..
बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात ज्या पद्धतीने माझा अपमान झाला त्याचे मला खूपच वाईट वाटले. खूप क्लेशकारक घटना होती. ४५ वर्षांच्या शिवसेनेच्या प्रवासात माझा असा अपमान कधी झाला नाही. गैरसमजातून हा अपमान झाला. एकतर अपुऱ्या माहितीमुळे अथवा जणूनबुजून हे झाले असावे. अनेकजणांनी त्यावेळी सहानुभूती दाखवली. अनेकांना ही गोष्ट खटकली. परंतु त्या दिवशीचे दसरा मेळाव्यातील उद्धवजींचे ते पहिलेच भाषण होते. हे भाषण नीट पार पडावे यासाठी मी तेथून निघून गेलो. ही घटना का घडली, यामागे कोण आहे, याचा शोध मी अजूनही घेत आहे, मात्र तो लागलेला नाही. त्यावेळी बाळासाहेब असते तर त्यांनी असे काही होऊच दिले नसते. अशा घटना टाळण्यासाठी मार्ग असतात. आजही पक्षात मतभेद मिटविण्यासाठी अंतर्गत यंत्रणा आहे. बाळासाहेबांनी आपल्या नेत्याचा अपमान कधीच होऊ दिला नाही. त्यामुळे यापुढे अपमान होऊ नये यासाठी आपली काळजी आपणच घेणे बरे! तसे पाहिले तर गैरसमजाचा बळी काही पहिल्यांदा पडलेलो नाही. १९९९ साली अशाच एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेले. माझ्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला. १९९५ साली मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केले? बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाली. उद्धव यांचेही माझ्यावर प्रेम आहे. तथापि वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो तसेच कम्युनिकेशन गॅपही असू शकते. त्यामुळेच दसरा मेळाव्यातही गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सारे काही माफ करू शकलो.
विहिणीने सांगितलेले भविष्य..
राजकारणात मला अनेक पदे मिळाली. मुख्यमंत्री झालो. त्यापेक्षाही अनेक मोठी पदे अजून शिल्लक आहेत. परंतु यशस्वी कोणाला म्हणायचे? व्यवहाराचा विचार करता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला विद्या-ज्ञान पाहिजे. चांगले शिक्षण झाले पाहिजे. पैसा मिळाला पाहिजे. तो चांगल्या उद्योगातून मिळाला पाहिजे. कुटुंब सुखी असले आणि हे सर्व मिळाले तर तो सुखी माणूस.. आपण जे स्वप्न पाहतो त्याप्रमाणे कृती करून यशस्वी होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राला सुखी व समृद्ध करण्याचे स्वप्न मी पाहत आहे. त्यासाठी मीच मुख्यमंत्री बनले पाहिजे असे नाही. त्यापेक्षा किती तरी मोठी पदे अजूनही रिकामी आहेत. आमच्या विहीणबाई, वसुधा वाघ या उत्तम ज्योतिषी होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही खूप मोठे पद मला मिळणार आहे. अर्थात माझा कर्मकांडावर विश्वास नाही तर कर्म करण्यावर विश्वास आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करणे माझ्या हातात आहे. ते मी करतो. अर्थात जेवढी जबाबदारी मोठी तेवढी त्यांची दु:खेही मोठी असतात..

आणखी वाचा – “मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप
वाचन आणि नरेंद्र मोदींचे चरित्र..
वाचनाची मला पहिल्यापासूनच आवड आहे. वाचनामुळे माणूस घडतो. खरेतर त्यामुळेच अनेक परीक्षांना मी बसलो आणि उत्तीर्णही झालो. वाचनाची आवड अनेक मोठय़ा नेत्यांना आहे. किंबहुना प्रत्येक मोठय़ा नेत्याचे वाचन चांगले असते. नरेंद्र मोदींचा विकास हा त्यांच्या कामाप्रमाणेच वाचनातूनच झाला आहे. त्यामुळेच त्यांचे प्रसिद्ध झालेले नरेंद्रायण नावाचे चरित्र पुस्तक प्रत्येकानेच वाचले पाहिजे.
केंद्रात पद मिळेल..
केंद्रात कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर हे होणारच.. प्रथमच माझ्याशिवाय दक्षिण मध्य मुंबईत निवडणूक होत असली तरीही निवडणूक न लढता मिळू शकतील अशा अनेक जागा केंद्रामध्ये आहेत. शिवसेना पक्षप्रमुख अशा जागेसाठी माझा विचार करून मला ती निश्चितपणे देतील, असा मला विश्वास आहे. सत्तांतरानंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील व त्यांच्याशीही माझा चांगला संबंध असल्यामुळे अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. मी प्रचारात सक्रिय आहे. अनेक ठिकाणी फिरतो. दक्षिण मध्य मुंबईमध्येही शिवसेनेला म्हणून मतदान होत असते व ते शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना मिळून ते विजयी होतील.
उद्धवही बाळासाहेबांसारखे भाषण करतात..
बाळासाहेबांबरोबर अनेकजण शिवसेनेत पट्टीचे वक्ते होते. तेव्हाच्या भाषणांची मजा काही औरच होती. वक्त्यांची भाषेवर पकड होती. ती मजा आता दिसत नाही. तेव्हा प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी असे अनेकजण सभा गाजवून सोडायचे. बाळासाहेबांच्या भाषणाचा बाजच वेगळा होता. थेट शिवसैनिक आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची त्यांची शैली होती. भीमगर्जना केल्यासारखे त्यांचे भाषण नसायचे. त्यांची स्वत:ची अशी एक शैली होती. वाचन आणि आकलन उत्तम असण्याबरोबरच प्रतिभासंपन्न असल्यामुळे एक जबरदस्त पकड त्यांच्या वक्तृत्वामध्ये होती. उद्धव ठाकरे यांच्या आताच्या भाषणातही बाळासाहेबांचा भास होतो. सुरुवातीचे उद्धव आणि आताचे याच पुष्कळ फरक पडला आहे. ४५ वर्षे मी बाळासाहेबांना ऐकत आलो आहे. त्यांचे काही गुण-दोष माझ्यातही आले आहेत. अनुभव आणि वाचनातूनही प्रतिभाशक्तीचा विकास होतो. काहीजणांकडे जन्मत:च प्रतिभेची देणगी असली तरी त्याच्या विकासासाठी वाचन आवश्यक आहे. उद्धव यांच्याकडेही बाळासाहेबांचा भाषणाचा वारसा आला आहे. खरे म्हणजे प्रत्येक मोठय़ा माणसाला भाषणाची कला येणे गरजेचे आहे.
राजही बाळासाहेबांसारखा बोलतो..
उत्तम भाषणासाठी वाचन, फिरणे आणि अनुभव यांची आवश्यकता असते. शिवसेनेत कोण वाचतो असे विचाराल तर मी वाचतो. वेळ मिळेल तेव्हा वाचन सुरूच असते. राज ठाकरे यांना स्वत:ची स्टाइल आहे आणि ती बाळासाहेबांसारखीच आहे. भाषण करताना बाळासाहेब जसे मध्येच थांबत तसेच राज व उद्धव हे दोघेही भाषण करताना एखादा मुद्दा सांगून पॉज घेतात.
शिवसेनेविषयी प्रेम आहे..
लोकांना शंभर टक्के शिवसेना आपली वाटत नाही, हे खरे नाही. मतांचे गणित वेगळे असते. लोकांच्या मनात शिवसेनेविषयी आकर्षण आहे तसेच प्रेमही आहे. मात्र मराठी माणूस भांडण विसरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीत अपमान झाल्यानंतर ते तात्काळ औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडले होते. त्यांनी दाखविलेल्या स्वाभिमानाचे आजही आपण कौतुक करतो. असाच स्वाभिमान प्रत्येक माराठी माणसाने जपला पाहिजे. मराठी माणूस यातच कमी पडतो. मराठी माणूस एकजुटीने उभा राहात नाही. खरेतर शिवसेना म्हणजे ‘अॅक्शन’.. मराठी माणसाला शिवसेनेवर विश्वास आहे परंतु तो मतदानातून दिसून आला तर अधिक चांगले..
या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.