आपले जीवन-मरण या लटक्या (मिथ्या) प्रपंचावर अवलंबून आहे, अशी आपली समजूत असते. म्हणूनच आपले ‘स्वार्थ आणि अधिकार’ जपण्यासाठी आपण खूप धावपळ करतो. अनेक कटकटी आणि उपद्व्याप मागे लावून घेतो. त्याने आपण तर कष्टी होतोच; पण इतरांनाही कष्टी करतो. आपली प्रापंचिक ध्येये साधण्यासाठी आपण रात्रंदिवस ऊर फाटेपर्यंत धावाधाव काय करतो, इतरांचे नुकसान काय करतो, काय वाटेल ते करतो! प्रपंचाच्या या खेळाला आपण विनाकारण महत्त्व देतो. त्यात इतके रंगून जातो, की त्याच्या परिणामाकडे मुळी लक्षच जात नाही.
सगळे जग हा खेळ आहे. जीवन म्हणजे नुसता एक खेळ आहे. ही जाणीव प्राप्त होताच सगळा खेळ संपतो. कधी आपल्याला मोठे गमतीचे तर कधी अतिभयानक स्वप्न पडते. त्यामुळे झोपेत आपण आनंदतो वा घाबरतोही! कित्येक वेळा दिसते, की आपण अगदी संकटांच्या समुद्रात सापडलो असून, असहाय्य झालो आहोत. त्या वेदनांमुळे आणि भीतीमुळे आपण विव्हळतो वा किंचाळतोदेखील. आपली सगळी बुद्धी, सगळा विवेक नाहीसा होतो. अगदी अशक्यप्राय अद्भुत गोष्टीदेखील स्वप्नात खऱ्या वाटू लागतात; पण झोप उघडताच स्वप्न भंगते आणि ते सगळे स्वप्नच होते या जाणिवेने आपला जीव भांडय़ात पडतो. एखाद वेळी सुखस्वप्न पडते. त्यात आपल्याला पैसाच पैसा मिळतो. आपण आनंदतो- तोच स्वप्न भंगते. आपण निराश होऊन हात चोळत बसतो. आपले सगळे जीवन म्हणजे खरे तर वर्णन केल्याप्रमाणे एक लांबलचक आणि अखंड स्वप्न आहे. चांगल्या-वाईटाच्या, सुख-दु:खाच्या, आशा-निराशेच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी ते विणलेले आहे. जोपर्यंत स्वप्न चालू असते तोपर्यंत त्यातील सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात. स्वप्न भंगताच ते सगळे जग शून्यात विलय पावते. तेव्हा मग काय उरते? उरते केवळ चिरंतन सत्य. ते स्वत:च स्वत:ला प्रकट करते. जे प्राप्त केले असता सर्व काही प्राप्त होते व ज्याच्या प्राप्तीनंतर प्राप्त करण्यासारखे दुसरे काहीही उरत नाही- ते चिरंतन सत्य प्राप्त करण्यासाठीच मानवी जीवनाचा उपयोग करा. जेणेकरून चिरंतन जीवन प्राप्त होईल, असे आपले जीवन घडवा!
०००
पुष्कळ जण श्रीरामकृष्ण आश्रमात येतात आणि म्हणतात, ‘आम्हाला संन्यास द्या’. का? तर कुणाला प्रापंचिक जबाबदाऱ्या टाळायच्या असतात. कुणाला नोकरी मिळत नसते, कुणाच्या मागे जन्माचे दारिद्रय़ असते, कोणी नाना संकटांनी गांजलेले असतात, कोणी अपयशाने खचले असतात. या सगळ्यांतून सुटण्यासाठी ते संन्यासी होऊ पाहतात.
अलीकडे काही लोकांना संन्यासी होणे ही टूमच वाटू लागली आहे. खरे वैराग्य बाणणे, प्रापंचिक इच्छा- अभिलाषा आणि दैहिक वासना यासंबंधी तिटकारा उत्पन्न होणे आणि खरा संन्यासी होणे इतके सोपे का आहे? प्रपंचात असताना प्रथम संन्यासी बनण्याची योग्यता निर्माण करावी लागते. साधना करून विषयासंबंधी अनासक्ति, निर्लिप्तता, नि:स्वार्थता यांचा बराच अभ्यास करावा लागतो. मनोभूमिका तयार करावी लागते. अशी प्रयत्नपूर्वक जोपासलेली वृत्तीच टिकते. अन्यथा ताडपत्रे जाळली म्हणजे क्षणभर मोठा जाळ होतो; पण नंतर निखारा नाही, की आच नाही. नवा उत्साह लवकरच मावळतो आणि मग सगळा दिवस आळसात जातो. शारीरिक सुखसोयी आणि नावलौकिक यांच्या मागे मन घोटाळू लागते. जप, ध्यान आदीसाठी तो कसाबसा तासभर बसतो. ती सगळी त्याला कंटाळवाणी कटकट वाटू लागते. सुरुवातीची भावना, तो आवेश सगळे लोप पावते आणि मन हळूहळू खाली घसरत जाते. अपरिपक्व मन मोठे फसवे असते. बेसावध साधकाला ते केव्हा आणि कसे नकळत पथभ्रष्ट करील आणि त्याला मायाजालात बांधून टाकील हे सांगणे मोठे कठीण आहे. देह सुखाचा आणि इंद्रिय सुखाचा शोध घेणे हा अपरिपक्व मनाचा सहज स्वभाव असतो. माणसाचे मन एखाद्या फळासारखे असते. फळ कच्चे असले म्हणजे आंबट, तुरट किंवा बेचव लागते. ते खाल्ल्याने मनुष्य आजारी पडतो; परंतु तेच फळ पिकले म्हणजे किती गोड लागते! परिपक्व फळच नैवेद्य म्हणून देवाच्या पूजेसाठी उपयोगी पडते. मनाचेही अगदी असेच आहे. मन कच्चे असूनही जे लोक व्यापक कार्याला वाहून घेतात, मोठमोठय़ा संस्था उभारतात ते लोक, त्यांची उद्दिष्टे महान असूनही अंततोगत्वा जगाला लाभापेक्षा हानीच अधिक पोहोचवितात.
(स्वामी विवेकानंदांचे शिष्य स्वामी विरजानंद यांचे हे विचार ‘परमार्थाची वाटचाल’ या पुस्तकातून संकलित.)
स्वामी विरजानंद

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क