नाशिक येथील गुणगौरव न्यासतर्फे ‘थिंक लाइन’ या वैचारिक उपक्रमांतर्गत अर्थशास्त्रास वाहिलेल्या पुस्तिकेचा शंभरावा अंक २१ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होत आहे. या शतकपूर्ती पुस्तिकेचे लेखन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन युनायटेड बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. श्रीनिवास यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त या उपक्रमाचा घेतलेला वेध.

‘विचार’ या तीन अक्षरी शब्दांत विलक्षण सामथ्र्य आहे. विचार व भावना यामुळे मनुष्य पशूपेक्षा वेगळा गणला जातो. विचारातून व्यक्ती अभिव्यक्त होते. विचार म्हणजे ज्ञान व समजूत. तसेच विचार देणे म्हणजे शिक्षण. व्यक्ती व समाज सुशिक्षित, सुसंस्कृत होण्यासाठी विचारांचा (शिक्षणाचा) प्रचार व प्रसार अधिक प्रमाणात होणे आवश्यक आहे.
अर्थशास्त्र हे सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे त्याला ते समजावे, त्याच्यात अर्थशास्त्राची अभिरुची वाढावी, या विषयातील नवनवीन संकल्पना सहज सोप्या भाषेत समजाव्यात, त्याला आपल्या अर्थव्यवस्थेची ओळख व्हावी, या उदात्त हेतूने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांच्या नेतृत्वाखाली ‘थिंक लाइन’चा प्रकल्प १९९८ मध्ये सुरू झाला.
या उपक्रमांतर्गत सामान्यांच्या अर्थशास्त्रविषयक अभ्यासाची गरज पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांतून एक पुस्तिका प्रकाशित करण्याचे ठरले. पुस्तिका हा ग्रंथ व लेख यामधला सुवर्णमध्य. त्याद्वारे एका विशिष्ट विषयाचे आकलन योग्य प्रकारे होण्यास मदत होते. अशा ९९ पुस्तिका आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. यामागे डॉ. गोविलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अथक प्रयत्न आहेत. ‘लाइफलाइन’ म्हणजे जीवनदायिनी. त्याप्रमाणे थिंक लाइन म्हणजे विचारदायिनी व विचारवाहिनी होय. आर्थिक सुधारणा, बँकिंग, कर प्रणाली, अन्नसुरक्षा, दारिद्रय़ादी आर्थिक समस्या, विमा, सरकारी कर्ज, महागाई, उद्योग, जलसमस्या, अर्थशास्त्रज्ञांचे विचार, अशा असंख्य महत्त्वाच्या विषयांवर ‘थिंक लाइन’ पुस्तिका प्रसिद्ध झाल्या. या सर्व क्षेत्रांतील अनेक नामवंत लेखकांनी या पुस्तिका लिहिल्या आहेत. त्यात ऑल इंडिया इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष रुद्र दत्त, नियोजन मंडळाचे महाराष्ट्राचे सदस्य डॉ. आर. पी. कुरुलकर, हैदराबाद राज्याचे सल्लागार एस. पी. खेर, एम. के. दातार, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष एम. एन. चैनी, डॉ. विनायक देशपांडे आदींसारख्या जाणकारांनी ‘थिंक लाइन’ समृद्ध केली.
या पुस्तिकांत विषय अगदी सहज सोप्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत. सर्वाना समजू शकेल, असा तो अक्षरप्रवास असतो. सर्वसामान्य वाचकाला अर्थशास्त्राची समज येण्यासाठी पुस्तिका उपयुक्त ठरतात, तसेच आर्थिक प्रश्नांकडे व्यापक व समतोल दृष्टीने पाहणे किती गरजेचे आहे, याची जाणीव या पुस्तिका करून देतात. थोडक्यात ‘विचार, ज्ञानाने महान व आकाराने लहान’ अशा या पुस्तिका आहेत. या पुस्तिका (पृष्ठसंख्या ४०-५०) आठ राज्यांतील वाचकांपर्यंत नियमितपणे पोहोचविल्या जातात. या वैचारिक उपक्रमास विविध पातळ्यांवर मान्यता मिळाली आहे. मराठी अर्थशास्त्र परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘अमर्त्य सेन पुरस्कार’ ‘भारतातील अन्न सुरक्षा’ या पुस्तिकेला मिळाला. विपणन व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात प्रकाशित केलेल्या सहा पुस्तिकांवर आधारित १०० गुणांची परीक्षा नाशिक व नागपूर येथे घेतली जाते. तसेच या विद्यार्थ्यांना वित्त व अर्थशास्त्रात अधिक जागरूक करण्यासाठी न्यास विशेष अभ्यासक्रमही राबवितो.
आपल्याकडे ज्ञानाचा महिमा गायला गेला आहे. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ व पवित्र मानले गेले आहे. हे पुण्यकर्म ‘थिंक लाइन’ अव्याहतपणे करत आहे. या ज्ञानगंगेत आपणा सर्वानी सहभागी होऊन हा पवित्र प्रवाह पुढे नेऊ या. ‘इवलेसे रोप लावियले दारी, वेलू त्याचा गगनावरी’ याप्रमाणे १९९८ मध्ये लावलेल्या या रोपाचा पाहता पाहता वटवृक्ष झाला आहे. आता या पुस्तिकांची शतकपूर्ती होत आहे.
( लेखक केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या विदेशी कर्जव्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत.)