प्रमिला बाळबुधे. गाव- गणेशपूर, वर्धा. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील ही महिला. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीने आत्महत्या केली. कारण तेच होते- शेतीची ओढग्रस्त अवस्था, कर्जाचा बोजा. पती गेल्यानंतर त्या यवतमाळ जिल्ह्य़ातल्या लोहारा गावी राहण्यास गेल्या. तेथे त्यांना एका संस्थेचे लोक भेटले. ही संस्था शेतकऱ्यांच्या विधवांना मदत करणारी. प्रमिला यांनाही त्यांनी आत्मनिर्भर होण्याचा मंत्र दिला. पाच हजार रुपये दिले आणि त्यातून त्यांनी सुरू केला बांगडय़ांचा व्यवसाय.

ही विधवा आता गावोगावच्या जत्रेत पायी फि रून अनेक महिलांना सौभाग्यचुडा देत होती. त्यात कष्ट होते आणि त्याहून अधिक एक त्रास होता, तो म्हणजे टोमण्यांचा. हा काय आपल्या जातीचा धंदा आहे काय, असे म्हणत गावातील काही महिला त्यांना टोचून बोलायच्या; पण त्यांनी ते मनावर न घेता व्यवसाय सुरूच ठेवला. हळूहळू मेकअपचे सामान, सौंदर्यप्रसाधने असेही साहित्य विकणे सुरू केले. त्यातून झालेल्या नफ्यातून त्यांनी संस्थेचे पैसे परत केले. आज त्या ५० हजार रुपयांच्या मालाचा साठा बाळगतात. या व्यवसायाच्या आधारावर मुलीचे लग्न लावून दिले त्यांनी. मुलाला डीएड् केले. गावखेडय़ातील मुली आता प्रमिलाबाईंकडूनच बेंटेक्सचे दागिने खात्रीने घेतात. हा एका विधवा स्त्रीचा पाच वर्षांचा प्रवास. त्यात त्यांना साथ दिली ती मुंबईच्या वंदना फाऊंडेशनने.

शेतकरी आत्महत्या करतो. त्याची कारणे अनेक; पण त्यांचा लसावि काढला तर एकच कारण समोर येते ते म्हणजे कर्जबाजारीपणा. ते कर्ज मागे ठेवून तो जातो आणि मग सुरू होते मागे राहिलेल्यांची परवड. त्याच्या पत्नीचे आयुष्य तर काटेरीच बनून जाते. ही क्लेशदायक वस्तुस्थिती एका सर्वेक्षणातूनही उघड झाल्यानंतर मुंबईतील ही संस्था पुढे आली. विधवांना दिलासा देण्याबरोबरच त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. त्यातूनच आज यवतमाळ, वर्धा व अमरावती या ‘आत्महत्यांच्या टापू’तील अनेक विधवा महिला आत्मसन्मानाचे जीवन जगत आहेत.

वर्धा जिल्ह्य़ातील ९० गावांतल्या १४००, यवतमाळ जिल्ह्य़ातील ७० गावांतल्या १३०० व गतवर्षीपासून अमरावती जिल्ह्य़ातील २० गावांतल्या ५०० महिलांना या संस्थेने मदत केल्याचे सांगण्यात येते. या सर्व महिलांच्या कहाण्या कमी-अधिक प्रमाणात प्रमिला बाळबुधे यांच्यासारख्याच. अल्लीपूरच्या ज्योत्स्ना वांदिले यांनी खेळणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पतीनिधनानंतर दोन एकर शेतीवरच आस न ठेवता बाजारात खेळण्यांचे दुकान मांडून स्वत:चे घर बांधले. जामणीच्या अनिता बारहातेकडे तीन एकर शेती आहे; पण त्यावरच विसंबून न राहता संस्थेने दिलेल्या मदतीवर लहान मुलांचे रेडिमेड कपडे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. रोज १५०० रुपयांचा व्यवसाय करतात. ५०० ते ६०० रुपये वाचतात. याच व्यवसायाने शेतीलाही उभारी मिळाली.

शेकडो उदाहरणे आहेत. पतीनिधनानंतर आप्त व गावकऱ्यांची सहानुभूती काही काळच सोबतीला असते. पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर सोडवायला कुणी येत नाही. या बिकट स्थितीला भेदून या महिलांनी स्वत:चे विश्व उभे केले. बेरोजगारीचे रडगाणे गाणाऱ्या धडधाकट युवकांना लाजवेल अशी कामगिरी या महिलांनी केवळ पाच हजार रुपयांच्या मदतीवर आरंभलेल्या व्यवसायातून करून दाखविली. वंदना फाऊंडेशनने जवळपास साडेतीन हजार महिलांना २०१० पासून मदतीचा हात दिला. यात सर्वच आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील नाहीत, पण १०० पैकी ४० टक्केआत्महत्याग्रस्त कुटुंबांतील, २० टक्केइतर कुटुंबांतील विधवा व ४० टक्केगरजू गरीब महिलांवर मदतीची सावली पडली.

वंदना फाऊंडेशनचा जन्मच या विधवा महिलांसाठी झाला. राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अनामी राय यांनी त्यांची कन्या सौम्या रायला सोबत घेऊन संस्था स्थापन केली. पत्रकार असणाऱ्या सौम्याने १५ वर्षांपूर्वी ‘आऊटलूक’मध्ये अशा महिलांची अवस्था एका बातमीपत्रातून मांडली होती. त्यातूनच अनामी राय यांना काही तरी करण्याची प्रेरणा मिळाली. ३१ मे २०१० ला निवृत्त झाल्यावर लगेच जून महिन्यात त्यांनी शेतकरी नेते किशोर तिवारी यांच्यासह यवतमाळ जिल्ह्य़ास भेट दिली. अशा कुटुंबांशी बातचीत केली. अनेक महिलांना जगणे डोईजड झाल्याचे पाहिल्यावर अत्यंत निकड असणाऱ्या विधवांना प्रत्येकी हजार रुपयांची मदत केली. बारा महिन्यांचे धनादेशही दिले; पण हे पुरेसे ठरणार नाही म्हणून मग रोजगार निर्माण करण्याचा विचार ठेवला. पाच हजार रुपयांपासून सुरुवात झाली. महिलांनीही प्रतिसाद दिला. मदतीचे क्षेत्र विस्तारले. विधवांनाच मदत मिळत असल्याचे पाहून काही गरीब महिला हिरमुसल्या. आम्हालाही मदतीसाठी विधवा व्हावे लागेल का, अशी आर्त विचारणा इतर गरजू महिलांनासुद्धा मदत मिळवून देणारी ठरली. एकूण आठशे कुटुंबांचे सर्वेक्षण राय परिवाराने केले. पुण्याच्या एका स्वयंसेवी महिला संस्थेने व्यवसायाचे धडे दिले. धंदा जमणार नाही, असे म्हणणाऱ्या महिला हिमतीने पुढे आल्या. तीन महिलांपासून झालेली सुरुवात तीन हजारांवर आज पोहोचली आहे. प्राधान्य आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्याचे ठरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकृत अशी यादी घेऊन मदतकार्य सुरू झाले. महिलांना प्रथम पाच हजारांची मदत दिली जाते. व्यवसाय वाढविण्यासाठी १५ हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकही महिला यात ‘फेल’ झाली नसल्याचे प्रकल्प समन्वयक मनोहर गायकवाड आपली हिशोबपुस्तिका दाखवून नमूद करतात. संस्थेची मदत मिळालेल्या सर्व महिलांच्या व्यवसायाचा मासिक आढावा वर्धास्थित कार्यालयातील कर्मचारी घेत असतात. आतापर्यंत चार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. त्याची परतफे डही हळूहळू होत असल्याचे गायकवाड नमूद करतात.

पूर्णपणे उमेद खचलेल्या विधवा महिलांनी दाखविलेली ही जिद्द शब्दांपलीकडची आहे. या महिलांची वाटचाल आता गावासाठी प्रेरणा ठरली आहे, असे राय नमूद करतात.

यातच समाधान आहे!

गेल्या सात वर्षांत अनामी राय व सौम्या यांनी मिळून कोटय़वधी रुपयांचे वाटप केले आहे. हा पैसा आला कुठून, या थेट प्रश्नावर उत्तर देताना राय हसतच म्हणाले- शंका नको. मला निवृत्तीच्या वेळी शासकीय लाभापोटी जो पैसा मिळाला, तो सर्व संस्थेच्या खात्यावर जमा केला. सुरुवात छोटय़ा प्रमाणात होती. पुढे वर्धा जिल्ह्य़ात रोजगारासाठी मदत देण्याचे काम सुरू केले तेव्हा जमनालाल बजाज प्रतिष्ठानने आमच्या जिल्ह्य़ात काम करताहात म्हणून मदत देणे सुरू केले. पारेख फाऊंडेशन मदतीला आले. महिलांना मदतीचा मोठा आकडा देण्यासाठी संस्थेने बँकेतून कर्ज काढले आहे. महिलांना बिनव्याजी देतो, पण आम्ही बँकेला व्याज भरतो. आता व्याजाची ही पूर्ण रक्कम पारेख फाऊंडेशनकडून येते. पैसा गोळा करण्याच्या भानगडीत पडलो नाही. संस्थेचा खर्च कमीच आहे. महिलांकडून प्रामाणिकपणे पैसा परत येतो. काही मित्रांनी देणगी दिली. मदत घेणाऱ्या सर्व महिलांचे बँक खाते आहे. येणारा व जाणारा अशा सर्व पैशांचा हिशोब खुला आहे. तक्रार नाही.. राय म्हणतात, यातच समाधान आहे!