untitled-17

रस्त्यावर टाकलेलं दूध-भाजीपाला, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, संपाचं हत्यार तुलनेनं अधिक तीक्ष्ण होत जाणारं.. निर्णय घ्यायला सरकार राजी होतेय न होतेय तोच काही ‘प्रतिक्रिया’ थेट जीवन संपवून दिलेल्या.. कोणी हातात विजेची तार धरतोय, कोणी चितेवर उडी मारतोय, कोणी विष पिऊन जीवनयात्रा संपवतोय. एका घटनेनं गलबलून व्हायला होतं तोच दुसरी घटना आदळते, अस्वस्थ करून जाते. माणसाला जगण्यापेक्षा मरण बरं वाटावं, अशी परिस्थिती; पण खरंच जगणं एवढं अवघड झालं आहे का? प्रतिकूल परिस्थितीतही जगण्यासाठी धडपडणाऱ्या माणसाचं कौतुक तर कमी होत नाही ना? चिकाटी न सोडणारी माणसं खरं तर गावोगावी असतात. इतरांनाही जगण्याचं बळ देणारी ही माणसं, ती अगदी कशातूनही जग उभं करीत असतात. त्याचं एक उदाहरण म्हणजे गोरखनाथ गोरे. खुलताबाद तालुक्यातील या शेतकऱ्याचा आदर्श घ्या, असं कृषी अधिकारीही आवर्जून सांगतात.

या गोरखनाथचं शिक्षण तसं जेमतेमचं. शेती पारंपरिक. म्हणजे कापसाची आणि मक्याची. ही पिकं घेतली की मजुरी सुटायची. २००३ पर्यंत कुडाच्या घरात राहत होतं त्याचं कुटुंब. आता त्यांनी शेतात टुमदार बंगला बांधलाय. लासूर स्टेशनसारख्या भागात जागा घेतलीय. दारात ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडी आहे. हे सारं आलं कुठून? तर डाळिंब आणि गांडूळ शेतीमधून.

गांडुळाच्या जाती ५०९ प्रकारच्या. त्यातली ‘आसेनिया पोटेडा’ आणि ‘य्रुडीलिप युजेना’ या दोन जाती शेण आणि काडीकचरा खातात. त्यांच्यापासून मिळणाऱ्या खतावर काळ्या जमिनीमध्ये गोरेंनी त्यांची डाळिंबाची बाग फुलवली. केवळ गांडूळखत विक्रीतून त्यांना दरमहा ४० हजार रुपये मिळतात. ते सांगतात, ‘‘कोणत्याही परिस्थितीमध्ये लढण्याची शक्ती पाहिजे माणसात. पूर्वी मी भाजी पिकवायचो. कधी दर पडायचे. कधी तरी लाभ व्हायचा. कापूस आणि मक्यातून फार तर मजुरी सुटते; पण हातात काही शिल्लक राहत नाही.’’ त्यामुळे त्यांनी डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. त्यामागे विचार एक होता की, ‘‘पारंपरिक पीक पद्धती बदलल्याशिवाय हाती काही येत नाही.’’ गांडूळशेती आणि डाळिंब बाग असे नवे सूत्र विकसित करण्यासाठी त्यांना दहा वष्रे लागली. बाजारपेठांचा अंदाज घेऊन शेती करायला हवी, हे गोरेंचं गणित. नेमकं तेच बिघडतं आणि शेती करणारी माणसं हवालदिल होतात.

पण त्यातूनही जिगर न सोडणारे बहाद्दर आहेतच. औरंगाबाद तालुक्यातील करजगावमधील दीपक सांडुलाल बडवणे, जितेंद्र बडवणे, येडुबा भिरे या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने फसवलं. लाखो रुपये अडकले. आता ते वसूल करण्यासाठी व्यापाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यापासून ते ती रक्कम वसूल करण्यासाठी नाना पातळ्यांवर दीपक लढतो आहे. या शेतकऱ्यांनाही हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कापूस विक्री करावा लागला. नोटाबंदीने त्यांना मारलं. सरकार आणि व्यवस्था दोन्ही बाजूंनी आपण नाडले जाऊ असं लक्षात आल्यानंतरही दीपक आणि त्याची मित्रमंडळी पाय रोवून उभी आहेत; पण या तरुणांचं गावात मात्र कौतुक होत नाही. खरं तर ‘तू लढ, आम्ही तुझ्याबरोबर आहोत,’ असं सांगण्याची गरज आहे. इथं यंत्रणा कमी पडतात. अशा काळात गोरखनाथ गोरेसारख्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन त्या गावात ठेवणं एवढंच कृषी विभागाचं काम असतं.

समस्येवर उपाययोजना करणारे अधिकारी नवे प्रयोगही करतात. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २१५० शेततळी उभारण्यात आली आहेत. संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्य़ातील साडेचार हजार शेततळ्यांपैकी दोन तालुक्यांत पूर्ण झालेल्या शेततळ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या दोन्ही तालुक्यांत शेततळे उभी करण्याची जणू शर्यतच सुरू आहे. गावोगावी शेततळे तयार करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. भलेही शेतीच्या क्षेत्रात नकारात्मक विचारांची पेरणी अधिक असो; पण सकारात्मक काम करणारेही कमी नाहीत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावी चांगल्या शेतकऱ्यांचं कौतुक व्हायला हवं..