सीरिया, लिबियातील दहशतवादी कारवायांविरोधातील आघाडीला साथ देत असल्याबद्दल ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेने गेल्या शुक्रवारी पॅरिसमध्ये भयंकर रक्तपात घडवला. १२८ जणांचा जीव या हल्ल्यात गेला. भविष्यात भारत हेही आयसिसचे लक्ष्य ठरू शकेल असे मत तेव्हा व्यक्त झाले होते. दुसरीकडे मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या देशातील सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्यास येत्या आठवडय़ात सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने हे दोन लेख..

‘जगात एक दिवस नक्कीच इस्लामी राज्य येईल. हे राज्य तब्बल २०० ते ३०० वर्षे टिकेल, असा दावा जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला २००६ मधील मुंबईतील बॉम्बस्फोटांचा प्रमुख सूत्रधार डॉ. तन्वीर अन्सारी याने जबाबात केला आहे. सुरुवातीला ‘स्टुडण्ट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘सिमी’ आणि नंतर ‘इंडियन मुजाहिदीन’, तर आता ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया’ म्हणजेच ‘आयसिस’ अशी कथित इस्लामी जिहादींची वेगवेगळी रूपे आहेत. धर्माधतेचा बुरखा पांघरून पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशत पसरू पाहणाऱ्या या कथित इस्लामी जिहादींचे सूत्र साधारणत: समान आहे.
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांमागे या कथित जिहादींनी १९९२ मधील दंगलींचा बदला असे त्याला स्वरूप दिले. आतापर्यंत मुंबईसह देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे हे कथित इस्लामी जिहादी असले तरी सर्व पाकपुरस्कृत आहेत. भारताला ‘आयसिस’चा नव्हे तर पाकपुरस्कृत दहशतवादाचाच प्रमुख धोका आहे आणि तो आजही कायम आहे. आजही ते कुठल्या स्वरूपात पुन्हा पुढे येतील हे आपल्या गुप्तचर यंत्रणेच्याही कल्पनेपलीकडचे आहे. याचा अर्थ असा नव्हे की, गुप्तचर यंत्रणा काहीच करीत नाही. परंतु संगणकीय क्रांतीमुळे अशा दहशतवादी संघटना एक पाऊल पुढे असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे. त्यांच्याशी दोन हात करण्यात आपण कमी पडत आहोत.
धर्माधनुकरण इतक्या मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे की, पूर्वीप्रमाणे ते फक्त मानवी गुप्तहेरीपुरते सीमित राहिलेले नाही. तंत्रज्ञानातील गुप्तहेरीही आता महत्त्वाची ठरली आहे. तंत्रज्ञानातील बदलाचा फायदा उठवितानाच दहशतवादी संघटना वेगवेगळ्या पद्धती वापरीत आहेत. या दहशतवादी संघटनांनी मोबाइल वा फोनद्वारे संपर्क साधणे कधीच बंद केले आहे. सॅटेलाइट फोनचा वापर होत होता. परंतु आता तर संपर्कासाठी नवनवीन साधने उपलब्ध झाली आहेत. प्रत्येक वेळी नवे ग्रुप तयार करून त्यांचे उद्योग सुरू आहेत. एका ग्रुपचा शोध लागला तर तो कधीच बंद होऊन दुसरा नवा ग्रुप तयार झालेला असतो. ई-मेलवरील माहिती गुप्तचर यंत्रणांना उपलब्ध होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ई-मेल पाठविणे बंद झाले. जे काही आहे ते ड्राफ्टमध्ये टाइप करायचे आणि समोरच्या व्यक्तीला पासवर्ड दिल्यामुळे त्याला ते सहज उपलब्ध होते. ई-मेलच पाठविला न गेल्यामुळे त्याचा शोधही लागत नाही आणि दहशतवादी संघटनांना आपले काम फत्ते करणे सोपे होते.
२६ नोव्हेंबरचा हल्लावगळता देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांना पाकिस्तानचीच फूस होती हे लपून राहिलेले नाही. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्याचे नियंत्रण थेट पाकिस्तानात होते. दहा दहशतवादी फिदाईन बनूनच आले होते. आताही हा धोका संपलेला नाही. भविष्यात हवाई हल्ले वा अन्य कुठल्या मार्गाने पाकपुरस्कृत दहशतवादाचा धोका कायम आहे. मला तर भीती वाटते आहे की, जैविक रसायनांच्या अस्त्रांची. २६/११सारखा हल्ला झाला तर आपण आता बऱ्यापैकी तयार आहोत, परंतु यापेक्षा वेगळा हल्ला झाला तर आपली बिलकूल तयारी नाही. त्यादृष्टीने किंबहुना विचारच झालेला नाही. खरे तर आपण शहीद सहायक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळेंचे खूप ऋणी आहोत. त्यांनी कसाबला पकडले नसते तर पाकिस्तानच्या थेट हस्तक्षेपाची खरी बाजू कळू शकली नसती. त्यावेळी हिंदू दहशतवाद्यांची चर्चा सुरू होती. २६/११तील पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे भारतीय पासपोर्ट सापडले तसेच त्यांच्या हाताला हिंदू वापरतात तसा गंडा होता, परंतु कसाब पकडला गेल्यामुळे त्यांचे बिंग फुटले.
कल्याणमधून चार युवक बेपत्ता झाल्यानंतरही आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याची काडीचीही कल्पना नव्हती. या मुलांपैकी एकाच्या वडिलांनी जेव्हा ही बाब पोलिसांना सांगितली तेव्हा ती माहिती मिळाली. त्यानंतर हे तरुण कोठे गेले असावेत याचा शोध सुरू झाला. तेव्हा आयसिसची कल्पना आपल्याला आली. तोपर्यंत आयसिसच्या दहशतवाद्यांनी अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आदींना आपला इंगा दाखविला होताच. भारतात अद्याप आयसिसपेक्षाही पाकपुरस्कृत मुस्लीम जिहादी ही संकल्पना खूपच रूढ होत आहे. त्याला कारणे अनेक आहेत. ती सोडविण्यासाठी आपण काय प्रयत्न केले हा प्रश्न आहे.
धर्माधतेच्या जोरावर मुस्लीम तरुणांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न पाकपुरस्कृत ‘लष्कर ए तोयबा’कडून मोठय़ा प्रमाणावर सुरू होते. मशिदीबाहेर मुस्लीम तरुणांना हेरायचे. त्यांना सुरुवातीला मुंबईतील दंगल व नंतर गोध्रा हत्याकांडाच्या ध्वनिचित्रफिती दाखवून जिहादसाठी तयार केले जात होते. काही वेळा बांगलादेशमध्ये महापुरात वाहून गेलेल्या प्रेतांचा खचही भारतात मुस्लिमांवर होणारे अत्याचार म्हणून दाखविला गेला. या मुस्लीम तरुणांना हाज यात्रेला जाण्यासाठी प्रवृत्त केले जायचे आणि तेथे लष्करचे एजंट त्यांचा ताबा घ्यायचे. पाकिस्तानात त्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जायचे आणि मग त्यांच्यावर विशिष्ट जबाबदारी सोपवून त्यांना भारतात पाठविले जायचे. लष्कर-ए-तोयबामार्फत पाकिस्तानचेच नाव पुढे येऊ लागले. त्यामुळे पाकिस्ताननेच ‘इंडियन मुजाहिदीन’ असे नामकरण केले. साधारणत: २००६ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर हे नाव अधिकच पुढे आहे. २०००, २००२ वा २००३ मधील बॉम्बस्फोटांसाठी अशा पद्धतीने प्रशिक्षण मिळालेले तरुण वापरले गेले. परंतु त्याही वेळी पाकिस्तानचे नाव पुढे आल्यामुळे दहशतवादाची पद्धती बदलण्यात आली. २००६च्या बॉम्बस्फोटांसाठी थेट पाकिस्तानातून काही तरुण आले होते. याच स्फोटातील एक मुस्लीम तरुण फैझल हा लष्करचा कमांडर आजीम चिमा याचा संरक्षक म्हणून राहू पाहत होता, परंतु चिमा त्याच्यावर भडकला.
माझा संरक्षक बनण्यासाठी तुला प्रशिक्षण दिलेले नाही. तुझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती पार पाड, असा त्याला सज्जड दम देऊन त्याची पाठवणी करण्यात आली. फैझलने तसे जबाबात सांगितले आहे. धर्माधनुकरणाच्या नावाखाली या तरुणांना मुस्लीम राज्याची स्वप्ने दाखविली जात होती. आयसिसही काही वेगळे नाही. जगावर राज्य करण्याची त्यांची भाषा आहे.
मराठवाडा वा आसपासच्या परिसरात मुस्लीम जिहादींची संख्या लक्षणीय आहे. याचे प्रमुख कारण काय? मराठवाडा हा पूर्वी निजामांकडे होता. तुम्ही पूर्वीचे राजे होता. आता तुमची अवस्था काय झालीय पाहा, असे सांगूनही त्यांना भडकावले जातेय. ओवेसी लोकप्रिय का होतोय, याचा विचार करण्याची गरज आहे. मुस्लिमांमध्येच आपल्याला सापत्न वागणूक मिळते अशी भावना आहे. पोलीस ठाण्यात गेलेल्या प्रत्येकाशी पोलीस कसा वागतो हे आपण पाहतो. परंतु मुस्लिमांना वाटते, फक्त आपल्याकडेच पोलीस दुर्लक्ष करतोय, त्रास देतोय.
मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना तेच हवेय. शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर जाणूनबुजून या गटाला सरकार आपले आहे असे वाटेल, तेव्हा इस्लामी जिहादीचा विळखा आपसूकच कमी झालेला असेल.

>लेखक राज्याचे माजी पोलीस महासंचालक व राज्य दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख आहेत.
   शब्दांकन आणि अनुवाद – निशांत सरवणकर