हरिश दामोदरन

उन्हाळ्यात ग्राहकांना अतिशय स्वस्त दरात टोमॅटो मिळत होते. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला. आता त्याची किंमत आपण मोजत आहोत..

केवळ एका महिन्यामध्ये टोमॅटोचा किरकोळ विक्री बाजारातील दर २० रुपयांवरून ७० रुपये (मुंबईत १०० रुपये) प्रति किलोपर्यंत जाऊन पोहाचला. मे आणि जूनच्या सुरुवातीला फक्त १० ते १२ रुपये प्रति किलोने टोमॅटो बाजारात उपलब्ध होते. मग असे अचानक नक्की झाले तरी काय?

या वर्षांसाठीही टोमॅटोची किंमत असमान राहणार आहे?

गेल्या वर्षी या काळामध्ये देशभरात सरासरी ४० रुपये प्रति किलो या भावाने टोमॅटो बाजारात उपलब्ध होते. या वर्षांच्या सुरुवातीला हा दर ३० रुपये इतका होता. शेतकऱ्यांनी या वेळी या पिकाची लागवड उन्हाळ्याच्या सुमारास करण्याऐवजी खरीप हंगामामध्ये केली. मात्र काही प्रमाणात टोमॅटो बाजारात उपलब्ध होऊनही अनेक ठिकाणी ९० ते १०० पर्यंत टोमॅटोची किंमत गेली.

हे नेमके कशामुळे झाले?

देशात उत्पादन केल्या जाणाऱ्या टोमॅटोची दोन मुख्य पिके घेतली जातात. एक म्हणजे जूनच्या मध्यावर मध्य आणि दक्षिण भारतामध्ये (मुख्यत्वे मध्य प्रदेशातील शिवपुरी आणि सागर, महाराष्ट्रातील नाशिक, आंध्र प्रदेशातील मदनपल्ले, कर्नाटकामधील कोलार आणि म्हैसूर आणि तामिळनाडूतील दिंडीगुल) टोमॅटोची लागवड करण्यात येते. जुलै मध्य ते ऑगस्टमध्ये राजस्थानमधील झालावर आणि जयपूर चोमी पट्टा, उत्तर प्रदेशमधील सानभद्र, वाराणसी, लखनौ, बरेली आणि आग्रा येथे टोमॅटोची लागवड करण्यात येते. हे विशेषत: ९० ते १०० दिवसांचे पीक आहे. रोपांची लावणी अथवा रोपण केल्यानंतर साधारणपणे ६० ते ७० दिवसांनंतर फळे येण्यास सुरुवात होते. (टोमॅटोच्या रोपांची वाढ प्रथम रोपवाटिकेमध्ये केली जाते. त्यानंतर २५ दिवसांनंतर ते शेतामध्ये लावण्यात येते.)

जानेवारी आणि फेब्रुवारीत टोमॅटोचे नव्याने रोपण केले जाते. हे दुसरे मुख्य पीक. हा १३० ते १५० दिवस असा दीर्घ हंगाम आहे. यादरम्यान एकरी २५ टन इतके उत्पन्न मिळते. तसेच याच्या १५ ते २० तोडण्या (पावसाळय़ात अथवा खरिपामध्ये उशिरा लागवड केलेल्या टोमॅटोला प्रति एकर १५ ते २० टन इतके उत्पन्न मिळते.) केल्या जातात. हे ‘उन्हाळय़ातील टोमॅटो’ (मेअखेर अथवा जुलैमध्ये याची कापणी होते म्हणून) जास्त करून फुले आणि फळे येण्याच्या दरम्यान कमाल ३० अंश से. तापमान असलेल्या भागात घेतले जाते.

उन्हाळ्यात शेतकरी टोमॅटोची लागवड करताना विशेषत: सिंचन, कीटकनाशके, स्टेकिंग (झाडे बांधण्याचे काम करणे), खते आणि इतर साधनांसाठी एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च करतात. खरिपात हा खर्च ५० ते ७५ हजार होतो. यामुळे शेतकरी उन्हाळ्यात टोमॅटोला अधिक दर मिळण्याची अपेक्षा करतात.

परंतु हा मुद्दा आपल्या मुख्य विषयाशी कसा जोडला गेला आहे?

नोव्हेंबर ते मेदरम्यान या पिकाचे उत्पादन कमी झाले होते, हे खरे आहे. संगमनेर, कोलार, मदनपल्ले या उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये एक महिन्यापूर्वी अथवा मेच्या मध्यापर्यंत टोमॅटोच्या किमतीमध्ये थोडीही वाढ झालेली नव्हती. खरिपाच्या पिकांसाठी मान्सून जोरदार झाला आहे. मागील वर्षीच्या खरिपाच्या टोमॅटोंना कमी किंमत मिळण्यामागे नोटाबंदी हे मुख्य कारण होते.

टोमॅटोच्या दरातील वाढ ही ग्राहकांना जूनच्या अखेरपासून दिसून येण्यास सुरुवात झाली होती. मात्र मागील सात किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून हा दर आकारास येण्यास सुरुवात झाली हे कुणाच्याही लक्षात आले नाही. अनेक प्रकरणांमध्ये पहिल्या दोन तोडण्या झाल्यानंतर उन्हाळ्यातील पिकाची देखभाल करणे, त्याला खत घालणे शेतकऱ्यांनी सोडून दिले होते. उन्हाळ्यात ग्राहकांना अतिशय स्वस्त दरात टोमॅटो मिळत होते. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला. आता त्याची किंमत आपण मोजत आहोत.

हे कसे झाले?

आपण वर पाहिल्यानुसार २०१६च्या खरिपात टोमॅटोचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेण्यात आले होते. मात्र त्याच वेळी सरकारने ८ नोव्हेंबरला निश्चलनीकरणाचा निर्णय घेत ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या. यामुळे टोमॅटोचे दर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तीन ते चार रुपये प्रति किलोने कोसळले. मागील वर्षांच्या याच काळामध्येही हे दर कमी असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. त्यामुळे सतत दर कोसळल्यामुळे या वेळी उन्हाळी टोमॅटोची लागवड करण्यास शेतकरी अनुत्सुक होते. उन्हाळय़ात या दरामध्ये काहीशी वाढ होईल अशी आशा अनेक शेतकऱ्यांना होती. मात्र तीही फोल ठरली. त्यामुळे अनेक शेतकरी निराश झाले. त्यांनी आपल्या पिकाकडे लक्ष देणे बंद केले. त्याचा परिणाम आता जाणवत आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे किमतीमध्ये थोडी वाढ झाली असली, तरी त्यामुळे शेतकरी आनंदी होईल याची शक्यता कमीच आहे.

भविष्यात काय स्थिती असेल?

संकरित भाजीपाला बियाणे पुरवठा करणाऱ्या ‘मोन्सॅन्टो इंडिया’ या कंपनीचे तांत्रिक व्यवस्थापक (भाजीपाला) शिशिर o्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षांच्या तुलनेत सध्याच्या खरीप हंगामामध्ये टोमॅटोची लागवड ३० ते ४० टक्क्य़ांनी कमी झाली आहे. सध्या शंभरी गाठलेला दर शेतकऱ्यांसाठी पीक लागवड करण्यासाठी उत्साह निर्माण करणारा असला, तरी अनेक भागांतील रोपवाटिकेत रोपे लावण्याची वेळ आता संपून गेली आहे. खरीप हंगामामध्येही पिकाची लागवड कमी होत असेल तर किमतीमध्ये लगेच काही फरक पडण्याची शक्यता धूसर आहे. मात्र या दरम्यान आपण कांदा आणि बटाटा घेऊ शकतो. सध्या तरी त्याच्या किमती भडकलेल्या नाहीत.