सीरियामध्ये गेली काही वर्षे सुरू असलेल्या संघर्षांची झळ आता शेजारी देशांना जाणवू लागली आहे. युद्धाच्या होरपळीतून सुटका करून घेण्यासाठी तेथील नागरिक मिळेल त्या मार्गाने शेजारच्या युरोपमध्ये धाव घेत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोप इतके मानवी गहिरे संकट अनुभवत आहे. व्हिएतनाम युद्धानंतर एक लाख निर्वासित जलमार्गे फ्रान्समध्ये आले होते. तर १९९० च्या दशकात युगोस्लाव्हियातील यादवी युद्धानंतर जर्मनी आणि अन्य देशांत मोठय़ा प्रमाणात निर्वासित आले होते. शिस्तबद्ध जगण्याला सरावलेल्या युरोपीय देशांना ही ‘नसती आफत’ झेलताना त्रास होत आहे. पण नाइलाजाने का होईना त्यांना या निर्वासितांना आश्रय देणे भाग पडत आहे आणि त्यातून नव्या समस्या उभ्या राहात आहेत. निर्वासितांचे लोंढे संख्येने फार मोठे आहेत. त्यांना युरोपीय समाजजीवनात सामावून घेणे वाटते तितके सोपे नाही. त्यातून अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मानवी प्रश्न निर्माण होत आहेत. सामाजिक आव्हान..

युरोपमधील बहुतेक देशांचा आर्थिक स्तर आणि जीवनमान उच्च आहे. त्या मानाने हे निर्वासित कमी उत्पन्नगटातून आले आहेत. त्यांचे धर्म, भाषा, सवयी, चालीरिती, निष्ठा, संकल्पना वेगळ्या आहेत. त्यासह त्यांना सामावून घेणे हे मोठे कठीण काम आहे. त्यातील अनेक जण गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत.
भयाण वास्तव ऐरणीवर..
सीरियातून ग्रीसमध्ये येताना नाव उलटून झालेल्या अपघातात एका तीन वर्षांच्या बालकाने – आयलान कुर्डी याने जगाचा निरोप घेतला. या अपघातात आयलानची आई, त्याचा मोठा भाऊ घालेब यांचाही मृत्यू झाला. त्याचे वडील अब्दुल्ला कार्डी तेवढे बचावले. तुर्की छायाचित्रकार निलोफर देमीर यांच्या कॅमेऱ्यास ते दिसले. त्यांनी ते टिपले. समाजमाध्यमांतून ते सर्वत्र पोचले आणि त्या छायाचित्राने संवेदनशील जग हेलावले. सीरियातील निर्वासितांचा प्रश्न किती गंभीर आहे हे त्या एका छायाचित्राने ठळकपणे जगासमोर आणले.

पुनर्वसनाचे आव्हान..

युरोपीय महासंघाने मे
महिन्यात इटली आणि ग्रीसमार्गे आलेल्या ४०,००० निर्वासितांचे अन्यत्र पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

ंयुरोपमधील देशांना त्यांची लोकसंख्या, क्षेत्रफळ, दरडोई उत्पन्न, अर्थव्यवस्थेची स्थिती, बेरोजगारीचा दर आदी निकष तपासून निर्वासितांना स्वीकारण्याचा कोटा ठरवून दिला जात आहे.

पण या देशांनी निर्वासितांना स्वीकारण्यासाठी केंद्रे उभारणे तसेच त्यांना नवी भाषा अवगत करण्यासाठी मदत करण्याचे बंधन घातले आहे. युद्धात होरपळल्याने मनावर मोठा आघात झालेल्या मुलांसाठी शाळांनी खास योजना राबवणे अपेक्षित आहे.

युरोपीय संघातर्फे निर्वासितांना स्वीकारणाऱ्या देशांना प्रत्येक निर्वासितामागे ६००० युरो (६,९०० डॉलर) मदत दिली जाईल.

सरकारांबरोबरच स्वयंसेवी संस्थांचीही मदत अपेक्षित आहे. काही देशांत निर्वासितांना सामावून घेण्यासाठी कायद्यांमध्ये बदल करावे लागणार आहेत.

कोणत्या देशांतून नागरिक परागंदा होत आहेत?

सीरिया, याचबरोबर लिबिया,
सुदान, सोमालिया, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नायजेरिया, गिनी, आयव्हरी कोस्ट, इरिट्रिया या देशांतूनही प्रामुख्याने नर्वासितांचे लोंढे बाहेर पडत आहेत.

निर्वासितांना संघर्षग्रस्त भागातून
बाहेर काढून स्थलांतरास मदत करण्यासाठी अनेक माफिया गट, चोरटी मानवी वाहतूक करणारे गट आणि तस्कर सक्रिय झाले आहेत. ते निर्वासितांकडून भल्यामोठय़ा रकमा घेऊन त्यांना असुरक्षित मार्गाने प्रवास करण्यास भाग पाडत आहेत. त्यात अनेकांचा जीव जात आहे.

संकटाचे संख्यात्मक रूप..
4४०,००,००० : अलीकडच्या काळात एवढय़ा नागरिकांनी सीरिया सोडला.
4२,७०,००० : या वर्षी जूनअखेर युरोपमध्ये एवढे निर्वासित दाखल झाले.
4५०,००० : यंदाच्या केवळ जुलै महिन्यात एकटय़ा ग्रीसमध्ये एवढे निर्वासित आले.
4८,००,००० : जर्मनीत प्रवेश करण्यास एवढे निर्वासित उत्सुक आहेत.
4५०० दशलक्ष : युरोपची एकूण लोकसंख्या. त्यात या निर्वासितांना सामावून घेण्यास अनेक देश राजी नाहीत.