संशोधनासाठी शिकागो विद्यापीठातील प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाले. आपल्या मर्यादा ओळखण्यातच शहाणपण दडलेले आहे. आर्थिक नायकाच्या या मर्यादांचे भान जगाला आणून देणाऱ्या थेलर यांना मिळालेले पारितोषिक म्हणूनच इकॉनच्या जनकाला मिळालेले नोबेल आहे.

पारंपरिक अर्थशास्त्रात त्यातील मध्यवर्ती नायक हा विवेकी मानला गेला आहे. आर्थिक निर्णयाचे अल्पकालीन फायदे आणि दीर्घकालीन तोटे किंवा त्याचे अल्पकालीन तोटे आणि दीर्घकालीन फायदे याचा सारासार विचार करून विवेकाने तो निर्णय घेतो असे समजले जाते. या मूळ गृहीतकालाच आव्हान दिले ते ‘वर्तणुकीय अर्थशास्त्र’ (बिहेव्हियरल इकॉनॉमिक्स) या शास्त्र शाखेच्या उदयाने. पारंपरिक अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या मिलाफाने सिद्ध झालेली ही शास्त्र-शाखा तशी नवीच. यात मध्यवर्ती नायक असतो ‘इकॉन’ हा चुका करणारा, स्खलनशील मानव, परिपूर्ण विवेकी मानव नव्हे, असे थेलर यांचे प्रतिपादन आहे. या शास्त्र शाखेची सुरुवात १९७४ साली सुरू झाली असे म्हणता येते. प्रिन्स्टन विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक डॅनियल काह्नेमन आणि दुर्दैवाने अकाली मृत्यू पावलेले त्यांचे सहकारी अमोस त्वस्र्की यांनी त्यांचा पहिला शोधनिबंध ‘जजमेंट अंडर अनसर्टनटी: ह्य़ुरिस्टिक्स अ‍ॅण्ड बायसेस’ हा ‘सायन्स’ या प्रख्यात जर्नलमध्ये ७४ साली प्रसिद्ध केला आणि मैलाचा दगड ठरलेला त्यांचा दुसरा शोधनिबंध ‘चॉइसेस, व्हॅल्यूज अ‍ॅण्ड फ्रेम्स’ हा ‘अमेरिकन सायकॉलॉजिस्ट’ या जर्नलमध्ये १९८४ मध्ये प्रसिद्ध केला. या दोन शोधनिबंधांनंतर ही शास्त्र-शाखा सुरू झाली. ‘मानसशास्त्रा’चे प्राध्यापक असलेल्या काह्नेमन यांना २००२ सालचे ‘अर्थशास्त्रा’चे नोबेल मिळाले तेव्हा पारितोषिकासाठी त्यांची निवड करताना या दोन्ही शोधनिबंधांना आधारभूत धरले गेले असे नोबेल समितीने आवर्जून नमूद केले होते. (अमोस हे तोवर हयात नसल्याने या नोबेलवर त्यांचे नाव नाही.) ही शास्त्र शाखा पुढे काह्नेमन यांच्याबरोबर काम करून आणि स्वतंत्ररीत्याही काम करून ज्यांनी विकसित केली त्यापैकी एक बुजुर्ग अर्थतज्ज्ञ म्हणजे या वेळचे अर्थशास्त्राचे नोबेल विजेते रिचर्ड थेलर.

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

सामाजिक धोरण आखताना या विद्याशाखेतील महत्त्वाच्या सिद्धांतांचा उपयोग केला गेला पाहिजे असे विशेषत: २००८ सालच्या अमेरिकन(आणि पर्यायाने जागतिक) आर्थिक पडझडीनंतर तीव्रतेने जगभरातील अर्थतज्ज्ञांना वाटू लागले आहे. या सिद्धांतांचे महत्त्व पटल्याची पावती म्हणजेच या वेळचे थेलर यांना मिळालेले नोबेल होय.

रिचर्ड थेलर यांनी त्यांच्या ‘नज’ या पुस्तकात एक मनोरंजक घटना सांगितली आहे. थेलर यांनी एकदा खाना आयोजित केला होता. खान्याच्या सुरुवातीला पाहुण्यांना तोंडात टाकायला तळलेल्या खाऱ्या काजूचे वाडगे प्रत्येकासमोर ठेवले होते. मुख्य जेवणापूर्वी हळूहळू एकेक करत पाहुणे काजू तोंडात टाकतील अशी अपेक्षा होती, त्याऐवजी ते सर्व जण काजूवर तुटून पडले. थोडय़ाच वेळात यजमान थेलर यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांना वाटले अशाने जेवणाचा विचका होणार. पण पाहुण्यांना काजू जास्त खाऊ  नका, असे सांगायचे कसे? त्यांनी तसे सांगितले नाही. त्यांनी चक्क पाहुण्यांच्या समोरून काजूचे वाडगे काजू शिल्लक असतानाच काढून घेतले. असे करताना खरे तर थेलर थोडे धास्तावले होते. पण पुढे आश्चर्य घडले. थेलर यांच्या या कृतीने पाहुण्यांनी रागावयाच्या ऐवजी थेलर यांचे चक्क ‘आभार’ मानले. पारंपरिक अर्थशास्त्रात पर्याय कमी केले असता त्यातील विवेकी नायक अधिक सुस्थितीत असूच शकत नाही असे मानले जाते. जितके अधिक पर्याय, जितकी अधिक निवडीला संधी तितका हा नायक अधिक सुस्थितीत, असे मानले जाते. व्यक्ती विवेकी असल्याने तिला हवे तर ती काजू खाणे थांबवेल. ती स्वत:साठी सर्वात सुयोग्य पर्याय विवेकाने निवडेलच, पारंपरिक अर्थशास्त्र निर्णयकर्त्यांच्या विवेकाविषयी अशी खात्री बाळगते. थेलर यांचा हा अनुभव मात्र या खात्रीला सुरुंग लावणारा होता.

हा प्रसंग आणि नंतर केलेल्या अनेक प्रयोगांनंतर थेलर यांना प्रकर्षांने वाटू लागले की व्यक्ती अनेकदा विवेकपूर्ण आर्थिक निर्णय घेण्याऐवजी आत्मघातकी निर्णय घेते आणि अशा निर्णयांपासून व्यक्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यशासनाची आहे. ओबामा प्रशासनाचे सल्लागार म्हणून काम करताना तशी संधी त्यांना मिळाली. व्यक्तीचे कित्येक मोठे आर्थिक निर्णय हे आळसाने घेतले गेलेले असतात हे थेलर आणि त्यांचे सहकारी सनस्टीन (नज या पुस्तकाचे सहलेखक) यांचे निरीक्षण अफलातून होते. त्यांचे म्हणणे व्यक्तीच्या या दोषाचाच वापर करून तिला योग्य आर्थिक निर्णय घेण्याकडे कोपराने हळूच ढकलता (नज) येईल. केवळ एवढे केल्याने कित्येक आर्थिक दुर्घटना टळतील असे त्यांना वाटत होते. उदा. अमेरिकेतील खासगी कंपन्या व्यक्तीला नोकरीवर रुजू करून घेताना एक अर्ज भरून घेतात. ज्यात व्यक्तीने पेन्शन योजनेत सहभागी होत नाही/आहे यातून पर्याय निवडायचा असतो. थेलर यांच्या असे लक्षात आले की, मूळ पर्याय पेन्शन योजनेत सहभागी होत नाही असा दिला जात होता आणि आळसापोटी बहुतांश लोक तो बदलत नव्हते. परिणामी पेन्शन योजनेतून बरेचसे वगळले जात होते. त्यांनी ओबामा प्रशासनाला सूचना केली की कंपन्यांना त्या अर्जात मूळ पर्याय पेन्शन योजनेत सामील होत आहे असा ठेवण्यास सांगावे. कामावर नवीन भरती होणाऱ्याला हवा असल्यास मूळ पर्याय बदलून पेन्शन योजनेत सामील होणार नाही असे मुद्दाम निवडावे लागावे. थेलर यांनी सुचवल्याप्रमाणे ओबामा प्रशासनाने हा बदल केला. नुसता एवढा बदल केल्यावर बहुतांश लोक आता पेन्शन योजनेत सामील होऊ  लागले. हा बदल जर वेळीच केला गेला असता तर बरेचसे नोकरदार पेन्शन योजनेत सामील झालेले असते आणि लाखो कुटुंबांना २००८च्या आर्थिक पडझडीची झळ इतकी तीव्र बसली नसती. स्पेन, नॉर्वे, फ्रान्स, इस्रायल या देशांत शव अवयवदानासाठी हीच युक्ती वापरली जाते. एखाद्या व्यक्तीला मरणोत्तर अवयवदान करायचे नसल्यास तो पर्याय तिला मुद्दाम निवडावा लागतो. व्यक्ती आश्चर्यकारकरीत्या मूळ पर्यायालाच चिकटून राहत असल्याने रोपणासाठी अवयव उपलब्धतेचे काम साधले जाते. व्यक्तीला बदलाचा पर्याय दिलेला असतो (स्वातंत्र्य) पण धोकादायक निर्णयापासून परावृत्त केलेले असते (किंवा अवयवदानासारख्या निर्णयात वांच्छित निर्णय घेण्याकडे ढकलले असते) (पालकत्व) अशी या ‘नज’मागील थेलर यांची भूमिका आहे.

१९७०च्या दशकात थेलर रोचेस्टर विद्यापीठात शिकत होते. त्यांची निरीक्षणशक्ती मार्मिक आणि तिरकस होती. त्यांच्या  एका प्राध्यापकांना (प्राध्यापक ‘आर’) वाइन गोळा करण्याचा छंद होता. त्यांना वाइनच्या लिलावांत भाग घेऊन वाइन गोळा करण्याचा नाद होता. थेलर यांचे निरीक्षण असे होते की प्राध्यापक आर हे वाइन खरेदी करताना ३५ डॉलरपेक्षा कधीही जास्त पैसे देत नसत आणि ती विकण्यास १०० डॉलरच्या खाली कधीही तयार नसत. ३५ आणि १०० डॉलर्सच्या मधल्या किमतींना ते विकतही नसत आणि विकत घेतही नसत. त्यांचे हे वर्तन पारंपरिक अर्थशास्त्रातील विवेकी नायकाशी विसंगत होते. ज्या बाटलीची किंमत त्यांना ३५ डॉलर पडली होती ती ५० पेक्षा अधिक किमतीला विकण्यास हा विवेकी नायक तयार असायला हवा होता. आणि इथे तर हे पारंपरिक अर्थशास्त्र अचूक आहे असे मानणारे त्या विषयाचे प्राध्यापक नायकच खुद्द तसे वर्तन करताना दिसत नव्हते. इतरांचीही अशी अनेक उदाहरणे थेलर यांच्या निरीक्षणात आली होती. या दरम्यान काह्नेमन आणि त्वस्र्की यांचा ‘प्रॉस्पेक्ट थिअरी’ मांडणारा शोधनिबंध त्यांच्या हाती लागला. ‘व्यक्तीला हातातील वस्तू जाण्याचा तोटा दु:सह असतो.’ या सिद्धांताने त्यांना आकर्षून घेतले. पुढे काह्नेमन यांच्याबरोबर काम करून त्यांनी ‘एन्डोवमेंट इफेक्ट’ हा परिणाम सिद्ध केला. ज्यामुळे व्यक्तीच्या अशा अतार्किक आर्थिक निर्णयांची संगती लागली. वापरण्यासाठी घेतलेली वस्तू आणि बदलून घेण्यासाठी घेतलेली वस्तू या वेगळ्या असतात. आणि बदलून घेण्यासाठी घेतलेल्या वस्तूच्या बाबतीत हा एन्डोवमेंट परिणाम दिसून येतो. यातूनच पुढे सुपरिचित कॉफीमगचा प्रयोग केला गेला. ज्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमात निम्म्या प्रेक्षकांना लॉटरी पद्धतीने सहा डॉलरचा कॉफीमग दिला गेला. आणि कार्यक्रमानंतर तो विक्रीस ठेवण्यास सांगितले गेले. कॉफीमग ज्यांना मिळाला होता त्यांनी किती किमतीला विकण्यास तयार हे लेबल लावायचे आणि ज्यांना तो मिळाला नव्हता त्यांनी तो किती किमतीस विकत घेण्यास तयार आहे हे सांगायचे, अशी अट होती. आश्चर्याची बाब ही की, विकत देण्याची सरासरी किंमत विकत घेण्याच्या सरासरी किमतीच्या दुप्पट होती. खरे तर निम्म्या लोकांना कॉफीमग तसाही फुकटच मिळाला होता अगदी सहा डॉलरचा कॉफीमग सहा डॉलर रोख घेऊनदेखील त्यांनी तो विकण्यास हरकत नव्हती आणि सहापेक्षा अधिक कोणत्याही किमतीला विकण्यास तर इकॉनच्या पारंपरिक संकल्पनेप्रमाणे मुळीच अडचण नव्हती. पण अशी वस्तू एकदा हातात आली की, त्याची किंमत त्या व्यक्तीच्या दृष्टीने दीडपट ते अडीचपट होते असे काह्नेमन आणि त्वस्र्की यांनी त्यांच्या प्रॉस्पेक्ट सिद्धांतात दाखवून दिले होते. इकॉन या सिद्धांतानुसार वागताना दिसला, पारंपरिक अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार विवेकी नायकाप्रमाणे वागताना दिसला नाही.

परंपरा घट्ट असतात. जबरदस्त धडाका दिल्याशिवाय त्या खिळखिळ्या होत नाहीत. ज्ञानाचे क्षेत्रही याला अपवाद नाही. वर्तणुकीय अर्थशास्त्रातील वादातीत सिद्धांतांचा समावेश अर्थशास्त्राच्या विद्यापीठीय अभ्यासक्रमात अजूनही होत नाही अशी खंत काह्नेमन यांनी त्यांच्या ‘थिंकिंग फास्ट अ‍ॅण्ड स्लो’ या २०११ साली प्रसिद्ध केलेल्या अजोड ग्रंथात व्यक्त केली आहे.

आपल्या मर्यादा ओळखण्यातच शहाणपण दडलेले आहे. आर्थिक नायकाच्या या मर्यादांचे भान जगाला आणून देणाऱ्या थेलर यांना मिळालेले या वर्षीचे नोबेल म्हणूनच इकॉनच्या जनकाला मिळालेले नोबेल आहे.

डॉ. अजय ब्रह्मनाळकर – Ajay.brahmnalkar@gmail.com