अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीवर  अखेर शिक्कामोर्तब झाले. आतापर्यंत बेलगाम वक्तव्य करून ट्रम्प यांनी अनेक गटांना दुखवून ठेवले आहे. स्वत:ला सर्वापेक्षा हुशार समजणाऱ्या ट्रम्प यांची अनेक वक्तव्ये त्यांचेच नुकसान करणारी असतात. फक्त गोऱ्या लोकांच्या मतावर निवडून येणे त्यांना कठीण आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा खासगी व्यवसाय नाही, की जेथे एका कंपनीशी जमले नाही तर दुसऱ्या कंपनीशी बोलणी करता येतात..

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीवर रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले. गुरुवारी रात्री त्यांनी भाषण करून ते स्वीकारले. हा सोहळा आधुनिक तांत्रिक प्रगतीचा उपयोग करण्यात जराही मागे नव्हता. तसेच दोन्ही पक्षांच्या इतिहासात अशा निवडणुका काही वेळा वाद, निदर्शने यांनी गाजल्या. यास यंदा अपवाद नाही.

विरोधकांनी अधिवेशनाच्या प्रारंभी बरीच निदर्शने करून दुहीचे प्रदर्शन घडविले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अमेरिकेची सुरक्षितता हा विषय होता. नंतरही तोच चालू होता असे वाटले. रिपब्लिकन पक्षाची कायमची समजूत आहे की, संरक्षणाबाबत तोच खरा जागरूक आणि समर्थ पक्ष आहे व त्याच्याइतके देशभक्त दुसरे कोणी नाही. पूर्वी काय असेल ते असो, पण गेल्या दोन-तीन निवडणुकींसाठी उभ्या राहिलेल्या अध्यक्षीय उमेदवारांत युद्धाचा अनुभव असलेल्यांची संख्या तुरळक दिसेल. सुरक्षित घरात बसून स्वत:ला सेनापती समजणारे पुढारी रिपब्लिकन पक्षात बरेच आहेत.

अध्यक्ष हा घटनेप्रमाणे सरसेनापती म्हणून संबोधला जातो, पण इथे अध्यक्ष हा खराच सरसेनापती असल्याचे समजणारे लोक आहेत. जॉर्ज डब्ल्यू. बुश व्हिएतनामविरुद्धच्या युद्धात भरती व्हायला लागू नये म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दलात सामील झाले होते. तेथेही ते कधी हजर होते की नाही याचा पुरावा कोणाला मिळाला नाही. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. उपराष्ट्रपती चेनी हे मोठे युद्धपिपासू, पण व्हिएतनाम युद्धाच्या वेळी त्यानी पाच वेळा भरती होण्याचे टाळले, पण युद्धाची हौस जोरदार.

ही निवडणूक असते ती अध्यक्षपदाची; पण वारंवार सरसेनापतीची निवडणूक असे म्हटले जाते. ही निवळ थट्टा आहे. लोकशाही देशांत पंतप्रधान वा अध्यक्ष हाच युद्धाचा निर्णय घेतो, पण त्याला सरसेनापती मानले जात नाही. इथे अधिकृतपणे तसे मानले जाते हे अजब आहे. पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉिशग्टन जनरल होते व नंतर अध्यक्ष झाले. त्यामुळे प्रत्येकाला आपण जनरल आहोत असे वाटत असावे. युद्धात भाग घेण्याचे टाळणाऱ्यांना तर ते जास्तीच तीव्रतेने वाटते.

तेव्हा अमेरिकेच्या सुरक्षिततेच्या विषयावर क्लिव्हलँडच्या अधिवेशनात सर्व वक्त्यांनी इतका वरच्या पट्टीतला सूर लावला होता की, टीव्हीचा आवाज कमी करणे श्रेयस्कर होते; पण श्रीमती स्मिथ यांनी जोरदार भाषेत नव्हे तर भावनात्मकतेने भाषण केले. लिबियात बेन्गाझीत दहशतवाद्यांनी अमेरिकन दूतावासातील चौघांचा बळी घेतला, त्यात त्यांचा मुलगा होता. बेन्गाझी हल्ल्यासंबंधी हिलरी यांची परराष्ट्रमंत्री म्हणून साक्ष झाली असता ज्या रीतीने व ज्या भाषेत त्यांनी उत्तर दिले ते संतापजनक होते. हे सर्व श्रीमती स्मिथ यांच्या भाषणाने श्रोत्यांना आठवून ते हेलावून गेल्याचे दिसत होते.

न्यूयॉर्कचे माजी महापौर जुलियानी यांनी मोठय़ा तावातावाने भाषण केले. न्यूयॉर्कवर सद्दाम हुसेन याने हल्ला केला नव्हता आणि इराकचा काही संबंध नव्हता. तरीही इराकविरुद्ध युद्ध पुकारण्यात आले. जुलियानी यांनी तेव्हा बुशविरोधी नेहमीच्या साध्या आवाजातही विरोध केला नव्हता. ते आणि न्यू जर्सीचे गव्हर्नर ख्रिस्त ख्रिस्ती यांची भाषणे ऐकत असताना आपण फ्रेन्च क्रांतीविषयीचा ‘टेल ऑफ टु सिटीज’सारखा चित्रपट पाहात आहोत व ख्रिस ख्रिस्ती हे रॉबस्पीअरची भूमिका करत आहेत का, असा प्रश्न पडला. फ्रेन्च क्रांतीच्या वेळी रॉबस्पीअर इत्यादी कंठशोष करून राजघराणे आणि सरदार इत्यादींचे शिरकाण करण्यासाठी लोकांना आवाहन करत व लोक चेकाळत.

परराष्ट्र धोरण, आंतराष्ट्रीय संबंध इत्यादीमुळे निर्माण झालेले प्रश्न या रीतीने लोकभावना चेतवून सोडवण्याची ही रीत कायद्याच्या राज्याचा पुकारा करणाऱ्यांना शोभत नाही. अब्राहम िलकन यांनी गेटिसबर्ग येथील भाषणात ‘सरकार हे लोकांचे आहे’ असे म्हटले होते. याचा अर्थ लोकांनी कायदा हातात घेऊन जाहीररीत्या खटले चालवून त्यांना जी व्यक्ती गुन्हेगार वाटेल तिला फाशीची शिक्षा द्यायची असा नव्हता व नाही.

याउलट ट्रम्प यांचा सर्वात मोठा मुलगा डोनाल्ड याचे भाषण होते. तो ट्रम्प उद्योगसमूहाचा उपाध्यक्ष आहे. त्या क्षेत्रातील अनुभव आणि देशपरदेश यांतील घडामोडींचे ज्ञान याचा उपयोग करून त्याने सध्याच्या राजवटीवर टीकास्त्र सोडले.

त्याचे सर्व मुद्दे मान्य होवोत वा न होवोत, पण त्याने परिणामकारक रीतीने त्याची बाजू मांडून जरूर विचार करायला लावले.

ट्रम्प हे मुस्लीमविरोधी अशी प्रतिमा त्यांच्या वक्तव्याने तयार झाली असता मंगळवारी रात्री धक्काच बसला. अर्थात हे एकाएकी झाले नाही तर ठरवून झाले. एक मुस्लीम संस्था चालवणारा गृहस्थ व्यासपीठावर आला आणि त्याने ट्रम्प यांच्याबद्दल मुस्लिमांच्या सद्भावना व्यक्त करून ट्रम्प यांच्यासाठी कोणत्याही धर्माची नव्हे तर परमेश्वराची प्रार्थना करण्याचे आवाहन सर्व श्रोत्यांना केले. श्रोते मान लववून व डोळे मिटून ऐकत होते. शेवटी त्याने ख्रिस्ती लोकांप्रमाणे आमेन असे म्हटले. ते झाल्यावर त्याने प्रेषित मोहम्मदाची प्रार्थना केली. सर्वानी त्यात भाग घेतला.

अधिवेशनात दरवेळी अध्यक्षीय उमेदवाराची पत्नी अध्यक्षीय उमेदवार शेवटच्या दिवशी बोलतो तेव्हा त्याची ओळख करून देते. या वेळी मलानिया या ट्रम्प यांच्या पत्नीने पहिल्या दिवशीच भाषण केले, कारण त्यांना राजकारणाची आवड नाही व भाषण देण्याचीही नाही. त्यांचे भाषण झाल्याबरोबर, भाषण व ते करण्याची पद्धत याविषयी टीव्ही वाहिन्यांचे भाष्यकार प्रशंसापर बोलत होते; पण दुसऱ्या दिवशी सकाळी असे जाहीर झाले की, त्यांच्या भाषणातील काही ओळी श्रीमती मिशेल ओबामा यांनी आठ वर्षांपूर्वी ओबामांची उमेदवार म्हणून निवड झाल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात केलेल्या भाषणांतील होत्या तशाच आहेत.

लगेच तेच रात्रीचे भाष्यकार टीकाकार झाले. या विषयावर किती वेळ बोलावे याबद्दल तारतम्य नव्हते. तसाच विचार केला तर आठ वर्षांपूर्वी ओबामा यांनी त्यांच्या एका भाषणात अनेक परिच्छेद डुव्हाल पॅट्रिक याच्या भाषणातून घेतले होते. हिलरी तेव्हा ओबामांच्या विरुद्ध निवडणूक लढवत होत्या. त्यांनी हे बाहेर आणले; तथापि ओबामा यांनी वेळ न लावता आपण डुव्हाल पॅट्रिक यांच्याशी बोललो होतो व त्यांच्या भाषणातील भाग घेतला, अशी कबुली दिली आणि वादच होऊ दिला नाही. ट्रम्प कुटुंबीयांपकी कोणीही खुलासा केला असता तर वाद झाला नसता, पण हे घडले नाही, त्यामुळे अतिशय क्षुल्लक बाबीवर चर्चा करण्यात ३६ तास गेले.

दुसऱ्या दिवशी ट्रम्प व ज्यांना कोणाला थोडीफार मते मिळाली होती त्यांना राज्यवार नव्याने मिळालेल्या मतांचा पुकारा नेहमीप्रमाणे झाला. तेव्हा ट्रम्प यांना १७२५ मते पडली, तर इतर तिघांना मिळून पडलेली मते त्यांच्या साधारणत: पन्नास टक्के कमी भरली.

तिसऱ्या दिवशी म्हणजे २० तारखेला उपाध्यक्षपदासाठी ट्रम्प यांनी निवड केलेल्या माइक पेन्स यांच्या निवडीवर अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले. पेन्स हे अमेरिकन काँग्रेसमध्ये १२ वष्रे सभासद होते. ते रेगन यांच्या प्रभावाखालील रिपब्लिकन आहेत. काँग्रेसमध्ये १२ वष्रे झाल्यावर ते इंडियानाचे गव्हर्नर झाले. आर्थिक शिलकीचे राज्य म्हणून इंडियाना ओळखले जाते. करांची पातळी कमी असल्याचा त्यांना अभिमान आहे. पेन्स यांचे भाषण सामान्य असेल असे काहींचे मत होते, पण तसे ते झाले नाही. अर्थात मोठे जोमदार, धारदार असे काही नव्हते, पण कंठाळीही नव्हते.

पण त्याआधी सेनेटर टेड क्रूझ यांचे भाषण झाले. ते प्राथमिक निवडणुकांत ट्रम्प यांचे एक प्रतिस्पर्धी होते. सेनेटमध्ये ते कोणालाही आवडत नाहीत. सरकार बंद पाडणे एवढा एकच कार्यक्रम त्यांना आवडतो. अर्थात ते करताना आपण फार मोठय़ा तत्त्वासाठी करतो असा ते आव आणतात. क्रूझ विधिनिषेधशून्य आहेत. त्यांच्या सेनेटमधील सहकाऱ्यांना त्यांच्याबद्दल अत्यंत तिरस्कार आहे.

ज्या वेळी प्राथमिक निवडणुका झाल्या तेव्हा ट्रम्प कुठूनही निवडून येणार नाहीत अशी सर्व पंडितांची खात्री असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाने सर्व उमेदवारांकडून लेखी लिहून घेतले की, जो कोणी उमेदवार निवडला जाईल त्याला सर्व जण पािठबा देतील; पण ट्रम्प अध्यक्षीय उमेदवार म्हणून निवडले गेले. त्यांच्या १७ प्रतिस्पध्र्यापकी काहींनी दिलेले वचन पाळले. क्रूझ पािठबा देणार नाहीत हे माहीत होते तरीही त्यांना ट्रम्प यांनी अधिवेशनात बोलण्याची संधी दिली. ऊठसूट देवाचे नाव घेणारे क्रूझ दिलेले वचन निदान अधिवेशनात भाषण करताना तरी पाळतील अशी अनेकांची समजूत होती; पण क्रूझ त्यांच्या ख्यातीप्रमाणेच वागले. त्यांनी सर्वाना आपापल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मत देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना पािठबा देणारे सभासदही संतापले. त्याच रात्री लगेच क्रूझ यांनी प्रत्यक्ष तसे न म्हणता स्वत:च्या २०२०च्या अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीसाठी पसे देण्याचे त्यांच्या पाठीराख्यांना आवाहन केले.  न्यूट िगगरिच यांचे भाषण क्रूझ यांच्यानंतर झाले. िगगरिच यांना हजार कल्पना एकाच वेळी सुचत असतात व प्रत्येक कल्पना ते इतक्या खुबीने सांगतात की, ऐकणाऱ्याला ती खरी वाटायला लागते. या त्यांच्या कौशल्यामुळे क्रूझ यांनी ‘जो उमेदवार घटना बदलणार नाही अशा उमेदवाराला सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मत द्या’ असे जे सांगितले त्याचा अर्थ ट्रम्प यांना मत द्या असा होता, असे िगगरिच म्हणाले. िगगरिच यांचा हा कल्पनाविस्तार ऐकून भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी चंद्रावर कायमची वसाहत करण्याची कल्पना अशाच कौशल्याने मांडली होती.

अधिवेशनाचा शेवटचा दिवस सर्वात महत्त्वाचा, कारण डोनाल्ड ट्रम्प अधिकृत अध्यक्षीय उमेदवारी स्वीकारून भाषण करणार होते. प्रारंभी अनेकांची भाषणे झाल्यावर ट्रम्प यांनी प्रदीर्घ भाषण दिले. यापूर्वी बिल क्लिन्टन यांनी सर्वात अधिक भाषण दिल्याची नोंद आहे; पण ट्रम्प यांनी त्यांच्या पुढे मजल मारली. श्रोते कमालीचे स्वागतशील असल्यावर ट्रम्प यांना आपला नेहमीचा उत्साह आवरणे शक्य नव्हते.

इथे आणि फ्रान्स वगरे अनेक देशांत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे सर्वसाधारण अमेरिकन लोकांत आजकाल चिंता अधिकच वाढली आहे. अधिवेशनात जमलेल्या सभासदांच्या या भावनेला अनेक श्रोत्यांनी प्रतिसाद देणारी भाषणे केलीच होती. ट्रम्प यांनी हाच धागा धरला. त्यांनी प्रारंभीच देश कोणत्या धोकादायक वातावरणातून जात आहे याची जाणीव करून देऊन आíथकदृष्टय़ा तो कसा संकटात आहे यासंबंधी बरीच आकडेवारी दिली. ती खरीच आहे हे प्रसिद्ध होत असलेल्या आíथक वार्तापत्रांवरून समजू शकते.

तथापि भाषणात निरनिराळ्या प्रकारे या सर्वास अध्यक्ष ओबामा व त्यांच्या पहिल्या चार वर्षांत परराष्ट्रमंत्री असलेल्या हिलरी क्लिन्टन हेच दोघे कसे पूर्णत: जबाबदार आहेत हेच सांगण्यावर भर दिला.

शिवाय ओबामा राज्यावर आले तेव्हा बुश राजवटीमुळे देश आíथक संकटात होता आणि तीतून वाट काढण्यासाठी ओबामा यांच्यावर जबाबदारी आली. वास्तविक जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यावर ट्रम्प नेहमीच टीका करत आले आहेत. मग सध्याच्या आíथक अडचणींचे सर्व खापर ओबामा यांच्यावर फोडताना त्यांनी बुश यांनी ओबामांच्या हाती दिलेल्या आíथक दुर्दशेची आठवण का ठेवली नाही?

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना वाढत असून इराक, अफगाणिस्तान इत्यादी देशांबरोबरच सीरिया इत्यादी देशांची भर पडली आहे. यासाठी ट्रम्प यांनी ओबामा व हिलरी क्लिन्टन यांच्यावर टीकास्त्र सोडले; पण सीरिया, इराक इत्यादी देशांत वाढत गेलेल्या दहशतवादी शक्तींना आता अधिक जोर आला असला तरी मुळातच ही विषवल्ली निर्माण झाली त्याला बुश यांनी अफगाणिस्तान व इराकमध्ये केलेल्या अनेक चुका कारणीभूत आहेत.

इराक युद्धाच्या संबंधात तेव्हाचे ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर हे कसे दोषी आहेत हे चिलकॉट समितीने काही लाख शब्दांच्या अहवालात नुकतेच दाखवून दिले आहे; पण ब्लेअर यांच्या आधी चूक केली ती बुश व त्यांचे सहकारी यांनी. ओबामा व हिलरी यांच्यावर इतक्या तोफा चालवताना बुश यांना वगळणे पटणारे नाही. अर्थात हिलरी यांचा इराक युद्धाला पाठिंबा होता. आजकाल वाढत चाललेल्या दहशतवादी संघटनांचे मूळ बुश यांच्यामुळे रुजले आहे हे रिपब्लिकन पक्षाने मान्य करायला हवे, अशी भाषा ट्रम्प यांनी केली नाही.

अर्थात यात ओबामा आणि हिलरी यांनी भर घातली हे खरे आहे. सीरिया, लिबिया अशा देशांत पर्यायी व्यवस्था नव्हती आणि अमेरिकेने तिचा विचार केला नाही. ट्रम्प यांची दीर्घ मुलाखत ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये आली आहे. तीत ट्रम्प यांनी विचारले की, एकाच वेळी आसाद व इस्लामी संघटना यांच्याशी लढायचे, हे कोणाला जमणारे आहे? उत्तर कोरियाची अणुविषयक ताकद वाढू नये यासाठी आपण दक्षिण कोरियात बरेच सन्य ठेवले; पण उत्तर कोरियाकडील क्षेपणास्त्रे वाढत आहेत. त्यांचे उड्डाण बघण्यापलीकडे आपले सनिक काय करू शकतात? हे प्रश्न बरोबर आहेत.

तथापि ट्रम्प एकीकडे आंतरराष्ट्रीय व्यापारी करार रद्द करणार आणि अमेरिकन लष्कर बरेच सुसज्ज करणार. मागे जनरल आयसेनहॅवर यांनी लष्कर व औद्योगिक संघटना यांच्या एकजुटीने व्याप वाढवणे धोकादायक असल्याचे म्हटले होते. कोठल्याही अमेरिकन सरकारने याची दखल घेतली नाही. ट्रम्पही ती घेण्याचा संभव नाही.

तसेच अनेक देशांत आंतरराष्ट्रीय सहकार्याचे करार रद्द करण्याचे वारे वाहात असून जहाल राष्ट्रवादी शक्ती वरचढ होत आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी अशाच त्या वाढल्या. परिणामत: नाझी व फॅसिस्ट वृत्ती बळावल्या. ट्रम्प यास पायबंद घालण्यासाठी काय करणार हे स्पष्ट व्हायला हवे.

आतापर्यंत बेलगाम वक्तव्य करून ट्रम्प यांनी अनेक गटांना दुखवून ठेवले आहे. स्वत:ला सर्वापेक्षा हुशार समजणाऱ्या ट्रम्प यांची अनेक वक्तव्ये त्यांचेच नुकसान करणारी असतात. यात कसलीच हुशारी नाही. फक्त गोऱ्या लोकांच्या मतावर निवडून येणे त्यांना कठीण आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा खासगी व्यवसाय नाही, की जेथे एका कंपनीशी जमले नाही तर दुसऱ्या कंपनीशी बोलणी करता येतात. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवाराची निवड लोक करतात, उमेदवार लोकांची निवड करत नाही.

govindtalwalkar@hotmail.com