पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत म्हणजे एनसीएलमध्ये डॉ. आशीष लेले आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संशोधनाचा श्रीगणेशा केला, असे कानपूर आयआयटीमधील शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराचे मानकरी ठरलेले व मूळचे पुण्याचे असलेले प्रा. डॉ. योगेश जोशी यांनी सांगितले.

वि ज्ञान संशोधन क्षेत्रातील वाटचालीबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘‘मुंबईतील पवई आयआयटी या संस्थेत आपण संशोधन केले व तेथेच विद्यावाचस्पती पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेत न्यूयॉर्कमधील लेव्हिच इन्स्टिटय़ूटमध्ये डॉ. मार्टेन डेन या जागतिक कीर्तीच्या पॉलिमर (बहुवारिके) क्षेत्रातील नामांकित वैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली ‘कपडय़ाचा धागा तुटण्याची कारणे व उपाय’ यावर संशोधन केले.’’

जोशी नंतर कानपूर आयआयटीमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून दाखल झाले. गेल्या ११ वर्षांत निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांतून त्यांचे साठहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी ते प्राध्यापक झाले. त्यांच्या संशोधनाचा वापर प्रगत औद्योगिक प्रक्रियेत केला जातो. द्रव-घनरूप पदार्थावरील संशोधनासाठी त्यांची डॉ. भटनागर पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांच्या संशोधनाविषयी नेमकेपणाने स्पष्टीकरण करताना त्यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे पेस्टसारखा पातळ पदार्थ सर्वाना परिचित आहे. त्या स्थितीतील पदार्थात अशा काही रासायनिक व भौतिक प्रक्रिया घडत असतात की, त्यामुळे त्या वस्तूची उपयोगिताच बदलते किंवा पूर्णपणे ती वस्तूच निरुपयोगी होते. यातील पेस्ट हा पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा फक्त दात घासायचे टय़ूबमधील दंतमंजन असे वाटते, पण अलीकडे औद्योगिक जगात अशा घट्ट द्रवरूपातील पदार्थ काही लक्ष टनाच्या प्रमाणात लागत असतात.  अशा वेळी जर त्या द्रवातील गुणधर्म बदलले किंवा त्यांची उपयोगिता कमी होत राहिली, तर त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असते. त्या घट्ट द्रवातील ते बदल एकाच स्वरूपातील नसतात, तर एकमेकांवर अवलंबून असण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे तो पदार्थ कठीण होतो व त्याची उपयुक्तताच संपुष्टात येते. अशा वेळी असे बदल कोणत्या पद्धतीचे असू शकतात आणि ते रोखायचे कसे, हा त्यांच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

औद्योगिकीकरण झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणावरील रासायनिक प्रक्रियांना महत्त्व आले. कोणत्याही कारखान्यात त्या त्या पदार्थाच्या उत्पादनानुसार प्रक्रिया ठरलेल्याच असतात; पण त्यातील ज्या बाबी सर्वत्र सामाईक असतात त्यावर व्यापक संशोधन केले जाते. आपल्या घरातील पाण्याचे उदाहरण घेतले, तर ते पाणी आपणहून खराब होत नसते; पण दहा-बारा दिवसांनंतर घरातील पाण्यातही ते वापरता न येण्यासारखे घटक निर्माण होतात. त्यातील जे ढोबळ असतात ते समजतातही, पण मायक्रोस्केल (सूक्ष्मपातळी) व नॅनोस्केल पातळीवरील (एकअब्जांश पातळी) बदल फारच सूक्ष्म असतात व त्याचा परिणामही व्यापक असतो.

अलीकडे अशा प्रकारच्या संशोधनात ९९ टक्के द्रवरूपात एक टक्का एक विशिष्ट प्रकारची माती टाकून तो द्रवरूप अगदी घट्ट म्हणजे त्याचा पेला पालथा केला तरी तो इतका घट्ट होऊन बसतो की खाली पडत नाही. ही माती काही ठिकाणी आपोआप तयार होते, तर अलीकडे औद्योगिक कारणासाठी असे मातीचे अनेक प्रकार विकसित करण्यात आले आहेत. अशा मातीचे निरनिराळे प्रकार जेव्हा मुख्य द्रवावर परिणाम करत असतात तेव्हा तो एकच परिणाम नसतो, तर अनेक घटक परस्परांवर परिणाम करत असतात. त्यांच्या रासायनिक साखळीच्या परिणामावर उत्पादनाची उपयुक्तता अवलंबून असते, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
-नीरज पंडित 
-राजेंद्र येवलेकर