स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अध्यापन, साहित्य, भटकंती, भाषांतर, छायाचित्रण अशा विधिध क्षेत्रांत मुशाफिरी  केलेल्या वसंत लिमये यांचे अलीकडेच निधन झाले.  वयाची नव्वदी झाल्यानंतरही  अखेपर्यंत  कार्यरत असलेल्या आपल्या  करारी आणि स्वाभिमानी पित्याविषयी त्यांच्या चिरंजीवांनी व्यक्त केलेल्या भावना.. तरुण पिढीला बरेच काही शिकवणाऱ्या.

तात्यांना गेल्या काही  दिवसांत स्वर्गात माझ्यामुळे उचक्या लागल्या असाव्यात. ५ तारखेला एका वयोवृद्ध पुरातत्त्वतज्ज्ञांच्या पाया पडताना नटसम्राटमधील वाक्यं आठवली. ‘ज्यांना नमस्कार करायला जागा नाही ती माणसं अभागी. आणि जागा असून ज्यांना नमस्कार करायचा धीर होत नाही ती निव्वळ कपाळकरंटी.’ सुदैवाने आई-वडील, गुरुजन आणि ज्येष्ठांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे नतमस्तक होण्याची लाज किंवा संकोच वाटत नाही म्हणून करंटेपण नाही. पाया पडण्यासारखी अनेक ठिकाणं सापडली त्यामुळे भाग्यवान, पण मंगळवारी या भाग्याला मोठं गालबोट लागलं. त्या दिवशी माझे बाबा गेले.
७ तारखेच्या सकाळी नेहमीच्या शिरस्त्यानुसार रुपालीत कॉफी घेताना आईचा फोन आला, ‘‘बाळा, हे कसं तरीच करताहेत!’’ मी तडक कॉफी तशीच टाकून घरी निघालो. वाटेतूनच डॉक्टरांना फोन केला. आज का कुणास ठाऊक, मनात पाल चुकचुकली होती. डॉक्टर माझ्या पुढेच घरी पोचले होते. आई घाबरीघुबरी होऊन थरथरत होती. लोडाला टेकलेले बाबा शांत मिटल्या डोळ्यांनी कधीच शांत झाले होते.
 हॉस्पिटल, अ‍ॅम्ब्युलन्स, दाखला अशा गोष्टी यंत्रवत घडत होत्या. फोन सारखा खणखणत होता. अशी बातमी वणव्यागत पसरत असावी. मी सुन्न झालो होतो. वसंत गोिवद लिमये, वय ९१ वष्रे, आता नव्हते. vv10एकीकडे समोर कलेवर होतं, पण विश्वास बसत नव्हता. वयोमानानुसार आणि त्यांच्या काही जुन्या दुखण्यांमुळे हे अपेक्षित होतं. पण अपेक्षित आणि अटळ यात खूप अंतर असतं.
मी भाग्यवान, कारण मला साठ वर्षांचा सहवास लाभला. त्या आधीच्या त्यांच्या ३१ वर्षांच्या आयुष्यातल्या अनेक सुरस आणि चमत्कारिक वाटाव्या अशा कहाण्या लहानपणापासून ऐकलेल्या होत्या. बाबांचा जन्म नागावला १९२४ साली झाला, ते साडेचार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गेले. उमाआजी मोठी खंबीर. किरकोळ पेन्शनच्या आधारे तिने   ३-४ मुलांचं संगोपन केलं. कडव्या स्वाभिमानाचं आणि स्वावलंबनाचं बाळकडू उमाआजीकडूनच बाबांना मिळालं असावं. बाबांचं शिक्षण अलिबाग, पुणे इथे झालं. मुख्य विषय गणित.
तरुणपणी माíक्सस्ट विचारांचा पगडा आणि त्यांनी एस.पी.समोर ४२ सालच्या आंदोलनात पुण्यात लाठय़ाही खाल्लेल्या. डोक्यावर उजवीकडे अडीच इंचांची खोक आणि गमतीचा भाग म्हणजे आमच्या सारख्या नावांप्रमाणेच लहानपणच्या धडपडीत माझ्याही डोक्यावर तश्शीच खोक. १९४८च्या सुमारास त्यांनी रुईया कॉलेजातून एम.एस्सी. केलं आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानिमित्त राजकीय राजबंदी म्हणून येरवडय़ात अडीच वष्रे कारावास भोगला. त्यापूर्वी मलेरिया आणि चळवळीतली आबाळ यामुळे प्रकृतीची पूर्ण हेळसांड. परंतु कारावास ही पर्वणी ठरली. सक्तीच्या मोकळ्या वेळामुळे वाचन आणि व्यायाम असा भक्कम व्यासंग घडला आणि बाबा मिस्कीलपणे मोरारजीभाईंना याचं श्रेय देत असत. त्यानंतर रोहा, ठाणे इथे शाळेत सायन्सचे मास्तर म्हणून काम केलं. करारी आणि स्वाभिमानी स्वभावामुळे बाबा त्यात फारसे रमले नाहीत. त्यानंतर गणित आणि इंग्रजीचे ठाण्यातील पहिले कोचिंग क्लासेस त्यांनी १९५४ साली सुरू केले. परीक्षेसाठी शिकवणी हा त्यांचा िपडच नसल्याने, ते मनापासून मुलांना विषयाची गोडी लागावी म्हणून शिकवत. एका बॅचला फक्त १५ विद्यार्थी असा त्यांचा नेम आणि एखाद्या व्रताप्रमाणे त्यांनी ७१ सालापर्यंत, १८ वष्रे मुलांना घासूनपुसून मार्गाला लावले. बाबांना व्यवसाय कधीच फारसा जमला नाही. १५ च्या वर एका बॅचला मुलं न घेण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे व्यवसायावर मर्यादा आल्या होत्या, परंतु शिक्षण हा त्यांच्यासाठी धंदा कधीच नव्हता, ते एक व्रत होतं आणि म्हणूनच ७१ सालची माझी मॅट्रिकची बॅच शेवटची ठरली.
६५ सालच्या सुमारास त्यांनी ठाण्यात Indo Soviet Cultural Society¨ ची शाखा सुरू केली आणि त्यानिमित्ताने ठाण्यात रशियन भाषेचे वर्ग सुरू झाले. यासाठी मुंबईहून शिक्षक आणण्यात बऱ्याच अडचणी येत. या प्रकाराला कंटाळून बाबांनी स्वत:च रशियन शिकून घेतलं. इथल्या दोन परीक्षांत उत्तम यश मिळवून ते ७२-७३ साली मॉस्कोला रशियन भाषेच्या उच्च शिक्षणासाठी गेले. एखादी गोष्ट ठरवल्यावर त्यामागे झपाटल्यासारखे लागणे आणि यश मिळवणे हा त्यांचा स्वभाव. मास्कोत असताना मॉस्को रेडिओवरून मराठीत बातम्या देऊन त्यांनी आईच्या तिकिटाची बेगमी केली. त्यांचा कोर्स संपताना त्यांनी आईला परदेशवारी घडवली. मॉस्कोत असतानाच आयआयटीचे संचालक केळकर यांनी पवईला भाषांतर अधिकारी म्हणून बाबांना निमंत्रित केलं. आयआयटी इथल्या कारकीर्दीत त्यांनी एकंदर १६ युरोपियन भाषा आत्मसात केल्या. त्यांचा गणिती मेंदू भाषा विषयातही सहजपणे विहार करत असे. व्युत्पत्तिशास्त्राचा त्यांचा व्यासंग दांडगा आणि त्याचा त्यांना एवढय़ा भाषा शिकण्यात खूप उपयोग झाला. ८२ साली निवृत्त झाल्यावरही त्यांचे भाषांतराचे काम शेवटपर्यंत चालू राहिले.
बाबा बुद्धिप्रामाण्यवादी होते. प्रत्येक गोष्टीवर विचार करून, परखड तर्काच्या आधारावर त्यांचे विचार आणि मतं घडलेली असत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विचार, मतं हे त्यांच्या आचरणात पायाभूत असत. आपली मतं त्यांनी उगाच दुसऱ्यावर लादली नाहीत. पण जिथे त्यांचा संबंध असेल तिथे ते कठोरपणे स्वत:च्या विचारांशी प्रामाणिक असत. कुठेही वशिला लावायला त्यांचा ठाम नकार असे. पसे खायला घालणे हे निषिद्ध. देव, कर्मकांड या गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता, यामुळे आमच्या घरी कधीच देव नव्हते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विचारांत अर्धवटपणा कधीच नव्हता. सामाजिक न्याय अन्यायाच्या कल्पना सुस्पष्ट होत्या. लग्नात हुंडा वगरे दूर, पण कुठलेही देणे-घेणे नाही हे त्यांचं ठामपणे ठरलेलं होतं. बाबा पक्के नारळासारखे होते, बाहेरून टणक, खरखरीत पण आतून मऊ खोबरं आणि गोड पाणी. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना, कम्युनिस्ट पार्टील्या व इतर सहकाऱ्यांना, माझ्या मित्रांना, एवढंच कशाला त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वानाच आपल्या कुवतीनुसार सढळ हस्ते मदत केली होती. तीही निरपेक्ष भावनेने. कुणाला उपचारासाठी रशियाला पाठव, कुणाला फुकट भाषांतर करून दे, असं काय काय तरी. त्यांना िहचोटेपणानं वागणं जमतच नसे आणि याबाबतीत ते दिलदार होते. या सर्व गोष्टीत अथकपणे आणि खूप कष्टांसहित त्यांच्या बरोबरीने उभी राहणारी सपोर्ट सिस्टीम आणि तीही ६१ वर्षांसाठी, म्हणजे माझी आई. काही योग मोठे गमतीशीर असतात. भांडुपला बाबा राहत असताना, एका ‘तो मी नव्हेच’मधील लखोबा लोखंडेछाप काझीमुळे अकोल्याच्या प्रमिला फडकेचं स्थळ बाबांना सुचवलं गेलं आणि यथावकाश त्यांचं ५४ साली लग्न झालं. तत्त्वनिष्ठ, करारी आणि काही वेळेस हट्टी अशा माणसाबरोबर, त्याच्या सर्व लहरी सांभाळत, खूप कष्ट करून ६१ वर्षांचा प्रेमळ संसार चालविणं हे एक असिधारा व्रत माझ्या आईनं उत्तम साभाळलं
मी आयआयटीतून बाहेर पडताच, ते म्हणाले होते, ‘‘बाळा आम्ही, म्हणजे तुझ्या आईने आणि मी ठरवलं होतं की मुलांना ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवायचं! ते आता झालं. आता तू तुझा आणि आम्ही आमचे! आम्ही तुझ्याकडे म्हातारपणची काठी म्हणून पाहत नाही, तसंच इथून पुढे तू आमच्याकडे सपोर्ट सिस्टीम म्हणून पाहू नको!’’ हे इतक्या स्वच्छपणे बोलणारे बाप विरळच. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले, अनेक लौकिकदृष्टय़ा अतक्र्य वाटणारे क्रांतिकारी निर्णय घेतले, पण ते सर्व पूर्वतयारीनिशी आणि त्याची झळ त्यांनी इतरांना कधीच लागू दिली नाही. भरपूर भटकले, वयाच्या ६५व्या वर्षी कैलास मानसची यात्रा केली, छायाचित्रणाचा छंद जोपासला, क्लासच्या मुलांच्या अनेक ट्रिप्स काढल्या. एकंदरीत कुवतीनुसार खूप चनही केली. या सर्वाचा मी साक्षीदार होतो आणि अनेकदा सहभागीही होतो. मला खूप स्वातंत्र्य दिलं. आपले विचार कधी लादले नाहीत. त्यांना काळजी वाटत असेल तर सल्ला दिला, पण कधीही आडकाठी आणली नाही. मळलेल्या वाटा सोडून नव्या वाटांवर जाण्यासाठी उदंड प्रोत्साहन दिलं. कोकणकडा मोहिमेच्या वेळेस हरिश्चंद्रगड चढून बाबा स्वागतासाठी हजर होते. सिक्कीममधील मोहिमेच्या वेळी आयत्या वेळेस सरकारी परवानग्यांसाठी हा माणूस वयाच्या ५८व्या वर्षी गंगटोकला आमचा सेक्रेटरी म्हणून गेला. खरंच बाबांनी माझे लाड केले नाहीत, पण खूप प्रेम मात्र दिलं. त्यांना प्रेमाचं प्रदर्शन आवडत नसे. पण त्यांच्या आश्वासक नजरेत, उबदार स्पर्शात ते जाणवत असे. वयोमानपरत्वे ते थकत चालले होते, पण ‘माझं सारं काही मीच करणार’ हा ताठ बाणा अखेपर्यंत होता. शेवटपर्यंत त्यांचं फिरणं, योगासनं, भाषांतराची कामं, वाचन हे सारं काही तोलूनमापून, झेपेल एवढं चालू होतं. व्रतस्थ असण्याचं ते एक लक्षण होतं. जन्माला आल्यानंतर काही गोष्टी अटळ आहेत. निवृत्ती, वार्धक्य आणि मृत्यू. बाबा निवृत्त कधीच झाले नाहीत, वार्धक्याशी ते मस्ती करत, परंतु मृत्यूची अटळता त्यांनी शांतपणे स्वीकारली होती. त्यांना हातावरचं घडय़ाळ जीव की प्राण होतं. हार्डडिस्क फुल झाल्यावर परिपूर्णतेच्या आनंदात त्यांनी शांतपणे कॉम्प्युटर स्विच ऑफ केला, हातावरचं घडय़ाळ मात्र टिकटिकत चालूच होतं..