समृद्ध निसर्ग लाभलेल्या कोकणच्या परिसरात साहित्यिक-सांस्कृतिक समृद्धी आणण्याचे स्वप्न उराशी बाळगून १९८० मध्ये वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्थापना झाली. प्रतिष्ठानने १९८२ पासून अव्याहतपणे चालवलेला बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा नावाचा कलायज्ञ जास्त मोलाचा म्हणावा लागेल. शालेय व खुल्या अशा दोन्ही गटात आणि महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या पातळीवर होणाऱ्या या स्पध्रेने असंख्य उदयोन्मुख रंगकर्मीना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिले आहे.  या उपक्रमशीलतेची दखल फोर्ड फाऊंडेशन (अमेरिका) आणि थिएटर अ‍ॅकॅडमी (पुणे) या संस्थांनी घेत स्थानिक नाटय़संस्था विकास योजनेसाठी निवडलेल्या राज्यातील चार संस्थांमध्ये प्रतिष्ठानचा समावेश केला.

मराठी माणूस नाटकवेडा आह. त्यातही कोकणी माणूस काकणभर जास्तच. इथल्या लोककलांमधूनही हे वेड जपलेलं दिसतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने हीच परंपरा जपत गेल्या तीन दशकांहून जास्त काळ नाटय़ासह विविध कलांची निष्ठेने जोपासना चालवली आहे म् शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील, कमालीचे बुद्धिवादी सर्जनशील गायक कुमार गंधर्व यांचे वसंतराव आचरेकर तबल्याचे साथीदार, ही ओळख अतिशय अपुरी ठरेल. कुमारजींच्या सांगीतिक वाटचालीचे ते सर्वार्थाने साथीदार आणि साक्षीदार होते. केवळ नियतीच त्यांची अकाली ताटातूट घडवू शकली. सिंधुदुर्गच्या या कलासक्त सुपुत्राच्या नावाने कणकवलीकरांनी विविधांगी कलाविष्काराला वाहिलेली संस्था स्थापन करून ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ अशी जणू ग्वाही दिली आणि त्यानुसार गेली तेहतीस र्वष अखंड वाटचाल सुरू ठेवली आहे.
समृद्ध निसर्ग लाभलेल्या कोकणच्या परिसरात साहित्यिक-सांस्कृतिक समृद्धी आणण्याचं स्वप्न उराशी बाळगून १९८०मध्ये या संस्थेची स्थापना झाली. नाटकाच्या माध्यमातून सामाजिक वास्तवाचं भान आणता येऊ शकतं, या विश्वासाने एकांकिका व नाटय़ स्पर्धा आयोजित करणं, नाटय़ाचं अविभाज्य अंग असलेल्या संगीताबद्दलची अभिरूची वाढवण्यासाठी शास्त्रीय गायन-वादनाचं प्रशिक्षण व स्पर्धाचं आयोजन, नाटय़प्रशिक्षण शिबिरं, नवशिक्षित व अल्पशिक्षित वर्गाच्या साहित्यविषयक जाणीवकक्षा रूंदावण्यासाठी कथा-कवितावाचन, साहित्यिक गप्पा अशा विविध कल्पक उपक्रमांद्वारे हे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. समविचारींची साथ मिळत गेली. ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, अतुल पेठे, ज्येष्ठ दिग्दर्शक दामू केंकरे, ज्येष्ठ अभिनेते नासीरूद्दिन शाह, डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे, नाना पाटेकर, अमोल पालेकर, ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, यशवंत देव, गायक-नट चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे, वीणा सहस्रबुद्धे यांसारख्या दिग्गजांचं सहकार्य-मार्गदर्शन लाभलं. त्यामुळेच आज या ‘प्रतिष्ठान’चं निमंत्रण हीसुद्धा एक प्रतिष्ठेची बाब बनली आहे.
संस्थेच्या उद्दिष्टांनुसार साहित्य-नाटय़ क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांनी उपक्रमांची सुरुवात झाली, पण त्यानंतर लवकरच प्रत्यक्ष नाटय़निर्मितीला प्रारंभ झाला. त्यातून ‘चाफा’, ‘किरवंत’, ‘महापूर’ यांसारखी आशयघन नाटकं आणि तब्बल १८ एकांकिका रंगदेवतेच्या चरणी रूजू झाल्या. यापैकी ‘मी माझ्याशी’ या नाटकाचे ३७, तर सहा एकांकिकांचे प्रत्येकी दहापेक्षा जास्त प्रयोग करण्यात आले. तसंच ‘राज्य नाटय’सह विविध महत्त्वाच्या स्पर्धामध्ये पारितोषिकंही पटकावली. पण अशा व्यक्तिगत यशावर समाधान न मानता प्रतिष्ठानने १९८२ पासून अव्याहतपणे चालवलेला बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा नावाचा कलायज्ञ जास्त मोलाचा म्हणावा लागेल. शालेय व खुल्या अशा दोन्ही गटात आणि महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या पातळीवर होणाऱ्या या स्पध्रेने असंख्य उदयोन्मुख रंगकर्मीना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं आहे.  
या उपक्रमशीलतेची दखल फोर्ड फाऊंडेशन (अमेरिका) आणि थिएटर अ‍ॅकॅडमी (पुणे) या संस्थांनी घेत स्थानिक नाटय़संस्था विकास योजनेसाठी निवडलेल्या राज्यातील चार संस्थांमध्ये प्रतिष्ठानचा समावेश केला. त्यामुळे ‘नाटय़ स्वाद-संवाद’ या उपक्रमाद्वारे समांतर रंगभूमीवरील ‘झुलवा’, ‘महानिर्वाण’, ‘जांभूळ आख्यान’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘तुघलक’, ‘फायनल ड्राफ्ट’ यांसारखी अतिशय नावाजलेली सुमारे शंभर नाटकं योजनेच्या ३५० सदस्यांना बघायला मिळाली आहेत. त्याचबरोबर, कर्नाटक, दिल्ली, गोवा, राजस्थान इत्यादी ठिकाणच्या भाषिक नाटकांचेही प्रयोग आवर्जून आयोजित करण्यात आले आहेत. दक्षिण कोकणच्या ग्रामीण भागातील रसिकांची अभिरूची अशा प्रकारे जोपासताना खास प्रशिक्षणाची गरज प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच ओळखली होती. त्यामुळे स्थापनेनंतर थोडय़ाच काळात, दोन आठवडय़ांचं पहिलं नाटय़ प्रशिक्षण शिबीर १९८२मध्ये घेण्यात आलं. त्यानंतर या क्षेत्राशी संबंधित अनेक चर्चासत्रं, परिसंवाद आणि प्रशिक्षण शिबिरं वेळोवेळी भरवण्यात आली आहेत. नाटय़कलेमध्ये वाचिक अभिनयाचं महत्त्च लक्षात घेऊन कै. हेमलता स्मृती आंतरमहाविद्यालयीन एकांकिका वाचन स्पर्धा प्रतिष्ठानच्या वैविध्यपूर्ण उपक्रमशीलतेचा आणखी एक वस्तुपाठ आहे.
अशा प्रकारे ‘वाईट मोठय़ां’साठी नाटय़विषयक निरनिराळे उपक्रम राबवत असतानाच कॅच देम यंग, या तत्त्वाचं पालन करत ‘छान छोटय़ां’साठी बालनाटय़ महोत्सव, प्रशिक्षण शिबीर आणि ‘पहिला माझा नंबर’ या बालनाटय़ाची निर्मिती प्रतिष्ठानने केली आहे. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने चित्रकला स्पर्धाही  आयोजित केली जाते. याशिवाय पाच ते पंधरा वष्रे वयोगटाच्या मुलांसाठी ‘सृजनाच्या वाटा’ हा वाचन, चित्रकला, संगीत इत्यादी विविध कलांच्या हसत खेळत प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चव्हाण गेल्या दोन वर्षांपासून राबवत आहेत. दर शनिवारी संध्याकाळी चालणाऱ्या या उपक्रमाचं स्वरूप लक्षात घेऊन सध्या फक्त तीस मुलांना सशुल्क प्रवेश देण्यात आला आहे. पण मुलांना टीव्ही किंवा कॉम्प्युटर गेम्सचा विसर पाडणारा हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला आहे की आणखी एका बॅचसाठी प्रतीक्षा यादी तयार आहे. चित्रकलेच्या प्रसारासाठी ज्येष्ठ अभिनेते व निसर्गचित्रकार चंद्रकांत मांढरे यांच्या चित्रांचे प्रदर्शन, प्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी काढलेल्या अर्कचित्रांचं ‘खेळ रेषावतारी’ प्रदर्शन, कणकवलीचे सिद्धहस्त चित्रकार नामनंद मोडक यांच्या चित्रांचं प्रदर्शन व विक्री इत्यादी उपक्रम प्रतिष्ठानने राबवले आहेत.
आचरेकरांच्या नावाने चालणाऱ्या संस्थेत सुरांचा दरवळ अपरिहार्य होता. त्याही बाबतीत प्रतिष्ठानने कसूर ठेवलेली नाही. स्थापनेनंतर थोडय़ाच वर्षांत बालगंधर्वाच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘गंधर्व दर्शन’ कार्यक्रम, त्यापाठोपाठ ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक यशवंत देव, प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका वीणा सहस्रबुद्धे, गायक-नट चंद्रकांत काळे आणि माधुरी पुरंदरेंचा प्रेमकाव्य व संगीताचा उत्कृष्ट मिलाप असलेला ‘प्रीतरंग’, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर आधारित आणि स्वत: विंदांनी कौतुक केलेला ‘स्वच्छंद’, अशा वेगवेगळ्या जातकुळीच्या दर्जेदार संगीतमय कार्यक्रमांची अखंडित मालिका सुरू झाली आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केली जाते. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेच दोन दिवसांची शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळा आणि स्पध्रेतील विजेत्या कलाकाराचा सहभाग असलेली गायन-वादनाची मैफल, असा हा त्रिवेणी उपक्रम गेले एक तप सलगपणे चालू आहे. प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांच्या तरंगिणी प्रतिष्ठान या संस्थेच्या सहकार्याने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगीत कलेचे मार्गदर्शन करण्यासाठी पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. अभिषेकी यांचे शिष्य प्रा. समीर दुबळे दर महिन्याला दोन दिवस कणकवलीत वास्तव्य करून या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देतात.
गेल्या सुमारे तेहतीस वर्षांच्या वाटचालीत साहित्य व कला क्षेत्रांतील मान्यवरांची व्याख्यानं-परिसंवाद, नाथ पै एकांकिका स्पर्धा, नाटय़ स्वाद-संवाद, वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा-कार्यशाळा-मैफल, प्रशिक्षण शिबिरं अशी कमालीची सातत्यपूर्ण विविधता राखणाऱ्या या संस्थेकडे ७८व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचं (१९९८) यजमानपद येणं हा एक सहज स्वाभाविक योग म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे प्रायोगिक रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अखिल भारतीय नाटय़ परिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार (२००२), पुण्याच्या संवाद संस्थेतर्फे ‘रंगमेळ-२००२’ पुरस्कार, रत्नागिरीच्या राधाकृष्ण नाटय़ मंडळाचा ‘पाऊलखुणा पुरस्कार’ (२०१०) यासारखे प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट कामाची पावती देणारे मान-सन्मान लाभले आहेत. मात्र हे सारं करत असूनही यापैकी कोणत्याही उपक्रमासाठी प्रतिष्ठानकडे कायमस्वरूपी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे उपक्रमाचा दर्जा आणि नियमितता राखत असतानाच खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी प्रायोजक किंवा देणगीदार मिळवण्यामध्ये बराच वेळ आणि श्रम खर्ची पडतात. वर नमूद केलेल्या प्रत्येक उपक्रमाचं अंदाजपत्रक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अनुभवाच्या आधारे काटकसरीने तयार केलं आहे. त्यापैकी कोणत्याही उपक्रमाला कायमस्वरूपी प्रायोजक मिळाल्यास दर वेळी गरजेनुसार निधी उभारण्याचा ताण कमी होणार आहे.
कणकवली शहराजवळून वाहणाऱ्या गडनदीच्या काठावर खासगी आणि सरकारी मिळून सुमारे ६२ गुंठे जागा आज प्रतिष्ठानच्या ताब्यात आहे. त्यापैकी काही जागेवर सातशे प्रेक्षक बसू शकतील अशा क्षमतेचं नाटय़गृह बांधण्यात आलं आहे. ध्वनिशास्त्राच्या दृष्टिकोनातून नाटय़गृहाची अंतर्गत रचना उत्तम करण्यात आली आहे. त्यातील रंगमंचावर दोनशे प्रेक्षकांची भारतीय बैठकीवर बसण्याची सोय होऊ शकेल असं ‘नाटक घर’ तयार करण्यात आलं आहे. हौशी नाटय़ संस्था आणि कलाकारांसाठी ते अतिशय आदर्श आहे. पण या नाटय़गृहाचं अद्ययावत बांधकाम, ध्वनी व प्रकाशयोजना, वातानुकूलन इत्यादी सुविधा निधीअभावी अपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे आत्तापर्यंतची उभारणीही मुख्यत्वे बँकेच्या कर्जाच्या आधारे झाली आहे. गडनदीच्या रम्य पाश्र्वभूमीवर ‘नाटय़तीर्थ’ या खुल्या प्रेक्षागृहाची रचना केली आहे. संगीत, नाटय़, चित्रकला वगैरे अभिजात कलांच्या अभ्यास, संशोधन व प्रसारासाठी कला ग्रंथसंग्रहालय निर्माण करण्याचा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा मनोदय आहे. त्या दिशेने प्रारंभ झाला असला तरी तुटपुंज्या आर्थिक तरतुदीमुळे फारशी प्रगती होऊ शकलेली नाही.

संस्थेपर्यंत कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरात एसटीच्या कार्यशाळेलगत आचरेकर प्रतिष्ठानचं कार्यालय व नाटय़गृह आहे. बसने येथे जाता येते.

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली
दीड एकर जागेवर प्रतिष्ठानला ध्वनिशास्त्राच्या दृष्टीने सुयोग्य नाटय़गृह बांधायचे आहे. पण निधीअभावी त्याचे आधुनिकीकरण रखडले आहे. आश्रयदात्यांकडून आश्रय मिळाल्यास दर्जेदार सांस्कृतिक केंद्र साकारू शकणार आहे.

लोकाश्रयाची गरज
आचरेकर प्रतिष्ठानची १९८०मध्ये स्थापना झाली तेव्हाच्या कार्यकारिणीचे सचिव असलेले वामन पंडित आता कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. राजेश राजाध्यक्ष, प्रसाद कोरगावकर, आनंद आळवे, कणकवलीच्या नगराध्यक्ष प्रज्ञा खोत, अ‍ॅड. एन. आर. देसाई इत्यादी सहकाऱ्यांची उत्तम साथ आहे. ‘नाटय़ं भिन्नरुचेर्जनस्य बहुधापि एकं समाराधनम्’ असं कवीकुलगुरू कालिदासाने नाटय़ कलेविषयी म्हटलं आहे. इथे तर नाटय़ासह साहित्य, संगीत, चित्रकला इत्यादी विविध कलांचा मनोहारी संगम पाहायला मिळत आहे. या कलांच्या जोपासनेसाठी आचरेकर प्रतिष्ठानकडे कल्पक उपक्रम आहेत. ते सिद्धीला जाण्यासाठी गरज आहे उदार लोकाश्रयाची!

प्रयोगाच्या दृष्टीने सोपी व सुटसुटीत म्हणून एकांकिकेला नेहमीच जास्त मागणी असते. पण त्यासाठी चांगली संहिता उपलब्ध होत नसल्याची तक्रारही अनेकदा ऐकू येते. या समस्येवर परिणामकारक उपाय म्हणून एक हजारांहून जास्त संहितांची संचयिका (स्क्रिप्ट बँक) हा अतिशय अभिनव उपक्रम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे राबवला आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकांकिका लेखन कार्यशाळाही घेण्यात आली.  

धनादेश या नावाने काढावेत
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान
देणगीदारांना ८० जी अन्वये आयकर सवलत
Vasantrao Acharekar Sanskritik Pratishthan

धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२१४

महापे कार्यालय   
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय     
संपादकीय विभाग,
कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय       
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४१०००

नाशिक कार्यालय        
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट
नागरोड, उंटखाना,
नागपूर -४४०००९.  ०७१२-२७०६९२३

औरंगाबाद कार्यालय        
संपादकीय विभाग,
मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद.  ०२४०-२३४६३०३.

नगर कार्यालय          
संपादकीय विभाग,
आशिष, सथ्थ्या
कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७.

दिल्ली कार्यालय          
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग नवी दिल्ली – ११०००२ ०११-२३७०२१००.