आभासी वास्तव हा नव्या जगाचा कणा आहे, अनैसर्गिकता हे या जगाचे भान आहे,
यंत्र गुलामगिरी किंवा यंत्रावर अवलंबित मानवाची यंत्रगुलामी हा या व्यवस्थेचा नवा तणाव आहे.

सुप्रसिद्ध चित्रकार, लेखिका, गायिका, अभिनेत्री माधुरी पुरंदरे यांची माझी अनेक वर्षांची मैत्री आहे, आदर आणि जिव्हाळा आहे. त्यांच्याविषयीचा एक प्रश्न मात्र माझ्या मनात अनेक वर्षांपासून घर करून आहे. तो म्हणजे त्या मोबाइल फोन का वापरत नाहीत. कॉम्प्युटरविषयी त्यांना उत्सुकता असली तरी प्रेम निश्चितच नाही आणि मोबाइल न वापरण्याविषयी अ‍ॅगमबेनच्या ‘टु डू नॉट टु डू’सारखी निश्चित तात्त्विक भूमिका असावी इतक्या ठामपणे त्यांचा नकार मी पाहिला व अनुभवला आहे. माझ्या मनात या त्यांच्या वागण्याचा उलगडा करण्यासाठी मी अनेकदा विविध बाजूंनी व दृष्टिकोनांतून पाहण्याचा यत्न केला. अनेकदा अशा ‘अप्रासंगिक किंवा अनटाइमली’ वर्तनात काही महत्त्वाचे व विशेषत: समकालाचे संकेत दडलेले असतात. त्यामुळे गेल्या आठवडय़ात जेव्हा स्टीफन हॉकिंग, चॉमस्की यांसारख्या समकालीन प्रगाढ विद्वानांनी व अनेक विद्वानांनी ‘किलर रोबो’च्या संशोधनाला(च) व त्याच्या पुढील वापराला विरोध केला तेव्हा माधुरी पुरंदरेंचा मोबाइलविरोध मला नुस्ताच आठवला नाही, तर प्रथमच थोडासा जाणवला किंवा किणकिणलासुद्धा!!
मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात मानवाबरोबर वाढलेला व विकसित झालेला एकमेव प्राणी(?) म्हणजे यंत्र. यंत्राचा प्रवास स्वप्नातून कल्पनेकडे, कल्पनेतून संकल्पनेकडे, संकल्पनेतून वस्तुरूपाकडे व वस्तुरूप यंत्रातून यंत्रमानवापर्यंत असा अद्भुत आणि रोमांचकारक झाला आहे. यंत्रापेक्षाही त्याचा यंत्रमानव हा अवतार माणसाला गेली हजारो वर्षे पछाडतो आहे.
विविध प्रकारच्या पुराण व दंतकथांतून आपल्याकडे वा पाश्चात्त्य जगात यंत्राच्या व यंत्रमानवाच्या कल्पना आपल्याला वारंवार भेटतात.
होमरच्या ‘इलिआड’मध्ये हेफेस्टस या लोहार देवाच्या निर्मितीत चाकावर चालणारी यंत्रमानवे जशी भेटतात, सोन्याचांदीत घडवलेली कुत्री-मांजरेही तेथे जिवंतपणे भेटतात, याच हेफेस्टसच्या कार्यशाळेत त्याने तयार केलेल्या युवती नुसत्याच यांत्रिक हालचाली नव्हे, तर संभाषणकलेत पारंगत असून त्यांना ‘मन’ असते असाही उल्लेख आहे. कविकल्पनांचे यंत्रमानव जर प्रत्यक्षात अवतरले, जर अवजारे त्यांना आज्ञा दिल्यावर आपोआप त्यांचे काम करू लागली, तर (आपल्याला) गुलामांची गरजच काय? असा प्रश्न अ‍ॅरिस्टॉटल त्याच्या ‘पॉलिटिक्स’ या ग्रंथात विचारतो. अर्थात पुढे (आत्ता) न पटणारे व गुलामांच्या असण्याचे समर्थन करताना काही माणसे मूलत:च गुलाम असतात, त्यांना सतत मालकासाठी काम करण्याचीच इच्छा असते वगैरे विवेचन तो करतो.
झेक भाषेतील ‘रोबोती’ या ज्या शब्दापासून ‘रोबोट’ किंवा ‘रोबो’ हा शब्द बनला त्याचा मूळ उगम, ‘रॅब’ म्हणजे गुलाम असाच असल्याने काही विचारवंत अ‍ॅरिस्टॉटलच्या यंत्रगुलाम विवेचनाला द्रष्टे मानतात.
जवळपास जगभरच्या प्रत्येक संस्कृतीमध्ये यंत्र व त्यांचे मनुष्यरूप याबाबत अनेक कथा, कविता व वैज्ञानिक आकृत्या, सिद्धान्त आदी गोष्टी सापडतातच, परंतु अशा पुराणयंत्र पुरुष-स्त्रियांबरोबरच सतराव्या शतकापासून अगदी अलीकडे लिहिल्या गेलेल्या कथा- कादंबऱ्या या नाटय़-चित्रपटांतून ‘रोबो’च्या स्त्रीिलगी स्वरूपाबाबत जे साहित्य तयार झाले आहे त्याचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार केला तर अगदी होमरकालीन ‘पंडोरा’पासून अलीकडच्या ‘एक्स मशीना’तील ‘अव्हा’पर्यंत यंत्रयुवतीचा विचार पुरुषी व पितृसत्ताक अभिरुचीला अनुसरून झाल्याचे दिसते. ‘यंत्रयुवतीं’चा किंवा ‘यंत्रमानवाच्या स्त्रीत्वा’चा अभ्यास या साहित्यातून कोणा विचारवंत महिलेने केलेला माझ्या पाहण्यात जरी नसला तरी केला असणार हे नक्की.
माणूस आणि यंत्रमाणूस यांच्यातील ‘माणूसपणा’च्या तात्त्विक संघर्षांला तशी अलीकडच्या काळातील सुरुवात म्हणजे मेरी शेलीच्या ‘फ्रँकेनस्टाइन’ (१८१८) या कादंबरीपासून फ्रँकेनस्टाइनने उभे केलेले प्रश्न थेट अलीकडच्या ‘किलर रोबो’च्या प्रश्नांपर्यंत किंवा गेल्या महिन्यात जर्मनीतील फॉक्सव्ॉगनच्या कारखान्यात ‘रोबो’ने मारलेल्या कर्मचाऱ्याच्या अपघातापर्यंत पोहोचतात. फ्रँकेनस्टाइनच्या निर्मितीचे बीज औद्योगिक क्रांतीत होते, तर आपल्या सध्याच्या संगणकीय जगात संगणकाच्या मानसिक व शारीरिक क्रिया-कृती करण्याच्या समतेमुळे माणूस आणि यंत्र यांच्या नव्या संबंधाविषयी विज्ञान व तत्त्वज्ञान अशा दोन्ही मूलभूत ज्ञानशाखांमध्ये प्राधान्याने विचार होऊ लागला आहे. विशेषत: सध्याच्या काळात जेव्हा आपण सर्वच जण आपला सर्वच मानवी संबंधांसाठी- सोशल मीडिया, डेटिंग, प्रेम, राजकारण वा लैंगिकता अशा सर्वच भावभावना व्यक्त करण्यासाठी जेव्हा संगणक, स्मार्ट फोन वा ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर चालणाऱ्या शेकडो यंत्र व यंत्रमानवांवर अवलंबून आहोत. त्या वेळी आपण आणि ‘ते’ यांचे संबंध नवी व्यवस्था समजून घेण्यासाठी वारंवार अभ्यासावे लागणार.
गमतीशीर भाग हा की, एकोणिसाव्या शतकातील फ्रँकेनस्टाइन असो वा गेल्या वर्ष-दोन वर्षांत आलेला हर किंवा एक्स मशिना असो, पंधरा वर्षांपूर्वी आलेला कुबरिकचा अ स्वेस ओडेसी असो किंवा त्याआधीच्या दशकातील ब्लेड रनर असो वा पन्नाशी-साठीतला अ‍ॅसिमॉव्ह असो, या सगळ्या व नव्या जगाच्या संगणकीय व्यवस्थेमध्ये माणूस व त्याचा यंत्र सहचर वा सहचरी यांच्यातील बिघडलेल्या संबंधाचेच चित्रण प्राधान्याने झालेले दिसते. आभासी वास्तव हा नव्या जगाचा कणा आहे, अनैसर्गिकता हे या जगाचे भान आहे, यंत्र गुलामगिरी किंवा यंत्रावर अवलंबित मानवाची यंत्रगुलामी हा या व्यवस्थेचा नवा तणाव आहे.
अलीकडचे वा पलीकडचे विज्ञान साहित्य असो, सिनेमा वा यंत्रमानवाविषयी तात्त्विक चर्चा असो, या सर्व विचारप्रक्रियेत मानव आणि यंत्र यांच्यातील बिघडलेल्या वा बिघडत चाललेल्या संबंधांची चर्चा का यावी? कुठे माणूस व त्याच्या यंत्र सहचरीचे अरण्यरुदन ऐकू येते, कुठे उद्विग्न यंत्रमानवाचा कंटाळा चित्रित होतो, कुठे आपले ‘प्रोग्रॅम्स्’ आयुष्य चारच वर्षांचे आहे, अशा अटळ मृत्यू कल्पनेतून सुटका मिळवण्यासाठी धडपडणारी व त्यांचा आपणच लिहलेला ‘प्रोग्रॅम’ बदलण्याची क्षमता नसलेली व म्हणून चिंतित झालेली माणसे असतात. माणसाचे व त्याने बनवलेल्या यंत्र मानवाचे जन्म-मृत्यूच्या चक्राचे प्रश्न नकळत एकसारखे होताना का दिसतात? आपण घडवलेला ‘प्रोग्रॅम’चे आकडे आपण बदलू शकणार नाही अशी आत्मविश्वास गमावलेली शक्यता का दिसते? यंत्र मानवांची त्यांच्या गुलामासारख्या राबण्याच्या व्यवस्थेतून सुटका मिळावी यासाठी चाललेली धडपड व संघर्ष का समोर येते? संगणकीय व्यवस्थेच्या प्रचंड पसाऱ्यात व सायबर स्पेसच्या अथांग अवकाशात आपले मानवीपण व म्हणून अस्तित्व हरवले जाईल अशी भीती आपल्याला का वाटते? अशा स्पेसचा वा अशा गतीचा आवाका न आल्याने भिरभिरल्यासारखे वाटून आपल्या जीवनाची चाके कोणा यंत्रसदृश मानवाकडे आहेत, अशी दु:स्वप्ने आपल्याला वारंवार का पडू लागली आहेत?
‘एक्स मशिना’मधील शेवटच्या दृश्याविषयी जगभरच्या समीक्षकांनी आणि नियतकालिकातील स्तंभलेखकांनी पुन:पुन्हा लिहिले असूनही पुनरुक्तीचा मोह मला टाळता येत नाही. नायिका ‘अ‍ॅव्हा’ या दृश्यात आपली यांत्रिक नग्नता, टिटॅनियम, केबल्स, तारा यातून प्रगटणारा नागडेपणा झाकायचा, लपवायचा प्रयत्न करते- का?
आभासातून (पुन्हा) वास्तवाकडे परतायची आपली इच्छाच तर ती प्रगट करत नाही ना हा प्रश्न समकाळाचा मुख्य प्रश्न आहे की काय? यंत्र आणि यंत्र मानवाच्या उत्क्रांत होत गेलेल्या अवस्थांतून नव्या आयुष्यात आपणही बदलत एखादे यंत्र, एखादा संगणक वा स्मार्ट फोन बनलो आहोत काय हा तो प्रश्न आहे. आपले जीवन व आपली अभिरुची, आपली भाषा व आपली कला, म्हणजेच आपले मानवीपण संपून आपलाही एक प्रणालीबद्ध कार्यक्रम झाला आहे काय? आपल्या प्रत्येकात कुणी एक फ्रॅकेनस्टाईन वा अ‍ॅव्हा दडली आहे काय?
यंत्र आणि मनुष्य यांच्यातला सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे आपले व्यवहार तात्त्विक प्रेरणेने आणि राजकीय इच्छेने भारलेले असतात. या दोन प्रेरणा असतात म्हणून आपण प्रेम करतो, आनंदी वा दु:खी होतो, गाणे गातो व चित्र काढतो. विश्वाची सत्ये शोधतो वा निसर्गाची गुपिते उलगडतो. यंत्राला अशा प्रेरणा नसतात. त्यामुळेच प्रेरणा नसलेले, एखाद्या ‘प्रोग्रॅम’सारखे सूत्रबद्ध व साचेबद्ध आयुष्य, प्रेम वा मैथून नसलेले, दु:ख वा सुख नसलेले, कला वा संगीत नसलेले, कविता वा कथा नसलेले, टिटॅनम वा केबल्समध्ये अडकलेले, भाषा आणि संस्कृती हरवलेले व म्हणून इतिहास वा भविष्य नसलेले आयुष्य अशी आपली वाटचाल होते आहे काय, याची चिंता आणि खंत यांचा झाकोळ नवतत्त्वज्ञानाच्या चिंतनाचा गाभा आहे.
यंत्र नागडे असू शकते काय? फक्त मनुष्यच नागडा असतो किंवा नसतो. नागडेपणाची त्याला लाज वाटते. ते तो झाकतो. लाज वाटणे हा आपला भाव इतिहासाचा एक उत्क्रान्त टप्पा आहे. लाज वाटते म्हणून आपण अनेक गोष्टी करतो किंवा करत नाही, (लाज या विषयावर लोकसत्तामध्ये आलेला माझा पूर्वीचा लेख पाहावा) गळत चाललेली लाज म्हणून आलेला राजकीय भानाचा अभाव ही आपल्या यंत्रयुगाची शोकांतिका आहे.
याकुबने फासावर चढण्यापूर्वी काय खाल्ले, कोणते कपडे घातले, कोणाशी व काय बोलला, त्याचे शेवटचे शब्द काय होते याचा तपशील पुरवणे व तो चघळणे हे आपल्या वाढत्या निर्लज्जपणाचे अलीकडचे उदाहरण. अशी उदाहरणे अनेक आहेत. आपला मनुष्यपणाचा इतिहासच आपण गमावला की काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आजूबाजूला आहे.
माधुरी पुरंदरेंचा मोबाइलचा प्रतीकात्मक व ठाम नकार अशा भीतिपोटी आला असावा. किंवा ‘किलर रोबो’ला विचारवंतांकडून होणारा विरोध भावनारहित युद्धखोरी वाढण्याच्या भीतीतून व्यक्त होत असावा. भावनारहित, वेगवान व साऱ्या साधनसंपत्तीचे ‘फायनान्स’ कॅपिटलमध्ये रूपांतर करून अतिमुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा व अनियंत्रित तंत्रज्ञानाचा परिणाम ‘अतिरिक्त क्रोधा’त कसा होतो याचे विवेचन अर्जुन अप्पादुराईंच्या ‘फिअर ऑफ स्मॉल नंबर्स’ या पुस्तकात आहे. चवताळलेल्या यंत्रमानवाची कैक दृश्ये ‘फ्रॅकेनस्टाईन’पासून आत्तापर्यंत आपण वाचली, पाहिली आहेत. भावरहित चवताळलेल्या माणसांचा जमाव हेच आपल्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाचे श्रेय आहे काय याची आज चिंता आहे.

संजीव खांडेकर

> लेखक चित्रकार, कलाचिंतक आणि नवतत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल: sanjeev.khandekar@gmail.com