संपूर्ण देशात ग्राहकाच्या हक्कांची सर्वप्रथम मांडणी करणारे बिंदुमाधव जोशी तसेच  लेखन आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून शिवचरित्रातील विविध पैलूंचे दर्शन घडविणारे व्याख्याते निनाद बेडेकर   या दोघांनीही अलीकडेच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आगळ्यावेगळ्या  कार्याची ओळख करून देणारे लेख.

बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीद्वारे ग्राहकाला शोषणमुक्त करणारे तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडले. ग्राहकाच्या हक्कांसाठी झगडताना मोच्रे, आंदोलने यांसारख्या सर्व मार्गाचा अवलंब केला. ग्राहकाचे फसवणुकीपासून संरक्षण करण्याकरिता कायदाच आवश्यक आहे, असा आग्रह धरला. त्या वेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांना हा विचार पटवून दिला. यामुळेच देशात ग्राहक संरक्षण कायदा लागू होऊ शकला.
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात ग्राहकाच्या हक्कांची सर्वप्रथम मांडणी करण्याचे श्रेय बिंदुमाधव जोशी यांनाच द्यायला हवे. ग्राहकाला उत्पादक आणि विक्रेत्यांच्या यंत्रणेत आपला हक्क, आवाज मिळवून देण्यासाठी त्यांनी ग्राहकशास्त्राचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत मांडून ते थांबले नाहीत तर तो प्रत्यक्षात यावा याकरिता त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली. अर्थनीतीमध्ये उत्पादक, पुरवठादार, शेतकरी या घटकांबरोबरच ग्राहक नामक घटकाला तितकेच महत्त्व असल्याचे प्रतिपादन करणाऱ्या बिंदुमाधवांनी उपेक्षेचा धनी झालेल्या ग्राहकाला सन्मान मिळवून देण्याचे काम केले. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे, हे तत्त्व ग्राहकाच्या मनात रुजण्यासाठी त्यांनी वक्तृत्वाबरोबर लेखणीचाही प्रभावी वापर केला. १९७४ मध्ये िबदुमाधव जोशींनी पुण्यात न्यायमूर्ती एम. सी. छागला यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीची स्थापना केली. त्या वेळी मी, सुहास काणे, डॉ. अशोक काळे, ठकसेन पोरे, भालचंद्र वाघ हे स्थापनेचे सहकारी होत. स्थापनेपासून आजतागायत त्यांच्याबरोबर ग्राहक पंचायतीमध्ये काम करण्याचे भाग्य मला लाभले. ग्राहक पंचायतीची स्थापना होईपर्यंत अर्थव्यवस्थेत ग्राहक नावाच्या घटकाला काही अधिकार, हक्क असतात हेच कुणाला ठाऊक नव्हते. १९७० च्या दशकात संपूर्ण देशात साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अन्नधान्याची तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण करत त्याद्वारे ग्राहकांना नाडण्याचे उद्योग ७० च्या दशकात भरात आले होते. याखेरीज त्या काळात अन्नधान्यातील भेसळीनेही ग्राहकाला लुबाडले जात होते. टंचाई, महागाई आणि भेसळ यांमध्ये ग्राहक भरडून निघत होते. बाजारपेठेतील विक्रेता आणि पुरवठादारांच्या व्यवस्थेकडून सामान्य ग्राहकाचे होणारे शोषण रोखण्याकरिता ग्राहक पंचायतीची स्थापना झाली. यातूनच पुढे सामान्य ग्राहकांना किफायतशीर दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याकरिता ग्राहक संघ आणि त्यापुढे ग्राहक पेठेची निर्मिती झाली. ग्राहकाची शोषणापासून मुक्ती करणे हा विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी िबदुमाधवांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने संघटना बांधणीचे कार्य जोमाने सुरू केले. सुस्त ग्राहकराजाला जागे करणे सोपे नव्हते. हे काम िबदुमाधवांनी मोठय़ा इमानाने आणि नेटाने पार पाडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या िबदुमाधवांनी ग्राहक चळवळीत कधीही पक्षीय राजकारण येऊ दिले नाही.
कोणत्याही वस्तूची किंमत ठरविताना त्या वस्तूचा उत्पादन खर्च विचारात घेतला पाहिजे. हे सर्वमान्य सूत्र आहे. उत्पादकांनी वस्तूच्या वेष्टनावर उत्पादन खर्च टाकावा, अशी मागणी िबदुमाधवांनी सातत्याने केली होती. अनेक पाश्चिमात्य देशांत उत्पादकाचा नफा उत्पादन खर्चाशी संतुलित प्रमाणात असावा, तो अवास्तव नसावा, अशी मांडणी िबदुमाधवांनी केली होती. देशातील ग्राहक पुरेसा जागरूक नसल्यामुळे त्याचे शोषण करण्यास उत्पादक, विक्रेते, पुरवठादार आघाडीवर असतात, हे ओळखून त्यांनी ग्राहक-शोषणमुक्तीचे तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडले. ग्राहकाला आपल्या हक्काची जाणीव निर्माण व्हावी याकरिता सुरू केलेला प्रबोधनाचा वसा आयुष्याच्या अखेपर्यंत त्यांनी जपला. एखाद्या विचाराला, तत्त्वाला आयुष्यभर वाहून घेणाऱ्या िबदुमाधवांसारख्या व्यक्ती दुर्मीळच असतात. पाश्चिमात्य देशातील ग्राहक चळवळ आणि भारतातील ग्राहक चळवळ यांच्या दृष्टिकोनातील मूलभूत फरक िबदुमाधवांनी ओळखला होता. पाश्चिमात्यांच्या ग्राहक चळवळीतून उपभोगवादाचा सिद्धांत पुढे आणला गेला. िबदुमाधवांना उपभोगवादाचा तिटकारा होता. ग्राहकाला शोषणमुक्त करण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्याकरिता प्रशासनाला ग्राहकाभिमुख केले पाहिजे हे ओळखत िबदुमाधवांनी त्या दृष्टीने मोठे कार्य केले.
१९९५ मध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या वेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी राज्य ग्राहक संरक्षण उच्चाधिकार समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी िबदुमाधवांची नियुक्ती करत त्यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. या समितीच्या बठकांमधून सामान्य ग्राहकाच्या हिताशी निगडित असलेल्या अनेक विषयांवर विस्ताराने चर्चा झाली आणि ग्राहकांच्या अनेक समस्यांवर मार्ग काढण्यासही मदत झाली. िबदुमाधवांपुढे केवळ शहरी ग्राहक नव्हता. शेतकरी हाही ग्राहकच आहे, अशी मांडणी करत त्यांनी शेतकऱ्याच्या हक्काची सनद तयार केली. तहसील, भूमापन आदी सरकारी कार्यालयांमध्ये शेतकऱ्याची कशी लुबाडणूक होते, फसवणूक होते हे ग्राहक पंचायतीने अभ्यासपूर्वक जगासमोर आणले. त्यामुळे शेतकरी ग्राहकाच्या हक्काची सनद संबंधित सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लावण्याचा आग्रह िबदुमाधवांनी धरला. सातबाऱ्यापासून वेगवेगळे उतारे मिळण्यासंदर्भात शेतकरी ग्राहकाचे कोणते हक्क आहेत याची जाणीव करून देण्याचे काम ग्राहक पंचायतीच्या अनेक कार्यकर्त्यांनी केले. तालुका स्तरावरील अनेक छोटय़ा छोटय़ा कार्यकर्त्यांना िबदुमाधवांनी अशा विषयांचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले.
िबदुमाधवांच्या निधनामुळे ग्राहकशास्त्राची मांडणी करणारा द्रष्टा विचारवंत पडद्याआड गेला आहे.
आज आधुनिक अर्थव्यवस्थेत ग्राहक चळवळीपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. ग्राहक चळवळ सुरू झाली त्या वेळचे आणि आताचे ग्राहक संरक्षणाचे संदर्भ बदलले आहेत. बदलत्या संदर्भाचा विचार करूनच सरकार आणि ग्राहक संघटनांना यापुढील काळातील आपल्या कामाची दिशा ठरवावी लागणार आहे.
गेल्या २०-२५ वर्षांत ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’मधील अंतर भरमसाट वाढले आहे. तंत्रज्ञानाधिष्ठित समाजात ज्ञानाचे महत्त्व वाढल्यामुळे ‘आहे रे’ वर्गाच्या उत्पन्नात भरमसाट वाढ झाली असून, त्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक पसा येत आहे. आज आपण आपल्या देशात तीन लाखांपासून ६०-७० लाखांच्या दर वर्षी पॅकेजेसची भाषा बोलू लागलो आहोत. पूर्वी काही हजारांत ज्यांचे उत्पन्न होते, त्यांच्या घरात आता लाखाने उत्पन्न येऊ लागले. स्वाभाविकपणे या लोकांची जीवन जगण्यासंबंधीची ‘अभिलाषा’ बदलली. त्यांना सर्व उत्तम दर्जाच्या आणि आकर्षक अशा गोष्टींचे आकर्षण वाटू लागले. महागडय़ा गोष्टींकडे कल वाढला. जगाला भेडसावणाऱ्या महागाईविषयी त्यांची तक्रार नाही. कारण त्यांना अधिक खर्च करणे शक्य आहे. म्हणून ते साध्या दुकानात न जाता मॉल्सच्या वाटेने जाऊ लागले आहेत. या ग्राहकवर्गाने ‘महागडय़ा जीवनशैलीचा’ मनापासून स्वीकार केलेला दिसून येतो. त्यांच्या दृष्टीने क्वालिटी महत्त्वाची, किंमत दुय्यम.
अशा या बदलत्या जीवनशैलीचा देशातील ग्राहक चळवळीवर काय परिणाम होणार, हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. उपभोगप्रधान समाजातील ग्राहक देशातील ग्राहक चळवळीला उपयुक्त ठरतील का, हा खरा सवाल आहे. अशा उच्चभ्रू समाजातील लोकांना ग्राहक चळवळीची आवश्यकता वाटेल का? असे ग्राहक सहजरीत्या संघटित होतील का? पशांच्या जोरावर ते सर्व प्रकारचे सुख उपभोगू शकतात. त्यांना ग्राहक चळवळ आवश्यक वाटेल का? अशा ग्राहकांचे प्रश्न सामान्य ग्राहकांच्या, गरीब प्रश्नांपेक्षा भिन्न असणार यात शंका नाही. इंटरनेटच्या जमान्यात वावरणारे हे सुशिक्षित आणि उच्च मध्यम वर्गातील ग्राहक एकत्र येऊन ग्राहक चळवळ समर्थ करण्यास किती उपयुक्त ठरतील, याविषयी साशंकता आहे. म्हणून इंटरनेटच्या युगातील ग्राहक चळवळीसंबंधी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आज ग्राहक संघटनांपुढे निर्माण झाली आहे.
आजच्या पिढीतील तरुण ग्राहकांच्या सवयी अत्यंत ‘खर्चीक’ होत चालल्या आहेत. भारतीय समाजात टिकाऊ जीवनपद्धतीचा शतकानुशतके अवलंब केला गेला; पण गेल्या २०-२५ वर्षांत वेगळे चित्र निर्माण होत असल्याचे दिसते. उपभोगावर संयम ठेवणे आवश्यक आहे याची जाणीव करून द्यायला हवी आहे, कारण कर्ज काढून उपभोग घेण्याची वृत्ती वाढत आहे. पूर्वीचा अशिक्षित ग्राहक कर्ज काढून थाटात मुलीचे लग्न करायचा आणि व्यापारी आणि सावकाराकडून लुबाडला जायचा. तशी परिस्थिती या सुशिक्षित क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्डधारकांची होत आहे. ग्राहक चळवळीपुढे हे एक आव्हान आहे. सातत्याने विकसित होत जाणारी ही नवी जीवनशैली आपल्या देशातील नीतिमूल्यांवर घाव घालणारी आहे. कारण खर्चीक जीवनशैली जगण्यासाठी प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतात आणि अशा स्रोतांच्या शोधासाठी भ्रष्टाचाराच्या मार्गावर कळत-नकळत चालत जावे लागते. नंतर तो मार्ग स्वीकारला जातो. आज अशी माणसे या नवीन जीवनशैलीचा यथेच्छ उपभोग घेताना दिसत आहेत. अशी माणसे ग्राहक चळवळीला कोणता आधार देणार? आणि ग्राहक चळवळ ‘अशा’ ग्राहकांच्या आधारावर का चालवायची? याचाही विचार करावा लागणार आहे.
ग्राहक पंचायत ही चळवळ िबदुमाधव यांच्या नावाशी गेले ४० वर्षे जोडली गेली आहे. त्यांच्या जाण्याने चळवळ अस्तंगत होऊ नये, उलट नव्या परिस्थितीत नवी आव्हाने आणि नवीन कार्यपद्धती याचा स्वीकार करून ही चळवळ वाढवली पाहिजे. राष्ट्रनिष्ठा, श्रम प्रतिष्ठा, विश्वस्त वृत्ती, स्वदेशी आणि ग्राहक नीती या पंचतत्त्वांना राष्ट्रीय मूल्ये म्हणून रुजवण्याची कधी नव्हे इतकी गरज आज निर्माण झाली आहे. िबदुमाधवांकडून या आव्हानाला कसे तोंड द्यायचे याचे मार्गदर्शन आता मिळणार नाही.
-सूर्यकांत पाठक

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

 *लेखक अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष आहेत.