कधीकाळी सतराव्या शतकात यवनांचे पारतंत्र्य उलथवून टाकण्यासाठी समर्थाच्या साहित्याने इथल्या
‘स्वराज्या’ला प्रेरणा दिली. याच विचारातून ब्रिटिशांविरुद्ध समाज उभा करण्यासाठी त्यांच्या वाङ्मयाचे मंदिर उभे केले.
यासाठी ‘विदर्भाचे टिळक’ म्हणून ओळखले जाणारे शंकरराव ऊर्फ नानासाहेब देव यांनी देशभर विखुरलेले वाङ्मय गोळा केले.
या प्राचीन वाङ्मयाचाच गाभारा म्हणजे धुळ्याचे श्री समर्थ वाग्देवता मंदिर होय.

उ त्कट भव्य तेचि घ्यावे ।
मळमळीत अवघेचि टाकावे ।
नि:स्पृहपणे विख्यात व्हावे ।
भूमंडळी।।
या उत्कट काव्यावरून लक्षात आले असेलच, वाङ्मय प्रवासाची ही पायरी समर्थ मंदिराची आहे. सकल समाजाला शुद्ध आचरण आणि उच्च विचारांची अनुभूती देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी आपल्या हयातीत अशी समाजमन घडविणाऱ्या साहित्याची निर्मिती केली. या संतवाङ्मयालाच देवतेचा दर्जा देत १९३५ मध्ये धुळय़ात एका मंदिराची निर्मिती झाली- श्री समर्थ वाग्देवता मंदिर!
हे मंदिर आहे पण इथे कुठला देव नाही; पूजाअर्चा, आरती, प्रसाद, घंटानाद नाही. हे आहे निव्वळ वाङ्मयाचे मंदिर! इथे शारदेचे अधिष्ठान आहे आणि या समाजाला ज्ञानी करणाऱ्या ग्रंथांना देवतेचे स्थान आहे. हा इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील! ब्रिटिशांविरोधातील लढय़ाला सर्वत्र व्यापक रूप येत असताना धुळय़ामध्येही ‘विदर्भाचे टिळक’ म्हणून ओळखले जाणारे शंकरराव ऊर्फ नानासाहेब देव यांनी इसवी सन १८९३ मध्ये ‘सत्कार्योत्तेजक सभा’ नावाने एक स्वातंत्र्य यज्ञ चेतवला. या स्वातंत्र्य यज्ञाचेच एक उपांग – श्री समर्थ वाग्देवता मंदिर!
लक्ष वेधून घेणाऱ्या संस्थेच्या दगडी इमारतीत शिरताच समोरच समर्थाची प्रतिमा दर्शन देते. या प्रतिमेसमोरच दासबोधाच्या मूळ ग्रंथाची नक्कल प्रत ठेवलेली आहे. दासबोधाची मूळ प्रत परांडा येथील डोमगावच्या मठात आहे. देवांनी ही प्रत जशीच्या तशी नकलून काढली. अगदी त्यातल्या चुका आणि दुरुस्तींसह! समर्थ तत्त्वज्ञानाचे हे दर्शन घ्यायचे आणि अन्य संग्रह पाहू लागायचे.
हजारो जुनी कागदपत्रे, बाडे, पोथ्या, ग्रंथ, काव्यरचना, पत्रव्यवहार आणि अन्य साहित्यसाधनांची ही मांडणी. अशा या अक्षरमंदिरात फिरू लागलो, की भोवतीने ही वाङ्मयाची दालने किलकिलू लागतात. वेद, पुराण, कला, कौशल्य, साहित्य, संस्कृती, इतिहास, भाषा, व्याकरण, संगीत, आयुर्वेद अशा नाना विषयांचा इथे स्पर्श. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा हा संचार. यातली कुठलीही एक कलाकृती घ्यावी आणि त्यातील शब्द, चित्र, माहिती, विचारांमध्ये बुडून जावे. प्रत्येक वाङ्मय दुर्मिळ सदरातील. संस्थेत फिरताना असेच एकेक थांबे आपल्याला भेटू लागतात.
समर्थानी लिहिलेले ‘वाल्मिकी रामायण’ हा या संग्रहातील सर्वात मोठा ठेवा. समर्थानी हा ग्रंथ नाशिकजवळ टाकळी मठात लिहिला. इसवी सन १६२२ मध्ये तयार झालेले हे हस्तलिखित रामायणाच्या बाल, अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि शेवटच्या उत्तरकांडातून आपल्यापुढे येते. आपल्याकडे रामायणाच्या अनेक प्रती आहेत. पण समर्थ लिखित रामायणामध्ये त्यांच्या ‘केल्याने देशाटन’ वृत्तीमुळे भारतवर्षांचे दर्शन घडते. ते पाहताना समर्थाची अक्षरवाटिका जशी भावते तशीच प्रत्येक खंडाच्या मुखपृष्ठावर त्यांनी चितारलेली चित्रेही लक्ष वेधून घेतात.
समर्थानी लिहिलेले हे ‘रामायण’ समाजापर्यंत घेऊन जाण्याचा ध्यास संस्थेने घेतला आहे. आठ खंड आणि त्याची सहा हजार पृष्ठे असा हा प्रचंड वाङ्मयीन विस्तार आहे. यासाठी मोठा खर्च आणि हाती संशोधकांची फळी लागणार आहे. पण या दोन्ही गोष्टींवर मात करत संस्थेने यातील पहिला ‘बालकाण्ड’ खंड नुकताच समाजसुपूर्द केला.
संस्थेतील ‘गीतगोविंद’ हा असाच दुर्मीळ ग्रंथ. इतिहास, कलासौंदर्य आणि वाङ्मय सर्व दृष्टीने अमूल्य! कृष्ण आणि राधेच्या प्रेमावर जयदेवाने लिहिलेले हे दीर्घ संस्कृत काव्य! साधारणपणे दोनशे पानांच्या या ग्रंथात प्रत्येक पानावर एक ओवी आणि तिला व्यक्त करणारे चित्र आहे. या शब्द आणि चित्र दोन्हीनांही उच्च प्रतिभेचे लेणे! सतराव्या शतकात साकारलेल्या या ग्रंथाची ही दुर्मीळ प्रत खान्देशातील शहादा तालुक्यात टेंभुर्णेपूरण गावी देवांना मिळाली. या ग्रंथावर पुढे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिसंवादात अनेक शोधनिबंध वाचले गेले. हजारो ऐतिहासिक कागदपत्रांचे दर्शन हे देखील या संग्रहालयाचे वैशिष्टय़! अगदी बाडांच्याच भाषेत बोलायचे झाल्यास संस्थेच्या दफ्तरी आज ती पाच हजार आहेत. या प्रत्येक बाडामध्ये पुन्हा शेकडो कागद. हे सारे कागद देव यांनी भारतभरामध्ये पसरलेल्या मठ, संस्था, व्यक्तींकडून मिळवले. यामध्ये त्यांनी भेट दिलेल्या मठांचीच संख्या अकराशेहून अधिक आहे. अखंड पायपीट, कष्ट, वेळप्रसंगी धन मोजत देवांनी हे सारे भांडार इथे जमा, सुरक्षित केले.
या कागदपत्रांच्याच संशोधनाचे कार्य इथे सुरू असते. एकटय़ा देवांनी यातील तीन हजारहून अधिक कागदपत्रांचे संशोधन केले आहे. या संशोधित हस्तलिखितांवर आधारित चार सूचिखंडही तयार करण्यात आले आहेत.
प्राचीन वाङ्मयातील या पानापानांवर तत्कालीन समाजाचे दर्शन घडते. त्याची जडण-घडण, सुरू असलेली आंदोलने समजतात. या साऱ्यांचा वेध इथे सतत सुरू असतो. देवांनी गोळा केलेला हा वाङ्मयीन खजिना तपासतानाच छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एक ना दोन तब्बल सात पत्रे हाताशी लागली. महाराजांची ही पत्रे आज वाग्देवता मंदिरांचा ठेवा आहेत. यामध्ये काही आदेशपत्रे आहेत, काही सनदा आहेत तर काही निवाडेदेखील. छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, समर्थ, त्यांचे शिष्य कल्याणस्वामी, अन्य काही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा पत्रव्यवहारही इथे लावलेला आहे. समर्थानी त्यांचे संपूर्ण लेखन हे पद्यात केले आहे. पण त्यांचे गद्यातील एकमेव पत्र इथे पाहण्यास मिळते.
ताडपत्र – ताम्रपटांवरचे लेख, प्राचीन बखरी, पोथ्या, अन्य संतांचे साहित्य, श्रीकल्याणस्वामींनी रेखाटलेले हनुमानाचे चित्र आणि कल्याणस्वामींचे त्याकाळी काढलेले चित्र, सचित्र पंचरत्न गीता, एकनाथी भागवताची ऐतिहासिक प्रत, देवांचा गांधी-सावरकरांबरोबरील पत्रव्यवहार, टिळकांनी भेट दिलेली ‘गीतारहस्य’ची प्रत असे काय काय पाहायचे होऊन जाते. वाङ्मय मंदिराचे हे सारेच देव्हारे आपले भान हरपून टाकतात.
समर्थाघरची ही ज्ञानपोई गेली ऐंशी वर्षे सारस्वतांची तहान भागवत आहे. देवांच्या पाठी त्यांच्या अनुयायांनी हा ज्ञानयज्ञ आजही त्याच आस्थेने सुरू ठेवला आहे. प्राचीन वाङ्मयाच्या जतन, संशोधन, अभ्यासाचे काम आजही त्याच गतीने सुरू आहे. हे सर्व कार्य केवळ दानशूरांच्या मदतीवर चालू आहे. वाङ्मय संशोधनाचे कार्य सुरू असणाऱ्या या संस्थेच्या नावात ‘मंदिर’ हा शब्द आहे म्हणून आजवर सरकारी अनुदान नाकारण्यात आले.
खरेतर अडचणी खूप आणि आव्हाने निरंतर आहेत. जुनी झालेली इमारत, मोडकी कपाटे, कसेबसे भिंतीवर साकारलेले प्रदर्शन, अभ्यासक-संशोधकांसाठी नसलेल्या सोयी, एक कर्मचारी व्यवस्था..अशी मोठी यादी तयार होईल. पण समर्थ निष्ठेतून ही मंडळी त्यावरही मात करत आहेत. आज या वाङ्मयाचे जतन करणे, अभ्यासक-संशोधकांसाठी व्यवस्था करणे, अद्ययावत संग्रहालयाची उभारणी ही संस्थेपुढची तातडीची कामे आहेत. पण आर्थिक पाठबळाअभावी या योजना आजतरी कागदावरच आहेत. केवळ निधीअभावी लांबणारा हा प्रत्येक दिवस या ‘वाङ्मया’ विषयी काळजी वाढवतो आहे. त्याचीच चिंता या विश्वस्तांना भेडसावते आहे.
राष्ट्राचा हा वारसा जतन व्हावा, पुढच्या पिढीला तो पाहता-अभ्यासता यावा. ज्यातून पुन्हा नवसमाजनिर्मिती व्हावी या हेतूने हे सारे धन देवांनी इथे गोळा केले. त्यांच्याबरोबरीने आजवरच्या विश्वस्तांनी ते निगुतीने सांभाळले; पण आता त्याला समाजाच्या उबदार हातांचीही गरज आहे. तुमचा मदतीचा हात वेळीच पोहोचला तर हे ‘मनाचे श्लोक’ चिरंजीव होतील आणि ही ‘वाग्देवता’ही जागती राहील!

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
beed district loksabha marathinews, dhananjay munde marathi news
मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा बैठकांवर जोर, मराठा भवन बांधून देण्याचे आश्वासन
instead of Kripal Tumane Raju Parve got Candidacy from Ramtek
शिंदेसोबत जाण्याच्या निर्णयाने तुमानेंची अवस्था ‘तेलही गेले अन् …’
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे
प्राचीन वाङ्मयातील या पानापानांवर तत्कालीन समाजाचे दर्शन घडते. त्याची जडण-घडण, सुरू असलेली आंदोलने समजतात. या साऱ्यांचा वेध इथे सतत सुरू असतो. वाग्देवतेच्या या मंदिरातून आजवर शेकडो अभ्यासकांनी नवनव्या विषयांमध्ये संशोधन केले आहे. या संशोधनावरच संस्थेतर्फे आजवर १६५हून अधिक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

‘मनाचे श्लोक’ची मुळाक्षरे!

‘मनाचे श्लोक’ हे समर्थाचे एक अक्षरवाङ्मय! मानवी जीवनमूल्यांची ही ‘गीता’ समर्थानी चाफळ येथे ध्वनित केली आणि त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांनी ती उतरवून घेतली. कल्याणस्वामींनी लिहिलेला हा मूळ ग्रंथच इथे पाहण्यास मिळतो. २०५ श्लोकांचे हे काव्य इथे ९२४ पानांवर विसावले आहे. या पानांवरची सुंदर अक्षरवाटिका लक्ष वेधून घेते.

विनोबा भावे यांनी इथल्या वाङ्मयदर्शनाला ‘स्वातंत्र्याचे पंचप्राण’ म्हटले, तर साने गुरुजींनी त्याला ‘स्फूर्तीचे राऊळ’ म्हणून गौरविले. ‘समर्थाच्या घळीत फिरल्यासारखे वाटते’ या शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संस्थेचे कौतुक केले. तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या अशा संशोधन संस्थांमधूनच राष्ट्रनिर्माण होत असल्याचे मत नोंदवले.

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, (०२२-६७४४०५३६)

महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट
नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० (०२२-२७६३९९००)

ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. (०२२-२५३९९६०७)

पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे
रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००

नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. (०२५३-२३१०४४४)

नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, (०७१२ – २७०६९२३)

औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
१०३, गोमटेश मार्केट, औषधी भवनजवळ, नवा गुलमंडी रस्ता, औरंगाबाद. (०२४०-२३४८३०३)

नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
१६६, अंबर प्लाझा, पहिला मजला, स्टेशन रोड, अहमदनगर. (०२४१-२४५१५४४/२४५१९०७)

दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१ / बी,
सेक्टर- १० नोएडा (गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) – २०१३०१ (०१२०- ६६५१५००)