लोकसभा निवडणुकीसाठी बहुतेक पक्षांच्या वॉर रूमचे स्वरूप हे संपर्क केंद्रे अथवा बॅक ऑफिस एवढय़ापुरतेच
मर्यादित असताना, भाजपच्या वॉर रूममध्ये मात्र मोदी लाटेचा संचार झालेला दिसतो. मतदारसंघात भाजपचे नेमके स्थान काय आहे, लोकभावना काय आहे, कल कोठे आहे, आदी माहिती उपलब्ध होऊन त्यानुसार संबंधित ठिकाणी आवश्यक त्या सूचना तसेच प्रचार यंत्रणा कार्यान्वित अथवा गतिमान करण्यावर येथून भर दिला जातो.
‘हॅलो, राजनाथ सिंहजींचे हेलिकॉप्टर इंधन भरण्यासाठी नांदेडला उतरवावे लागणार आहे.. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याशी संपर्क होत नाही, ठीक आहे!’ ..
नंतर काही वेळात निवडणूक आयोगाकडून आलेला ‘ओके’ मेसेज संबंधितांना पाठविला जातो आणि नवा निरोपही सोबत जातो.. ‘नरेंद्र मोदींच्या सभेसाठी व्यासपीठ प्रतिनिधींमध्ये काही नावांचा नव्याने समावेश करायचाय.. तुमच्या मतदारसंघात किती घरांपर्यंत बुथप्रमुख पोहोचले? तुम्हाला हवी असलेली व्यवस्था केली जाईल.. मी बोलतो, देवेंद्रजींशी.. जोरात काम होऊ द्या, तुमच्याकडे प्रचाराचा जोर वाढवण्याची गरज असल्याचा रिपोर्ट आहे.. मोदींच्या भाषणातील महत्त्वाच्या मुद्दय़ांच्या त्यांच्याच आवाजातील मराठी सिडी पाठवत आहे.’
..भाजपच्या निवडणूक ‘वॉर रूम’मधून सकाळी साडेसात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंतचे हे चित्र.. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ‘वॉर रूम’ हे भाजपच्या कार्यकर्त्यांचे ‘प्रेरणा केंद्र’ बनले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह बहुतेक पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी ‘वॉर रूम’ची स्थापना केली असली, तरी बहुतेक वॉर रूमचे स्वरूप हे संपर्क केंद्रे अथवा बॅक ऑफिस एवढय़ापुरतेच मर्यादित असताना, भाजपच्या वॉर रूममध्ये मात्र मोदी लाटेचा संचार झालेला दिसतो. अमेरिकेत ओबामांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेतील एक व्यक्ती मुंबईत आली होती. भाजपच्या वॉर रूमचे प्रमुख श्रीकांत भारती यांच्यासह काही जणांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तेथील प्रचाराची तंत्रे आणि वॉर रूमचे स्वरूप याची माहिती मिळाली आणि श्रीकांत भारतींनी भारतातील लोकसभेच्या निवडणुकांचा विचार करून भाजप महाराष्ट्रासाठी एक संकल्पना तयार केली. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या तालमीत तयार झालेले आणि पुण्यामध्ये नऊ वर्षे भाजपचे संघटनात्मक काम करणाऱ्या भारतीवर फेब्रुवारीमध्ये वॉर रूमची जबाबदारी सोपविण्यात आली. जोपर्यंत तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर ही यंत्रणा थेट संपर्क प्रस्थापित करणार नाही, तोपर्यंत वॉर रूमचे स्वरूप हे बॅक ऑफिस असेच राहील हे ओळखून दौराप्रमुख, सभाप्रमुख, हिशेब तपासनीस, सीए, प्रभारी, स्थानिक कार्यालयप्रमुख अशा आठ गटांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. चार तासांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणुकीत या साऱ्यांची नेमकी भूमिका, कार्य तसेच संपर्क यावर मार्गदर्शन करण्यात आले. भाजप लढत असलेल्या महाराष्ट्रातील २४ लोकसभा मतदारसंघांतील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत संपर्क ठेवता यावा, अशी यंत्रणा यासाठी निर्माण करण्यात आली. यासाठी बुथप्रमुखांच्या संपर्कासाठी औरंगाबाद येथे केंद्र स्थापन करण्यात आले. याचप्रमाणे पुणे, मुंबई येथे मिळून चार केंद्रांची स्थापना करण्यात आली. या सर्व केंद्रांत मिळून सुमारे ७५ प्रशिक्षित कर्मचारी आणि सुमारे ६० संगणक बसविण्यात आले. मुंबईतून मीडिया आणि सोशल मीडियाचे काम सुरू असून त्याचबरोबरच ‘सीएजी’ कम्युनिटी फॉर अकांऊटेबल गव्हर्नन्सची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली. या टीममध्ये काम करणाऱ्यांचा भाजप अथवा कोणत्याही पक्षाशी थेट संबंध नाही. यात काम करणारे बहुतेक जण हे आयआयटी शिक्षित अथवा उच्चशिक्षित तरुण असून, प्रत्येक विधानसभानिहाय तीन-चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा क्षेत्रातील पक्षीय घडामोडी, लोकांचे मत, लोकांची मानसिकता आदींची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले जाते. ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ या घोषणेला शंकराचार्यानी विरोध केल्यानंतर त्याचे परिणाम ब्राह्मणबहुल विभागात तसेच अन्य विभागात कसे झाले, याची तात्काळ माहिती गोळा करून वर्गीकरण करण्यात आले.
राज्यात भाजप लढत असलेल्या लोकसभेच्या २४ मतदारसंघांत २८,६०३ बूथ असून, यातील प्रत्येक ठिकाणी भाजप कार्यकर्ते लोकांपर्यंत किती पोहोचले आहेत, याची नेमकी माहिती रोजच्या रोज येथे कोसळत असते. यातून संबंधित मतदारसंघात भाजपचे नेमके स्थान काय आहे, लोकभावना काय आहे, कल कोठे आहे, आदी माहिती उपलब्ध होऊन त्यानुसार संबंधित ठिकाणी आवश्यक त्या सूचना तसेच प्रचार यंत्रणा कार्यान्वित अथवा गतिमान करण्यावर भर दिला जातो. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठीच्या प्रचारसभांच्या नियोजनास प्राधान्य देण्याबरोबरच नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांच्या प्रचारसभांसाठी यंत्रणा कार्यान्वित केली जाते.
मोदींच्या सभा या त्यांच्याच यंत्रणेकडून निश्चित केल्या जातात, असेही श्रीकांत भारती यांनी सांगितले. सकाळपासून बुथ स्तरावरील माहिती घेण्यापासून दिवसभर सभा आणि प्रचारासाठी संपर्क साधला जातो. रात्री प्रदेश भाजप अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, भाजप नेते गोपीनाथ मुंडे तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याशी रोज संपर्क साधून सूचनांची देवाणघेवाण होते. मोदींच्या भाषणाच्या मराठी कॅसेटसह आवश्यक ते प्रचार साहित्य पोहोचले की नाही, यासह वेगवेगळ्या गोष्टींची काळजी वॉर रूममधून घेतली जाते. फिल्डवरच्या कार्यकर्त्यांनाही थेट संपर्क साधता येत असल्यामुळे भाजपच्या प्रचाराने यावेळी वेगळीच गती घेतल्याचे दिसून येत आहे. मोदी लाटेचा पुरेपूर फायदा उठविण्यासाठी राज्यस्तरावरील नेतेही सर्व प्रचार यंत्रणा ताकदीनिशी उतरवत असून, यातील वॉर रूमच्या माध्यमातून मीडिया व सोशल मीडियाच्या अ‍ॅक्टिव्हिटी वेगाने सुरू असतात. यातच केवळ मोदी पंतप्रधान बनावेत अशी मानसिकता असलेले, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही पक्षाचे नसलेले तरुण मोठय़ा संख्येने आहेत. या तरुणांचा परिणामकारक वापर ‘मोदी की दो आँखे’ म्हणून करून घेण्यात येत आहे.
केवळ भाजपचे काय चालले आहे, एवढय़ापुरते मर्यादित न राहता प्रतिस्पर्धी पक्षाच्या हालचालींचा बारकाईने मागोवा काढण्याचे कामही भाजपच्या वॉर रूमच्या माध्यमातून सुरू आहे. प्रचारासाठी येणारे राष्ट्रीय नेते तसेच राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभांच्या नियोजनाची काळजीही घेतली जाते. नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनता यामध्ये प्रभावी सुसंवाद साधणारी ‘वॉर रूम’ कार्यकर्त्यांसाठी ‘प्रेरणा’ बनली आहे.