एक सर्जनशील उद्योगपती खेडय़ांतील गरजू महिलांना पाणी-रिक्षा (जलदूत) चालविण्यास देतो,  राज्याच्या काही भागांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग चालू केल्यानंतर आठ तासांच्या शिफ्टमध्ये बाई  ४०० ते ५०० रुपये  कमावू लागते आणि आता या प्रकल्पाची पाणी शुद्धीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातल्या पहिल्या सात प्रकल्पांमधून उत्कृष्ट प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय संस्था निवड करते.. या अभिनव उपक्रमाच्या निमित्ताने एका वेगळ्या विषयावरील चर्चा..
‘होठों पे सच्चाई रहती है और दिल में सफाई रहती हैं, हम उस देश के वासी है, जिस देश में गंगा बहती है..’ हा खास राज कपूरीय भाबडेपणा लहानपणी पाहिला. तिथपासून ‘राम तेरी गंगा मली हो गयी पापियों के पाप धोते धोते..’ इथपर्यंतचा प्रवासही केव्हाच होऊन गेलेला आहे. स्वत: पापे करणे यथास्थित चालू ठेवून गंगेचे पूजन-स्तवन करणाऱ्यांचा देश, ही आपल्या देशाची आत्मप्रतिमा खचितच अभिमानास्पद नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले तेव्हा त्यांनी एक छोटेसेच भाषण केले होते. ‘‘मुझे ऐसा लगा की गंगामय्या ने बुलाया है’’ असा नमुनेदार भावनाखेचक डायलॉग त्यांनी मारलाच; पण पतंग उत्पादकांसाठी आपण काय केले याची हकीकतही सांगितली. सरकारने काहीही अनुदान वगरे न देता ‘उद्योजकता’ दिली. छपाईवाल्यांशी संधान साधून चिकटवा-चिकटवीचे श्रम वाचवणारा डिझायनर कागद आणि पतंगावर जाहिराती टाकून उत्पन्नाचा एक नवाच स्रोत या गोष्टी त्यांनी फक्त सुचवल्या. पतंगवाल्यांचे उत्पन्न व व्यवसाय किती तरी वाढला. मोदीजी ‘वाढवून सांगणारे’ आहेत, असे बऱ्याच जणांचे मत आहे. ते खरे मानले तरी ‘काय वाढवून सांगायचे?’ याबाबत त्यांची निवड, विधायकता, आíथक-व्यवहार्यता आणि कार्यपद्धतीत सुधारणा या गोष्टींवर भर देणारी होती, हे वेगळेपण मान्य करायला हवे. रुळलेल्या राजकीय संभाषितात एक तर ‘सत्ता-संपत्तीत कोणाच्या वाटय़ाला कसे झुकते माप पडेल?’ असा तरी आशय असतो किंवा ‘कोणाचा द्वेष करायचा?’ याची तरी निवड केली जाते. उत्पादकता हा मुद्दा बनवून आणि ठोस उपायांच्या तपशिलात शिरून, त्यांनी स्वपक्षासकट सर्वाच्याच राजकीय संभाषिताला मोठाच धक्का दिला हे निश्चित.
हा भोज्या-बदल काय स्वरूपाचा आहे, हे ‘आपल्या’ परंपरेतील प्रतीके वापरण्याचा आग्रह ठेवूनच व्यक्त करायचे झाले, तर त्याचे वर्णन ‘गंगेकडून भगीरथाकडे’ असे करता येईल. नेपाळ आणि भारत यांच्या संबंधातदेखील एक भौगोलिक बाब महत्त्वाची आहे. नेपाळकडे बर्फ वितळून ओसंडणारे पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. उलट त्याच पाण्यामुळे भारत (उदा. उत्तर बिहारमध्ये) कायमचा पूरग्रस्त आहे. जर नेपाळमध्ये धरणे बांधली, तर पाणीपुरवठा, पूरनियंत्रण आणि जलविद्युत असा तिहेरी लाभ (दोघांचा मिळून) होईल. भारतात एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात सोडणे (याला नदी-जोड प्रकल्प असे अशास्त्रीय नाव पडले आहे.) कुठे लाभदायक आणि व्यवहार्य होईल? याचा निदान विचार व्हावा यासाठीही ‘भगीरथ’ हे प्रतीक उभे राहणे मोलाचे आहे.
‘भगीरथ-प्रयत्न’ म्हणजे जास्तीत जास्त कष्ट घेणारी तपश्चर्या, हा अर्थ बदलून, आधुनिक काळात ‘कमी प्रयत्न पण नेमक्या जागी’ असा घेण्याची खबरदारी मात्र हवी. कारण असे की, कशाला थोर मानायचे याचे आपले निकष विचित्रच होऊन बसलेत. आपण तपश्चय्रेच्या उग्रतेलाच श्रेय मानून बसतो. वाल्याचा वाल्मीकी होण्यासाठी अंगावर वारूळ चढवून घेण्याची गरज नसते; पण त्याग-आत्मक्लेश यालाच आपण महत्त्व देतो. प्रश्न झेलत राहण्यापेक्षा तो सोडवणे खरे महत्त्वाचे. असे असूनही, उदाहरणार्थ बाबा आमटे हे नाव सर्वाना माहीत असते, पण लेप्रसीवर रामबाण उपाय शोधून काढणाऱ्याचे नाव कुणालाही माहीत नसते.  
जे व्यावसायिकदृष्टय़ा व्यवहार्य व किफायतशीर असते ते सामाजिकदृष्टय़ा उन्नयनकारक असूच शकत नाही की काय? कारखाने बंद पाडण्याचा विक्रम करणारे दत्ता सामंत थोर आणि तशाही स्थितीत कारखाने चालू ठेवणारे ते नफेखोर? एका ‘नफेखोर’च असलेल्या उद्योगपतीने केलेला एक अभिनव प्रयोग आता पाहू.
शुद्ध पाणी विकणारी रिक्षावाली बाई
जंतू, व्हायरस, इतर कचरा व अति-क्षारयुक्त पाणी मिळणारे असंख्य पाणवठे खेडोपाडी आहेत. अल्ट्रा फिल्टरेशन व रिव्हर्स ऑस्मॉसिस यांसारखी तंत्रे वापरून पाणी शुद्ध करणारी अनेक यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे व्यक्तिश: परवडणे फारच कमी लोकांना शक्य असते. व्यक्तिश: बसवलेली ही यंत्रे दिवसातून दहा मिनिटे इतपतच वापरात राहतात. ही पडीक राहणारी गुंतवणूक जर पुरेपूर वापरता आली तर मोठय़ा प्रमाणात व बऱ्याच स्वस्तात शुद्ध पाणी मिळू शकते. अनेकांनी मिळून सामायिक यंत्र घ्यावे हे उत्तम; परंतु एक तर वाडय़ा-वस्त्या आणि पाणवठे यातील लांब अंतरे आणि जे सर्वाचे असते ते कोणाचेच राहात नाही व त्याची वाट लागते, हे कटू सत्य लक्षात घेता शुद्ध पाण्याचे सार्वजनिकीकरण हे फारच दूरचे स्वप्न राहते. सर्वानाच पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी शुद्ध पाणी ‘मिळावे’ हे चांगलेच; पण हे व्यवहारात जमणार कसे?
एक ऑटोरिक्षा, वेगाने शुद्धीकरण करणारे जास्त क्षमतेचे एक केमिकलविरहित अल्ट्रा फिल्टरेशन या तंत्रावर चालणारे संयंत्र, ५०० लिटरची एक टाकी शुद्ध पाण्यासाठी व एक मोबाइल फोन असे एक युनिट बनवायला सहा लाखांची गुंतवणूक लागते. या युनिटला आपण पाणी-रिक्षा म्हणजेच ‘जलदूत’ म्हणू या. एका तळमळीच्या आणि सर्जनशील उद्योगपतीने खेडय़ातील गरजू महिलांना, दान नव्हे तर गुंतवणूक वसूल होईल अशा पद्धतीने बँक लोन आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून, अशा पाणी-रिक्षा (जलदूत) चालविण्यास दिल्या आहेत.
रिक्षा पाणवठय़ावर पोहोचली, की तिचेच इंजिन वापरून पाणी उपसून शुद्धही केले जाईल असा इंजिनाचा दुहेरी उपयोग करून घेतलेला आहे. टाकी शुद्ध पाण्याने भरली, की ही पाणी-रिक्षावाली बाई वाडय़ा-वस्त्यांत सोयीच्या ठिकाणी रिक्षा चालवत जाते. जे जे स्वेच्छेने घेतील त्यांना ७० पसे ते १ रुपया लिटर या दराने पाणी विकते आणि पुढील पाणवठय़ाकडे कूच करते. फक्त पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी घेतले तर कुटुंबाला १५ लिटर पुरते. त्या त्या वस्तीची आíथक स्थिती पाहून सवलत देण्याची तिला मुभा आहे. पेट्रोल, डिझेलमध्ये कशी बचत करता येईल यानुसार ती आपला रूट ठरवते. शिरूर तालुक्यात अशा २० रिक्षा आणि मराठवाडय़ातील सहा जिल्ह्य़ांत २० रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर चालू आहेत. आनंदाची बाब अशी की, साधारणत: आठ तासांची शिफ्ट करणारी बाई त्या शिफ्टला २५०० ते ३००० लिटर पाणी विकते आणि बँकेच्या भांडवलाला चांगल्या दराने परतावा देऊनही ती ४०० ते ५०० रुपये स्वत: कमावते. (मेन्टेनन्सची जबाबदारी मालकाची राहते) मालकांचे म्हणणे असे की, जर आम्ही वाजवून परतावा घेतला नाही तर गहाळपणा सुरू होईल. आम्ही चॅरिटी म्हणून नव्हे, तर एक व्यवहार्य उद्योग म्हणून हा प्रकल्प प्रसृत करू इच्छितो. या उद्दिष्टाला प्रतिसादही मिळत आहे. काही इतर गावकऱ्यांनीही स्फूर्ती घेऊन व स्वत: भांडवल घालून हा व्यवसाय सुरू केला आहे व त्यांनाही पाणी-रिक्षा युनिट व त्या संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम मूळ कंपनी करते आहे.
हा जरी किफायतशीर व्यवसाय असला तरी ते एक सामाजिक कार्यसुद्धा आहे. अनेक बाबींमधून मूळ उद्योगपतीची सामाजिक जाणीव दिसून येते. महिलांनाच या पाणी-रिक्षा देणे, त्याच्या सुरक्षेसाठी व्हेइकल ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणे, रिक्षावालीच्या पाणी ग्राहकांना आरोग्यविषयक जाणीव करून देणे, आजारपणाने किती रोजगार बुडतो व खर्च येतो व त्या मानाने ७० पसे ते एक रुपया लिटर हा दर कसा रास्त आहे हे समजावणे, रिक्षाबरोबर स्थानिकरीत्या व स्वस्तात बनविलेले सॅनिटरी नॅपकिनसुद्धा उपलब्ध करणे, रिपोर्ट व हिशेब ठेवण्यासाठी चार रिक्षांच्या एका कोऑर्डिनेटर महिलेला लॅपटॉप व प्रशिक्षण देणे इत्यादी अनेक गोष्टी यासाठी केल्या गेलेल्या आहेत.
डाव्या विचारांचा भांडवलशहा!
या ‘जलदूत’ प्रकल्पाची पाणी शुद्धीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातल्या पहिल्या सात प्रकल्पांमधून उत्कृष्ट प्रकल्प म्हणून, मिलेनियम अलायन्स या विख्यात आंतरराष्ट्रीय संस्थेने ‘फिक्की’च्या माध्यमातून नुकतीच निवड केली आहे.  
आता हा नफेखोर असूनही ‘विक्षिप्त’ उद्योगपती कोण ते पाहू. अत्यंत गरीब व दलित कुटुंबातील चंदू चव्हाण नावाचा मुलगा शिकता शिकता फुटपाथवर भाजी विकत व्यवसायास सुरुवात करतो, अभियंता होतो आणि आज ४०० कोटींची उलाढाल असलेला उद्योगसमूह चालवतो. त्याचा हा अविश्वसनीय प्रवासही मुळात अभ्यासनीय आहे. तो राजकीय विचारसरणीमध्ये डावा (अशी निरुपयोगी लेबल्स खरे तर लावूच नयेत.) मानला जातो. मात्र जोवर खरा समाजसत्तावाद सापडत नाही तोवर सध्या भांडवलशाहीला पर्याय नाही असेही तो मान्य करतो. चंदू चव्हाण यानेच मेम्ब्रेन फिल्टर्सच्या सुभाष देवी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून चालविला आहे.
येथे आíथक विवेक राखून समाजहितासाठी झटणाऱ्या अनेकांची आठवण होते. ‘द्राक्षमाउली’ श्री.अ. दाभोलकर यांचे टोकाचे दावे बाजूला ठेवले तरी प्रत्येक शेतकरी हा प्रयोगशाळेची शिस्त कशी शिकेल या तळमळीने त्यांनी चालवलेला प्रयोगपरिवार, ‘ज्ञान बनो कर्मयुक्त क्रम ज्ञानवान’ या घोषणेचा प्रत्यक्ष आविष्कार होता. जे कोणत्याच चळवळीत नाहीत, पण आपले काम चोख आणि जाणतेपणाने करणारे आणि मुख्य म्हणजे त्यात आनंद सापडलेले अनेक जण मला माहीत आहेत व माझा तोटका संपर्क लक्षात घेता मला माहीत नसणारे किती तरी जास्त असणार.
 ‘जुटना’ या िहदी क्रियापदात झटणे आणि एकजूट करणे असे दोन्ही भाव व्यक्त होतात. एकजूट म्हणजे नुसते ‘िझदाबाद’ नव्हे, तर एकमेकांना पूरक ठरण्याचे मार्ग! या अर्थाने आपल्या देशाची ओळख ‘जिस देश में भगीरथ जुटते हैं’ अशी बनविण्याचा निर्धार करू या.