‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी ठाणे जिल्ह्य़ातील शहापूरमधील पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा, भातसा आदी मोठी धरणे असूनही या भागातील अनेक  गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असते. या परिसरात फिरून घेतलेला सद्य:स्थितीचा आढावा..

निभाळपाडय़ातली स्त्री, पुरुष, वृद्ध, मुले.. सर्वाचीच सकाळ हल्ली रात्री दोनला उजाडते. दोन वाजले की या गावातील अनेक माणसे घराबाहेर पडतात. शेजारच्या मांजरे गावात जातात. अगदी गुपचूप, लपत-छपत. त्यांचे लक्ष्य असते मांजरेतील एक विहीर. तेथून ते प्रत्येकी एक-दोन खेपा पाणी चोरून आणतात. पहाटे साधारण सहापर्यंत ही पाणीचोरी सुरू असते.

दुसरे काय करणार मग? निभाळपाडय़ात एकच विहीर. ती आटलीय आता. मांजऱ्यातील एका विहिरीला अजून पाणी आहे, पण ते त्या गावातल्या लोकांनाच पुरत नाही. म्हणून दिवसा तिथे गावकऱ्यांचा पहारा असतो. त्यामुळे पाणी आणायचे तर तिथे रात्री चोरासारखेच जावे लागणार. निभाळपाडय़ातल्या नागरिकांना पटत नाही हे, पण त्यांचाही नाइलाज आहे. असेच एका रात्री पाणी भरण्यासाठी गेल्या असताना पाडय़ावरील वंदना काळुराम चौधरी यांना साप चावला. त्या धसक्याने त्यांनी रात्री पाणी भरायला जाणे सोडून दिले आहे. पण बाकीच्यांना जावे तर लागतेच.

बरे, यातून त्यांना पाणी मिळते किती? जेमतेम ५०-६० लिटर. म्हणजे आपल्या मिनरल वॉटरच्या ५०-६० बाटल्यांइतके पाणी. आता तेवढय़ा पाण्यात कसे भागणार? निभाळपाडय़ातील कविता पवार, मनीषा चौधरी, संगीता राऊत आदी महिला असे अनेक अनुत्तरित करणारे प्रश्न विचारतात. त्यांच्या एका प्रश्नाने तर आपल्या धोरणांच्या प्राथमिकतेवरच बोट ठेवले. त्या म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी हे स्वच्छ भारत अभियान सुरू केलेय. घरोघरी शौचालये बांधलीत. बाहेर शौचाला जाणे बंद केलेय. पण मोठय़ा कष्टाने घरात जेमतेम ६० लिटर पाणी येत असेल तर त्या शौचालयात ओतणार काय?

ही एकटय़ा निभाळपाडय़ाची कर्मकहाणी नाही. डोळखांब या बाजारपेठेच्या गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवरचे गाव. तेथे जे चित्र आहे तेच शहापूर तालुक्यातील अनेक गावांत दिसते.

शहापूर म्हणजे सध्या समृद्धी महामार्गविरोधी आंदोलनाने गाजत असलेला ठाणे जिल्ह्य़ातील तालुका. या तालुक्याची आणखी एक ओळख आहे. ती म्हणजे हा मुंबईचा जलपुरवठादार आहे. तानसा, वैतरणा, भातसा अशी मुंबईला पाणी पुरवणारी तीन धरणे या तालुक्यात आहेत. पण येथील गावांच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई मात्र कायम आहे.

तालुक्यातील बहुतेक टंचाईग्रस्त गावांमधील महिलांचा दिवस सध्या घरची कामे करण्यात आणि रात्र पाणी भरण्यात जाते. ज्यांची ऐपत आहे, ते सरळ पाणी विकत घेतात. निभाळपाडय़ातही बैलगाडीने पाण्याचे पिंप पुरविण्याची व्यवस्था आहे, पण हा खर्चही डोईजडच. तेथील महिला सांगत होत्या, डोळखांबहून २०० लिटर पाण्याचे पिंप वाहून आणण्यासाठी सध्या १५० रुपये दर आहे. साठ लिटर पाण्यात भागत नाही. त्यामुळे किमान दिवसाआड, अगदीच काही नाही, तर आठवडय़ातून दोनदा तरी अनेक जण हे पिंप मागवतात. म्हणजे आठवडय़ाला पाण्यापायी गेले तीनशे रुपये.

या पाणीटंचाईने सगळ्यांचे जगणेच विस्कटून टाकले आहे. पाणी तर जपूनच वापरायचे. पण गेल्या जानेवारीपासून निभाळपाडय़ातील महिलांनी घरी कपडे धुणे बंद केले आहे. आठवडाभराचे कपडे साठवायचे. तीन किलोमीटरवर डोळखांबला जायचे. तेथील धरणातल्या पाण्यात ते धुवायचे.

एक महिला सांगत होती, आम्ही हल्ली घरी कुणी पाहुणा येणार नाही याची काळजी घेतो. पाहुणा वाढला की पाण्यात वाटेकरी आला. आता लग्नकार्य निघते. पाहुणे येतात वस्तीला. नाइलाजच असतो तो. पण मुक्कामी नाही राहू देत कुणाला. सोयऱ्यांनी सकाळी यावे आणि संध्याकाळी जावे असाच सगळ्यांचा आग्रह असतो.

पण यावर काहीच उपाय नाही का?

निभाळपाडय़ातील महिला डोळखांब धरणावर कपडे धुण्यासाठी जातात. तेथून त्यांच्या गावात प्यायला पाणी नाही मिळू शकत?

तानसा, वैतरणा, भातसासारख्या मोठय़ा धरणांचे पाणी मुंबई-ठाण्याला जाते ते जाऊ द्या. शहापूरमधील अनेक टंचाईग्रस्त गावांना या मोठय़ा धरणांतील पाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तालुक्यात ठिकठिकाणी अनेक छोटी धरणे आहेत. त्यात अगदी पाऊस पडेपर्यंत मुबलक पाणी असते. उदाहरणार्थ, तालुक्यातील सर्वात भीषण पाणीटंचाई असणाऱ्या डोळखांब-डोहाळपाडा परिसरातील पाच किलोमीटर परिघात खराडे आणि डोळखांब अशी दोन धरणे आहेत. मोठय़ा धरणांमधून शंभर किलोमीटरहून अधिक अंतरावरील मुंबई-ठाणे शहरात जर पाइपद्वारे कोटय़वधी लिटर पाणी वाहून नेले जाते, तर या जेमतेम तीन ते पाच किलोमीटर अंतरावरील पाडय़ांना या छोटय़ा धरणांमधून पाणी का मिळत नाही, हा प्रश्न येथील गावकरी विचारीत आहेत.

डोहाळपाडय़ातील ग्रामपंचायत सदस्य उत्तम डोळे सांगत होते, आमच्या गावातील महिला कपडे धुण्यासाठी खराडे धरणावर जातात. जेमतेम दीड किलोमीटर अंतर आहे ते. तिथून कालवा अथवा पाइपद्वारे गावात सहज पाणी आणता येईल. ग्रामपंचायतीने तशी मागणीही केली आहे. पण प्रशासन दादच देत नाही.

शाई धरणविरोधी संघर्ष समितीचे युवाध्यक्ष शरद उमवणे सांगतात, अहो, केवळ ही दोन धरणेच नाही, तर या परिसरात अशी आदिवली, वेहेळोली, मुसई, खांडपे, जांभा अशी अनेक लहान-मोठी धरणे आहेत. त्यातून परिसरातल्या गावांची तहान सहज भागू शकते. पण त्याचे कोणाला काय पडलेय? आणि त्यांना आता येथे ठाणे शहराची वाढती तहान भागवण्यासाठी नवे शाई धरण बांधायचे आहे.

सध्या या भागात शाई धरणाला असलेला विरोध चांगलाच संघटित होताना दिसतो. गेले दशकभर या धरण प्रकल्पाला स्थानिक रहिवासी एकमुखाने तीव्र विरोध करीत आहेत. अनेक आंदोलनेही झाली. पण शासन आपला हेका सोडायला तयार नाही. ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात शाई धरण प्रकल्पासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे पुन्हा एकदा शाईच्या खोऱ्यात असंतोषाचे वारे वाहू लागले आहेत. या परिसरातील पाणीटंचाईच्या भळभळत्या जखमेवर शाई धरणाचा अट्टहास म्हणजे मीठ चोळल्यासारखे आहे.

शाईविरोधी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष केशव भेरे सांगतात, आम्ही शाई धरणाला केवळ विरोधासाठी विरोध करीत नाही. काळू आणि शाई या दोन प्रस्तावित मोठय़ा धरणांऐवजी या परिसरात लहान-मोठी १४ धरणे बांधता येऊ शकतात. संघटनेने तसा रीतसर सव्‍‌र्हेही केला आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता शासकीय अधिकाऱ्यांनी ही धरणे अव्यवहार्य ठरवली आहेत. एका मोठय़ा धरणाऐवजी १४ धरणे बांधून शासनाने आधी स्थानिकांची तहान भागवावी. मग उरलेले पाणी खुशाल मुंबई-ठाण्यात न्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. नव्याने १४ धरणे बांधणे, आता अस्तित्वात असलेल्या धरणांचे विस्तारीकरण करणे, डोळखांब धरणाची उंची वाढवून त्यात अधिक जलसाठा करणे हे उपाय नागरिक मांडत आहेत. पण ते अजून शासनाला पटलेले दिसत नाहीत.. धरणछायेतला रखरखाट त्यामुळेच पेटताना दिसतो आहे..

तरीही टँकरमुक्त

  • केवळ निभाळपाडाच नव्हे तर या पाच-दहा किलोमीटर परिघातील आवळपाडा, डोहळेपाडा, पांढरीचा पाडा, पष्टेपाडा, तोरणपाडा अशा अनेक गावपाडय़ांवर सध्या अशा अनेक कहाण्या ऐकायला मिळतात. पाण्याचा विषय काढला की, महिला तर भरभरून बोलतात.
  • वर्षांनुवर्षे हीच परिस्थिती मागच्या पानावरून पुढे सुरू आहे आणि इतके भीषण चित्र असूनही प्रशासनाच्या दप्तरी ही बहुतेक गावे टँकरमुक्त आहेत. कारण या गावांमध्ये कागदोपत्री का होईना कधीकाळी पाणी योजना राबविण्यात आल्या होत्या. त्यातल्या अनेक खराब झाल्या.
  • आता गावांनीच त्यांची दुरुस्ती करून घ्यावी, असे प्रशासन सांगते. गावात ठिकठिकाणी पाण्याच्या वाहिन्या टाकलेल्या दिसतात. मात्र त्यातून गावात कधीच पाणी आले नाही. एका ग्रामस्थाने वैतागून सांगितले, कंत्राटदाराने हे पाइप पाण्यासाठी नव्हते हो टाकले.
  • योजना नादुरुस्त आहेत म्हणून काय सांगता? त्या दुरुस्त होत्याच कधी? प्रशासन मात्र हे वास्तव समजून घ्यायला तयार नाही. कागदोपत्री पाणी योजना असल्याने या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. पाणीपुरवठा योजनांमध्ये राजरोसपणे भ्रष्टाचार केलेले नामानिराळे राहिले. त्याची शिक्षा मात्र येथील नागरिक भोगत आहेत.

पाणी वाहून नेण्यासाठी ‘गाडी’

शेजारच्या गावातून पाण्याची एक खेप आणण्यासाठी महिलांचे दोन तास खर्ची पडतात. त्यातूनही एका खेपेत हंडा आणि कळशी मिळून जेमतेम १५ लिटर पाणी वाहून आणता येते. बैलगाडीतून पिंप आणणे सर्वानाच काही परवडत नाही. त्यामुळे या परिसरात काही स्वयंसेवी संस्थांनी पाणी वाहून नेणाऱ्या छोटय़ा गाडय़ा रहिवाशांना दिल्या आहेत. त्याद्वारे तब्बल ४० लिटर पाणी सहजपणे ढकलून आणता येते. शहरातील माणसे जसे चाक असलेल्या बॅगेतून सामान वाहून आणतात, तशा पद्धतीने गावातील महिला या गाडीद्वारे पाणी आणतात.

‘शेतघर’वाल्यांचे लाड?

  • गावात भीषण टंचाई असली तरी परिसरातील लहान-मोठय़ा धरणांमधून वेशीबाहेरील टेकडय़ांवर उभ्या राहणाऱ्या नव्या बंगल्यांच्या वसाहतींना तसेच शेतघरांना मात्र मुबलक पाणीपुरवठा सुरू आहे.
  • याच तालुक्यात ठाणे जिल्ह्य़ातील एका जाणत्या राजकीय नेत्याची हजारो एकर जमीन आहे. इतरत्र भीषण टंचाई असली तरी या ‘मुंबई’वाल्यांच्या बंगल्यांमध्ये पाण्याचे पाट वाहत आहेत. मग हाकेच्या अंतरावर धरणे असूनही आम्ही कोरडे का, असा या परिसरातील गावकऱ्यांचा सवाल आहे.