केंद्रीय जल आयोगाच्या (सेंट्रल वॉटर कमिशन) ताज्या (१३ एप्रिलपर्यंतच्या) आकडेवारीनुसार देशातील ९१ प्रमुख धरणांच्या ‘जिवंत’ म्हणजेच वापर करण्यायोग्य पाणीसाठय़ात चालू वर्षीच्या जानेवारीपासून आतापर्यंत साधारण निम्म्याने घट झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात देशातील ९१ धरणांमध्ये त्यांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ४४ टक्के इतका पाणीसाठा होता. तो आता २३ टक्क्यांवर आला आहे. देशातील ९१ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १५८ (बीएमसी – बिलियन क्युबिक मीटर्स) आहे. सध्या त्यांच्यात केवळ ३६ बीएमसी पाणी शिल्लक आहे. इतक्या वर्षांच्या सरासरीनुसार या काळात त्यांच्याच ४६ बीएमसी पाणी शिल्लक असणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हा आकडा ५३.५ बीएमसीवर गेला होता.

याच काळात महाराष्ट्रातील १७ मोठय़ा धरणांमधील पाणीसाठा ३० टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच यंदाच्या जानेवारी ते एप्रिल या काळात महाराष्ट्रातील १७ प्रमुख धरणांतील पाणीसाठा ४.३ बीएमसीवरून २ बीएमसीवर आला आहे. देशाच्या इतर भागांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पाणीसाठा कमी होण्याचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत गंभीर बनली आहे. घरगुती वापर, शेती, उद्योग आणि वीजनिर्मिती यासाठी प्रामुख्याने पाण्याचा वापर होत असतो.

 

पश्चिम व दक्षिण भारतात स्थिती वाईट, पूर्वेकडील राज्यांत पाणीसाठा समाधानकारक

संपूर्ण देशाचा विभागवार विचार केल्यास दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्यांत दुष्काळस्थिती सर्वात गंभीर आहे. दक्षिणेकडील ५ राज्यांतील ३१ मोठय़ा धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या केवळ १५ टक्के आहे, तर पश्चिमेकडील महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतील २७ धरणांतील पाणीसाठा केवळ १८ टक्के इतकाच उरला आहे. देशाच्या अन्य प्रदेशांच्या तुलनेत त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील पाणीसाठा सरासरीपेक्षा काहीसा अधिक आहे.

गंगा वगळता सर्व नदी खोऱ्यांत कमी पाणीसाठा

नद्यांच्या खोरेनिहाय विचार करता गंगा वगळता अन्य नद्यांच्या खोऱ्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. गंगेच्या खोऱ्यात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पाणीसाठा आहे. तर तापी, कृष्णा आणि गोदावरी या प्रामुख्याने महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यात सरासरीपेक्षा अनुक्रमे ५९, ६३ आणि ३२ टक्के कमी पाणीसाठा आहे.