स्वागत दिवाळी अंकांचे!

रणांगण आडव्या चित्रवहीसारखा आकार आणि विठ्ठलाची आत्मलीन मुद्रा असलेले देखणे मुखपृष्ठ हे या अंकाचे पाहताक्षणी

मुंबई | November 21, 2012 9:23 AM

रणांगण
आडव्या चित्रवहीसारखा आकार आणि विठ्ठलाची आत्मलीन मुद्रा असलेले देखणे मुखपृष्ठ हे या अंकाचे पाहताक्षणी मनात भरणारे वैशिष्टय़. आणीबाणीची दुसरी बाजू (आरती साठे), गोष्ट श्यामच्या आईची (इसाक मुजावर), जयवंत दळवी यांच्या नाटय़कृती (अमृता कुळकर्णी) हे लेख माहितीपूर्ण आहेत. ‘पंढरीची वारी’ हा विशेष विभाग आहे मात्र त्यात भरीव माहिती देणारे लेख कमी आहेत. ‘एकदा काय झालं’ ही विद्या मोरे यांची कथा मध्यवर्ती कल्पनेच्या वेगळेपणामुळे आणि प्राण्यांना दिलेल्या मानवी भावनांच्या कोंदणामुळे वेगळी भासते. अंकाचे दृश्यरूप आणि पानांचा दर्जा अत्यंत उत्तम आहे पण एकाच लेखकाचे चार-चार लेख, लेखांचा अपुरा आवाका, वारीच्या विशेष विभागातच जयवंत दळवींच्या नाटकांबाबतचा लेख येणे, अंकाच्या सुरुवातीलाच पसायदान छापणे, या काही त्रुटी जाणवतात.
संपादक – अविनाश गारगोटे.
पृष्ठे १६३, किंमत १०१.

न्यूजरूम लाइव्ह
दूरचित्रवाहिन्यांवरील पत्रकारांचा दिवाळी अंक ही कल्पनाच वेगळी आहे. वाहिन्यांची बातमीदारी ही वेगवान, आकर्षक, अद्ययावत आणि रंजक असावी लागते आणि त्याच शैलीची सवय असलेल्या पत्रकारांचे लिखाणही मुद्रितमाध्यमांतील पत्रकारांपेक्षा वेगळे असेल, अशी अपेक्षा अंक वाचण्याआधीच मनात उत्पन्न होते. या अंकातल्या कथा या वाहिन्यांमध्ये बातमीदारी करणाऱ्यांनी लिहिल्या आहेत आणि त्यात वाहिन्यांच्या जगाचेही स्वाभाविक व अटळ प्रतिबिंब आहे. त्यामुळे वाहिनीविश्वातील शब्दांची सूची प्रथम देण्याची कल्पनाही वेगळीच. थेट बोली मराठीतलं संपादकीय आणि गत सहकाऱ्यांची आठवण, मनाला भावते. यात एकही स्त्रीलेखिकेची कथा नाही, ही त्रुटी संपादकांनीही मान्य केली आहे.
संपादक- सचिन परब.
पृष्ठे ९८. किंमत ६५ रुपये.

ललित
वाचनऊर्जा निर्माण करण्याची क्षमता घेऊन दरवर्षी वाचकांना समाधान देणाऱ्या ‘ललित’चा यंदाचा अंक परिसंवादविरहित आहे. तरी त्यातील लेखसामग्री ललितचा शिरस्ता पाळणारी आहे. विस्मृतीधनी झालेल्या साहित्यिकांची आठवण जागविणारे लेख, महाराष्ट्राला अज्ञात असलेल्या परराज्यातील साहित्यसेवेकऱ्यांची ओळख आणि साहित्यव्यवहारातील व्यक्तींच्या महतीने अंकाची घडण झाली आहे. मराठीतील रघुवीर सामंतांपासून सुरू झालेली व्यक्तिचित्रांची आठ दशकांची परंपरा विलास खोले यांनी प्रदीर्घ लेखाद्वारे उलगडून दाखविली आहे. अंकातील अनिल अवचट यांच्यावर कमल देसाई यांनी लिहिलेला, अशोक जोग यांच्यावर दीपक घारे यांनी लिहिलेला, गुरुनाथ धुरी यांच्यावर अनंत देशमुख यांनी लिहिलेला लेख हे सुंदर व्यक्तिचित्रांचे नमुने आहेत. नरेंद्र चपळगावकर यांनी  दुर्लक्षित राहिलेल्या बी. रघुनाथांच्या कथा आणि त्यांच्या मराठवाडय़ातील वातावरणाचा परामर्श घेतला आहे.
विमल मित्र यांची कादंबरी, असामी लेखिका मित्रा फुकन, बंगाली लेखिका मैत्रियीदेवी  आदी साहित्यिकांवरचा शब्दऐवज शेजारओळख वाढविणारा आहे. मधुकर धर्मापुरीकर, श्रीराम शिधये, प्रवीण दवणे, जयंत वष्ट, लीला दीक्षित आदी नव्या-जुन्या व ओळखीच्या ललित लेखकांची भट्टी अंकात जमवण्यात आली आहे.
संपादक : अशोक कोठावळे
पृष्ठे १९२, किंमत : ८०

मिळून साऱ्याजणी
‘मिळून साऱ्याजणी’चा दिवाळी अंक दरवर्षीप्रमाणेच उत्तम झाला आहे. दर महिन्याला निघणाऱ्या मासिकातून समाजाला वैचारिकदृष्टय़ा समृद्ध करण्याची मिळून साऱ्याजणीची परंपरा दिवाळी अंकातही कायम आहे. दिवाळी अंकातील लेख, कथा, कविता आणि एक उकल- पॉलिटिकल हा विशेष विभाग वाचनीय झाले आहेत. अंकात सुनील गोडस, श्रीनिवास भणगे, सदानंद देशमुख, मधुकर धर्मापुरीकर आणि य: कश्चित लावण्य ही गी द मोपसाँ यांची विश्वास सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेली कथा यामुळे कथाविभाग संपन्न झाला आहे. त्याचप्रमाणे ‘वन्यजीवांची डॉक्टर सखी : डॉ. विनया जंगले’ यांची मुलाखत त्यांच्या धडाडीची ओळख करून देणारी झाली आहे. त्याशिवाय परिवर्तनाची सुरेल वाट (मुकुंद संगोराम), जलवारसा नष्ट होताना.. (अभिजित घोरपडे), लोककहाणी जनाबाईची (इंद्रजित भालेराव) हे लेख उत्तम झाले आहेत. त्याशिवाय मेंदूपलीकडचा माणूस (चित्रा बेडेकर) यांचा लेख माहितीपूर्ण झाला आहे.
राजकारण, अनेकांना न आवडणारे, पण त्यावर चर्चा, प्रामुख्याने टीका करण्यासाठी आवडणारा विषय. आम्ही राजकारण करत नाही, असं म्हणत त्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवू पाहणारे वास्तवात राजकारणापासून अलिप्त राहू शकतच नाहीत. अशा या राजकारणाचा विविध अंगांनी धांडोळा ‘एक उकल- पॉलिटिकल’ या विशेष विभागातून घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन्ही महामानवांनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करत ज्येष्ठ नेत्या मृणाल गोरे यांनी नैतिक आणि सार्वजनिक मूल्यांशी तडजोड न करता निवडणुकांचं राजकारण यशस्वी करता येते हे सिद्ध करून दाखवलं म्हणून हा विभाग त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आला आहे. या विभागात २४ लेखांचा समावेश केला आहे. या अंकात कवितांचाही विभाग आहे. विशेष म्हणजे या विभागामध्ये सर्व महिला कवयित्रींच्या कवितांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
संपादक- विद्या बाळ, डॉ. गीतांजली वि. मं. पृष्ठे-२३०
मूल्य – १०० रुपये

First Published on November 21, 2012 9:23 am

Web Title: welcome to diwali magazines