लाइफ जॅकेट्स अंगात नसताना पाण्यात काढलेली वीस मिनिटं ही खूप मोठी आहेत. मदतीची बोटही प्रवासी होती व केवळ त्यांच्या नशिबाने ती त्या वेळी बाजूने जात होती. अक्वा मरीनवरील वाचलेले इतरही लोकअसेच कुणाच्या दया-भरवशावर जगले असतील; ज्यांना वाचवल्याचा दावा आज शासन करत आहे!

मी अंदमानला दोन वर्षांपूर्वी गेले होते. समुद्र खवळलेला असल्यामुळे अंदमानच्या त्या तीन दिवसांत आम्हाला हॅवलॉकव्यतिरिक्त कुठल्याच आयलंडवर जाता आले नव्हते. त्यामुळे ट्रिप चांगली होऊनही काहीशी अपूर्ण राहिल्याच्या जाणिवेने आम्ही परतीच्या वाटेवर एअरपोर्टवर असतानाच कानावर बातमी आली होती ती आयलंडवर स्कूबा डायिव्हग करताना झालेल्या ओळखीतल्या तावडे आडनावाच्या एका बाईंच्या मृत्यूची! तेव्हाच मन चरकले होते, कारण तिथे फिरताना जाणवले होते की, एकंदरीने सगळाच मामला तिथल्या स्थानिक लोकांवर अवलंबून आहे. समुद्रावरच्या अनुभवाने आलेले शहाणपण त्यांच्यात असेलही, परंतु professional capability बद्दल शंका वाटली होती. वॉटर स्पोर्ट्सच्या नावाने लोकांना घेऊन जाऊन पुरेशी काळजी घेतात की नाही? तावडेबाईंच्या मृत्यूने मनातली शंका अधोरेखित झाली. मात्र असा एखादा सुटा प्रसंग घडतोही असे समजून त्या गोष्टीला मी प्रयत्नपूर्वक बाजूला सारले होते तोवर अक्वा मरीनच्या बुडण्याने आमच्या कुटुंबातल्या दोन माणसांना आम्हाला एकाच वेळी गमावावे लागले आहे.
अंदमानच्या इतिहासात बोटीला अशा प्रकारे झालेला हा पहिलाच अपघात असे म्हटले जाते.  इतका मोठा अपघात पहिल्यांदाच घडला असला तरी बेफिकिरी, अनागोंदी ही रोजचीच बाब असेल. वर्षांनुवष्रे बोटीत अशीच माणसे भरली जात असतील, त्यांची ये-जा होत असेल. बोटीवर ज्या काही तांत्रिक अडचणी येत असतील त्या, पुरेसे प्रशिक्षित नसलेले, परंतु वर्षांनुवष्रे त्याच लायनीत काम केलेले लोक सोडवत असतील. किनाऱ्यावर सुखरूप पोहोचताच देवाचे आभार मानून प्रवासी त्यांचे अनुभव विसरून जात असतील. बोट चालवणाऱ्या लोकांना ‘हे रोजचेच’ असेल.
पूर्वीच्या काळी ‘काळ्या पाण्या’चे ठिकाण म्हणून काहीशी नकारात्मक रेष असणाऱ्या अंदमानला पर्यटनासाठी जाण्याकडे लोकांचा ओढा अलीकडे चांगलाच वाढलेला आहे. पर्यटनासाठी नि:संशयच ते एक सुंदर ठिकाण आहे. महाराष्ट्रातून अंदमानला जाताना सावरकरांची कोठडी पाहाण्याच्या इच्छेचीही किनार असते. अंदमानची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पर्यटन व्यवसायाशी निगडित आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे समुद्रकिनारे, पाण्यावरील विविध खेळ, तीन-चार आयलंड्सचा दौरा हा सारा अंदमान सहलीतला अविभाज्य भाग. मात्र या साऱ्यासाठी आणि पर्यटकांचा जेवढा ओघ अंदमानला येत आहे त्याला पुरे पडण्यासाठी, तसेच तिथली व्यवस्था व नियोजन याबाबत प्रशासन आणि पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बहुतांश पर्यटन संस्था तितक्याशा प्रभावी नाहीत अशी शंका घेण्यास जागा आहे. आपण प्रवासी कंपनीला पसे भरतो, मात्र अंदमानला पोहोचल्यावर तिथल्या स्थानिक एजंटच्या हातात प्रवाशांना सोपवले जाते, हा अनुभव तर मलाही आलेला आहे. अक्वा मरीन बोटीवर ज्या प्रकारे माणसे भरली गेली होती ते एका दिवसाचे चित्र नाही, तर हे सारेच वर्षांनुर्वष चालत असेल. मग सगळे काही माहीत असूनही पर्यटनासाठी जबाबदार असलेल्या सर्व प्रकारच्या संस्था डोळेझाक करून राहात आहेत म्हणावे का? पर्यटन व्यवसाय भरभराटीला आला आहे, तर साहजिक आहे की तिथल्या स्थनिक लोकांना काम मिळायला हवे, पण मग त्याबरोबर त्यांना आवश्यक असे प्रशिक्षणही द्यायला हवे आहे. असे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची काही व्यवस्था आहे का?   अक्वा मरीन बोटीत क्षमतेपेक्षा जास्त माणसे भरली होती आणि कुणाला काही कळण्याच्या आतच ते पाण्यात पडले होते. ट्रेकिंगसारख्या साहसी पर्यटनासाठी गेले असताना धोका हा त्या प्रवासाचा अविभाज्य भाग असतो. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की, अंदमानला जाणारे लोक कुटुंब-कबिल्यासह जाणारी माणसे आहेत. पसे चांगले वाजवून घेतले जात आहेत, मात्र त्यामानाने माणसाच्या जिवाची पर्वा मात्र केली जात नाही हेच खरे! चित्र दिसते ते, लाइफ जॅकेट्स घालण्याची सक्ती नाही, गर्दीचे व्यवस्थापन करण्याची पद्धत नाही, शिस्त नाही, सुरक्षा प्रणालीची बांधलेली पद्धत नाही किंवा विम्याचे पुरेसे संरक्षण नाही!
आणि म्हणूनच अक्वा मरीनच्या प्रवाशांचा मृत्यू ही केवळ बोटचालकाची चूक मानून थांबण्याचे कारण नाही, तर ते तिथल्या प्रशासनाचे किंवा प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी संस्थांचेही अपयश आहे, असे म्हणावे लागेल. प्रवाशांना होणारा त्रास, मनस्ताप या सगळ्यांच्या डोळ्यांदेखत नेहमीच घडत असूनही पर्यटन केंद्र म्हणून वेगाने विकसित झालेल्या अंदमानला सुरक्षित करणे त्यांना जमलेले नाही असेच नाइलाजाने म्हणावे लागेल. अलका आणि चंद्रशेखर भोसेकर यांचा मृतदेह आणण्यासाठी अंदमानला गेलेल्या त्यांच्या नातेवाईंकाचा असा अनुभव आहे की, अक्षरश: तीन तासांत सर्व बाबी पूर्ण करून त्यांना दोन शवपेटय़ांसह विमानात बसवून पाठवण्याइतके तिथले प्रशासन तत्पर होते.  सगळी व्यवस्था सुलभ झाली, अडचण आली नाही हे उत्तमच झाले, पण जो पर्यटन विभाग धावपट्टीवरील विमानही चेन्नई-मुंबईच्या प्रवाशांसाठी अडवून धरू शकतो, ते पर्यटन खाते प्रवाशांची सुरक्षा धाब्यावर बसवणाऱ्या बोटींवर वचक ठेवू शकत नाहीत हे कसे काय? प्रशासनाशी लढा घेणे ही एक सर्वस्वी वेगळी बाब आहे. मात्र तोवर किमान ज्या मातब्बर प्रवासी संस्था आहेत त्यांनी जातीनिशी या प्रकारात लक्ष घालून लोकांचा अंदमानचा प्रवास सर्वार्थाने सुरक्षित करावा इतकीच किरकोळ अपेक्षा आहे. त्याचबरोबर बोटीत बसताना स्वत: लाइफ जॅकेट मागून घेणे, स्वत: घालून इतरांनाही घालायला लावण्याची सक्ती करणे किंवा वाजवीपेक्षा जास्त बोट भरू न देणे – एक जागरूक पर्यटक म्हणून आपणही आपले कर्तव्य करायला हरकत नाही. इतके तर आपल्या हातात निश्चितच आहे. देशभर असेच पाण्याच्या अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रवाहावर वाहतूक करणाऱ्या बोटीत हे असे अपघात होतच असतात, आपल्या देशात हे असेच चालणार, असे हतबल, निराश  उद्गार काढत हा अपघात स्वीकारण्यापेक्षा यानिमित्ताने प्रवास करणारेच सजग झाले तरी मोठीच उपलब्धी आहे.
खरं तर पाण्याच्या प्रवाहावर चालणाऱ्या कुठल्याही छोटय़ा बोटीतल्या माणसांनाही सुरक्षा पुरवणे गरजेचे आहेच, पण त्यातूनही पर्यटक म्हणून पसे भरून गेलेल्यांना सुरक्षा पुरवणे ही तर लोकांना पर्यटनाचे स्वप्न दाखवणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. इथे सुरक्षा हा पर्यटकांचा हक्क आहे.