साईबाबा देव नव्हते, संत नव्हतेच, पण गुरूही नव्हते, असा निकाल स्वयंघोषित धर्मसंसदेने दिला आहे. (निदान साईबाबा म्हणून कोणीतरी या भूमीत होऊन गेले, हे त्यांनी नाकारले नाही, ही मोठीच सहिष्णुता म्हणायची.) खरं सांगायचं तर बाबांनीही आपल्या उभ्या हयातीत मी देव आहे, संत आहे किंवा गुरू आहे, असं कधीच सांगितलं नाही. जो तसा नसतो त्यालाच उच्चरवानं तसा दावा करावा लागतो आणि असा दावा करणाऱ्या अनेक स्वयंघोषित संत, अवतारी आणि गुरूंचा बाजार तेजीत असताना धर्मसंसदेला त्यांच्याबाबत चकार शब्दही उच्चारावासा वाटत नाही. ही धर्माची हानी आहे, असं वाटत नाही. मग प्रश्न असा की, आखाडे आणि पीठांचे धर्मधुरीण साईबाबांना बहिष्कृत करण्यासाठी इतके का आसुसले? या फैसल्यासाठी त्यांनी कोणता शास्त्रार्थ केला? कशाचा आधार घेतला? साईबाबा खरंच होते तरी कोण, याचा काय निष्कर्ष काढला? त्यांच्या चरित्राचं किती परिशीलन केलं? यातलं काहीही झालं नाही. धर्मसंसद किंवा कोणी काही म्हणो, लोकांना खरा धर्म शिकवणाऱ्या हजारो संतांचा, सद्गुरूंचा प्रभाव हिंदू समाजातून कधीच नष्ट होणार नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की, ‘‘माझी निंदा करणाऱ्यांना मी कळलो नाहीच, पण माझी स्तुती करणाऱ्यांनाही मी कळलो नाही.’’ त्यामुळे साईबाबांची बाजू मांडायची तरी का, कुणासमोर आणि कशासाठी? खरं तर या घडामोडींना किंमतही देण्याची गरज नाही. तरीही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
साईबाबा खरंच कोण होते? बाबा शिर्डीत आले तेव्हा एका मंदिरात बसले. पुजाऱ्यानं हाकललं तेव्हा (पुढे जिचं नामकरण बाबांनीच द्वारकामाई केलं त्या) मशिदीत बसले. गावातली मुलं त्यांच्यावर दगड मारत मागे धावत तेव्हा हसत हसत बाबा हा ‘खेळ’ खेळत. या कोणत्याही वेळी, ‘अरे तुम्ही मला समजता काय, मी अवतार आहे, संत आहे, गुरू आहे’, असं ते बोलले नाहीत. त्याच शिर्डीत चांदीची मूठ असलेली छत्री त्यांच्या डोईवर धरून त्यांची चावडी ते मशीद अशी मिरवणूक निघे तेव्हाही लोकांच्या आनंदात ते सहभागी होत. ना त्यांना दगडांचं दु:ख झालं ना छत्रचामरांचा आनंद झाला. तेव्हाची शिर्डी होती तरी कशी? खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यांनी खाँसाहेबांचं ९०० पानी चरित्र लिहिलं आहे. त्यात खाँसाहेब बाबांच्या दर्शनास गेले तेव्हाच्या शिर्डीचं वर्णन आहे. ते लिहितात, ‘‘सर्वत्र दाट जंगल, रातकिडय़ांची किरकिर, रस्ते नाहीत, सापकिरडय़ाची भीती फार. शेतवडीमुळे चिखल भरलेला, अशा एका ठिकाणी एका चौकीत पेटत्या धुनीसमोर हातात चिलीम घेतलेली साईमहाराजांची मूर्ती बसलेली असे.’’ म्हणजेच शिर्डी साधारण होती. तिथे बाबांमुळे हळूहळू उच्चशिक्षितांची ये-जा वाढली तरी बाबांची साधी गावठी राहणी, त्यांची लोकांशी असलेली वर्तणूक कधीच बदलली नाही. कुणी श्रीमंत आहे म्हणून ते कोणाशी सलगीने वागले नाहीत की गरीब आहे म्हणून कुणाला झिडकारले नाही. उलट कुणाला फटकारताना त्याच्या श्रीमंतीला त्यांनी काडीची किंमत दिली नाही. कोण कसं आहे, याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नव्हतं. माणसानं कसं झालं पाहिजे, हेच त्यांचं एकमेव उद्दिष्ट होतं. त्यांनी कुणाच्याच धर्मावर आक्रमण केलं नाही, उलट प्रत्येकाला धर्मरत व्हायला शिकवलं. ‘अल्ला मालिक’ हा मंत्र कायम त्यांच्या मुखी असे, अनेक फकीर आणि हाजीही त्यांच्या संगतीचा लाभ घेत. पण शेकडो हिंदूही त्यांचे निस्सीम भक्त होते. शिर्डीत रामनवमी त्यांनी सुरू केली. अनेकांना विष्णुसहस्रनाम म्हणायला लावले. मशिदीचे नाव ‘द्वारकामाई’ ठेवले! खरं तर धार्मिक सलोख्याचा किती मोठा सामाजिक प्रयोग बाबांनी सहजतेने साधला. हे ताकदीचं लोकोत्तर कार्य संतांचं नाही? लोकमान्य टिळकांचे सहकारी दादासाहेब खापर्डे अनेकवार साईचरणी जात. एकदा साईबाबा त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही अन्य कुणापेक्षाही देवाचीच सेवा करा. परमेश्वर जे देतो ते कधीच संपत नाही आणि मनुष्य जे देतो ते कधीच चिरंतन टिकत नाही.’’ खापर्डेचे तेव्हाचे सामाजिक स्थान पाहता, तुम्ही आता केवळ माझीच सेवा करा, हे सांगून शिष्यपरिवार वाढवत नेण्याचा मोह एखाद्या भोंदू बाबाला झाला नसता का? लोकमान्य टिळकांना साईबाबांनी सांगितले की, ‘‘लोक वाईट आहेत, तुम्ही तुम्हाला तुमच्यासारखे ठेवा!’’ अर्थात नेत्यानं लोकानुनयी होऊन तत्त्वाला मूठमाती देऊ नये, हा किती मोठा राजकीय बोध झाला. जिवाला सत्याकडे, स्वरूपाकडे वळवणं ही सद्गुरूत्वाची खूण नाही?
एकदा बाबांनी एक फळ उचलले आणि खापर्डेना विचारले, ‘‘या फळात किती फळे निर्माण करण्याची क्षमता आहे?’’ खापर्डे उत्तरले, ‘‘ फळात जेवढय़ा बिया असतील त्यांच्या हजारोपट.’’ यावर हसून बाबा म्हणाले, ‘‘या फळाने त्याचा नियम आणि गुणधर्म पाळलेला आहे.’’ म्हणजे सृष्टीतील सर्वच वस्तुमात्रांनी त्यांचा त्यांचा गुणधर्म पाळला आहे, माणसानं मात्र तो पाळलेला नाही. माणुसकी हाच माणसाचा गुणधर्म असताना माणसानं पशूलाही लाज वाटेल इतकी हीन पातळी गाठली आहे. माणसाला त्याच्या मूळ गुणधर्माची आठवण करून द्यायला बाबा आले होते. खापर्डेची रोजनिशी, साईसच्चरित्रासह अनेकानेक पुस्तकांतील शेकडो प्रसंगांतून साईबाबांच्या कार्यावर आणि कळकळीवर प्रकाश पडतो. त्यातील कशाचाही आधार धर्मसंसदेने घेतला नाही, हे उघड आहे.
भगवंत गीतेत सांगतात, ‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।’ म्हणजे मी मनुष्य रूपात अवतरित होतो, तेव्हा मूढ लोक मला जाणत नाहीत, माझं खरं स्वरूप जाणत नाहीत! मग साईबाबा कोण होते, हे आपण कसं जाणणार? साईबाबांना जे आवडतं ते आपल्या जगण्यात जितकं उतरेल तितके साईबाबा खरे कोण होते, हे जाणवू लागेल.
मग साईबाबा होते कोण? निस्संशय ते सद्गुरूच होते. संकुचित जिवाला व्यापक करीत परमतत्त्वात विलीन करणं, हे सद्गुरूंचं एक कार्य सांगता येईल. ते बाबांनी अहोरात्र केलं. भगवान शंकरांनी पार्वतीमातेला सांगितलेल्या ‘गुरुगीते’च्या प्रत्येक श्लोकाचा दाखला देत साईबाबांचे सद्गुरूरूप उकलता येईल. या ‘गुरुगीते’त पार्वतीमाता विचारते, ‘केन मार्गेण भो स्वामिन् देहि ब्रह्ममयो भवेत?’ देहात जन्मलेला जीव ब्रह्ममय कसा होईल? त्यावर शिवजी सांगतात की, देवी जीव ब्रह्ममय कसा होईल, हे पाहण्यापूर्वी ब्रह्म म्हणजे काय, हे पाहिलं पाहिजे. मग ब्रह्म काय आहे? तर सद्गुरूच ब्रह्म आहे, हे शिवजी त्रिवार सांगतात. जीव गुरुमय होत नाही तोवर तो ब्रह्ममय होऊच शकत नाही, हेही सांगतात. आता कुणाला वाटेल की अमक्या शास्त्रात तर असं म्हटलं आहे, तमक्या पुराणात तर तमुकच देवाला श्रेष्ठ मानलं आहे. त्यावर शिवजी स्पष्ट सांगतात, ‘‘वेदशास्त्रपुराणानि इतिहासादिकानिच। मंत्रयंत्रादिविद्याश्च स्मृतिरूच्चाटनादिकम्। शैवशाक्तगमादिनि अन्यानि विविधानि च। अपभ्रंशकराणिह जीवानां भ्रांतचेतसाम्।।’’ वेद, शास्त्र, पुराणे, इतिहास, यंत्रतंत्रादि विद्या, स्मृती, शैव, शाक्त, आगमनिगमादि अनेक ग्रंथ हे आधीच भ्रमित असलेल्या जिवाला आणखीनच भ्रांतीत टाकून भटकवणारे आहेत! ज्या वेदांना हिंदू तत्त्वज्ञान उच्चस्थानी मानते त्यांच्यापासूनच सुरुवात करून शिवजींनी समस्त ग्रंथ-पंथांना भटकंती वाढवणारे ठरवले आहे. ही ‘गुरुगीता’ही आता असंमत ठरवणार काय?
साईबाबा कोणीच नव्हते, हा पूर्वनियोजित निर्णय घोषित करू पाहणाऱ्या आखाडय़ांना आणि धर्मसंसदेला या देशासमोरचे आणि धर्मासमोरचे खरे प्रश्न का भेडसावत नाहीत? ते का उकलावेसे वाटत नाहीत? या आखाडय़ांकडे शेकडो एकर जमिनी पडून आहेत. अमाप पैसा आहे. तेथे रुग्णालये, शाळा, उद्योगकेंद्रे काढून लोकसेवेला आणि रोजगारनिर्मितीला चालना का द्यावीशी वाटत नाही? धर्मातील महत्त्वाची तत्त्वं पुस्तकरूपानं छापून ती खेडोपाडी का नेली जात नाहीत? बहुभाषिक हिंदू समाजातील ऐक्याला बळकटी आणण्यासाठी विविध प्रांतांच्या भाषा शिकवणाऱ्या केंद्रांची साखळी देशभर का उभारावीशी वाटत नाही? तीर्थस्थानांच्या ठिकाणी पावित्र्य, स्वच्छता राहावी आणि बाजारूपणा नष्ट व्हावा म्हणून का पुढाकार घ्यावासा वाटत नाही?  
जातिभेदाचं विद्रूप रूप सोडलं (आणि त्याची कारणं आणि त्याचं विद्रूपीकरण हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे) तर हा धर्म कधीच कुणाला नाकारणारा वा विचार दडपणारा नव्हता. वेदतत्त्वांना नाकारणाऱ्या चार्वाकांचाही ऋषी म्हणूनच आदर इथे झाला आणि त्यांची हत्या कोणी केली नाही. जो धर्म प्राचीन काळातही व्यापक आणि सर्वसमावेशक होता तो आधुनिक काळात अधिकाधिक संकुचित, असहिष्णू आणि असंवेदनशील होत आहे, ही भावी काळातील अधर्मसंसदेची नांदीच आहे.

raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा
sumeet pusavale exit from balumamachya navan changbhal serial
सुमीत पुसावळेने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका का सोडली? कारण सांगत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”