झाकीर नाईक यांच्या मूलतत्त्ववादी शिकवणुकीविरुद्धची लढाई केवळ समूहवादाने लढली जाऊ शकत नाही. धर्मग्रंथाचा चुकीचा अर्थ सांगणेएवढय़ापुरताच सध्या त्यांना मुस्लिमांकडून विरोध होतो आहे. त्याऐवजी, चांगलेवाईट ठरवण्याचा निर्णायक निकष धर्मग्रंथ असू शकतो का, याची चर्चा सुरू झाली पाहिजे..

झाकीर नाईक प्रकरणामुळे मुस्लीम समाजात काही आशादायक घडण्याची शक्यता आहे का? मुल्ला मौलवींच्या पकडीतील या बंदिस्त समाजातील काही खिडक्या किलकिल्या होतील का? त्यातून आधुनिक मूल्ये झिरपण्याची काही शक्यता निर्माण झाली आहे का? की हा केवळ भाबडा आशावाद ठरेल?

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

असा कमालीचा भाबडा ठरू शकणारा आशावाद मनात निर्माण होण्याचे कारण म्हणजे मुस्लीम समाजातूनच झाकीर नाईक यांना होत असलेला मोठा विरोध. पण हे एकमेव कारण नाही. या विरोधाच्या, क्रिया-प्रतिक्रियेच्या घुसळणीतून मुस्लीम समाजातील ही चर्चा धर्माची चौकट ओलांडू लागेल का? – अंधूक का होईना, पण आशेला जागा आहे. ही चौकट ओलांडण्याची प्रक्रिया खूप संथ असेल किंवा कोणी सांगावे ती अभूतपूर्व अशा गतीनेदेखील होईल. कारण बांगलादेशातील दहशतवादी क्रौर्यात सामील असलेल्या तरुणांची पाश्र्वभूमी ही भारतीय उपखंडातील मुसलमान समाजात अस्वस्थता निर्माण करणारी गोष्ट आहे. झाकीर नाईक यांच्याविरुद्धच्या प्रतिक्रियादेखील हेच सूचित करतात.

झाकीर नाईक यांची भाषणे ही अतिरेकी विचारांना प्रवृत्त करतात का याचा विचार करून कारवाई करण्याचे सरकारने ठरवले आहे. ही आवश्यक आणि स्वागतार्ह गोष्ट असली तरी झाकीर नाईक यांना कायद्याच्या चौकटीत अडकवणे कदाचित अवघड ठरेल. एखाद्या अतिरेक्याने ‘मला झाकीर नाईक यांच्या भाषणाने प्रेरणा मिळाली’ असे म्हणणे हा त्यांच्याविरुद्धचा पुरावा ठरत नाही. वरवर पाहता, झाकीर नाईक यांच्या भाषणांतून (एखाद् दुसरा अपवाद सोडता) हिंसेचा प्रचार केला जातो असे म्हणता येणार नाही. पण म्हणून त्यांच्याकडून हिंसेला उत्तेजन मिळत नाहीच, असे नाही म्हणता येत. हिंसेचा प्रसार कसा होतो याचे खोल विश्लेषण आवश्यक ठरेल. झाकीर नाईक स्वत:ला अभिमानाने मूलतत्त्ववादी म्हणवतात. आणि मूलतत्त्ववाद व हिंसा यांचे नाते घनिष्ठ असते. शिवाय मूलतत्त्ववाद काही नेहमी आयसिसच्या रूपातच समोर येतो असे नाही. तो झाकीर नाईक यांच्यासारख्यांच्या रूपातही असतो. म्हणून ते धोकादायक असतात.

झाकीर नाईक जगभर भाषणे देत असतात. या भाषणांचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यांच्या भाषणांना प्रचंड गर्दी होत असते. ते पाश्चिमात्य देशांतही व्याख्याने देतात. आधुनिक विचारसरणीच्या (मुस्लीम वा बिगरमुस्लीम) लोकांच्या प्रश्नांना जाहीर उत्तरे देतात. वरवर पाहता इतरांच्या आचार/विचाराच्या स्वातंत्र्याला मान्यता देत असतानादेखील तेच स्वातंत्र्य हिरावण्याची क्षमता असलेल्या मूलतत्त्ववादाला ते समाजमनात रुजवतात.

एका व्हिडीओमध्ये, झाकीर नाईकांना त्यांच्या ऑक्सफर्डमधील भाषणानंतर विचारण्यात येते की, तुम्ही युरोपमध्ये जसे इस्लामचा प्रचार करू शकता तसाच ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य सर्व मुस्लीम देशांमध्ये का नाही? त्यावर नाईक म्हणतात- ‘तसे स्वातंत्र्य त्या देशात का नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना जरूर विचारा.’ हे चलाख उत्तर आहे. या देशांच्या धोरणाबद्दलचे स्वत:चे मत ते सांगत नाहीत.

‘कोणत्याही निष्पाप माणसाला मारणे म्हणजे सबंध मानव जातीला मारण्यासारखे आहे अशी आपल्या धर्माची शिकवण आहे,’ असे ते जेव्हा म्हणतात तेव्हा एखादा माणूस आपला निष्पापपणा केव्हा गमावतो या विषयावर ते काहीही भाष्य करत नाहीत. ‘धर्मातराची शिक्षा मृत्युदंड आहे असे तुम्हाला वाटते का?’ अशासारखे थेट प्रश्न त्यांना विचारले गेले पाहिजेत.

नाईक यांची रणनीती अशी की, ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधुनिक मूल्यांना थेट विरोध करत नाहीत; पण चर्चेचा आधार केवळ धर्मग्रंथ हाच ठेवतात. आधुनिक मूल्यांना छेद देणारे हे चलाख राजकारण आहे.

नाईक यांना भारतीय मुसलमानांकडून वाढता विरोध, ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. ‘ते धर्मग्रंथाचा चुकीचा अर्थ सांगताहेत आणि या त्यांच्या राजकारणामुळे सबंध मुस्लीम समाज बदनाम होतो आहे.’ अशी मोठी टीका त्यांच्यावर होते आहे. यापुढील पायरी म्हणजे – चांगले काय, वाईट काय, हे ठरवण्याचा निर्णायक निकष धर्मग्रंथ हा असूच शकत नाही, हा मुद्दा समाजात रुजणे.

आज मुस्लीम समाजाची होत असलेली कोंडी आणि अस्वस्थता या विषयावरील चर्चेला धर्मग्रंथाच्या चौकटीपलीकडे नेईल का? हा आशावाद खूप भाबडा वाटू शकतो. याला कारणदेखील आहे. प्रत्यक्षात कोणताही समाज- मुस्लीमसुद्धा- धर्मग्रंथाबरहुकूम जगत नसतो. पण असे विसंगत जगणे यात काही चुकीचे नाही असे मात्र मोकळेपणाने म्हणत नसतो. असे मोकळेपणे, निधरेकपणे म्हणता येणे ही क्रांतिकारी गोष्ट ठरेल. ही कदाचित नजीकच्या भविष्यकाळातील घटना ठरणार नाही. यापुढील एक मोठा काळ मुस्लीम समाजात झाकीर नाईकसारखे मूलतत्त्ववादी आणि इतर मुस्लीम नेते यांच्यात धर्मग्रंथाचे अर्थ लावण्याच्या पातळीवर वादंग होत राहतील. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधुनिक मूल्याचे समर्थन धर्माच्या चौकटीत करण्याचे प्रयत्न चालू राहातील. कारण मूलतत्त्ववाद ही सबंध मुस्लीम समाजासाठी एक गंभीर समस्या म्हणून उदयाला आली आहे याची जाणीव या समाजात वाढत आहे.

हिंदू धर्मसुधारणा आणि ग्रंथप्रामाण्य मानणाऱ्या धर्मातील (इस्लाम/ ख्रिस्तीधर्म) सामाजिक सुधारणा यातील फरकाबद्दल पुरोगामी, सेक्युलर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी एक मोलाचे निरीक्षण नोंदवले आहे. हिंदू धर्माला धर्मग्रंथाचा किंवा ‘चर्च’सारख्या संस्थेचा आधार नाही. याउलट इतर दोन धर्मात ग्रंथ, संस्था यांच्या रूपाने एक गंडस्थळ आहे. एकदा का या गंडस्थळावर आधुनिकतेचा वैचारिक हल्ला झाला की सबंध समाज झपाटय़ाने आमूलाग्र बदलण्याची शक्यता असते. पण असा वैचारिक हल्ला होण्याची कुरुंदकरांनीच नोंदवलेली पूर्वअट म्हणजे ही लढाई आधुनिकता विरुद्ध धर्मसत्ता किंवा  सेक्युलॅरिझम विरुद्ध धर्मसत्ता अशीच असली पाहिजे. त्यामुळे सेक्युलर लोकांना ‘सिक्युलर’ म्हणणे, ‘पुरोगामी’ शब्दाला दुसरी बदनामीकारक विशेषणे लावणे आणि हे शब्दच राजकीय दृष्टय़ा निष्प्रभ करणे ही सेक्युलॅरिझम विरुद्ध धर्मसत्ता या लढाईचे समूहवादाच्या लढाईत रूपांतर करण्याची राजकीय खेळी आहे हे आधी ओळखले पाहिजे. आजच्या काळात मुस्लीम मूलतत्त्ववादाला प्रतिक्रिया देण्याच्या नावाखाली ही धूर्त खेळी परिणामकारक ठरते, परंतु त्यामुळे मूलतत्त्ववाद्यांना हवे तेच घडते.

या लढाईत सेक्युलर लोकांपुढील आव्हान आजच्या जागतिकीकरण झालेल्या जगात जास्तच कठीण आहे. कारण त्यांना ज्या मूलतत्त्ववादी विचारसरणीचा सामना करायचा आहे, ती विचारसरणी जागतिकीकरणाच्या गतिमान आणि म्हणून काहीशा ‘गोंधळ’सदृश भासणाऱ्या जगात माणसाच्या जगण्याला मोठे प्रयोजन किंवा अर्थपूर्णता देते, असे दिसते. आपण ज्याला अतिरेकी म्हणतो तो स्वत:ला ईश्वराच्या सर्वात जवळ असल्याचे समजत असतो. म्हणून स्वत:चे मरण ही त्याला क्षुल्लक गोष्ट वाटत असते. जगण्यास अर्थपूर्णता असावी असे वाटणे ठीक, पण अनेक कारणांमुळे आजच्या काळात ती अर्थपूर्णता, प्रयोजन हे ईहवादी मार्गाने मिळवणे हे अनेकांना अशक्य होते. आपल्या जीवनात आपण अयशस्वी आहोत अशीही अनेकांची धारणा असते. म्हणून मूलतत्त्ववादाच्या आकर्षणाला तरुण बळी पडतात. ते आकर्षण कमी कसे करता येईल, हा मोठाच आव्हानात्मक प्रश्न आहे. गुंतागुंतीचा आहे. पण त्यालाच भिडले पाहिजे. हे करताना इस्लामी मूलतत्त्ववादाचीही कठोर चिकित्सा झाली पाहिजे. पण कोणत्याही प्रकारे एक समूह विरुद्ध दुसरा समूह असे या लढाईचे रूपांतर होऊ देणे म्हणजे सेक्युलॅरिझम विरुद्ध धर्मसत्ता या लढाईत सेक्युलॅरिझमचा पराभव होऊ देणे ठरेल.

हिंसेला थेट प्रोत्साहन देणाऱ्या वाक्यावरून झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालता येईल आणि शिक्षादेखील करता येईल. ती झालीच पाहिजे, पण ते पुरसे नाही.  झाकीर नाईक यांच्या विचारसरणीचा पाडाव होणे आवश्यक आहे. शिवसेनेसारखा पक्ष नाईकच्या फोटोला चपला मारू शकतो, आपली मते वाढवू शकतो. पण त्याच्या विचारसरणीचा पाडाव नाही करू शकत. कारण हा पक्ष समूहवादी (हिंदुत्ववादी) आहे. उलट आज मुस्लीम समाजातूनच नाईक यांच्यावर होत असलेला हल्ला जास्त मोलाचा आहे. त्याला उत्तेजन मिळाले पाहिजे. त्यातून, एकविसाव्या शतकातील जीवनाच्या अर्थपूर्णतेची उत्तरे आपल्याला सातव्या शतकातील धर्मग्रंथात नाही शोधता येणार, ही जाणीव वाढण्याची आशा बाळगली पाहिजे.

बाराव्या शतकातील सेंट अ‍ॅक्विनासने ख्रिस्ती धर्मश्रद्धेचे समर्थन तर्काच्या आधारे देण्याचा प्रयत्न केला. धार्मिक लोकांनी त्याला समजावले की, श्रद्धेच्या प्रांतात तर्क आणू नये; पण अ‍ॅक्विनास बधला नाही. आणि याचा परिणाम म्हणून अ‍ॅक्विनासला नेमके नको होते तेच झाले. त्याला तार्किक वाटलेली मांडणी तर्काच्याच निकषावर खोडली गेली. परिणामी, जे लोक श्रद्धेने ख्रिस्ती धर्म संकल्पना मानत होते तेदेखील सेक्युलर बनले. धर्मसत्तेची समाजमनावरील पकड खिळखिळी होण्यातील हा एक मोठा टप्पा होता.

नरहर कुरुंदकरांच्या भाकिताला आधार पुरवणारी इतिहासातील ही एक घटना. अशी घटना नजीकच्या भविष्यात घडण्याची शक्यता दिसत नाही; पण आजच्या मळभ दाटलेल्या जगात अशी आशा बाळगायला काय हरकत आहे? निदान त्या दिशेने जाण्याच्या क्षीणपणे का होईना, चालू असलेल्या प्रयत्नांना बळ देण्याचे काम झाले पाहिजे. झाकीर नाईक प्रवृत्तींचा सामना सेक्युलॅरिझमच्या हत्याराने केला पाहिजे. समूहवादाच्या अनैतिक हत्याराच्या वापरामध्ये मूलतत्त्ववाद्यांचे यश निश्चित आहे.

milind.murugkar@gmail.com